कोकणात ‘हाय व्होल्टेज’ लढतीची तयारी

शिवप्रसाद देसाई
गुरुवार, 10 जानेवारी 2019

शिवसेना, भाजप यांची युती होण्याची शक्‍यता धूसर झाल्याने कोकणात लोकसभेच्या लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. चारही प्रमुख पक्षांनी चाचपणी सुरू केली असली, तरी शिवसेना आणि भाजप यांच्यातच चुरशीची लढत होईल अशी चिन्हे आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांत चिपळूणपासून दोडामार्गपर्यंत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. २०१४ मधील लढतीत शिवसेनेचे विनायक राऊत दीड लाखाच्या फरकाने निवडून आले; मात्र आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. पूर्ण मतदारसंघाचा विचार करता काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ची स्थिती फारशी चांगली नाही; मात्र शिवसेना, भाजप यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. यात नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरेल. या मतदारसंघात शिवसेनेकडे पाच, तर काँग्रेसकडे विधानसभेची एक जागा आहे.

संघटनात्मकदृष्ट्या शिवसेना चांगल्या स्थितीत आहे. हे वर्चस्व राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. युती झाली नाही तर भाजपही येथे आव्हान उभे करेल अशी स्थिती आहे. यात त्यांना ‘स्वाभिमान’ची किती साथ मिळते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

खासदार राऊत यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. शिवसेनेचे सचिवपद आणि ‘मातोश्री’वर असलेले वजन यामुळे संघटनेवर त्यांचे नियंत्रण आहे. जवळपास सगळीकडे असलेले पक्षाचे संघटनात्मक बळ आणि शिवसेनेविषयी कोकणातील आत्मीयता हे त्यांचे बळ आहे. पक्षांतर्गत फारसा कोणी प्रतिस्पर्धी नसल्याने शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी जवळपास पक्की आहे. भाजप स्वतंत्रपणे लढल्यास केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येऊ शकते.

‘सावंतवाडी महोत्सवा’वेळी प्रभू यांनी आपण लोकसभा लढवणार नसल्याचे वक्तव्य केले होते; मात्र पाच राज्यांतील निवडणूक निकालात भाजपची झालेली पिछेहाट पाहता लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्षादेश म्हणून प्रभूंना निवडणुकीत उतरावे लागेल. ते नसतील तर भाजप आमदार प्रसाद लाड यांना उमेदवारी देऊ शकतो.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे; मात्र शिवसेनेला लढत द्यायची असेल, तर भाजपला प्रभूंना रिंगणात उतरवावे लागेल. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्यास नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष ‘राष्ट्रवादी’शी जवळीक साधेल अशी चर्चा होती. त्यांनी सिंधुदुर्गात काढलेल्या ‘विश्‍वास यात्रे’त भाजपला टीकेचे लक्ष्य करून तसे सूचितही केले होते; मात्र आता युतीची शक्‍यता धूसर झाल्याने भाजप-‘स्वाभिमान’ एकत्र येतील. भाजपने जाहीरनामा निर्मिती आणि प्रभावी प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी जाहीर केलेल्या समितीत राणेंचा समावेश केल्याने याला दुजोरा मिळाला आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास या मतदारसंघावर ‘स्वाभिमान’ दावा करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शिवसेनेला शह देण्याची संधी आणि विधानसभा निवडणुकीसाठीचे महत्त्व लक्षात घेता भाजप हा मतदारसंघ सोडण्याची शक्‍यता कमी आहे. विधानसभा लढतीत कोकणात ‘स्वाभिमान’ला जागावाटपात झुकते माप देण्याच्या अटीवर राणे भाजपच्या मागे आपली ताकद उभी करू शकतात. प्रभू उमेदवार असतील आणि राणेंची ताकद त्यांच्या मागे असेल, तर येथे ‘क्‍लोज फाइट’ पाहायला मिळेल.

‘राष्ट्रवादी’चा चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरीचा काही भाग वगळता फारसा प्रभाव नाही. लोकसभेसाठी त्यांच्याकडून उमेदवार कोण असेल हेही स्पष्ट नाही. काँग्रेस संघटनात्मकदृष्ट्या कमजोर आहे; मात्र काँग्रेसला मानणारा मतदार आजही टिकून आहे. शिवाय अल्पसंख्याक समाजातील भाजपविरोधी ‘व्होट बॅंक’ काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करेल, असे चित्र आहे. सद्यःस्थितीत काँग्रेसकडून माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांचे नाव चर्चेत येऊ शकते. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, तर ते बऱ्यापैकी मते मिळवू शकतील; मात्र विजयापर्यंत पोचण्याइतपत मजल मारणे सद्यःस्थिती पाहता अवघड आहे.

एकुणच पूर्ण मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक स्थिती चांगली आहे; मात्र भाजप आणि ‘स्वाभिमान’ त्यातही प्रभू आणि राणे एकत्र आल्यास ते शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे करू शकतात. यापैकी एक जरी नेता सक्रिय नसेल, तर मात्र शिवसेनेसाठी लढाई सोपी होणार आहे.

Web Title: Shivprasad Desai article on Konkan Lok Sabha Election

टॅग्स