सभ्य खेळाची ऐशीतैशी

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. यात सभ्य गृहस्थांचा खेळ असा लौकिक असलेल्या क्रिकेटचा कधीच समावेश झालेला आहे.
jonny bairstow
jonny bairstowsakal

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. यात सभ्य गृहस्थांचा खेळ असा लौकिक असलेल्या क्रिकेटचा कधीच समावेश झालेला आहे. मैदानात उतरायचं ते जिंकण्यासाठी, अशी जिद्द प्रत्येकाची असतेच; पण मैदानावरचा खेळ हार-जितच्याही पलीकडचा असतो. जिंकल्यावर किंवा विजेतेपद मिळवल्यानंतर मान-सन्मान, प्रतिष्ठा, लौकिक सर्व काही आलं; पण त्यात एखादी लबाडी केली की, अशा यशाला वादाची किनार आलीच.

पण, त्यापेक्षा मनाल लागलेली रुखरुख त्या सर्वांगीण आनंदाला गालबोट लावत असतेच. काही करा; पण जिंका, हा विचार हल्लीच्या जमान्यात सर्वच क्षेत्रांत सर्वत्र पसरलेला जाणवतोय. मग क्रिकेट तरी त्यापासून कसं दूर राहील? जेवढी स्पर्धा तीव्र आणि प्रतिष्ठा पणाला लागलेली असते, तेवढी खिलाडूवृत्ती कमी होत जाते; पण त्यातही हरलो तरी बेहत्तर, पण सभ्यता कायम ठेवणारे सभ्य खेळाडू असतातच.

इतिहासातील आकडेवारीत भले विजयाचा तराजू तुमच्यासमोर झुकलेला असेल; पण जेव्हा जेव्हा अशा विजयाची आठवण काढली जाईल, तेव्हा त्या वेळी झालेल्या खिलाडूवृत्तीचा असेल किंवा लबाडीचा, संदर्भ आठवला जाईल. क्रिकेटची पंढरी लॉर्ड्‌स इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील २०२३ मधील अॅशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय असं क्रिकेटच्या पुस्तकात लिहिलं गेलं तरी हा सामना आठवताना इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टॉला वादग्रस्तरीत्या केलेलं धावचीत हे कायस्वरूपी आठवलं जाईल, यात शंका नाही.

लॉर्डसवरील या सामन्यात काय घडलं... कॅमेरून ग्रीनचा आखूड टप्प्याचा चेडू बेअरस्टॉने खाली वाकून सोडून दिला. षटकातील तो अखेरचा चेंडू असल्यामुळे बेअरस्टॉ जमिनीवर पाय घासून तत्काळ क्रिजच्या पुढे निघाला (त्यात त्याचा धाव घेण्याचा कोणताच हेतू नव्हता).

हा चेंडू यष्टिरक्षक अॅलेक्स केरीने हातात येताच तो यष्टींवर फेकला त्या वेळी बेअरस्टॉ क्रिजच्या बाहेर असल्यामुळे त्याला तिसऱ्या पंचांनी धावचीत ठरवलं. नियमानुसार तो धावचीत होता हे निश्चित, कारण त्या वेळी चेंडू पूर्ण होण्याची प्रक्रिया झाली नव्हती. काही सेकंदांचा हा प्रकार होता. अखेर इंग्लंडने तो सामना ४३ धावांनी गमावला, त्यामुळे बेअरस्टॉचं धावचीत होणं इंग्लंडसाठी अधिक वेदनादायक होतं.

या घटनेनंतर दोन्ही संघांतील आजी-माजी खेळाडू तसंच प्रसिद्धी माध्यमांतही जुंपली. इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्सला बेबी असं म्हणत, लहान मूल, त्याला स्टोक्सचा चेहरा आणि त्याच्या तोंडी चुपणी असं छायाचित्र ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं. यावरून सभ्य खेळ म्हणून कधीकाळी लौकिक असलेल्या या खेळाची पातळी इतकी घसरावी, हे चिंतादायक आहे.

करावं तसं भरावं किंवा जशास तसं... कधी कधी म्हटलं जातं. आता हेच पहा ना, २०१९ च्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना, ज्यात न्यूझीलंड हरले नाहीत, तरीही त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. खरंतर त्या सामन्याचा निकाल लागलाच नव्हता. इंग्लंडचा तारणहार ठरलेल्या बेन स्टोक्सच्या बॅटला यष्टींच्या दिशेने थ्रो मारलेला चेंडू लागून तो सीमापार गेला आणि इंग्लंडला ५०-५० षटकानंतर बरोबरी साधता आली होती.

नियमानुसार तो चौकार होता; पण खिलाडूवृत्ती जागृत असती तर इंग्लंडने तो चौकार नाकारला असता; पण विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात अशी काँटे की टक्कर असताना कसली आली खिलाडूवृत्ती किंवा नैतिकता? याच्यासाठी मोठं काळीज असावं लागतं. त्यामुळे इंग्लंड संघाकडून आता नैतिकतेचा आव आणण्यात काहीच अर्थ नाही.

एवढंच कशाला, गतवर्षीचं उदाहरण ताजं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचे हेन्री निकोल्स आणि डॅरेल मिशेल डाव सावरत होते. १२३ धावांवर खेळत असलेल्या निकोल्सने समोर फटका मारला. नॉनस्टायकरवर असलेल्या मिचेलच्या बॅटला तो चेंडू लागला.

खरंतर त्या वेळी मिचेल आपली बॅट बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता; पण चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि मिडऑफला उडाला. तिथं असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला... नियमानुसार निकोल्सला बाद देण्यात आलं; पण त्याची काहीच चूक नव्हती. म्हटलं असतं तर खिलाडूवृत्तीला प्राधान्य देत इंग्लंडने हे अपील मागे घ्यायला हवं होतं; पण तसं झालं नाही.

धोनीची खिलाडूवृत्ती

आता आपल्या धोनीचं उदाहरण पाहू या. याच इंग्लंडमध्ये एका कसोटी सामन्यात शतक करणाऱ्या इयान बेलने चेंडू जोरदार मारला. चेंडू सीमापार होत असताना आपल्या एका क्षेत्ररक्षकाने अडवला. त्यालाही वाटलं की चौकार गेला, म्हणून त्यानेही चेंडू आरामात यष्टिरक्षक धोनीकडे फेकला. या दरम्यान इयान बेल आणि दुसरा फलंदाज मॉर्गन हे चौकार असेल असं समजून एकाच एंडकडे होते. त्यामुळे धोनीने हलकेच यष्टी उडवल्या आणि अपील करायचं म्हणून अगदी सहज पंचांकडे विचारणा केली.

पंचांनीही तिसऱ्या पंचांकडे खूण केली आणि टीव्ही रिप्लेमध्ये तो चौकार नसल्याचं स्पष्ट झालं, परिणामी बेल धावचीत असल्याचा निर्णय देण्यात आला, परंतु सामना तिथंच चहापानाच्या ब्रेकला थांबला; पण त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर बेल पुन्हा फलंदाजीस येताना दिसला, कारण इंग्लंड कर्णधाराने केलेली मागणी भारतीय कर्णधार धोनीने मान्य केली आणि खिलाडूवृत्ती दाखवत अपील मागे घेतलं होतं.

एकीकडे खिलाडूवृत्तीला तिलांजली देणारे आणि खेळाची सभ्यता जपणारे अनेक प्रकार घडलेले आहेत; पण सध्या तरी सभ्यता गुंडाळली जाणाऱ्या घटना अधिक वाढत आहेत. आयपीएलमध्ये अश्विनने गोलंदाजीच्या ओघात नॉन स्ट्राइकवर असलेला, परंतु क्रिज सोडून पुढे गेलेला इंग्लंड फलंदाज जॉस बटलरला धावचीत केलं, त्यामुळे कितीतरी टीका प्रामुख्याने इंग्लंड क्रिकेटमधून अश्विनवर झाली होती.

क्रिकेटमधील सभ्यतेचा ऊर बडवण्यात आला होता. आता स्वतःच जात्यात आल्यावर आकांडतांडव होत आहे; पण दाखवलेली सभ्यता आणि जपलेली खिलाडूवृत्ती सामन्यांच्या निकालाएवढीच अजरामर असते. म्हणूनच ३१ वर्षांपूर्वीची ती घटना अजूनही सन्मानाने आठवली जाते आणि भारतीय कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथ यांचं नाव आदराने घेतलं जातं.

विश्वनाथ यांचा आदर्श

भारतीय क्रिकेटचा सुवर्णमहोत्सवी सामना वानखेडे स्टेडिअमवर होता. भारताने इंग्लंडची अवस्था ५ बाद ५८ अशी केली होती. त्यानंतर इयान बॉथम आणि बॉब टेलर यांनी १७१ धावांची मोठी भागीदारी करून इंग्लंडचा डाव सावरला आणि पुढे जाऊन त्यांनी भारताचा पराभव केला. पण, आजही त्या निकालापेक्षा विश्वनाथ यांची कृतीच अधिक लक्षात ठेवली जाते.

ही भागीदारी ८५ धावांची झाली असताना बॉब टेलर झेलचीत झाल्याचा निर्णय पंच हनुमंत राव यांनी दिला; पण बॅटला चेंडू लागला नसल्याचं टेलर याचं म्हणणं होतं. त्याने आणि बॉथम यांनी कर्णधार विश्वनाथ यांच्याकडे विचारणा केली. त्या वेळी टीव्ही रिप्ले किंवा तिसरा पंच असा प्रकार नव्हता. विश्वनाथ यांनी टेलरकडेच विचारणा केली आणि त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून अपील मागे घेतलं.

म्हणूनच म्हणावंसं वाटतं... कुठं विश्वनाथ, धोनीसारख्या आपल्या खेळाडूंनी जपलेली सभ्यता आणि कुठं बेन स्टोक्स अथवा पॅट कमिन्स यांनी गुंडाळलेली खिलाडूवृत्ती, चर्चा तर होणारच !!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com