somnath-venugopal
somnath-venugopal

सोमनाथपूरचा वेणुगोपाळ

दक्षिणेतल्या हिंदू राजांच्या प्रभावळीतलं एक उज्ज्वल नाव म्हणजे कर्नाटकातला होयसळ राजवंश. कावेरी नदीच्या पाण्यानं समृद्ध झालेल्या आजच्या कर्नाटकमधल्या हासन शहराजवळच्या कावेरी खोऱ्यातून या होयसळ राजांनी अकराव्या ते चौदाव्या शतकादरम्यान जवळजवळ साडेतीनशे वर्षं राज्य केलं. आधी ते वातापीच्या चालुक्यांचे मांडलिक होते. पुढं चालुक्यांचं साम्राज्य हळूहळू कमजोर होत गेलं आणि होयसळ राजांचा वैभवकाळ आला. आपल्या कारकीर्दीत होयसळ राजांनी एक हजार मंदिरं बांधल्याचे उल्लेख जुन्या कन्नड साहित्यात आहेत, त्यातली शंभरेक मंदिरं आजही कर्नाटकात अस्तित्वात आहेत. 

होयसळ-स्थापत्य म्हटलं की बेलूर आणि हळेबिडू ही दोन नावं सर्वप्रथम आपल्याला ऐकायला मिळतात. बेलूर ही होयसळांच्या साम्राज्याची पहिली राजधानी. तिथलं चेन्नकेशवाचं भव्य मंदिर आजही उपासनेत आहे. बेलूरला पाणी कमी पडायला लागलं म्हणून राजा विष्णुवर्धन या होयसळ राजानं आपली राजधानी जवळच्याच हळेबिडू इथं हलवली. तिथं त्यानं एक प्रचंड सरोवर बांधलं, त्याचा व्यास इतका मोठा होता की ते सरोवर लोकांना समुद्रासारखं भव्य वाटायचं. त्यामुळे हळेबिडूचं तत्कालीन नाव होतं द्वारसमुद्र. हळेबिडूला दोन भव्य शिवमंदिरं आहेत.  मात्र, आज मी ओळख करून देणार आहे ती बेलूर-हळेबिडूच्या भव्य मंदिरांची नव्हे, तर याच होयसळपरंपरेतल्या एका छोट्याशा; पण अतिशय सुंदर अशा मंदिराची. बेलूर-हळेबिडूची मंदिरं सुविख्यात आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक या दोन मंदिरांना भेट देतात; पण याच शिल्पपरंपरेतलं एक खूप सुंदर मंदिर म्हैसूरजवळ सोमनाथपुरा इथं आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. बेलूर-हळेबिडूच्या मंदिरांच्या तुलनेनं हे मंदिर बरंच उपेक्षित आहे. ‘बेलूरचं चेन्नकेशव मंदिर आतून बघावं, हळेबिडूचं होयसळेश्वर मंदिर बाहेरून बघावं,’ अशी कन्नडमध्ये म्हण आहे. सोमनाथपूरचं मंदिर मात्र आतून आणि बाहेरून दोन्हीकडून बघावं इतकं ते सुरेख आहे!

मला हे मंदिर खूप आवडतं. इथपर्यंत पोहोचणंही तसं सोपं आहे. म्हैसूर शहरापासून सोमनाथपूरचं हे मंदिर जेमतेम २७ किलोमीटरवर असेल. बंगळुरू किंवा म्हैसूरला मुक्काम केला तर एका दिवसात संपूर्ण मंदिर बघून होतं. बंगळुरू ते म्हैसूरपर्यंतचा रस्ता अत्यंत चांगला आहे. जवळजवळ सगळा रस्ता कर्नाटकची जीवनदायिनी नदी कावेरीच्या कडेकडेनं जातो, त्यामुळे डोळे निववणारी हिरवीगार शेती आणि झाडी दोन्ही बाजूंना आहे. 

सकाळी सात वाजता बंगळुरूहून निघाल्यास दहा वाजेपर्यंत सोमनाथपूराला पोहोचता येतं. म्हैसूरपर्यंतचा रस्ता अत्यंत चांगला आहे. चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीच्या फौजेतल्या धर्मांध मुसलमानी आक्रमकांनी इथल्या गाभाऱ्यातल्या मूर्तीचा भंग केला आहे, त्यामुळे सोमनाथपूरला पूजा-अर्चा होत नाही. मंदिर सध्या एएसआयच्या ताब्यात आहे. तिथला गाईड रामकृष्ण याच्या शब्दांत सांगायचं तर, ‘हे मंदिर आता मंदिर उरलं नाही, ते फक्त एक संग्रहालय आहे’. मंदिराबाहेरची देखणी शिल्पेदेखील खिलजीच्या सैन्याने छिन्नविच्छिन्न करायचा प्रयत्न केला, काही देवमूर्तींची नाकं तुटलेली आहेत, तर काहींचे हात-पाय. मात्र, इतक्या क्रूर, विध्वंसक हातांतून जे बचावलंय तेही इतकं सुंदर आहे की हे मंदिर सुस्थितीत असताना किती भव्य दिसत असेल असा विचार मनात येतोच! 

हे मंदिर होयसळ राजा नरसिंहराज तिसरा याच्या कारकीर्दीत सोमनाथ दंडनायक नावाच्या त्याच्या पराक्रमी सेनापतीनं सन १२६८ मध्ये बांधून घेतलं अशा अर्थाचा एक प्रचंड शिलालेख मंदिराच्या भव्य प्राकारात ठेवलेला आहे. हा शिलालेख संस्कृत आणि अभिजात कन्नड म्हणजे हळेकन्नड अशा दोन्ही भाषांमध्ये आहे. होयसळ साम्राज्याच्या कारकीर्दीत बांधलं गेलेलं हे शेवटचं मंदिर. 

सोमनाथपूरच्या मंदिराचं पहिलं दर्शन होताच आपल्या मनात पहिल्यांदा ठसते ती या मंदिराची प्रमाणबद्धता! इतका प्रचंड आकार आणि दर्शनी भागात दिसणारी शिल्पांची रेलचेल असूनसुद्धा मंदिर कुठंच डोळ्यांवर आघात करत नाही. 

होयसळमंदिरांची काही वैशिष्ट्यं आहेत. पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे होयसळमंदिरांची जगती म्हणजे जोतं नक्षत्राकार असतं आणि प्रदक्षिणापथ मंदिराच्या बाहेर असतो. एका मंदिरात एकाहून अनेक शिखरं आणि गर्भगृहं असू शकतात; पण नृत्यमंडप मात्र सहसा एकच असतो व तो लेथवर फिरवून गोल गुळगुळीत केलेल्या खांबांनी तोलून धरलेला असतो. 

होयसळमंदिराच्या शिखरांच्या संख्येवरून मंदिराची ओळख ठरते. एकच शिखर आणि एक गर्भगृह असेल तर ते एककूट मंदिर, दोन शिखरं असतील तर ते द्विकूट, तीन असतील तर त्रिकूट, चार असतील तर चतुष्कूट आणि पाच असतील तर ते पंचकूट मंदिर असं होयसळ मंदिरांचं वर्गीकरण होतं. 

सोमनाथपूरचं मंदिर हे ‘त्रिकूट मंदिर’ आहे. इथल्या तीन गाभाऱ्यांत श्रीविष्णूची तीन रूपांमध्ये उपासना व्हायची. केशव, जनार्दन आणि वेणुगोपाळ. सध्या इथली मूळची केशवाची मूर्ती चोरीला गेलेली असल्यामुळे गाभाऱ्यात दुसरीच एक विष्णुमूर्ती ठेवलेली आहे, उरलेल्या दोन गाभाऱ्यांतल्या मूर्ती मात्र मूळच्याच आहेत. विशेषतः वेणुगोपाळाची बासरी वाजवतानाची काळ्या पाषाणाची मूर्ती अत्यंत सुरेख आहे. मूर्तीच्या चेहेऱ्यावरचे भाव, उभं राहतानाचा शरीराचा नृत्यमय डौल, बासरीवरून फिरणारी लांबसडक बोटं तर इतकी सुरेख आहेत, की वाटतं कुठल्याही क्षणी ही बोटं बासरीवरून फिरू लागतील. 

मंदिराचं छतदेखील बघण्यासारखं आहे. केळफुलाच्या आणि कमळफुलाच्या वेगवेगळ्या स्थितीतल्या शिल्पाकृतींनी छत तोलून धरलंय. एका चौकोनात अनंत सर्पाकृती आहे, म्हणजे अनंतनागाच्या देहाची अनेक गुंतागुंतीच्या वेटोळ्यांतून निर्माण झालेली शिल्पाकृती. जन्म-मरणाच्या फेऱ्यामुळे मानवी आयुष्याला न आदी, न अंत हे सुचवणारी ही आकृती. मंदिराचा बाहेरचा भाग तर निव्वळ अप्रतिम! एक इंचही जागा रिकामी सोडलेली नाहीये. 

होयसळमंदिरांच्या दर्शनी भिंती विशिष्ट शैलीत कोरल्या जातात. जगतीपासून वर जवळजवळ पाच फूट दगडांचे शिल्पपट्ट असतात. सगळ्यात खालच्या पट्टीला ‘गजथर’ म्हणतात.शक्तीचं प्रतीक म्हणून त्यावर हत्ती कोरलेले असतात. त्यावरच्या पट्टीवर ‘अश्वथर’, हिच्यावर वेगाचं प्रतीक म्हणून घोडे कोरलेले असतात, त्यावरच्या पट्टीला म्हणायचं ‘नरथर.’ कारण, त्यावर महाभारतातले-रामायणातले प्रसंग किंवा त्या वेळच्या लोकांच्या दैनंदिन जीवनातले प्रसंग आहेत. त्यानंतरच्या पट्टीत ‘व्याळ’ किंवा ‘मकर’ हे काल्पनिक प्राणी, त्यावरच्या पट्टीत गायक, वादक, नर्तक कोरलेले आहेत.  क्वचित मैथुनशिल्पंही. आणि सगळ्यात वरती हंसपक्षी. कारण, त्याच्यापाशी नीरक्षीरविवेक असतो. हे सगळे थर संपल्यावर मंदिराची मुख्य भिंत सुरू होते. या भिंतीवर अनेक देवकोष्ठ म्हणजे कोनाडे असतात आणि त्या प्रत्येक देवकोष्ठामधून देवांची शिल्पं कोरलेली असतात. 

सोमनाथपूरच्या मंदिरातल्या देवकोष्ठातून श्रीविष्णूची असंख्य शिल्पं आहेत, त्याचबरोबर नृत्यलक्ष्मी, सरस्वती, रती-मन्मथ आणि श्रीगणेश यांची नितांतसुंदर शिल्पं कोरलेली आहेत. ही सगळीच शिल्पं इतकी देखणी आहेत की डोळ्यांचं पारणं फिटतं. मूर्तींच्या अंगावरची आभूषणं, चेहेऱ्यावरचे भाव हे सगळंच इतकं बारकाईनं दाखवलं गेलंय की शिल्पकारांच्या उत्तुंग प्रतिभेपुढं आपण नकळतच नतमस्तक होऊन जातो. बहुसंख्य होयसळमंदिरं ही ‘क्लोराईट शिस्ट’ या दगडात बांधलेली आहेत. या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे, नुकताच खाणीतून काढलेला असताना हा दगड साबणासारखा मऊ असतो आणि त्यामुळे अगदी नाजूक कोरीव काम या दगडावर होऊ शकतं. म्हणूनच सोमनाथपूरच्या शिल्पांमध्ये आभूषणांची इतकी रेलचेल आहे. 

हिंदुपरंपरेत सहसा शिल्पकार स्वतःची नावं कुठं कोरून ठेवत नाहीत; पण या मंदिरात मात्र शिल्पकारांनी स्वतःची नावं शिल्पांखाली लिहून ठेवली आहेत. इथला प्रमुख शिल्पकार होता रेवारी मालीताम्मा. त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अद्भुत प्रतिभेला वंदन करण्यासाठी तरी सोमनाथपूरचं हे अद्वितीय मंदिर पाहायलाच हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com