भाजप बनला इंदिरा काँग्रेस

भाजप बनला इंदिरा काँग्रेस

‘ब्रॅंड गुरू’ अलेक पद्‌मसी एक किस्सा नेहमी सांगायचे. ‘‘ ग्राहक मला त्यांच्या ब्रॅंडची फेरमांडणी करायला सांगतात. त्यावर मी त्यांना म्हणतो, मी माझ्या ब्रॅंडची कधीच फेरमांडणी करत नाही. मी माझ्या प्रतिस्पर्ध्याच्याच ब्रॅंडची फेरमांडणी करतो.’’ दुर्दैवाने अलेक यांचे नुकतेच निधन झाले; अन्यथा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांच्याशी चर्चा करायला मजा आली असती. मोदी- शहा यांनी ज्याच्या बळावर २०१४ मध्ये मतबाजार जिंकला, त्या ब्रॅंडच्या पूर्णतः विपरीत वर्तन करण्याची चूक त्यांनी केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी नकारात्मक शब्द क्वचितच वापरले होते आणि निराशावादाचा सूर तर मुळीच लावला नव्हता. त्यांचा संदेश ठोस, सुसंबद्ध आणि विश्‍वासार्ह होता. सर्व आघाड्यावर विकास, प्रगती, नोकऱ्या, सक्षम प्रशासन आणि अच्छे दिन, स्वच्छ, निर्णायक, व्यापक कारभार आणि किमान सरकार आदी वचने त्यांनी दिली होती. ते भविष्याबद्दल आणि विशेषतः भारतातील युवकांसाठी क्रांतिकारी बदल घडवून आणण्याबद्दल बोलत होते. त्यांनी भूतकाळाचा उल्लेख केला तर तो केवळ  ‘संपुआ’ सरकारचे अपयश, धोरण लकवा, निष्क्रिय कारभार, पंतप्रधानांची मानहानी, पर्यावरणविषयक परवानग्या देण्यातील धक्कादायक गोंधळ आणि अर्थातच अनेक गैरव्यवहार यांच्यापुरताच असायचा. ते विभाजन अथवा ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत नव्हते. त्यांच्या मोहिमेचे सूत्र होते ‘सबका साथ, सबका विकास.’ 

त्यांचा मूलभूत संदेश होता. मी समस्या जाणतो म्हणूनच उपाय घेऊन येत आहे. मला जनादेश, वेळ आणि विश्‍वास द्या. हे एक प्रभावी उत्पादन सिद्ध झाले. त्याने स्पर्धाच संपवून टाकली. पुढील निवडणुकीला सहा महिने शिल्लक राहिले असताना मात्र त्यांचा संदेश बव्हंशी दुसऱ्या टोकाचा आहे. इंदिरा गांधी यांच्या नंतरचे सर्वांत कणखर पंतप्रधान अशी त्यांची प्रतिमा साकार झाली. मात्र, तेच आता तक्रार करत आहेत की काँग्रेस मला काम करू देत नाही. ‘मी भारतमाता की जय’, अशी घोषणा दिली तर काँग्रेस आक्षेप घेते असे त्यांनी अलिकडेच म्हटले होते. याचा अर्थ असा होतो की, मनमोहनसिंग यांची कथितपणे मुस्कटदाबी करणारा १० जनपथमधील कंपू आता त्यांचीही गळचेपी करत आहे. तेही त्यांचे लोकसभेत अवघे ४७ एवढे संख्याबळ असताना. त्यांना नोकऱ्या हव्या आहेत; मग गाय घ्या. 

तरुण भारतातील बेरोजगारांच्या फौजा गावांमधील चौकात कॅरम, पत्ते खेळण्यात किंवा गप्पा मारण्यात मग्न आहेत. विडी, सिगारेट फुंकण्यात किंवा इंटरनेट डेटा जवळपास फुकट असल्याने चिनी बनावटीच्या स्मार्टफोनवर कचरा चिवडण्यात ते वेळ घालवताना दिसतात. या तरुणांचा संताप आणि नैराश्‍य वाढत चालले आहे. मोदी यांना सत्ता मिळवून देणाऱ्या आपल्या आकांक्षासाठी आत्मसन्मानाचा शोध सोडून गोरक्षणाला तनमनाने वाहून घेण्यासाठी ते तयार होतील का? नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून तसे वाटत नाही.

विजयोत्सव साजरा करणारे मोदींचे टीकाकार आणि कार्यकर्ते या निकालासाठी फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वेदना कारणीभूत असल्याचे मानत असतील तर ते चुकीचे आहे. निवडणुका झालेल्या राज्यातील बहुतेक शहरात भाजपचा पराभव झाल्याचे आकडेवारी सांगते. शहरी-निमशहरी मध्यमवर्ग आणि बेरोजगार तरुण हेच मोदी यांचे सर्वांत मोठे, सर्वांत आवाजी आणि सर्वांत आशावादी समर्थक होते. २०१४ मधील निकालानंतर मी लिहिले होते की, हा भारतामधील नवसहस्रकातील बिगर विचारसरणीवादी, व्यवहारवादी, मी तुमचे काहीही देणे लागत नाही, अशा प्रवृत्तीच्या पिढीचा उदय आहे. सर्व प्रकारच्या वारसा हक्काबाबत आणि विशेषतः घराणेशाहीबाबत तिटकारा असलेल्या या पिढीने काँग्रेसला भुईसपाट केले होते. त्यांना त्यात घराण्याविरोधात लढण्याचे आवाहन मोदी आणि शहा करत आहेत. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नाही. गोंधळून गेलेले मतदार एकच प्रश्‍न विचारत आहेत, आम्हाला वाटले तसे तुम्ही आहात का?

सिंह आणि शेतकरी
२०१४ मधील त्या अत्यंत प्रभावी प्रचार मोहिमेत सोनिया गांधी आणि त्यांच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाने अवलंबलेल्या कल्याणकारीवादाचा समाचार घेताना मोदी यांनी एक मनोरंजक कथा सांगितली होती. एक शेतकरी जंगलातून जात असताना अचानक भुकेल्या सिंहासमोर आला. त्याचा फडशा उडवण्यासाठी सिंह सज्ज झाला. मात्र, शेतकरी शांत होता. ‘आत्मघातीपणा करू नकोस’, शेतकऱ्याने सिंहाला बजावले. ‘पुढे आलास तर बंदुकीची गोळी घालीन’, असा इशाराही त्याने दिला. सिंह थबकला, बुचकळ्यात पडला. त्याने एकवार शेतकऱ्याकडे बारकाईने पाहिले आणि विचारले; ‘पण बंदूक आहे तरी कुठे?’ शेतकऱ्याने बंडीच्या खिशातून घडी घातलेला एक कागद काढला. ‘हे बघ सिंहभाऊ, अजून बंदूक मिळाली नाही; पण सोनियाजींनी परवाना दिला आहे’, असे शेतकरी उत्तरला. ही कहाणी ऐकल्यावर हजारोंच्या जमावातून हशा उसळायचा. मोदींचा संदेश अचूक समजायचा. 

मतदार संभ्रमात
गरिबी, रोजगाराची कमतरता, प्रगतीच्या आकांक्षा यांच्यावर खिरापत वाटणाऱ्या योजना हे उत्तर असू शकत नाही. अधिकारांना कायद्याचे अधिष्ठान (बंदुकीच्या परवान्याचे रूपक) दिले तरी त्यातून मूलभूत समस्या सुटणार नाहीत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) म्हणजे तर काँग्रेस सरकारच्या दशानुदशकातील अपयशाचा सर्वांत मोठा पुरावा आहे, असा हल्लाही मोदींनी चढवला होता. आता तेच या योजनेत आणखी पैसा ओतत आहेत आणि अशाच प्रकारच्या आणखी काही योजना पुढे आणत आहेत. 

वचनांचा विसर
भ्रष्टाचाराचे निर्मूलन हे भाजपचे एक कळीचे वचन होते. हे खरे की, या राजवटीत कोणतेही मोठे गैरव्यवहार झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळाले नाहीत. मोदींच्या वैयक्तिक सचोटीच्या भक्कम प्रतिमेवर ओरखडाही उमटलेला नाही; तथापि, नागरिक आणि प्रशासन असा संघर्ष तीव्र झालेला दिसतो. दरम्यान, भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचा नायनाट करण्यासंदर्भात या सरकारची कामगिरी कशी आहे? टू जी प्रकरणातील सर्व संशयित दोषमुक्त झाले. कोळसा गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेस-संपुआ नेते आणि उद्योगपतींना खरचटलेही नाही. भ्रष्टाचार केलेला नसतानाही तीन निरपराध सनदी अधिकारी मात्र तुरुंगात गेले. तेही याच सरकारने रद्द केलेल्या कायद्याखाली. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा, आदर्श, एअर इंडियाचे व्यवहार भारताचे राजकारण तळापासून ढवळून काढणारे सर्व गैरव्यवहार विस्मृतीत गेले. मोजक्‍या व्यक्तींविरोधात खटले सुरू असून, एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही. सरकार आणि त्यांच्या सर्व यंत्रणांनी विरोधकांना नवनवीन प्रकरणात अडकवण्यात संपूर्ण वेळ घालवला. त्यातही अपयशच आले. सर्व प्रकारचे बिघाड दूर करण्याची क्षमता असल्याची द्वाही फिरवत नरेंद्र मोदी आणि शहा यांनी २०१४ मध्ये नवी सुरवात केली. आता ते कडवट, संतप्त, नकारात्मक, खुनशी वाटू लागले आहेत. जिंकल्याचे तिकीट हातात असतानाही अशी अचंबित करणारी स्व-फेरमांडणी कशासाठी? अलेक पद्‌मसी यावर खळखळून हसले असते.

शौरींचे ते विधान
सत्तांतर झाल्यानंतर काही दिवसांतच अरुण शौरी यांनी भाजप सरकार म्हणजे ‘काँग्रेस अधिक गाय’ असे भविष्यवेधी विधान केले होते. त्यांचे हे वक्तव्य तसे सौम्य असल्याचेच आता स्पष्ट होत आहे. भाजप सरकार म्हणजे ‘काँग्रेस अधिक गाय’ हे खरे आहे; पण ही काँग्रेस जुनी इंदिरा युगातील आहे.  मोदींचा भाजप हा ‘जुनी काँग्रेस अधिक गाय’ असल्यास ही नाममुद्रा अथवा उत्पादन वेगळे कसे? मोदी-शहा आणि अगदी मोहन भागवत हे घराणेशाहीचे प्रतिनिधी नाहीत; परंतु त्यांच्या धोरणात कोणता वेगळेपणा आणि मनमोहकता आढळते? अल्पसंख्याकांची भीती? हा तर मुद्दाच होऊ शकत नाही.

अनुवाद : विजय बनसोडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com