ऋणानुबंध पदकांच्याही पलीकडचा

एकमेकांत गुंतलेली पाच वर्तुळं, ही ऑलिंपिकची सर्वांत पहिली ओळख. पाच खंडांचं प्रतिनिधित्व दाखवणारी ही वर्तुळं उगाचच एकमेकांत दाखवलेली नाहीत.
Relation
RelationSakal

एकमेकांत गुंतलेली पाच वर्तुळं, ही ऑलिंपिकची सर्वांत पहिली ओळख. पाच खंडांचं प्रतिनिधित्व दाखवणारी ही वर्तुळं उगाचच एकमेकांत दाखवलेली नाहीत. खेळ तर होतच असतो; कोणी जिंकत असतं, कोणी पराभूत होत असतं, तर कोणी ऑलिंपिकमध्ये खेळायला मिळणं यातच समाधान मानत असतं. पण यापलीकडंही या ऑलिंपिकचं महत्त्व आहे. खेळाच्या निमित्तानं का होईना, अख्खं जग एकत्र येत असतं. तिथं प्रतिनिधित्व करणारे ( पात्र ठरलेले) काही देशांचे खेळाडू मोजकेच असतील; पण त्या खेळाडूंच्या निमित्तानं तो देशही जगाच्या जवळ आलेला असतो. ऑलिंपिक हे निमित्त आहे; पण त्यामुळं बरंच काही घडत असतं. दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यातील द्वेषाचा इतिहास असला, तरी आत्ता दक्षिण कोरियाचे खेळाडू जपानमध्ये खेळत आहेत आणि जपानही त्यांचं तेवढंच आदरातिथ्य करत आहे. या खेळाडूंमध्ये खेळता खेळता कधी मैत्रीचं नातंही जुळलं जातं, हे समजतही नाही.

ऑलिंपिकसारख्या या बहुराष्ट्रीय आणि बहुविध स्पर्धांमध्ये खेळणारा खेळाडू हा त्या देशाचा जणूकाही राजदूतासारखा असतो. काही बरे-काही वाईट प्रसंग अशा स्पर्धांमध्ये घडत असतात; पण यंदाच्या स्पर्धेत कोणी किती पदकं मिळवली, कोणी किती विक्रम केले, यापेक्षा दोन खिलाडूवृत्तीच्या घटनांनी स्पर्धा लक्षात राहील. यातील एक प्रसंग आहे उंच उडीतला. कतारचा दोनवेळचा विश्वविजेता आणि गतस्पर्धेतील रौप्यपदक विजेता मुताझ बारशीम आणि इटलीचा गियानमार्को ताम्बेरी यांच्यात सुवर्णपदकाची चुरस होती. दोघांनी २.३७ मीटरवर यशस्वीपणे उडी मारली होती. त्यामुळं सुवर्णपदकासाठी जम्पऑफ घ्यायचं काय, असा प्रश्न पंचांनी केल्यावर मुताझनं त्यास नकार देत सुवर्णपदक विभागून घेत आहोत, असं सांगितल्यावर गियानमार्कोचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुताझलाही अश्रू अनावर झाले होते. कारण अखेर त्यालाही सुवर्णपदक जिंकण्यात यश आलं होतं.

एका पदकाचं मोल किती मोलाचं असतं याची जाणीव खेळाडूंनाच असते. काही सेंकदांच्या फरकानं किमान चार वर्षं केलेली मेहनत पाण्यात जात असते. पुढची ऑलिंपिक चार वर्षांनी होणार असल्यामुळं संधी मिळेल की नाही, किंवा पात्रता मिळवली जाईल की नाही, हे कोणीच सांगू शकत नाही, त्यामुळं जे काही मिळवायचं ते आज आणि आत्ताच. अशा वेळी सुवर्णपदक विभागून घेणं म्हणजे कठोर आणि अविरत मेहनत घेऊन कमावलेलं साम्राज्यच विभागून द्यायचं, एवढं मोठं काळीज असावं लागतं. साम्राज्य काय पुन्हा कमावताही येईल; पण सुवर्णपदक नाही, त्यामुळं मुताझ बारशीमचं काळीज फारच मोठं म्हणायला हवं.

आपल्या देशातही गुणवत्तेबरोबरच खिलाडूवृत्तीलाही तेवढंच प्राधान्य देणारे खेळाडू काही कमी नाहीत. क्रिकेटमध्ये गुंडाप्पा विश्वनाथ, राहुल द्रविड अशी उदाहरणं आहेत. सामर्थ्यवान अॅडॉप हिटलरनं जर्मनीचं राष्ट्रीयत्व देण्याची दिलेली ऑफर सन्मानानं नाकारणारे राष्ट्रप्रेमी मेजर ध्यानचंद, मिल्खा सिंग, प्रकाश पदुकोण असे दिग्गज नेहमीच खिलाडूवृत्तीसाठीही नावाजले जातात. आता त्यांच्या पंक्तीत पी. व्ही. सिंधूही आहे. खेळ तर होत असतो, हार-जितही होतच असते; पण निर्माण केलेले मैत्रीचे संबंध दाखवलेली खिलाडूवृत्ती एकवेळ सुवर्णपदकाच्या लकाकीप्रमाणे कायमस्वरूपी चमकत राहते.

सलग दोन ऑलिंपिकमध्ये सिंधूचे पदकांच्या शर्यतीतील दोन पराभव आपल्याला टीव्हीवरून पाहताना दुःखद वाटत असले, तरी सिंधूनं कोर्टवरच्या कडव्या लढतीनंतर दाखवलेली खिलाडूवृत्ती कमालीची भावणारी आहे. या ऑलिंपिकमध्ये सिंधू तैपेईच्या तई त्झु यिंगकडून पराभूत झाली. खरंतर तईच्या वेगवान खेळापुढं सिंधू निरुत्तर होती; पण पुढं जाऊन सिंधू ब्राँझ पदक जिंकली आणि तई सुवर्णपदकाची लढत पराभूत झाली. पदक ग्रहणाच्या पोडियमवर तई निराश होती; पण सिंधूनं तिला धीर दिला. समजूत काढली, दोन-चार शब्द धीराचे बोलली, त्यामुळं तई इतकी भारावली, की सिंधूचा आदर व्यक्त करणारी पोस्ट तिनं लिहिली आणि आपल्या भावना जाहीर केल्या... आणि हे सर्व घडलं ते जागतिक मैत्रीदिनीच.

२०१४ मधला हा आणखी एक प्रसंग. थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू तई त्झु यिंगकडूनच पराभूत झाली आणि तिचं आव्हान संपलं. सामन्यानंतर भारतीय संघ संध्याकाळी एका मॉलमध्ये जेवणासाठी बाहेर गेला होता. सिंधू काही चिनी खेळाडूंशी गप्पा मारत आहे हे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या लक्षात आलं. इतकंच काय, तर त्यातील एकीला ती योग्य असा ड्रेस निवडण्यात मदत करत होती. गोपीचंद यांनी सिंधूला विचारलं की ती कोणाशी गप्पा मारत आहे, हे तिला माहीत आहे का? होय, ती तई त्झु यिंग आहे... सिंधूनं उत्तर दिलं. ज्या खेळाडूकडून आपण सामना हरलो आहोत, तिच्याबरोबर अशी मैत्री अवर्णनीयच.

गतवेळच्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सिंधू आणि कॅरोलिना मरिन यांच्यातील सुवर्णपदकाचा अतिशय संघर्षपूर्ण सामना सर्वांच्या स्मरणात आहे. सिंधू हरली... सुवर्ण इतिहास घडता घडता राहिला. अत्यंत कठीण क्षण समोर असतानाही सिंधूनं मरिनची पडलेल रॅकेट उचलून तिच्या हाती दिली. तिचं आलिंगन देऊन अभिनंदन केलं. काही सेकंदांचा हा प्रसंग होता; पण सिंधूनं सर्वांना जिंकलं होतं. त्यानंतर मरिन तर सिंधूच्या कुटुंबाचाच जणू काही भाग झाली होती. बॅडमिंटन लीगसाठी मरिन भारतात खेळत होती तेव्हा हे जाणवत होतं.

ऑलिंपिक येतील-जातील, पदकंही मिळवली जातील; पण खेळाडूंचे हे ऋणानबंध पदकांच्याही पलीकडचे असतील आणि राहतील...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com