सॅमची ‘करनी’

सॅमची ‘करनी’

‘करणी’ या शब्दाला नकारात्मक छटा आहे, त्यामुळे त्याचा संदर्भ चांगल्या गोष्टींसाठी कधीच दिला जात नाही. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करननं नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांवर जणू काही ‘करणी’ करावी अशीच अफलातून फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची मती (गती आणि अचूकता) गुंग केली होती. सात फलंदाज बाद केल्यानंतर खरं तर भारतीय संघ विजयाच्या औपचारिकतेकडे झुकला होता; पण जादूटोणा करावा अशा प्रकारे सॅमनं भारताच्या तोंडचा घास जणू काही हिरावलाच होता. मात्र, सॅमची ही ‘करनी’ भारताला विजयापासून रोखू शकली नाही. भारतानं ही एकदिवसीय मालिकाही जिंकली; पण त्या अंतिम सामन्यात सॅम करननं दाखवलेल्या जिद्दीला केवळ माजी इंग्लिश खेळाडूंनीच नव्हे, तर भारतीयांनीही दाद दिली. वास्तविक पराभूत होणाऱ्या संघातील खेळाडूला ‘सामन्याचा मानकरी’ हा पुरस्कार दिला जात नाही; पण सॅमची ती खेळी इतकी प्रभाव पाडणारी होती की तोच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. 

पुण्यात कसे होईल उणे...
खरं तर पुणे तिथे भारतीय संघाचे उणे कसे होईल...? म्हणूनच की काय विजयश्री भारताच्या गळ्यात पडली. नाहीतर हाच सॅम करन पुन्हा एकदा भारताच्या मार्गातला अडथळा ठरला असता. हाच सॅम काय करू शकतो याचा अनुभव विराट कोहलीच्या संघाने सन २०१८ मध्ये घेतलेला आहे. त्या इंग्लंडदौऱ्यातील पाच कसोटी मालिकांच्या सामन्यात भारताची १-४  अशी दारुण हार झाली होती. भारताची प्रतिष्ठा पणास लागलेल्या त्या मालिकेत सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सॅम करन हाच फॅक्टर निर्णायक ठरला. भारतीय गोलंदाज इंग्लंडचे प्रमुख फलंदाज बाद करायचे. त्यानंतर येणारा सॅम करन अर्धशतकी खेळी करायचा. इंग्लंडला आघाडी मिळायची. त्यात हाच करन गोलंदाजीतही महत्त्वाचे फलंदाज बाद करायचा आणि भारतीय संघ पराभवाकडे झुकायचा. त्या मालिकेतील पहिल्या आणि त्याच्या कसोटी कारकीर्दीतील दुसऱ्याच सामन्यात तो सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याचं सर्वोत्तम होणं भारतासाठी धोकादायक असतं, म्हणूनच पुण्यातील गेल्या रविवारच्या सामन्यात अनेकांना सॅम करन काय करू शकतो याची आठवण येत होती. त्या संपूर्ण मालिकेत त्यानं २९२ धावा आणि १३ विकेट अशी अष्टपैलू कामगिरी केली होती.

कोण आहे हा सॅम? 
सॅम करन याचा जन्म नॉर्दम्टनमधला असला तरी तो मूळचा इंग्लंडचा नाही. झिम्बाब्वेचे माजी अष्टपैलू खेळाडू केविन करन यांचा तो मुलगा. सॅम, बेन आणि टॉम अशी त्यांना तीन अपत्ये. यातील टॉम करनही इंग्लंड संघातून खेळतो. हा सॅम झिम्बाब्वेच्या १३ वर्षांखालील संघातूनही खेळलेला आहे; पण जन्मच इंग्लंडमधला असल्यामुळे इथंच त्यानं 

क्रिकेटची कारकीर्द सुरू केली. एकोणिसाव्या वर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सॅमकडे भन्नाट वेग नसला तरी नवा चेंडू स्विंग करण्याची खासियत आहे आणि कोणत्याही क्रमांकावर कसलेल्या फलंदाजाप्रमाणे  फलंदाजी करण्याची क्षमता आहे. इंग्लंडसाठी तो ‘लंबी रेस का घोडा’ आहे आणि भारतीयांसाठी तो जेव्हा जेव्हा समोर येईल तेव्हा तेव्हा इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा सॅमचा धोका अधिक असेल.

‘आयपीएल’मुळे भारतप्रेम
सॅम करन भारतीय संघासाठी धोकादायक असला तरी आयपीएलमुळे त्याचं भारतप्रेम वाढलं आहे. एकदिवसीय मालिकेत मॉर्गन दुखापतग्रस्त झाल्यामुळे जॉस बटलर कर्णधार होता. अंतिम सामन्यानंतर बोलताना त्यानं, सॅम करनमध्ये महेंद्रसिंह धोनीची छबी दिसत असल्याचं मांडलेलं मत फारच महत्त्वाचं आहे. भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना धोनीनं अशाच प्रकारच्या अफलातून खेळीनं भारताला विजय मिळवून दिलेले आहेत, म्हणून त्याला ‘फिनिशर’ म्हटलं जातं. सॅम आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई संघातून खेळतो, याचा फायदा त्याला नक्कीच होईल. धोनी हा केवळ ग्रेट फिनिशर किंवा चाणाक्ष कर्णधारच नव्हे, तर तो फिलॉसॉफरही आहे. खेळाडू घडवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. सहा महिन्यांपूर्वी अमिरातीत झालेल्या आयपीएलमध्ये धोनीनं सॅमला सलामीलाही पाठवलेलं आहे. सलग दोन आयपीएल धोनीच्या सान्निध्यात खेळल्यावर सॅमची प्रगती होणार हे नक्कीच आहे आणि याची जाणीव स्वतः सॅमला आणि त्याच्या इंग्लंड संघातील अनुभवी खेळाडूंनाही आहे, म्हणूनच बटलरनं केलेलं भाष्य महत्त्वाचं  आहे. 

आता सहा महिन्यानंतर भारतातच ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. इंग्लंडच्या या भारतदौऱ्यातील आणि आयपीएलमधील अनुभव सॅम करनला अधिक परिपक्व करेल. मात्र, भारतीय संघासमोर त्याची ‘करणी’ चालू नये हीच अपेक्षा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com