अयोध्याकांड आणि हिंदुत्वाचे राजकारण

Babri Masjid
Babri Masjid

येत्या 6 डिसेंबरला बाबरी मशिदीचं पतन झाल्याला पंचवीस वर्षे पूर्ण होतील. 6 डिसेंबर 1992 पूर्वी, स्वातंत्र्यानंतर चाळीस वर्षांहून जास्त काळ हिंदुत्ववाद हा भारतीय राजकारणाच्या परिघावर होता. मात्र त्यानंतर 25 वर्षांच्या आत या पक्षानं लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवलं, एवढंच नाही तर या पक्षाचा सर्वोच्च नेता हा आज देशातील सर्वांत लोकप्रिय नेता आहे. एका अर्थानं हिंदुत्वाच्या राजकारणाचं हे यशच आहे. मात्र हे यश केवळ निवडणुकांपुरतंच मर्यादित नाही तर हिंदुत्व हा आज भारतीय राजकारणातील सर्वसहमतीचा, मध्यभूमीचा मुद्दा झालाय, हे वैचारिक-राजकीय यश जास्त महत्त्वाचं. मात्र या यशाबरोबरच हिंदुत्व-भाजपच्या राजकारणासमोर उभी असलेली काही आव्हानं; तसेच हिंदुत्वाच्या राजकारणाने भारतीय लोकशाहीसमोर निर्माण केलेली आव्हानं यांचाही विचार करावा लागेल. 

सुरवातीला हिंदुत्वाच्या राजकीय यशाविषयी. मात्र याविषयी विवेचन करताना, हे यश केवळ हिंदुत्वाचं नाही हे लक्षात येऊन त्यातल्या अनेक मनोरंजक विसंगती, गुंतागुंती पुढे येतात. म्हणजे राम मंदिराच्या विखारी आंदोलनाच्या आधारावर भाजपची राजकीय ताकद प्रचंड वाढली. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा मिळविणारा हा पक्ष 1996 च्या निवडणुकीत 161 जागांपर्यंत पोचला. एवढंच नाही तर तोपर्यंत शहरी मध्यमवर्ग, व्यापारी, उच्च जाती यांच्यापुरताच मर्यादित असलेला हा पक्ष त्या पलीकडे जाऊन ओबीसी-दलित या हिंदूधर्मातील "बहुजन', "शोषित' जनतेचाही पाठिंबा मिळवू लागला. मात्र दुसरीकडून याच काळात उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या मोठ्या उत्तर भारतीय राज्यांत ओबीसी-दलित या समाजगटांचे सामाजिक न्यायाचे, सत्तेवर दावा सांगणारे वेगळे राजकारण सुरू झाले. यातूनच 1990 च्या दशकाच्या पहिल्या भागात धर्मनिरपेक्षता विरुद्ध हिंदू-जमातवाद असं भारतीय राजकारणाचं चित्र काही पत्रकार आणि अभ्यासक यांनी उभं केलं. मात्र या कथनातील फोलपणा लवकरच पुढे आला.

उत्तर प्रदेशात मायावतींनी, तर बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपशी आघाडी-युती केल्यामुळे या तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकारणातील फाटाफूट स्पष्ट झाली. यापुढे जाऊन भाजपने लवकरच अनेक जाती-आधारित, प्रादेशिक, धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करून केंद्रातील सत्तेवर दावा सांगितला. ही या आघाडीमुळे भाजपच वाजपेयींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आलं. मात्र ही आघाडी करण्यासाठी पक्षाला अयोध्येत राममंदिर बांधणे, समाननागरी कायदा आणि घटनेचे 370वे कलम रद्द करणे हे आग्रही हिंदुत्ववादी कार्यक्रम बासनात गुंडाळून ठेवावे लागले. हे होण्यामागे, अंतिमतः भारतीय लोकशाही राजकारणाचे एक खास लक्षण कारणीभूत होते. ते म्हणजे कोणताही टोकाचा आग्रही विचार मांडणारा पक्ष या देशाच्या लोकशाहीतून सत्तेत येऊ शकत नाही. त्यासाठी मध्यममार्गी पक्ष होणं हे गरजेचं असतं. एका अर्थानं, भारतीय लोकशाहीच्या गुंतागुंतीतून येणाऱ्या सक्तीमुळं पक्षाला ही आगतिकता आलेली होती. लोकशाही राजकारणाशी असलेल्या भाजपच्या या वाटाघाटी, मोदींना हिंदुत्वाचा नेता म्हणून पुढे न करता "विकास पुरुष' म्हणून प्रोजेक्‍ट करण्याच्या प्रक्रियेतूनही बघता येतात. 

निवडणुकांच्या राजकारणापलीकडे जाऊन पाहिल्यास भारतीय लोकशाहीशी हिंदुत्वाचं ताणाचं असलेलं नातं दिसतं. एक म्हणजे, वरवर पाहता हिंदुत्व हे पारंपरिक, मागास वाटत असलं, तरी आधुनिकतेशी त्याचं एक घट्ट नातं आहे. म्हणजे एकच एक सामाजिक आधार घेऊन राष्ट्रनिर्मिती करण्याचा युरोपीयन राष्ट्रांचा प्रयोग हा हिंदुत्वाचा आदर्श आहे. त्यातून भारतातील अनेक धर्म, जाती, भाषा यांमुळे असलेली सामाजिक गुंतागुंत आणि राष्ट्रनिर्मिती यांची सांगड कशी घालायची असा हिंदुत्ववाद्यांपुढील प्रश्‍न आहे. त्यामुळेच काश्‍मीर प्रश्‍नातील गुंतागुंत दाखविणाऱ्यांना देशद्रोही ठरवणं; "भारत माती की जय' म्हणणं हाच देशभक्तीचा एकमेव बालिष निकष समोर ठेवणं अशी राष्ट्रवादाची नवी मांडणी हा पक्ष गेले काही महिने करीत आहे. या राष्ट्रवादी मांडणीतून येणाऱ्या प्रच्छन्न लोकशाही विरोधापलीकडे हिंदुत्वाच्या विचारसरणीत थेटपणे लोकशाहीविरोधी भूमिकाही आहे. ही भूमिका म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं या विचारसरणीचं उद्दिष्ट यात धार्मिक अल्पसंख्यकांना बहुसंख्य हिंदूंचा शत्रू मानणे, त्यांच्यात असुरक्षितता निर्माण करणे, त्यांना दुय्यम दर्जा देणे या गोष्टी तर आहेतच. पण त्यापलीकडे जाऊन, हिंदुत्ववादाचा हा प्रकल्प एकसाची, अधिकृत "हिंदू' असण्याची मांडणी करीत असल्यामुळे या मांडणीत न बसणाऱ्या, बहुविधतेचं आयुष्य जगणाऱ्या हिंदूंसाठीही तो घातक आहे. त्यामुळेच मग गोमांस प्रकरणांवरून फक्त अल्पसंख्याकांवरच हल्ले होत नाहीत, तर उनासारख्या ठिकाणी दलितांवरही हल्ले होतात.

हिंदुत्ववादातील आणखी एक विसंगती म्हणजे, एका बाजूला ही विचारसरणी हिंदूंना एका प्रकारचा राजकीय आत्मविश्‍वास देते असं वाटतं. मात्र त्याचबरोबर थोडसं खोलात जाऊन पाहिलं तर असं दिसतं, की हिंदूंच्या रोजच्या जगण्यातल्या धर्माशी या विचारसरणीचा फारसा संबंध नाही. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे, कोणत्याही धर्मीयांप्रमाणेच हिंदूंच्या या रोजच्या जगण्यात धर्माचं नातं हे नैतिकतेशी, मानसिक स्वास्थ्य राखण्याशी असतं. मात्र हिंदुत्ववादी विचारसरणी हिंदूंच्या मनात अल्पसंख्याकांविषयी द्वेष, असुरक्षितता भरवून देऊन हे नातं विस्कळित करते. 
पुढच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी राजकारणाचा विजय किंवा पराभवही होईल. पण त्यापलीकडे जाऊन धर्मनिरपेक्षताही पक्षांना आज हिंदुत्ववादाला मिळालेल्या सर्वमान्यतेचा सामना करायचा असेल, तर आपलं राजकारण आमूलाग्र बदलावं लागेल. मुसलमानांच्या राजकारणात मुलाल-मौलवींना बाजूला करून त्यांच्या ठोस आर्थिक-सामाजिक समस्यांवर काम करावं लागेल. शिवाय हिंदू आणि इतर धर्मातील, दैनंदिन जगण्याच्या धार्मिकतेशी आपल्या धर्मनिरपेक्षतेची मोट बांधावी लागेल, त्यापासून धर्मनिरपेक्षतेला शिकावं लागेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com