‘तुझा आवाज तूच शोधायला हवा...’ (शौनक अभिषेकी)

शौनक अभिषेकी
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

बाबा मला नेहमी सांगायचे ः ‘‘माझा आवाज हा माझ्या गुण-दोषांसहित माझा आहे. तुझा आवाज तूच शोधला पाहिजेस. त्या आवाजातल्या गुण-दोषांची जाणीव तू स्वतः करून घेतली पाहिजेस व त्यानुसार तुझं संगीत प्रकट व्हायला हवं.’’

बाबा मला नेहमी सांगायचे ः ‘‘माझा आवाज हा माझ्या गुण-दोषांसहित माझा आहे. तुझा आवाज तूच शोधला पाहिजेस. त्या आवाजातल्या गुण-दोषांची जाणीव तू स्वतः करून घेतली पाहिजेस व त्यानुसार तुझं संगीत प्रकट व्हायला हवं.’’

आ  मच्या घरात गुरू-शिष्य परंपरा असल्यानं सगळ्यांना गुरुकुल पद्धतीनंच सांगीतिक शिक्षण दिलं जायचं. प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, राजाभाऊ काळे यांच्यासारखे त्या वेळचे विद्यार्थी आमच्या घरी राहून गाणं शिकायचे. घरात पूर्ण वेळ सांगीतिक वातावरण असल्यानं माझ्यावर संगीताचे संस्कार लहानपणीच होत गेले. बाबा (पंडित जितेंद्र अभिषेकी) स्वतः साधक प्रवृत्तीचे असल्यानं पहाटे चार वाजल्यापासून तानपुऱ्याचा झंकार कानावर येत राही. हेच वातावरण रात्री झोपेपर्यंत असायचं.

लहानपणापासून राजाभाऊ काळे, सुधाकर देवळे यांनी माझ्याकडून बंदिशी मुखोद्गत करून घेतल्या. वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत ५०-६० बंदिशी मला मुखोद्गत होत्या. खऱ्या अर्थानं इथंच माझी सांगीतिक वाटचाल सुरू झाली. माझी संगीतातली रुची आणखी वाढत चालली आहे, याची जाणीव बाबांना व आईला जेव्हा झाली, तेव्हा त्यांनी मला जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका व गुरू कमलताई तांबे यांच्याकडं सांगीतिक शिक्षणासाठी पाठवलं. कमलताईंनी माझा संगीतातला पाया भक्कम करून घेतला. यानंतरच्या काळात पूर्ण वेळ मी बाबांच्या मार्गदर्शनाखाली सांगीतिक वाटचाल सुरू केली. या शिक्षणात रियाज करण्याविषयीची पद्धत, सकाळच्या खर्जाचा रियाज, सायंकाळचा अलंकाराचा रियाज या गोष्टींचा प्राधान्यानं समावेश होता; त्याचबरोबर तालामध्ये ख्याल व बंदिश याची मांडणी, त्यांचा विस्तार या गोष्टीदेखील होत्या. या गोष्टींची अधिक अनुभूती बाबांबरोबर प्रत्यक्ष कार्यक्रमात स्वरसाथ करताना मला आली.

जेव्हा कुणी संगीतसाधना करत असतो, तेव्हा पुढं या साधनेचं व्यावसायिक रूपांतर करणं किंवा त्यातून पैसा मिळवणं हे ध्येय नसतं. शास्त्रीय संगीत आपल्याला किती आत्मसात करता येईल, यावर अधिक भर असतो. त्या काळात गुरूच्या आज्ञेशिवाय कार्यक्रम करण्याची परवानगी आम्हाला नसे. माझा लहानपणापासून शाळेच्या, तसंच दूरदर्शनच्या कार्यक्रमात सहभाग असे. मात्र, खऱ्या अर्थानं माझे कार्यक्रम बाबांकडं एक तप साधना केल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार सुरू झाले. बाबांच्या शिस्तीबद्दल, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल अनेक मान्यवरांनी आजवर खूप लिहिलेलं-सांगितलेलं आहे. त्यांच्याबरोबर कार्यक्रमात, प्रवासात आलेल्या अनुभववैविध्याबद्दलही मी असंख्य वेळा मुलाखतींद्वारे बोललेलो आहे. मात्र, आजही २० वर्षांनंतर बाबा लौकिकार्थानं आमच्यात नसताना त्यांच्याबद्दल लोकांमध्ये कुतूहल, आदर तेवढाच दिसून येतो. बाबांचं सांगीतिक योगदान इतकं मोठं आहे, की त्यांना न पाहिलेली पिढीही त्यांच्या रचना आदरपूर्वक गाते.

मला असं वाटतं, की शिष्यांवर/विद्यार्थ्यांवर गुरूचा प्रभाव हा अटळ असतो. कारण, गुरूच्या सहवासात ते २४  तास असतात. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा आदर्श शिष्यांच्या/विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी असतो. मात्र, दोन शरीरं अथवा दोन आत्मे हे जसे वेगवेगळे असतात, त्यानुसार हळूहळू प्रत्येक शिष्यानं/विद्यार्थ्यानं स्वतःचा सांगीतिक शोध घेतला पाहिजे...आत्मशोध घेतला पाहिजे. आमचे बाबा मला नेहमी सांगायचे ः ‘‘माझा आवाज हा माझ्या गुण-दोषांसहित माझा आहे. तुझा आवाज तूच शोधला पाहिजेस. त्या आवाजातल्या गुण-दोषांची जाणीव तू स्वतः करून घेतली पाहिजेस व त्यानुसार तुझं संगीत प्रकट व्हायला हवं.’’ बाबांच्या पिढीतल्या अन्य कलाकारांचंही गायन मी, तसंच त्यांच्या अन्य शिष्यांनी ऐकावं, त्या अन्य कलाकारांच्या संगीताचा आम्ही अभ्यास करावा, असाही बाबांचा आग्रह असायचा. या मार्गानंच आम्ही घडत गेलो.

भारतीय शास्त्रीय संगीतात राग-अभ्यास ही जीवनभराची साधना आहे आणि ती कधीच थांबता कामा नये. आम्हाला गुरूंनी अनवट रागांची व जोडरागांचीही संथा दिलेली असल्यामुळं ‘माझ्या विशेष आवडीचे राग कोणते’ याबद्दल मी काही सांगू शकत नाही. मात्र, माझ्या मते प्रत्येक राग हा मोठाच आहे आणि उभं आयुष्य गेलं तरी त्या त्या रागाचा अभ्यास सुरूच राहत असतो. मला नेहमी असं वाटतं, की कलाकार हा बहुश्रुत आणि स्वागतशील असायला पाहिजे. आपल्या कलेची साधना करताना त्यानं इतर कलांचाही मनसोक्त आनंद घ्यायला हवा.
संगीतक्षेत्रातल्या कलाकारानं संगीताबरोबरच नृत्य, वाद्य, साहित्य, चित्रकला या अन्य कलांचा आनंद
मुक्तपणे घेणं आवश्‍यक आहे. असं केल्यास प्रत्येक कलेमधून आपली कला समृद्ध होण्यासाठी काही ना काही मदत नक्कीच होत असते. उदाहरणार्थ ः चित्रकलेत वापरल्या जाणाऱ्या रंगसंगतीमधून किंवा अमूर्ततेमधून एखाद्या गायकाच्या, गायिकेच्या सांगीतिक विचारांमध्ये प्रगल्भता येत असते.

घराण्याच्या चौकटीत राहून संगीतशिक्षण घेणं, यासारखा उत्तम मार्ग दुसरा नाही. मात्र, ‘माझं घराणं हेच संगीत आहे,’ हे अभिनिवेशानं सांगणं उचित नव्हे. एक विशिष्ट काळ घराण्याच्या शिस्तीत राहून संगीत-अभ्यास केलाच पाहिजे; परंतु यानंतर व्यापक दृष्टीनं विचार करता इतरही घराण्यांमधल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास झाला पाहिजे. तसं केल्यानं गायकाची सांगीतिक मांडणी जास्त विस्तारते. भारतीय शास्त्रीय संगीताचं वैशिष्ट्य हे ‘उपज’-अंग आहे. यातलं ख्यालगायन हे कुठंतरी अमूर्ततेच्या दिशेनं जाणारं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कलेच्या प्रांतात हे उपज-अंग आणि अमूर्तता अनुभवाला येते. यामुळंच इतर कलाप्रवाहांचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्यावर त्या कलाप्रवाहांचा प्रभाव जर पडत असेल, तर तो पडू द्यायला हवा.

अनेक गोष्टींचा रियाज व प्रत्यक्ष मैफल यांत खूप फरक असतो. कारण, गायकानं/गायिकेनं खूप गोष्टी शिकलेल्या असतात; परंतु ते शिकलेलं प्रत्यक्ष मैफलीत सादर करताना त्या वेळी उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळेतच सगळ्या गोष्टींना न्याय देत नेमकेपणानं मांडायचं असतं. आज कार्यक्रमांच्या निमित्तानं देश-विदेशात माझी भ्रमंती होते. आपल्या देशात व विदेशात कार्यक्रम करण्याचा अनुभव वेगवेगळा असतो. विदेशी रसिकांच्या मानानं आपल्या देशातला सांगीतिक प्रसार व ऐकणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त आहे; पण म्हणून विदेशात सादरीकरणाचा दर्जा व पद्धत बदलून चालत नाही. कारण, ते लोक ज्या संगीताचा आस्वाद घेण्यासाठी आलेले असतात, त्याचा ते अभ्यास करूनच आलेले असतात.

विदेशात गेल्यावर वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्यायला, तिथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला मला आवडतं. तिथं भेटणाऱ्या माणसांशी संवाद साधायला आवडतो.
आज जगात भारत देश त्याची संस्कृती, अध्यात्म, योगाभ्यास आदी गोष्टींबरोबरच भारतीय शास्त्रीय संगीतासाठी विशेषत्वानं ओळखला जातो. असं असताना आपल्या देशात याचा प्रचार व प्रसार ज्या पद्धतीनं व्हायला हवा तसा होताना दिसत नाही, ही प्रत्येक कलाकाराच्या मनातली खंत आहे.

ज्याप्रमाणे बाबांनी आम्हाला कलेशी बांधिलकी जपायला शिकवलं, त्याचप्रमाणे आमच्या आईनं आम्हाला जगायचं कसं, हे शिकवण्याबरोबरच ‘कलाकाराची सामाजिक बांधिलकी’ याचीदेखील जाणीव करून दिली. कलाकार हा आत्ममग्न असतो; त्याच्या सांगीतिक शोधात तो हरवलेला असतो; परंतु जो समाज त्याला मान-सन्मान देतो, मोठा करतो, त्याच्याबद्दल कलाकारानं बांधिलकी ही ठेवायलाच हवी. याच भावनेतून माझ्या आई-बाबांनी ‘तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान’ या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. त्याअंतर्गत ते अनेक समाजाभिमुख कार्य करत असत. सध्या मी, माझे आत्येभाऊ मंगेश मुळ्ये आणि बाबांचे शिष्य हे कार्य पुढं नेत आहोत. गरजू व बुजुर्ग कलाकारांना आर्थिक मदत, तरुण विद्यार्थ्यांना सांगीतिक शिक्षणाची सोय, होतकरू कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून या स्वरूपाची कामं या ट्रस्टच्या वतीनं केली जातात.
(शब्दांकन : रवींद्र मिराशी)

Web Title: shaunak abhisheki write article in saptarang