'स्वतःसाठी किमान 15 मिनिटं द्या' (श्रेयस तळपदे)

shreyas talpade
shreyas talpade

प्रत्येकानं स्वतःसाठी रोज किमान 15 मिनिटं द्यावीत. स्वतःसाठी दिवसातून फक्त 15 मिनिटं काढणं काहीच अवघड नाहीये. आपण बसल्याबसल्या किंवा उभे राहूनही व्यायाम करू शकतो. आपली गाडी व्यवस्थित चालण्यासाठी आपण वेळच्या वेळी ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करतो, त्याचप्रमाणं स्वतःचं शरीर व आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण नियमित व्यायाम आणि वेळेवर आहार घेणं गरजेचं आहे.

आपलं शरीर हे मंदिरासारखं असल्याचं सांगितलं जातं. खरंच त्याला मंदिरच मानून आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं शरीर तंदुरुस्त असलं, तरच आपला दिनक्रम चांगला जातो. त्यासाठी आपल्या शरीराची काळजी घेणं, त्यासाठी वेळ देणं, स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी व्यायाम करणं; ध्यानधारणा, प्राणायाम करणं गरजेचं बनलं आहे. मीसुद्धा माझ्या शरीराची शक्‍य तितकी जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो. खरंतर अनेकदा चित्रीकरणामुळं वेळेच्या गणिताची जुळवाजुळव करण्यासाठी खूपच कसरत करावी लागते. कधी-कधी तर तब्बल बारा ते तेरा तास चित्रीकरण चालतं. त्यामुळे खाण्या-पिण्यासह झोप अन्‌ आरामाच्या वेळाही बदलतात. त्यामुळे दिनक्रमच बदलून जातो. त्याचा आपल्या शरीरासह आरोग्यावरही नकळत परिणाम होत असतो. मात्र, अशा परिस्थितीवर मात करण्याची ताकद आपल्या शरीरात असली पाहिजे, तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो. हे सर्व साध्य करण्यासाठी मी आठवड्यातून पाच दिवस न चुकता वर्कआऊट करतो आणि दोन दिवस गॅप घेतो. कारण, आपल्या शरीरातल्या स्नायूंवर ताण येत असतो अन्‌ त्यासाठी गॅप घेणं खूपच गरजेचं आहे, असं मी मानतो. त्यामुळे आपलं शरीर मिक्‍स-मॅच होतं अन्‌ त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसू लागतात. याबरोबरच मी दररोज सात ते आठ तास झोप घेतो. त्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो आणि दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते. कमी झोप घेतल्यास दिवस आळसावल्यासारखा जातो. त्यासाठी चांगली आणि व्यवस्थित झोप ही खूप गरजेची आहे.

घरातल्या पदार्थांनाच प्राधान्य
माझ्या शरीराचा स्टॅमिना वाढविण्यासाठी, बॉडी-बिल्डिंगसाठी; तसंच फ्लेक्‍झिबिलिटीसाठी मी नियमितपणे प्रयत्न करतो. हे करत असतानाच आहारालाही तेवढंच महत्त्व आहे. आहारावरच तुमच्या शरीराची जडणघडण होत असते. आपल्या शरीराला ज्याप्रमाणं प्रोटिनची गरज असते, आणि त्याचप्रमाणं न्यूट्रिशनचीही गरज असते. त्यामुळे आपल्या घरातल्या अन्नालाच मी प्राधान्य देतो. मसल्ससाठी प्रोटिन्सची खूपच आवश्‍यकता असते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रोटिनयुक्त पदार्थ आपल्या शरीरात कसे जातील, याचीही काळजी घेतो. विशेष म्हणजे मी गोड पदार्थही खातो- कारण मन मारून एखादी गोष्ट करणं मला आवडत नाही. समजा मी एखाद्या कार्यक्रमाला किंवा पूजेला गेलो, तर त्यावेळी पेढा किंवा प्रसाद खावाच लागतो. मात्र, तो किती खायचा याचं प्रमाणही मी ठरवून घेतो. शक्‍यतो अर्धाच पेढा खातो. त्यामुळे मन न मारल्याचं समाधानही मिळतं. मनाचं समाधान होणं हेही तेवढंच गरजेचं असतं. बर्गर, पिझ्झाही मी खातो; पण या गोष्टी किती खायच्या यावर माझं नियंत्रण असतं.

व्यायाम चुकवत नाही
माझी शरीरयष्टी आणि मानसिक स्वास्थ चांगलं राहण्यासाठी मी सर्व प्रकारचे पदार्थ खातो. चित्रीकरणामध्ये कितीही व्यग्र असलो, तरी मी 45 मिनिटं व्यायाम करण्यावर भर देतोच. अभिनय क्षेत्रामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा साकाराव्या लागतात. त्याचप्रमाणं अनेकदा स्टंटही करावे लागतात. कधीकधी वेगवेगळे सीन्स करण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपण जेवढं मेन्टेन असू, तेवढा फायदा ती व्यक्तिरेखा साकारताना होतो. त्यामुळे आपण स्क्रीनवर जेवढे चांगले दिसू, तेवढा फायदा आपल्याला भविष्यातही होत असतो. प्रेक्षकांना हिरो हा चांगला दिसणारा आणि चांगली भूमिका साकारणाराच हवा असतो. त्यासाठी मी आहार आणि वर्कआऊटवर विशेष मेहनत घेत असतो, तसंच इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन देतो.

"बाजी'साठी खूप कष्ट
"बाजी' चित्रपटामध्ये माझे दोन वेगवेगळे लूक होते. त्यासाठी मला खूपच कष्ट घ्यावे लागले. कारण पहिल्या भागामध्ये मी सडपातळ होतो आणि दुसऱ्या भागामध्ये माझी शरीरयष्टी खूपच मजबूत दाखवण्यात आली होती. मला माझ्या या व्यक्‍तिरेखांसाठी शरीरयष्टी कमीत कमी काळामध्ये बदलण्याचं आव्हान होतं. मराठी चित्रपटांमध्ये कमीत कमी काळात या गोष्टी कराव्या लागतात. त्याचप्रमाणं आपलं व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्याचंही आव्हान असतं. त्यामुळे मी खूपच व्यवस्थितरीत्या माझ्या शरीरयष्टीचा समतोल राखला; पण असं करणं धोकादायकही असतं- कारण त्याचा नकळत आपल्या शरीरासह आरोग्यावरही परिणाम होत असतो. आपण आंब्याचं रोपटं लावलं, तर त्याला लगेचच आंबे येत नाहीत. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. त्याचप्रमाणं आपल्या शरीराचंही असतं. आपल्या शरीरावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीनंच आपणही आपली काळजी घेणं गरजेचं असतं. ते प्रत्येक कलाकाराला करावं लागतं.

"माय नेम इज लखन' या शोमध्ये खूपच ऍक्‍शन्स आहेत. त्यासाठी मला विविध प्रकारच्या कसरतीही कराव्या लागल्या. मात्र, स्टॅमिना वाढवणं हे माझ्यासाठी खूपच गरजेचं होतं. काहीकाही ऍक्‍शन्स वा सीन्स करताना आपल्याला दुखापतही होते; पण हे करत असताना चित्रीकरण फार दिवस थांबवता येत नाही. इतर अर्थकारणाचाही विचार करावा लागतो. तसंच, एपिसोड्‌स असल्यानं ते वेळच्या वेळी पूर्ण होणं गरजेचं असतं. त्यामुळे आलेल्या संकटावर मात करत आपण त्याला आव्हानात्मकरित्या सामोरं जाणं गरजेचं असतं. खरं तर हेच प्रत्येक कलाकारासाठी आव्हान असतं. जो हे आव्हान समर्थपणे पेलतो, तोच यात यशस्वी होतो.

शरीराचं "सर्व्हिसिंग' हवंच
मला सर्वांना एक महत्त्वाचा सल्ला द्यायचा आहे, तो म्हणजे प्रत्येकानं स्वतःसाठी किमान 15 मिनिटं द्यावी. स्वतःसाठी दिवसातून फक्त 15 मिनिटं काढणं काहीच अवघड नाहीये. आपण बसल्याबसल्या किंवा उभे राहूनही व्यायाम करू शकतो. आपली गाडी व्यवस्थित चालण्यासाठी आपण वेळच्या वेळी ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करतो, त्याचप्रमाणं स्वतःचं शरीर व आरोग्य चांगलं राहण्यासाठी, चिरतरुण आयुष्यासाठी, हसतमुख राहण्यासाठी आपण नियमित व्यायाम आणि वेळेवर आहार घेणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण प्राधान्यानं केल्या, तर तुमचा "वेलनेस' नक्कीच कायम राहील. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला फारसे पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही.
(शब्दांकन ः अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com