डॉक्‍टरला वाचवा! 

शैलेश पांडे
सोमवार, 27 मार्च 2017

पदव्युत्तर-प्रशिक्षित-अनुभवी डॉक्‍टरांची संख्या शहरांमधील त्यांच्या क्‍लिनिक्‍स किंवा हॉस्पिटल्सच्या पाट्या पाहून मोठी वाटत असली, तरी ती लोकसंख्येच्या प्रमाणात कमीच आहे. त्या आकडेवारीत जाण्यात हशील नाही. सामाजिक, आर्थिक विषमता जशी या देशात आणि राज्याच्या लोकजीवनात भरून राहिली आहे, तशीच आरोग्यसेवेच्या संदर्भातही विषमता आहे आणि ती साऱ्याच भागीदारांनी केलेल्या दुर्लक्षामुळे, विशेषतः सरकारच्या उदासीनतेमुळे निर्माण झालेली आहे.

डॉक्‍टरांवरील हल्ल्यांचा विषय सध्या महाराष्ट्रात गाजतो आहे. डॉक्‍टरांचे संप, सरकारशी चर्चा, न्यायालयीन प्रक्रिया हे सारे घडते आहे. आता लगेच डॉक्‍टरांवरील हल्ले थांबतील असे नाही. परंतु, ते होऊ नयेत, यासाठी आता समाजात विशिष्ट प्रकारची वातावरण निर्मिती करण्याची वेळ आलेली आहे. आधीच आपल्याकडे डॉक्‍टरांची संख्या कमी. त्यात चांगले-सेवाभावी डॉक्‍टर आणखी कमी आणि त्यात अशा हल्ल्यांची भर पडली तर एकूण आरोग्यसेवेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्‍यता आहे. तशीही महाराष्ट्रातील सरकारी आरोग्यसेवा जेमतेम आहे.

सरकारी आरोग्यसेवेचा लाभ 25-30 टक्के लोक घेतात. बाकीचे 70 ते 75 टक्के लोक खासगी डॉक्‍टरांकडे जातात. या 75 टक्‍क्‍यांमधील साऱ्यांना खासगी डॉक्‍टरांची किंवा इस्पितळांची सेवा परवडते असे नव्हे. नाइलाज अशांना खासगी डॉक्‍टरांकडे घेऊन जात असतो. खरे तर समाजातल्या बहुसंख्य लोकांना सरकारने चांगली आरोग्यसेवा दिली पाहिजे. ती मिळत नसल्यामुळे आपल्याकडे खासगी डॉक्‍टरांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, डॉक्‍टरांचे महत्त्व वाढले आहे आणि या क्षेत्रात अनाचारही वाढला आहे. पण, डॉक्‍टरवर हल्ला करण्याच्या कृत्याचे कोणत्याही पद्धतीने समर्थन करता येत नाही. त्याचा निषेध करून किंवा तात्पुरता संप मिटवून सारे काही आलबेल झाल्याचा आभास निर्माण करण्याऐवजी हा प्रश्‍न मुळातून निकालात काढला पाहिजे. 

एक डॉक्‍टर घडण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप अभ्यास करावा लागतो. एका चांगल्या-तज्ज्ञ डॉक्‍टरच्या घडवणुकीला किमान दशकभराचा वेळ लागतो. एवढा वेळ दुसऱ्या कोणत्याही व्यवसायातील "प्रोफेशनल' तयार करण्यासाठी लागत नाही. अर्थात, याची अनेक कारणे आहेत. इच्छा असलेल्या प्रत्येकाला पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी जशी कला, विज्ञान, वाणिज्यादी शाखांमध्ये आहे, तशी ती वैद्यकशास्त्रात नाही. सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालये मिळूनही एकूण पदवीधरांच्या तुलनेत पदव्युत्तर जागा कमीच आहेत. त्यात खासगी महाविद्यालयांमधील पीजीच्या सीटचा रेट प्रचंड (लाखाचे बोलू नका..., एक कोटी, दोन कोटी, तीन कोटी...) आहे. एवढा पैसा देऊन आपल्या मुलांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणारे समाजात किती असतील? आणि असतील तर ते सारे प्रामाणिकपणे पैसा कमावणारे असतील काय? आणि तसे नसेल तर अशा प्रक्रियेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला डॉक्‍टर डोनेशनपोटी दिलेल्या खर्चाची वसुली करणार नाही काय?... प्रश्‍न अनेक आहेत. मूळ प्रश्‍न आहे तो लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध असलेल्या डॉक्‍टरांच्या प्रमाणाचा, त्यांच्याकडून असलेल्या अनाठायी अपेक्षांचा आणि डॉक्‍टरांना मारायला धजावणाऱ्या निषेधार्ह प्रवृत्तींना अटकाव करण्याचा.

पदव्युत्तर-प्रशिक्षित-अनुभवी डॉक्‍टरांची संख्या शहरांमधील त्यांच्या क्‍लिनिक्‍स किंवा हॉस्पिटल्सच्या पाट्या पाहून मोठी वाटत असली, तरी ती लोकसंख्येच्या प्रमाणात कमीच आहे. त्या आकडेवारीत जाण्यात हशील नाही. सामाजिक, आर्थिक विषमता जशी या देशात आणि राज्याच्या लोकजीवनात भरून राहिली आहे, तशीच आरोग्यसेवेच्या संदर्भातही विषमता आहे आणि ती साऱ्याच भागीदारांनी केलेल्या दुर्लक्षामुळे, विशेषतः सरकारच्या उदासीनतेमुळे निर्माण झालेली आहे. हे क्षेत्र शास्त्र म्हणून विकसित झाले असले, तरी सामाजिक भागीदारी आणि जबाबदारीच्या अंगाने ते अविकसितच राहिलेले आहे. दर्जेदार आरोग्यसेवा प्राप्त करण्याचा निकष हा आर्थिक क्षमता नव्हे तर "गरज' (नीड) मानला जाईल, असे वातावरण व त्यासाठी सोयीसुविधा निर्माण करणे हे आपल्या आरोग्यसेवेचे ध्येय असले पाहिजे. डॉक्‍टरांवरील हल्ले हा वरवर दिसणारा मुद्दा असला, तरी त्यामागे ही वैविध्यपूर्ण विषमता आणि त्या विषमतेतून तयार होणारे वातावरण हे खरे कारण आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. 

डॉक्‍टरचा व्यवसाय हा जिवंत माणूस हाताळण्याचा आहे. डॉक्‍टर मंडळी ते लीलया करीत असतात आणि तरीही हल्ल्यांचे प्रकार अपवादानेच घडत असतात. याचा अर्थ डॉक्‍टर आणि रुग्ण या दोन्हीकडील सामंजस्याची स्थिती समाधानकारक आहे, असा काढता येतो. एखाद्याचा जीव जातो किंवा त्याच्या जिवाला काही इजा होते किंवा कोणत्याही प्रकारची गुंतागुंत निर्माण होते, तेव्हाच डॉक्‍टरवर हात उगारण्याचे प्रकार घडतात. एकूण पेशंट्‌सच्या तुलनेत हे प्रमाण अल्प आहे; पण चिंताजनक आहे. समाजातील वाईट प्रवृत्ती डॉक्‍टरांना लुटण्यासाठी प्रयत्नशील असतात हेही त्याचे एक कारण आहे. अलीकडच्या काळात डॉक्‍टरांवरील हल्ल्यांच्या निमित्ताने व्हॉट्‌सऍपवर एक संदेश फिरला. तो वस्तुस्थितीदर्शक होता...""एखाद्याला रक्त लागले तर ते द्यायला एकही नातेवाईक फिरकत नाही; पण डॉक्‍टरला मारहाण करण्यासाठी पाच-पन्नास नातेवाईक लगेच गोळा होतात!'' डॉक्‍टरला मारायचे म्हटले की, छप्पन लोक तयार. डॉक्‍टर काही देव नसतो... त्याला देव मानले जात असले तरी! तो याच मातीतून तयार झालेला एक माणूस असतो. त्याला मर्यादा असतात. तोही थकतो. तरीही बहुसंख्य डॉक्‍टर्स वेळेच्या वेळी पेशंट तपासायला, त्यांना उपचार देण्यासाठी उपलब्ध असतात. डॉक्‍टरांनीच आता ठरवून देवत्वाच्या झुलीतून बाहेर यायला हवे. वैद्यकशास्त्राच्या मर्यादा आणि पेशंटगणिक उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादातील वैविध्य यासंबंधी व्यापक प्रमाणात संवाद, जनजागृती निर्माण करणे आवश्‍यक झाले आहे. मेडिकल कॉलेजमध्ये ऍप्रन अंगावर चढला की, पेशंटकडून अतिशय सन्मानाची वागणूक डॉक्‍टरांना मिळते.

आदरार्थी संबोधने मिळतात. देवत्वाची बिरुदे मिळतात. त्यांच्या आहारी न जाता माणूस म्हणून आपल्याला असलेल्या मर्यादांचे भान डॉक्‍टरांनी सोडता कामा नये. डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यामागे संवादाचा आणि संवाद कौशल्याचा अभाव हेही एक कारण आहे. मेडिकल कॉलेजमध्ये पेशंट भरती करायचा असेल, त्याला चांगली ट्रीटमेंट मिळायची असेल तर ओळख लागते. खासगी इस्पितळांमध्येही अनेक डॉक्‍टर्स रुग्णांशी नीट बोलत नाहीत. त्यांना समजावून सांगत नाहीत. त्यासाठीही कुणाची तरी ओळख काढावी लागते. त्यातून गैरसमज निर्माण होतात. त्यामागे अनेक कारणे असतात. कट प्रॅक्‍टिस, अनावश्‍यक चाचण्यांमधून केली जाणारी कमाई, अहंकार, व्यस्तता, त्रस्तता यातले काही ना काही असते. "क्रिटिकल' केस असेल तेव्हा सुरुवातीलाच डॉक्‍टरांनी स्पष्टपणे बोलले पाहिजे. शक्‍याशक्‍यतांची स्पष्ट कल्पना रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकांना-मित्रांना दिली पाहिजे. यातून गैरसमज टळतील. अनावश्‍यक अपेक्षांच्या ओझ्यातून डॉक्‍टर बाहेर पडू शकतील. त्यांनाही "रिलीफ' मिळेल. सारे ओझे अपेक्षांचे आहे. अपेक्षा विरुद्ध गैरसमज असा हा संघर्ष आहे. अपेक्षा कमी केल्या तर संघर्ष कमी होतील. पेशंट पूर्वीही दगावत, आताही दगावतात. प्रत्येक वेळी हल्ला होतोच असे नाही. प्रत्येक वेळी मोठ्या बिलावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हिंसेत होतेच असे नाही. याचा अर्थ, सामंजस्य मोठ्या प्रमाणात आहे. ते संवादाने वाढेल. काही डॉक्‍टर्स दररोज शेकड्याने पेशंट्‌स घेतात. त्यांच्या हाताला यश असते म्हणून लोक येतात हेही खरे. पण, असा अतिव्यस्त डॉक्‍टर किती पेशंट्‌सना आवश्‍यक वेळ आणि व्यवस्थित उपचार देऊ शकेल, हा प्रश्‍न आहे. एखाद्या पेशंटची तब्येत बिघडत चाललेली असेल तर त्याने मनात आणले तरी त्याच्या नातेवाइकांना तशी कल्पना देणे त्याला शक्‍य होत नाही. अचानक काही बरे-वाईट झाले की, नातेवाइकांना धक्का बसतो आणि त्यातून अशा घटना घडतात. मारायला छप्पन्न नातेवाईक येतात हे ओघाने आलेच. त्यांच्या जोडीला ब्लॅकमेल करणारे समाजसेवकही आपले हात धुऊन घेतात. ज्या व्यवसायाच्या प्रामाणिकपणाबद्दल अविश्‍वास किंवा संशय निर्माण होतो, तेथेच अशा घटना घडतात. अपवादात्मक माथेफिरू लोक सोडले तर बहुतेकांना डॉक्‍टरवर विश्‍वास असतो. परंतु, त्यांना जे ऐकायला, अनुभवायला मिळते, त्यातून त्यांची मने खराब होतात. डॉक्‍टर-रुग्ण या संघर्षाची मुळे या ठिकाणी आहेत.

मानसशास्त्रीयदृष्ट्या बोलायचे तर "क्रायसिस ऑप ट्रस्ट'मधून हा दुरावा तयार होतो. मिळणारी सेवा, उपचार आणि त्याचे बिल यात जाणवण्याइतपत तफावत निर्माण होते, तेव्हा अविश्‍वासाचे वातावरण तयार होते. डॉक्‍टर संवादासाठी वेळ काढत नाही, तेव्हा प्रश्‍न निर्माण होतात. मग डॉक्‍टरच्या ठिकाणी दिसणारा "देव' दृष्टीआड होतो आणि अनाठायी अपेक्षांमधून निर्माण झालेले वातावरण वाईट घटनेत परिवर्तित होते. आपल्या समाजाची एक रीत आहे- चूक कुणाचीही असली तरी रस्त्यावर होणाऱ्या अपघातात दोष मोठ्या गाडीचाच असतो. डॉक्‍टर आणि पेशंट संबंधात डॉक्‍टर ही मोठी गाडी आहे. त्यामुळे तो दोषी असो वा नसो, त्याला रोषाचे धनी व्हावे लागणार. मोठ्या गाडीने सांभाळून, हॉर्न वाजवत ड्रायव्हिंग केले पाहिजे. सरकारनेही कायदा करण्यात आता कुचराई करता कामा नये. शेवटी या जगातला अत्यंत पवित्र व्यवसाय जर कोणता असेल तर तो डॉक्‍टरकीचा आहे. त्या पावित्र्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी जशी डॉक्‍टरांची आहे, तशी ती समाजाची आणि सरकारचीही आहेच.

Web Title: Shailesh Pande writes about attack on doctors