लीगब्रेकर ते मॅचविनर...

एप्रिल-मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले होते. प्राणवायूपासून औषधांपर्यंत सर्वत्र हाहाकार सुरू होता अशा वेळी स्टेडियममध्ये आयपीएलचा फड रंगत होता.
varun chakravarthy
varun chakravarthysakal

एप्रिल-मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले होते. प्राणवायूपासून औषधांपर्यंत सर्वत्र हाहाकार सुरू होता अशा वेळी स्टेडियममध्ये आयपीएलचा फड रंगत होता. अखेर एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर आणखी एका संघातील दोन जण बाधित झाले आणि आयपीएल स्थगित झाली. कोरोना झालेला तो पहिला खेळाडू होता कोलकाता येथील वरुण चक्रवर्ती ! म्हणून त्याला `लीगब्रेकर` म्हणून हिणवण्यात आले. योगायोग बघा स्थगित झालेली आयपीएल सुरू झाली आणि त्याच्या कोलकाता संघाच्या पहिल्याच सामन्यात तो मॅचविनर झाला. आयपीएल स्थगित झालेला मे महिना आणि आता पुन्हा स्पर्धा सुरू झाली तो सप्टेंबर महिना. हे चार महिने वरुणसाठी त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी फलदायी ठरले आहे. मुळात मुख्य संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असताना दुसऱ्या फळीच्या संघाला श्रीलंकेत मर्यादित षटकांची मालिका खेळण्याची संधी मिळाली त्यात वरुण होता. इतकेच नव्हे तर तेथे केलेल्या कामगिरीला प्राधान्य देत निवड समितीने त्याची थेट ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड केली ती अनुभवी युजवेंद्र चहलला वगळून !

वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता असलेला आणि फलंदाजांचा संभ्रम निर्माण करणाऱ्या अशा फिरकी गोलंदाजांना मिस्ट्री गोलंदाज म्हटले जाते. विश्वकरंडक स्पर्धेसाठी चहलला वगळून वरुणला पसंती देण्यात आल्यानंतर तो जास्तच चर्चेत आला. त्यातच आयपीएलच्या या दुसऱ्या टप्यात त्याने विराट कोहलीच्या बंगळूर संघाची दाणादाण उडवली आणि दस्तूर खुद्द विराट कोहलीने त्याचे कौतूक केले.

असा गोलंदाज विश्वकरंडक स्पर्धेसाठी फायदेशीर ठरेल तसेच अशा गोलंदाजांमुळे भारताची दुसरी फळीही किती सक्षम आहे हे स्पष्ट होते अशा प्रकारे वरूणचे कौतुक विराटने केले होते. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया. विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवडताना कर्णधार या नात्याने विराट कोहलीचे मत महत्वाचे ठरते त्याने त्याच्या बंगळूर संघातून खेळत असलेल्या चहलऐवजी वरुणला पसंती दिली यातच वरूणची उपयुक्तता लक्षात येते.

कसा झाला मिस्ट्री गोलंदाज

वरूण जसा मिस्ट्री गोलंदाज आहे तसा त्याचा विश्वकरंडक स्पर्धेतही स्थान मिळवण्याचा प्रवास अनपेक्षितच आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सतराव्या वर्षापर्यंत तो यष्टिरक्षक फलंदाज होता. पण त्यात चांगली क्षमता नसल्यामुळे त्याला वेळोवेळी विविध वयोगटातून वगळण्यात येत होते.आपल्याला काही हे जमणार नाही असा विचार करून त्याने क्रिकेट सोडून शिक्षणाकडे लक्ष दिले. चेन्नईतील एका प्रतिथयश विद्यापीठातून पाच वर्षे आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण केले, पुढे काही वर्षे नोकरी केली. पण क्रिकेट खेळण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. टेनिस क्रिकेट खेळता खेळता चेन्नईतील एका क्लबमधून मध्यमगती गोलंदाज म्हणून खेळण्यास सुरुवात केली. क्लबमधील दुसऱ्याच सामन्यात त्याचा गुडघा दुखावला, बराच काळ पुन्हा क्रिकेटपासून दूर रहावे लागले. त्यानंतर वेगवान गोलंदाजीत गुडघा दुखापतीचा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून तो फिरकी गोलंदाज झाला

दुखापतीनंतर त्याने क्लबही बदलला २०१७-१८ मध्ये चेन्नई लीगमध्ये चौथ्या श्रेणीत खेळताना त्याने सात सामन्यात ३१ विकेट मिळवल्या इतकेच नव्हे तर तो चांगली फलंदाजीही करू शकत असल्यामुळे एका सामन्यात ७४ धावांची खेळी करून स्वतःच्या क्लबला एका धावेने विजय मिळवून दिला.

आयपीएलशी आधीच ओळख

२०१८ मध्ये तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये त्याने आपल्या जादूई फिरकीने सिचेम मदुराई संघाला विजेतेपद मिळवून दिले. या तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये खेळण्याअगोदर त्याची आयपीएलशी ओळख झाली होती.

चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या चेन्नईतील सरावात तो नेट गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत होता. पण पाण्याच्या संकटावरून चेन्नईत आंदोलने सुरू झाल्यावर फ्रँचाईजने चेन्नई संघाचा मुक्काम पुण्यात हलवला पण वरूणसाठी दुसरा मार्ग उघडला. मुळचा चेन्नईचा असलेला परंतु कोलकाता संघाचा कर्णधार असलेल्या दिनेश कार्तिकने कोलकाता संघाच्या नेटमध्ये गोलंदाजी करण्यास वरूणला तेथे नेले तेथे त्याला वेस्ट इंडीजचा मिस्ट्री गोलंदाज सुनील नारायणाशी संवाद साधण्याची आणि त्याच्याकडून शिकण्याची संधी मिळाली.

वरूणच्या गोलंदाजीबाबत आता फ्रँचाईसमध्ये चर्चा होऊ लागली होती, मुंबई इंडियन्सच्या नेटमध्येही त्याने नेट गोलंदाज म्हणून गोलंदाजी केली होती.

वरूणची विविधता ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन आणि तिरकस हाताने यॉर्क

अपयशी सुरवात : अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हणतात, वरूणसाठी असेच घडले असावे. आयपीएलमध्ये नेट गोलंदाज म्हणून चाचणी झाल्यावर २०१९ पंजाब संघाने तब्बल ८.४ कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले. पण पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या पहिल्या षटकात २५ धावा दिल्या. पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाने पहिल्या षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा उच्चांक वरूणच्या नावावर नोंदला गेला. २०२० मध्ये कार्तिकने संघ व्यवस्थापनाकडे आपले वजन वापरून वरूणला कोलकाता संघात घेतले आणि दुबईत दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात वरूणने २० धावांत ५ विकेट अशी कामगिरी केली.

दुखापतींवर लक्ष हवे : वरूणच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्याला दुखापतीने वारंवार सतावले आहे गतवर्षी त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी निवड झाली होती, परंतु ऐनवेळी दुखापत झाली आणि तो दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतही निवड होऊन तो खेळू शकला नव्हता अखेर काही महिन्यांपूर्वी श्रीलंका दौऱ्यात त्याचे पदार्पण झाले.

`कुलदीप यादव` होऊ नये... : काही वर्षांपूर्वी अशीच चर्चा कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजाचीही होती. चायनामन गोलंदाज म्हणून त्याने अनेकांचे धाबे दणाणून सोडले होते. मिस्ट्री गोलंदाज म्हणून त्याची ओळख होती, तोही कोलकाता संघातून खेळत होता, परंतु आयपीएलच्या एका सामन्यात मोईन अलीने त्याची धुलाई केली आणि एका षटकांत २७ धावा काढल्या त्यामुळे कुलदीपचा आत्मविश्वास कमालीचा खचला त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर झाला. बिच्चारा कुलदीप आता पाठीमागे पडला. वरूणबाबत असे घडू नये हीच अपेक्षा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com