अपेक्षा ठेवा; पण...तारतम्याने

श्रद्धा पेठकर-कारंजकर
रविवार, 15 सप्टेंबर 2019

लग्न ठरविणे ही गोष्ट अवघड होत चालली आहे, असं हल्ली सर्रासपणे बोलले जाते. बरेच दिवस, महिने, वर्षे, स्थळे बघणे सुरूच आहे...पाहतोय पण अजून काही निर्णय झाला नाही...असे संवाद हमखास ऐकायला मिळतात

लग्न ठरविणे ही गोष्ट अवघड होत चालली आहे, असं हल्ली सर्रासपणे बोलले जाते. बरेच दिवस, महिने, वर्षे, स्थळे बघणे सुरूच आहे...पाहतोय पण अजून काही निर्णय झाला नाही...असे संवाद हमखास ऐकायला मिळतात. दिवस पुढे सरकतात.. वय वाढत जाते. पालकांची काळजी वाढते. पण निर्णय काही होत नाही.

असे का होत असावे? याचा खोलवर विचार केला तर अनेक गोष्टी समोर येतात. त्याचा विचार विवाहेच्छू मुले, मुली व त्यांच्या पालकांनी करणे गरजेचे आहे. 

सर्वांत पहिला मुद्दा : आपली पूर्वापार चालत आलेली विचारपद्धती होती की, संसार दोघांचा असतो. दोघांनी स्वप्न पाहायचे आणि मग कष्ट करून एकमेकांच्या साथीने पूर्णत्वास आणायचे. पण सध्या मुलींचा बायोडेटा पाहिला तर केवळ अपेक्षाच पाहायला मिळतात. मुलगा वेल सेटल्ड असावा, पाच आकडी पगार असावा, स्वतःचा फ्लॅट असावा वगैरे वगैरे. थोडक्‍यात सर्व सुखसोई रेडिमेड असाव्यात. पण, बारकाईने विचार केल्यास मुलगा २२-२३ व्या वर्षी पदवीधर होणार. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर २५-२६ वर्षे. दोन तीन वर्षांतच तो मोठा पगार कसा मिळविणार?

आयटी क्षेत्रात मोठा पगार आहे. पण, तिथली जीवनशैली वेगळी आहे. मोठ्या पगारांसोबत त्याचे ‘साइडइफेक्‍टही’ आहेत. पैसा आहे पण स्थैर्य नाही. सतत बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घ्यावे लागते. स्वैराचार, व्यसने याचे प्रमाण जास्त आहे. आपल्या जोडीदाराप्रती आयुष्यभर एकनिष्ठ राहण्याची किंवा एकमेकांना समजून घेऊन शेवटपर्यंत निभावून नेण्याची वृत्ती कमी आहे. 

आयटीव्यतिरिक्त इतर क्षेत्रात फारसे तेजीचे वातावरण नाही. त्यामुळे मुलांना नोकरी मिळते. पण, मिळणारा पगार कमी आहे. पण, थोड्या कालावधीनंतर ग्रोथ, स्टॅबिलिटी नक्की आहे, याचा विचार मुलींनी केला पाहिजे. 

आज अनेक मुलींचा पुण्या-मुंबईकडीलच स्थळाकडे कल असतो. पण, जर मुलगा उच्चशिक्षित, कर्तृत्ववान असेल तर मुलींनी इतरत्र स्थळे स्वीकारायला हरकत नाही. आधी मुलाच्या शिक्षणाला, कर्तृत्वाला महत्त्व द्यायला हवे. मोठ्या शहरात येणारा पगार जरी जास्त असला तरी, खर्चाचा आकडाही मोठाच असतो. याचाही विचार व्हायला हवा.

दुसऱ्या बाजूने मुलांच्या अपेक्षा पाहता त्यांनाही ‘आखुडशिंगी, बहुगुणी, दुभती’ अशी उपमा वापरता येईल अशी मुलगी हवी असते. अर्थात, मुलीने घर, करिअर, मुले-बाळे, पै-पाहुणे सर्व काही एकहाती सांभाळले पाहिजे, अशी अपेक्षा असते. ‘अष्टभुजा नारायणी’ बनून सर्व आघाड्यांवर लढणे अपेक्षित असते. पण, सखोल विचार केल्यावर लक्षात येते, पूर्वी एकत्र कुटुंबात जबाबदाऱ्या वाटल्या जात होत्या. त्यामुळे एका स्त्रीवर भार पडत नव्हता. तिला इतर जणांची साथ मिळायची. मानसिक, शारीरिक ताण कमी होता. मुलांचे संगोपन करणे सोपे होते. पण, आजच्या काळात मुलांनी पण सांसारिक जबाबदारीमध्ये मदत करण्याची गरज आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात मुले टिकून राहावीत म्हणून त्यांच्या जडणघडणीत मदत करणे गरजेचे आहे. तरंच तिची तारेवरची कसरत कमी होईल. शिवाय मुलगी उच्चशिक्षित असेल, मोठ्या पदावर नोकरी करणारी असेल तर, त्यासोबत तिची स्वतःची काही मते असणारच हे समजून घ्यायला हवे. 

पालकांनी मुला-मुलींना वाढविताना तडजोड, नाती सांभाळण्याची समज याचेही शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण महत्त्वाचे आहेच. पण, मुलींना आधीपासून घरातील कामांची, जबाबदारी घेण्याची सवय हवी. हाच पूर्वानुभव तिला लग्नानंतर आत्मविश्‍वासाने घर सांभाळताना उपयोगी ठरेल. वेळेचे व्यवस्थापन करता येईल, कामाचा ताण कमी जाणवेल. 

हल्ली आपल्या समाजाची स्थिती पाहता, मुलींचे उच्चशिक्षित होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच त्यांना त्याच तोडीचा जोडीदार हवा असतो. त्यासाठी मुलांनी मानसिकता बदलून शिक्षणाचा पाया भक्कम केला पाहिजे. 

स्थळे निवडताना जर सर्वच मुला-मुलींच्या अपेक्षा एका ठराविक साच्यातील स्थळाकडे केंद्रित झाल्या तर आपल्यालाच असे स्थळ मिळावे, यादृष्टीने हुंडा पद्धती, खर्चिक लग्नसोहळे याला प्रोत्साहन मिळेल. वरील उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यास एक सांगावे वाटते, की दोन्हीकडील पक्षांनी अपेक्षा ठेवताना आपण कोणत्या गोष्टींबद्दल ठाम (Rigid) आहेत व कोणत्या मुद्‌द्‌यामध्ये लवचिक (Flexible) राहू शकतो याचा विचार करून स्थळ निवडावे. म्हणजे निर्णयाप्रत पोचणे सोपे जाईल. कारण, जगातील कोणतीच व्यक्ती सर्वगुणसंपन्न नसते. 

वडीलधाऱ्यांनी मुलगा, मुलगी दोघांनाही समुपदेशन केले पाहिजे की, सर्व गोष्टी रेडिमेड (Readymade) मिळणार नाहीत. दोघांनी मिळून संसारातले एक एक टप्पे गाठायचे असतात.संयम, समजूतदारपणा, नैतिकता या गुणांची संसाराला पैशापेक्षा जास्त गरज आहे याची समज द्यायला हवी. 

पुढील काळातील संभाव्य धोके टाळायचे असतील, तर या गोष्टीवर आताच विचारमंथन होणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shraddha Pethkar article life partner