मूकनायकांची `अजिंक्य` गाणी...अमरावतीतील त्या बालकांच्या जीवनावर बनली फिल्म...निर्मातेही भन्नाटच...

प्रमोद काळबांडे
Friday, 17 July 2020

मुजरिमांची मुले म्हणून समाजाने जणू वाळीत टाकलेली शेकडो बालके आता चांगलं जगण्यासाठी धडपडताहेत. त्यांना सुंदर आकाश बहाल करण्याचा प्रयत्न एक तरुण करीताहे. ती बालके आणि तो तरुण आता एका शार्ट फिल्मचा विषय झाला आहे. ती फिल्म काढणारेही भन्नाट तरुण आहेत..वाचाच.

मुजरिम ना कहना मुझे लोगो
मुजरिम तो सारा जमाना हैं
पकडा गया वो चोर हैं,
जो बच गया व सयाना हैं...

नागपूर येथील संविधान साहित्य संमेलनात स्टेजवरून एक मुलगा कळवळून हे गाणं म्हणायला लागला आणि मला सहा-सात वर्षांपूर्वी चंद्रपूर येथे आयोजित महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशनातील प्रसंग आठवला. अधिवेशनाची तयारी सुरू असताना तत्कालीन सरचिटणीस हरीश ससनकर यांचा फोन आला. `आमच्या या अधिवेशनात तुम्हाला शिक्षण हक्क कायदा या विषयावर बोलायचे आहे.' मी त्यांचा प्रस्ताव स्वीकारताना एक विनंती केली. `या कायद्याची स्थिती काय आहे, याचे प्रात्यक्षिकच मी तुम्हाला स्टेजवर दाखवितो.' हरीशरावांनी विचारले, `ते कसे?' मी म्हणालो, `रेल्वस्टेशनवर भीक मागणारे, हॉटेलमध्ये काम करणारे, व्यसनात लिप्त असलेले, जंगलात शिकारीसाठी जाणारे मुले आणि मुली यांना शिक्षण मिळावे यासाठी एका तरुणाने बकऱ्या विकून एक शाळा उभारली. त्याची मुलाखतही घेऊया.'' हरीशराव यांना ही कल्पना आवडली. त्या तरुणाची आणि त्याच्या शाळेतीत कळकट कपड्यातील दोन विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्या बालकांनी हेच गाणे म्हटले-

हेही वाचा - मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...

जिस उमर में चाहिए मॉं का आँचल
मुझकों सलांखे मिली
नन्हें से हांथों में पुस्तक के बदले
हथकडियॉं डाली गई
बचपन ही जब कैदखानें में बीता
जवानी का फिर कहॉं ठिकाणा हैं
मुजरिम न कहना मुझें लोगो
मुजरिम तो सारा जमाना हैं...

हे गाणे ऐकताच उपस्थितांचे डोळे पानावले. अनेकांनी मदत केली. त्यातून 26 हजार रुपये जमा झाले. पन्नास-एक बालकांचे पालकत्व स्वीकारले गेले. या बालकांसाठी शाळा चालविणारा तो तरुण होता मतीन भोसले. मंगरूळ चव्हाळा येथे त्याने `प्रश्नचिन्ह' आश्रमशाळा सुरू केली होती. आज मतीन महाराष्ट्रभर प्रसिद्ध असला, तरी तेव्हा त्याची एवढी ओळख नव्हती. अशा स्टेजवर तो पहिल्यांदा आला होता. त्याच्या बालकांनी `मुजरिम' सिनेमातील या गाण्यातून त्यांच्या जीवनातील चित्रच उभे केले होते. संविधान साहित्य संमेलनातूनही मतीन भोसले यांची मुलाखत जेव्हा घेतली तेव्हा, शेकडो उपस्थितांच्या पुढे हेच गीत `प्रश्नचिन्ह' शाळेतील बालकांनी सादर केले.

अधिक माहितीसाठी - लग्नापूर्वी मटण पार्टी देणे नवरदेवाला पडले महागात; या जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट, गुन्हा दाखल

मैं था पसीना बहाने को राजी
रोजी ना फिर भी मिली
मैने शराफत से जब जीना चाहा
ठोकर पे ठोकर लगी
कैसे भी हो पेट की आग हैं
ये आग को बुझाना हैं
मुजरिम न कहना मुझे लोगो
मुजरिम तो सारा जमाना हैं...

हे गाणं सिनेमातलं असलं तरी, त्यातून वर्णन केलेलं जीवन `प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेतील बालके प्रत्यक्षात जगली आहेत. त्यांचं हे जगणंच एक तासाच्या `शॉर्ट फिल्म'मधून जगापुढे येऊ घातलं आहे. `सॉंग ऑफ दी सायलेंट प्रोटोगॉनिस्ट' असं `शॉर्ट फिल्म'चं नाव आहे. पहिल्या भागाचा `यू ट्युब प्रीमियर' करण्यात आला. अकोला येथील तरुण आणि उमदा सिनेदिग्दर्शक अजिंक्‍य पाटील याच्या अपार कष्टातून ही फिल्म साकारली आहे. अजिंक्‍य अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक असून `एनएफडीसी'च्या `फिल्म बाजार'मध्येही त्याच्या पहिल्या `फिचर फिल्म'ला स्थान मिळाले होते. याशिवाय शॉर्ट फिल्म, हॉरर आणि नॉन नॅरेटिव्ह फिल्म आदी प्रकारातील `फिल्म'चीही त्याने निर्मिती केली आहे. `जात पंयाचती'वरील एका सिनेमाच्या संबंधाने अजिंक्‍यसोबत ओळख झाली. त्यावर त्याने खूप संशोधनही केले आहे. या संशोधनादरम्यान मतीनची आश्रमशाळा त्याने बघितली. तेथील बालकांसोबत तो बोलला. त्याच्यातील कलावंताला हा विषय खुणावल्याशिवाय राहिला नाही. त्यातूनच या `फिल्म'ची निर्मिती झाली आहे.

क्लिक करा - नवरीसोबत सासरी गेलेल्या बहिणीवर ओढवला असा काही प्रसंग की...

चौकट विस्तारणारी दोस्त मंडळी

`करिअर' निवडताना पारंपरिक चौकटीला छेद देण्याचे धारिष्ट्य अनेक पालकांमध्ये नसते. मग त्यांची मुलेही वडिलांनी सांगितलेल्या `ट्रॅक'वर धावण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात. मुलांना डॉक्‍टर, इंजिनिअर करून स्वतःच्या अर्धवट आकांक्षांना गवसणी घालण्याचा बालिश प्रयत्न करताना दिसतात. अजिंक्‍यने मात्र ही चौकट विस्तारण्याचा प्रयत्न केला. `सीए' करायचे सोडून त्याने कॅमेरा हातात घेतला. त्याला `टीम'ही भन्नाट भेटली. राहुल कुमार, रोहन वाखेडे, गौरव भोसले, रोहन वानखेडे, अक्षय मारोटकर, रमीज राजा, कुणाल घाटोळ असे अनेक `आउट ऑफ बॉक्‍स' आणि `आउट आफ ट्रॅक' दोस्त एकत्र आले. भविष्य साकारण्याच्या पारंपरिक चक्रव्यूहातून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. सिनेमा निर्मितीची सारीच कौशल्ये त्यांनी आत्मसात करून घेतली. एवढेच नव्हे, तर उपलब्ध संसाधनांतून दिव्य साकारण्याचे कसबही त्यांच्याकडे आहे.

ही तर परिवर्तन करणारीच गाणी

अजिंक्‍य आणि त्याची `टीम'निर्मित `बॉइल्ड पोटॅटो' किंवा `कनव्हिक्‍शन' या `शॉर्ट फिल्म' अकोल्यासारख्या छोट्या शहरात `शुट' केल्या आहेत यावर विश्वासही बसणार नाही, असे `लोकेशन्स' यात बघायला मिळतात. त्यांनी आजवर `फिल्म'साठी निवडलेल्या विषयांमध्ये थिल्लर आणि सवंगतेला मुळीच थारा नाही. `सॉंग ऑफ दी सायलेंट प्रोटोगॉनिस्ट'मध्ये तर त्यांनी पारंपरिक विषयांची चौकटही लांघण्याचे काम केले आहे. `मूकवत जगणाऱ्या समूहाच्या परिवर्तनाची गाणी' हा विषयही होऊ शकतो, हे अजिंक्‍यने दाखविण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. या `फिल्म'च्या `शुटिंग प्रोसेस'मध्ये मी पूर्णवेळ `टीम'सोबत होतो. झपाटल्यासारखे कामे करणाऱ्या अशा तरुणाईमध्ये उद्याची आश्वासक पिढी दिसते.

काय म्हणता... बनावट पासद्वारे आंतरजिल्हा प्रवास, कुठे... कसा...

काहीच ठरतात अजिंक्य

दहावी-बारावीचे निकाल लागण्याचा हा काळ. गुणांची नव्वदी `क्रॉस' केलेले कुणीही मतीनसारखे समाजसेवक बनणार किंवा अजिंक्‍यसारखे फिल्ममेकर बनणार, असे मीडियाला मुलाखत देताना सांगत नाहीत. उमटलेल्या चाकोरीवर चालतानाच बहुसंख्य दिसतात. परंतु, त्यापैकी जीवनात "अजिंक्‍य' ठरणारे बोटावर मोजण्याइतकेच असतात. विदर्भातील या कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे राहता आले आणि त्यांना बळ देता आले, तर देऊया.

संपादन - प्रमोद काळबांडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Short Film on Tribal poor children and Matin Bhonsale`s social work