लैंगिकता संस्कार

Sex_education.
Sex_education.

आजच्या मानवाचा प्रवास सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी सुरू झाला आहे, असे मानववंशशास्त्र सांगते. भौतिकदृष्टीने सर्वांत प्रगत मानवजात पृथ्वीवर वास्तव्य करीत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार आहे. मानवजातीच्या एकूणच विकासासाठी एवढा मोठा कालावधी जाऊ द्यावा लागला. आणि विकासाच्या या विविध टप्प्यांमध्ये लैंगिक प्रेरणा आणि लैंगिकता यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणजे सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सिग्मंड फ्रॉइड असे म्हणतात की, एकूणच जीवनाच्या दोन प्रमुख अंतप्रेरणा (इन्स्टिंक्‍ट) आहेत; पहिली नीड ऑफ सर्व्हायवल म्हणजे जगण्याची गरज आणि दुसरी म्हणजे पुनरुत्पादन म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची प्रेरणा. आणि स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची प्रेरणा ही लैंगिक संबंधातून होत असते. सोबतच या लैंगिक संबंधांतून आनंद (प्लेजर) प्राप्त होतो. सजीवांच्या चार पाशवी प्रेरणा म्हणजे भय-निद्रा-भूक-मैथून यामध्येही मैथुनाला म्हणजे लैंगिक संबंधांना आणि सहज समजेल अशा शब्दांत सांगायचे तर सेक्‍सला विशेषत्वाने महत्त्व दिले आहे.
संघटित समाजाची निर्मिती होण्यापूर्वी माणूस टोळ्या करून राहत असे. त्यावेळी लैंगिक संबंधांमध्ये मुक्तपणा असायचा. जो आज आपण प्राण्यांमध्ये बघतो, अगदी तसाच! कुणाचेही कुणासोबत लैंगिक संबंध स्थापित होत असत. कालांतराने माणूस स्थिरावू लागला, शेती करू लागला आणि समाजाची सूत्रे पुरुषांच्या हाती आली आणि पितृसत्ताक पद्धतीचा उदय झाला. तेव्हा मानवाला कळू लागले की, या जन्माला आलेल्या बाळाचा पिता मी आहे. मालकी हक्क सांगितल्या जाऊ लागले व समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये "मी'ने फार महत्त्वाची भूमिका बजावली.
समाजाचा लैंगिक व्यवहार कसा होता, हे बघताना आपल्याला आढळेल की, एकेकाळी समाजात पॉलीगामी (एकाहून अधिक महिलांशी लैंगिक संबंध) आणि पॉलीऍन्ड्री (एकाहून अधिक पुरुषाशी लैंगिक संबंध) या प्रथा प्रचलित होत्या. आपणास समाजाचे महत्त्वही समजून घ्यावे लागेल. समाजात सुरक्षा प्राप्त होते. त्यामुळे समाज ही मानवाची गरज आहे. आणि सुरक्षित वातावरणात आपला वंश वाढविण्यासाठी आणि सुरळीत, सहज व भयमुक्त जीवन जगण्यासाठी समाजाने आखून दिलेले नियम पाळण्याची गरज मानवाला निर्माण झाली. आणि पॉलीअँड्री व पॉलीगामीसारख्या प्रथा नष्ट झाल्या. मग समाजाने स्वतःचे काही नियम तयार केले. नीती-अनीतींच्या चौकटीतीलच ते नियम असतात, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे एकूणच मानवी व्यवहारांचे नियमन करण्यात आले. त्यास रेग्युलेशन ऑफ बिहेव्हियर असे म्हणू शकतो. जेव्हा मानवी व्यवहारांचे नियमन करण्यात आले तेव्हा स्वाभाविकतः लैंगिक व्यवहारांचे नियमन झाले. म्हणजे लग्न आणि मानवी संस्कारातून त्या बाबी समाजाने स्वीकारल्या. म्हणजे लैंगिक व्यवहारांच्या नियमनाचा एक भाग म्हणजे लग्न होय. मग स्त्री आणि पुरुष यांच्याही जगण्याचे नियम समाजाने ठरविले. पुरुषाने आणि स्त्रियांनी कसे कपडे घालायचे, कशाप्रकारे वागायचे वा बोलायचे आदी नियम ठरविल्या गेलेत. या प्रक्रियेला एकूणच प्रक्रियेला सोशलायजेशन म्हणजे सामाजिकीकरण असे म्हणतात. आता व्यवहारांचे नियमन झाल्याने लैंगिक व्यवहारातही बंधने आलीत. पूर्वी लैंगिक संबंधात मुक्त व्यवहार होत असे. संस्काराने त्यावर बंधने नियंत्रण आणले. समान वंशाच्या वा नातेवाइकांमध्ये लैंगिक संबंध नको, अशीही बंधने जगातील जवळपास सर्वच समाजाने स्वतःवर लावून घेतली. त्यामुळे लैंगिक संबंधांचे नियमन करण्यात समाजाचा मोठा वाटा आहे. आणि लैंगिकतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लैंगिक संबंधांमध्ये चांगले काय आणि वाईट काय, यामध्ये कालसापेक्ष बदल होत असतो. त्यामुळे लैंगिकता ही कालसापेक्ष असते. जसे पूर्वीच्या काळी असलेला अमुक प्रकारचा लैंगिक व्यवहार आज कदाचित नाकारल्या गेला आहे, अथवा त्यास वाईट म्हटले आहे.
आता समाजाने लैंगिक व्यवहारावर नियंत्रण आणले असले, तरी लैंगिक भावना या तशाच कायम आहेत. आणि जीनमधून एका पिढीतून दुसऱ्या पिढीत त्याचे वहन होत आहेच. मात्र, आताच्या काळात जेव्हा माहितीचा स्फोट झाला आहे, समाजात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे संस्कार कमी पडत असताना, सोशल मीडिया आणि अन्य दृकश्राव्य माध्यमांमध्ये लैंगिक भावना चाळविण्याची माध्यमे उपलब्ध असताना मुक्त लैंगिक प्रेरणा पुनःश्‍च वर डोके काढू पाहत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुन्हा एकदा स्वैराचार वाढल्याचे आपल्याला समाजात दिसतच आहे. हे त्याचेच प्रतीक आहे. अशावेळी लैंगिक संस्काराचे महत्त्व खऱ्या अर्थाने अधोरेखित करावे लागते. पुढील भागात त्यासंबंधी विस्तृत जाणून घेऊ या.

-डॉ. संजय देशपांडे
लैंगिक विकारतज्ज्ञ, नागपूर.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com