Shammi Kapoor : मनस्वी शम्मी

शम्मी कपूर हा माझ्या कॉलेजजीवनातला एक लाडका हीरो. हा देखणा आणि नाचणारा-गाणारा, नायिकेला छेडणारा हीरो खूप आवडायचा.
Shammi Kapoor Indian actor Hindi cinema history bollywood
Shammi Kapoor Indian actor Hindi cinema history bollywoodSakal

Shammi Kapoor : शम्मी कपूर हा माझ्या कॉलेजजीवनातला एक लाडका हीरो. हा देखणा आणि नाचणारा-गाणारा, नायिकेला छेडणारा हीरो खूप आवडायचा. सन १९५७ च्या ‘तुमसा नही देखा’पासून १९७० च्या आसपासच्या ‘प्रिन्स’पर्यंत त्यानं जवळपास प्रत्येक चित्रपटात त्याच त्याच गोष्टी केल्या; पण त्या सगळ्या भावल्या.

त्यानंतर त्याचं शरीर बेढब होत गेलं. तो हीरो राहिला नाही. आम्हीही इतर नटांकडे खेचले गेलो; मग तो व्यावसायिक चित्रपटांमधला अमिताभ बच्चन असेल किंवा कलात्मक चित्रपटांतला नसिरुद्दीन शहा असेल.

पुढच्या काळात शरीरानं खूप बेढब झालेला शम्मी सुरुवातीला अतिशय हाडकुळा होता यावर विश्वास बसणार नाही. पंधरा वर्षांपर्यंत तो चार फुटांच्या थोडा वर होता. सन १९४६ मध्ये तो रेवा इथं, म्हणजे राज कपूरच्या बायकोच्या - कृष्णा हिच्या - माहेरी राहायला गेला. तिथं तो पोहायला शिकला.

रेवामधल्या वास्तव्यात तो शरीरानं सुटत गेला. कदाचित् कृष्णाच्या हातच्या जेवणामुळे तसं झालं असेल. शम्मीची उंचीही वाढत गेली. तिन्ही भावांत तो सर्वात उंच म्हणजे, पाच फूट ११ इंच उंच झाला.

शाळेत असताना शम्मी अतिशय लाजरा-बुजरा होता. शाळेतल्या एका नाटकात त्याला एका मुलीचं चुंबन घ्यायचं होतं. त्यानं चुंबन घेतलं आणि घरी येऊन दहा वेळा तोंड धुतलं! तो तेव्हा तेरा वर्षांचा होता.

तो शाळेत सिगारेट ओढायला लागला. चौदाव्या वर्षी त्यानं घरून शॅम्पेनची बाटली पळवली आणि चार मित्र जमवून, वडाळा रेल्वे स्टेशनवर जाऊन, एका चहावाल्याकडून बादली तात्पुरती घेतली. तीत बर्फाचं पाणी घातलं.

शॅम्पेन थंड केली आणि चहाच्या पेल्यात ओतून त्यानं आणि मित्रांनी ती प्यायली. राज कपूर वडिलांसमोर सिगारेट किंवा दारू प्यायचा नाही. शम्मीनं तेसुद्धा बंधन कधी पाळलं नाही. तो वेगळाच होता. त्याला वाचनाचं वेड होतं.

पृथ्वीराज आणि राज हे विचारानं समाजवादी. शम्मी हा हाडाचा भांडवलशाहीवादी. तो आयन रँडच्या तत्त्वज्ञानानं भारावलेला होता. त्यानं तिची Atlas Shrugged ही हजार पानाची कादंबरी ३६ तासांत वाचून पूर्ण केली, असं म्हणतात.

पुस्तक वाचताना वाचून झालेलं पान तो काढून टाकून द्यायचा; कारण, वाचनाच्या वेडापायी ते पुन्हा वाचलं जाईल ही त्याला भीती होती! त्याचे पहिले १८ चित्रपट कोसळले. सन १९५० मध्ये त्याचा ‘जीवनज्योती’ हा चित्रपट आला.

मग एकामागून एक येतच गेले. त्यातल्या ‘लैला-मजनू’, ‘ठोकर’, ‘शमा-परवाना’ आदी चित्रपटांची नावं निदान काही ना काही कारणासाठी कानावरून गेली होती. त्याचं नशीब बदललं ते ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटामुळे. या चित्रपटाचा नायक आधी होता देव आनंद.

त्यात नायिका होती अमिता. अमिता अगदी नवी होती. त्यामुळे देव आनंदनं सांगितलं, ‘नायिका बदला.’ तो सिनेमा होता तोलाराम जालान यांचा. त्यांचं प्रेम बसलं होतं अमितावर. तिच्यासाठीच ते हा चित्रपट काढत होते. ते देव आनंदचं कशाला ऐकतील? त्यामुळे तो चित्रपट देव आनंदनं सोडला आणि मग रहेजा यांनी देव आनंदच्या जागी शम्मीला घेतलं.

मुलं लहानपणी हरवायची हा फॉर्म्युला - जो पुढं मनमोहन देसाईंनी लोकप्रिय केला - त्याचा पाया नासीर हुसेन यांनी घातला. या चित्रपटात शम्मीनं स्वतःचं रूप बदललं. त्यानं मिशी काढली, केसाचा क्रू कट केला.

अंगाला चिकटणारे कपडे घातले. जीन्स घातली. थोडक्यात, त्यानं हॉलिवूड गाजवत असलेल्या एल्विस प्रिस्लेचा अवतार धारण केला. त्यासाठी तो वांद्र्याला ख्रिस्ती मुलांचं निरीक्षण करायला जायचा. शामळू शम्मीची जागा स्मार्ट आक्रमक शम्मीनं घेतली. तिथून नवी ‘शम्मी कपूर स्टाईल’ सुरू झाली.

शम्मी आला तेव्हा चार स्टाईल अस्तित्वात होत्या. एक दिलीपकुमारची - दुःखी, ट्रॅजेडी, उदास... दुसरी स्टाईल होती राज कपूरची - भाबडी आणि चार्ली चॅप्लिन-स्टाईल. तिसरी स्टाईल होती प्रदीपकुमार,

भारतभूषण यांची - ‘पुतळा’-स्टाईल...कोरा, निर्विकार चेहरा, कपाळावर एखादी आठी वगैरे. चौथी स्टाईल होती देव आनंदची - रोमँटिक, छेडछाडीची स्टाईल. शम्मीची स्टाईल ही देव आनंद स्टाईलची पुढची पायरी होती.

देव आनंदचा रोमान्स हळुवार होता. शम्मीनं छेडछाड जास्त हिंसक केली. त्याच्या प्रणयाच्या बाबतीत प्रेम कुठं संपतं आणि हिंसा कुठं सुरू होते ते कळत नसे.

‘दिल तेरा दिवाना’ या चित्रपटातच एक गाणं आहे. ‘मुझे इतना प्यार है तुम से...’ या गाण्यात तो सुरुवातीला चालत येतो तेव्हा तो प्रेम करायला आलाय की कानाखाली आवाज काढायला आलाय हेच कळत नाही! मध्येच हुतूतू खेळल्याप्रमाणे तो हूल देतो.

त्यानं प्रेमात रांगडेपण आणला. शम्मीचा रोमान्स ‘लस्ट’च्या सीमारेषेवर घुटमळायचा. ती सेक्शुअॅलिटी होती. तुम्हाला ‘जंगली’मधला एक प्रसंग आठवतोय? सायराबानो आणि तो एका झोपडीत असतात. त्याला स्त्रीसहवास आवडत नाही असं तोपर्यंत त्या चित्रपटात दाखवलंय.

त्या वादळात सायराचे केस, तिची लाल शाल पाहून त्याच्यातला पुरुष जागा होतो. तो ‘या ऽऽ हू’ अशी आरोळी देतो. ती स्वातंत्र्याची आरोळी होती. तो आवाज महंमद रफीचा नसून, प्रयागराजचा आवाज आहे.

शम्मीनं सुरुवातीला शामळू भूमिका केल्या तरी तो शामळू नव्हता. तो शिकारी होता. त्यानं तीन वाघ मारले होते. एकदा शिकार करताना, त्याला अस्वलानं जवळपास मिठीत पकडलं होतं. त्यातून तो वाचला. तो पुढच्या काळातला शम्मी असता तर अस्वल मेलं असतं! शम्मी शिकार करायचा, जंगलात शेकोटी पेटवायचा, प्राणी भाजायचा त्यावर ब्रँडी ओतायचा आणि खायचा.

ललनांच्या बाबतीत ‘जवानीयाँ ये मस्त मस्त बिनपिये’ हे गाणं त्याच्या जीवनाचं तत्त्वज्ञान होतं. सुरुवातीला तो नादिया गमान या इजिप्त संस्कृतीतून आलेल्या बेली डान्सरवर प्रेम करायचा. नंतर त्याला मधुबालाशी लग्न करायचं होतं; पण ती दिलीपकुमारच्या प्रेमात आहे म्हटल्यावर त्याचा नाइलाज झाला.

त्यानंतर ‘रंगीन रातें’ या चित्रपटाच्या सेटवर त्याला गीता बाली भेटली. गीता बाली आणि शम्मी यांच्यात जमीन-अस्मानाचं अंतर होतं. दोघांनी तीन चित्रपट एकत्र केले. उरलेले दोन म्हणजे ‘कॉफी हाऊस’ आणि ‘मिस कोकाकोला’. त्या वेळी गीता बाली टॉपला होती. तिनं पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर ‘आनंदमठ’ चित्रपटात काम केलं होतं.

‘बावरे नैन’मध्ये ती राजचीही नायिका होती. शम्मीची ओळख ‘पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा आणि राज कपूरचा भाऊ’ अशी होती. शम्मी हा गीता बालीपेक्षा वयानं लहान होता. ती अत्यंत गरिबीतून आलेली आणि अशिक्षित.

शम्मी वाचनवेडा, मोठं खानदान मिरवणाऱ्या कपूर घराण्यातला. त्या काळच्या हिंदी चित्रपटांमधली एकदम पक्की कहाणी...! पण शम्मीची प्रतिज्ञा होती - ‘दुनिया की कोई ताकद हमे जुदा नहीं कर सकती...’

ता. २३ ऑगस्ट १९५५ ला शम्मीचे आई-वडील ‘पृथ्वी थिएटर’च्या दौऱ्यावर गेले होते. शम्मीनं गीताला म्हणाला : ‘चल, लग्न करू’. गीता एका पायावर तयार होती; पण करायचं कसं? ते दोघं जॉनी वॉकरकडे गेले. तो त्यांचा फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईड. त्यानंही नुकतंच पळून जाऊन लग्न केलं होतं, म्हणून त्यांना जॉनी वॉकरकडून अनुभवी सल्ला हवा होता. जॉनी म्हणाला : ‘‘ मी मुस्लिम म्हणून काझीकडे गेलो होतो, तू देवळात जा.’’

शम्मी-गीता बाणगंगा इथल्या देवळात गेले. लग्न केलं...तेव्हा नुकतंच झुंजुमुंजू झालं होतं. बरोबर एक साक्षीदार होता. त्याच्या ‘कॉफी हाऊस’ चित्रपटाचा निर्माता, हरी वालिया. शम्मीकडे गीताची ‘माँग भरायला सिंदूर’सुद्धा नव्हता...पण शम्मीच तो! त्यानं गीताच्या लिपस्टिकनं तिची ‘माँग भरली’. मग तो पहाटे आजीकडे गेला.

त्यानं आई-वडिलांना कळवलं. घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल? ‘तुम ने हमारे खानदान की इज्जत मिट्टी में मिला दी’ वगैरे? अजिबात नाही. वडील म्हणाले : ‘‘घरी काय करताय? मधुचंद्र साजरा करायला जा कुठं तरी...’’ अर्थात्, मधुचंद्र करण्यासाठी शम्मी वडिलांच्या परवानगीची वाट पाहणार नव्हताच. त्याचं लग्न दहा वर्षं टिकलं. ‘तीसरी मंझील’ चित्रपटाच्या वेळी शम्मी

शूटिंगनंतर घरी जात नसे. गीता आजारी होती. तिनं अनेक निरोप पाठवले. शम्मीला वाटलं, ती नाटक करतेय. शेवटी तो घरी गेला. ती शेवटच्या घटका मोजत होती. त्यात ती गेली. तिला देवी आल्या होत्या.

गीताच्या जाण्यानं शम्मीला प्रचंड धक्का बसला. तो त्या धक्क्यातून बाहेरच येत नव्हता. शेवटी राजनं विजय आनंदला निरोप पाठवला,

‘याला ‘तीसरी मंझिल’च्या सेटवर कसंही करून घेऊन जा.’

त्यानंतर शम्मीला डिप्रेशनमधून बाहेर यायला खूप काळ जावा लागला. त्याचं पिणं खूप वाढलं. याचा अर्थ तो आधी तो शहाण्यासारखा पीत होता असं नव्हे; पण गीताचा थोडा कंट्रोल होता. त्याला पुन्हा बायकोची गरज आहे हे कृष्णानं जाणलं आणि त्याच्या आयुष्यात नीलादेवी येईल हे पाहिलं. तसे ते दोघं एकमेकांना ओळखत होतेच. परत या लग्नातही त्यानं धुसमुसळेपणा केला. ता. २६ जानेवारी १९६९ ला तिला फोन त्यानं करून सांगितलं : ‘उद्या लग्न करू.’

आणि ‘प्रोफेसर’ मधल्या गाण्याप्रमाणे तो आर्ततेनं म्हणाला...‘आवाज दे के, हमे तुम बुलाओ...मुहब्बत में इतना न हमको सताओ... ’

शम्मी हा असा होता...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com