'बाईचं गाणं हेलावून टाकणारं हवं' (शैला दातार)

शैला दातार
रविवार, 1 एप्रिल 2018

माझ्या आई-वडिलांचं (मनोहर आणि लीला सरदेसाई) "मनोहर संगीत विद्यालय' होतं. माझे वडील तबला आणि पेटी शिकवायचे, तर आई गाणं शिकवायची. रामकृष्ण पर्वतकर यांच्याकडून माझे वडील तबला शिकले होते, तर बाळकोबा गोखले यांच्याकडून पेटी शिकले होते. विनायकबुवा पटवर्धन व केशवराव भोळे यांच्याकडून आई गाणं शिकली होती. ती "संगीत-अलंकार'ही होती. आईला शास्त्रीय संगीताचं ज्ञान चांगलं होतं. या कारणानं घरात दिवसभर फक्त सांगीतिक वातावरण असायचं. अगदी लहान वयात मला अनेक रागांची व त्यांच्या वादी-संवादी स्वरांची माहिती झाली होती. "संगीत-विशारद'पर्यंतचा अभ्यासक्रम आम्हा तिन्ही बहिणींना तोंडपाठच होता.

माझ्या आई-वडिलांचं (मनोहर आणि लीला सरदेसाई) "मनोहर संगीत विद्यालय' होतं. माझे वडील तबला आणि पेटी शिकवायचे, तर आई गाणं शिकवायची. रामकृष्ण पर्वतकर यांच्याकडून माझे वडील तबला शिकले होते, तर बाळकोबा गोखले यांच्याकडून पेटी शिकले होते. विनायकबुवा पटवर्धन व केशवराव भोळे यांच्याकडून आई गाणं शिकली होती. ती "संगीत-अलंकार'ही होती. आईला शास्त्रीय संगीताचं ज्ञान चांगलं होतं. या कारणानं घरात दिवसभर फक्त सांगीतिक वातावरण असायचं. अगदी लहान वयात मला अनेक रागांची व त्यांच्या वादी-संवादी स्वरांची माहिती झाली होती. "संगीत-विशारद'पर्यंतचा अभ्यासक्रम आम्हा तिन्ही बहिणींना तोंडपाठच होता. माझ्या जन्माच्याही आधी पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे आमच्या घरी यायचे. त्यांची गाणी आमच्या घरी होत असत, असं मला आई-बाबांनी सांगितलं.

डॉ. वसंतराव देशपांडे यांची आणि माझ्या वडिलांची मैत्री होती. मॅट्रिकनंतर मी त्यांच्याकडं गाणं शिकायला गेले. वडिलांच्या इच्छेनुसार वसंतरावांनी मला दीनानाथांचं गाणं शिकवण्यापासून सुरवात केली. ही माझी वसंतरावांकडची पहिली शिकवणी. वसंतरावांनी कोणतीही आडकाठी न ठेवता मला 15-20 गाणी अगदी मनापासून शिकवली.

सन 1969 मध्ये "स्वरानंद' या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या "चैत्रबन' कार्यक्रमातही मी गायची. विश्वनाथ ओक यांनी मला या कार्यक्रमाच्या दृष्टीनं माणिक वर्मा यांची गाणी योग्य असल्याचं सुचवलं. स्वरपट्टीत फरक पडत असल्यानं, वसंतरावांनी मला माणिकबाईंकडं शिकायला परवानगी दिली. सन 1980 ते 1984 अशी चार वर्षं मी माणिकबाईंकडं शिकले. पुढं 1996 पर्यंत म्हणजे माणिकबाईंच्या अखेरच्या श्वासापर्यंत मला त्यांचा सहवास लाभला. एकूण 16 वर्षं. मी रेल्वेचा पास काढला होता. मी दर बुधवार-गुरुवार पुण्याहून मुंबईला जायची.

मला गाणं शिकवताना माणिकबाईंनाही खूप आनंद व्हायचा. त्यांची शिकवण्याची पद्धत त्यांच्या सारखीच सरळ, निर्मळ आणि मधुर होती. सुरांवर त्यांचं फार बारीक लक्ष असे. मला त्यांच्याबद्दल खूप आदरयुक्त भीती वाटायची. त्यांचं गाणं हे माझ्या दृष्टीनं फार आदर्श गाणं होतं. त्या नेहमी सांगायच्या ः "बाईचं गाणं कसं मार्दवयुक्त आणि सोज्वळ असावं. आपलं गाणं श्रोत्यांना हलवून सोडेल असं होऊ न देता, ते हेलावून टाकेल, असं झालं पाहिजे.' "काळी चार'मध्ये गायलेलं त्यांना फार आवडायचं. "पहाटे खर्जाची मेहनत बाईनं फक्त पंचमापर्यंत करावी, तसंच फुगा फुगवताना तो फुटणार नाही याची आपण जशी काळजी घेत घेत फुगवतो, अगदी तस्सा "षड्‌ज' लावायला हवा,' असं त्यांचं मत होतं.

पुढं पंडित गजाननबुवा जोशी यांच्याकडंही शिकण्याचा माझा योग जुळून आला. त्यांच्या सर्व बंदिशी भास्करबुवांच्या वहीतल्या होत्या, याचा मला सर्वाधिक आनंद झाला. समेवर सहजतेनं येण्याची बुवांची खासियत होती. "कुठून तरी आलो म्हणून तुमच्याकडं आलो असं नव्हे, तर तुमच्याकडंच यायचं होतं म्हणून आलो', असं समेवर यायला हवं, हे त्यांनी आम्हाला शिकवलं.

दरम्यानच्या काळात पंडित मल्लिकार्जुन मन्सूर हे आम्ही जिथं राहायचो, त्या बाक्रे यांच्याकडं वरचे वर येत असत. त्यांच्याकडूनही मला खूप काही शिकायला मिळालं. स्वतः गायलेल्या 92 रागांचं रेकॉर्डिंग मन्सूर यांनी आम्हाला अगदी आनंदानं दिलं. "हे आपण भास्करबुवांच्या नातवाला व नातसुनेला देतो आहे,' याचं समाधान त्यांना असायचं.

छोटा गंधर्व यांच्या शिकवणीमधून माझा "किर्लोस्कर', "देवल', "कोल्हटकर', "टेंबे' यांच्या संगीताचा अभ्यास झाला. त्यांच्या भेटीचा योग एका विचित्र घटनेनं आला. छोटा गंधर्व यांचा एकुलता एक मुलगा चंदा (शिवप्रसाद) हा अचानक गेल्यानं ते खूप अस्वस्थ व बेचैन होते. त्यांची पत्नी मला एकदा म्हणाली ः ""ते सध्या एकटे बसून असतात, तुमच्याकडं आल्यावर त्यांचा वेळ जाईल.'' त्यानुसार मी त्यांच्याकडंही शिकले.

सन 1996 मध्ये "सवाई गंधर्व महोत्सवा'चं मला आमंत्रण आलं. माणिकबाईंना जाऊन त्या वेळी बरोबर एक महिना झाला होता. रामभाऊ जोशींच्या आग्रहावरून मी माणिकबाईंना श्रद्धांजली म्हणून "सवाई'त जोगकंस हा राग गायला. मैफलीची सांगता मी "सावळाच रंग तुझा' या माणिकबाईंच्या गाण्यानं केली. "सवाई'मधल्या रसिक-श्रोत्यांची "वन्स मोअर'सह उत्स्फूर्त मिळाली. माझ्या सांगीतिक प्रवासात ही दाद खूप मोलाची आहे.

भास्करबुवा बखले यांची संपूर्ण माहिती मिळेल, असं त्यांचं एकही पुस्तक उपलब्ध नव्हतं.
श्री. ना. पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली 16 वर्षं संशोधनात्मक काम करून मी बखलेबुवांवरचं "देवगंधर्व' हे चरित्रात्मक पुस्तक लिहिलं.

(शब्दांकन ः रवींद्र मिराशी)

Web Title: shaila datar write artilcle in saptarang