म्हातारपणाला वय नसतं

म्हातारपणात बालपण दडलेलं असतं. आपण हे बालपण लहान मुलांसारखं जागं ठेवलं तर जीवनाचा आनंद आयुष्यभर घेऊ शकतो, त्यासाठी समाधानी वृत्ती हवी...
old people
old peoplesakal

- शोभना कसबेकर

म्हातारपणात बालपण दडलेलं असतं. आपण हे बालपण लहान मुलांसारखं जागं ठेवलं तर जीवनाचा आनंद आयुष्यभर घेऊ शकतो, त्यासाठी समाधानी वृत्ती हवी...

हल्ली सगळीकडे वृद्धत्वावर जे वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं त्यामुळे असं वाटतं की याविषयी प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती घर करून राहिली आहे. म्हातारपण हा काही अचानक आलेला आजार नव्हे. ही जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही मनाची अवस्था आहे. ही अनुभवपूर्ण आयुष्य जगून झाल्यानंतर गंतव्याची वाट आहे.

आपण आयुष्यभर नाना अनुभवांची पोतडी गोळा केलेली असते; पण एव्हाना आपण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरवून टाकलेला असतो. तो बदलण्याची आपली तयारी वयानुसार कमी झालेली असते. सकारात्मक भावना कमी होतात. सगळं कळतं; पण जुळवून न घ्यायला अहंकार आणि आडमुठेपणा आड येतो. याचा आपण कधी गांभीर्याने विचार करतो का?

प्रत्येकाच्या जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे. प्रत्येकाची जीवनरेखा ठरलेली आहे. ती आपल्याला स्वीकारावीच लागते. दुसरा कुठलाही पर्याय आपल्याकडे नाही. मृत्यू न आल्यास म्हातारपणाच्या विवंचनेला प्रत्येकाला सामोरे जावे लागतेच. या म्हातारपणाचे नियोजन करण्याऐवजी हा विषय जाणूनबुजून टाळला जातो, ही सध्याची सत्यस्थिती आहे. मृत्यूपेक्षा म्हातारपणाचा प्रश्न आपल्याला जास्त सतावतो.

मृत्यूनंतर सगळंच संपणार असतं. पुढं काय, हा प्रश्नच उद्भवत नाही. याउलट वृद्धत्वात तब्येतीच्या तक्रारी, मानसिक अस्थिरता, स्वाभिमान अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. या भीतीचं दडपण आपल्याला त्रस्त करत असतं. शरीराच्या झिजेला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरं जाणं हे जगण्याचं यश आहे. एकटेपणा न येता जगणं आपल्या हातात आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत आनंदी राहण्याचा आपण निर्धार केला, तर सगळं सहज शक्य होणार आहे. निवृत्तीनंतर आपापल्या पैशाचं, वास्तव्याचं नियोजन करणं आपल्या हातात आहे. आपलं आरोग्य जपणं आपल्या मनावर आहे. शरीर स्वस्थ राहिलं तरी मन चंचल होतं. मनाला काबूत ठेवायला शिका. आपल्या जगण्याचा काही उपयोग नाही, हा विचार मनातून काढून टाका.

निसर्गानं बालपण, तारुण्य आणि म्हातारपण या तीन टप्प्यात आपलं आयुष्य आखलं आहे. पहिले दोन टप्पे क्रियाशील; तर तिसऱ्या आयुष्याचं समाधान मिळवायचं आहे. आपल्या अनुभवांच्या बळावर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याचा हा काळ आहे. आज काळ झपाट्याने पुढे जात आहे. अशा वेळी काळाशी जुळवून घेणं बऱ्याच वृद्धांना जमत नाही. याचं कारण त्यांच्या मनावर खोलवर कोरला गेलेला संस्काराचा पगडा.

काही जण आपले विचार, रुढी मुलांवर लादू लागतात. तेव्हा दोन पिढ्यांच्या अंतरात समन्वय साधण्यात ठिणगी पडते. निराशा येते. त्यामुळे आपण आपला कुठलाही अनुभव मुलांवर लादू नका. कारण त्यांना तो अनुभव येईलच, याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. चुकीच्या वाटेवर गेलेल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यास मात्र विसरू नका.

ते आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. म्हातारपणात बालपण दडलेलं असतं. आपण हे बालपण लहान मुलांसारख जागं ठेवलं तर जीवनाचा आनंद आयुष्यभर लुटू शकाल. यासाठी समाधानी वृत्ती हवी. गैरसोयीचे बदल जुळवून घ्यायची ताकद आपल्यात हवीच हवी. तक्रारीचा सूर नको.

घरातील चार भिंतीत एकटं राहण्यापेक्षा आपल्याला आप्तेष्टांबरोबर आनंद मिळवण्याची संधी वृद्धाश्रमाच्या माध्यमातून मिळणार असेल, तर त्यात बिघडलं कुठं? आपण आयुष्यभर घरावर प्रेम केलं, घरातील प्रत्येक वस्तूवर जीवापाड माया लावलीत, तर त्यांना आता सोडून जायचं कसं? शेवटी वानप्रस्थाश्रमाची जागा आपल्या आयुष्यात आहेच ना?

दुःखात कुढत राहण्यापेक्षा आनंदाची जागा शोधणं उचित नाही का वाटत? आपली क्रियाशीलता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. तेव्हा वृद्धाश्रमाची गरज लागेल. जरुर असेल तर आनंदाने हा पर्याय स्वीकारा. हा वृद्धाश्रम नव्हे, तर हे वृद्धालय आहे. आपलं दुसरं घर आहे. घर म्हणजे नुसत्या भिंती नव्हेत. तिथे प्रेमाचा ओलावा हवा असतो. काळजी घ्यायला कुणीतरी हवं असतं.

या दृष्टीने वृद्धालयाचा विचार जरूर व्हावा. इथं माणसं जोडायला संधी आहे. नवीन गोष्टी शिकता येतील. आयुष्य सुखकर होईल. बा. भ. बोरकर म्हणतात, ‘‘फुलल्या वेलीला वयं नसत’’ तसंच म्हातारपणालाही वय नसतं. आपण आनंदानं ते स्वीकारायचं आणि अभिमानानं जगायचं!

म्हातारपण हा काही अचानक आलेला आजार नव्हे. ही जीवनाची नैसर्गिक अवस्था आहे. अनुभवपूर्ण आयुष्य जगून झाल्यानंतर गंतव्याची वाट आहे. मनाला काबूत ठेवायला शिका. आपल्या जगण्याचा काही उपयोग नाही, हा विचार मनातून काढून टाका. म्हातारपणात बालपण दडलेलं असतं. आपण हे बालपण लहान मुलांसारखं जागं ठेवलं, तर जीवनाचा आनंद आयुष्यभर लुटू शकाल. यासाठी समाधानी वृत्ती हवी. गैरसोयीचे बदल जुळवून घ्यायची ताकद हवी. तक्रारीचा सूर नको.

shobhana.kasbekar@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com