आंतरराष्ट्रीय जलदिन !

‘पाणी’ नावाचा पदार्थ जगात होता याची निदान पुढे आठवण तरी राहील
Shri Guru Dr Balaji Tambe writes International Water Day
Shri Guru Dr Balaji Tambe writes International Water Daysakal
Summary

सर्व रोगांचे मूळ चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी पिण्यात आलेल्या पाण्यात आहे. पाणी व्यवस्थित वापरले नाही, तर पाण्याचा अमृताचा गुण जाऊन ते विषासारखे होते. तसेच पाण्याला सूर्यदर्शन झाले नाही, पाण्याला प्रकाश दिसला नाही, तर हलके हलके त्याची गुणवत्ता कमी होते, ते पचायला जड होते.

खरोखरच हा दिवस साजरा करण्याची खूपच आवश्‍यकता आहे. कारण त्यामुळे ‘पाणी’ नावाचा पदार्थ जगात होता याची निदान पुढे आठवण तरी राहील. आज मनुष्य पाण्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाश करतो आहे की पुढे ‘पाणी-पाणी’ म्हणण्याची वेळ येणार आहे. आपणा सर्वांना पाण्याचे महत्त्व कळायलाच पाहिजे. रामायण घडले त्यासाठीही पाणी हेच कारण होते. श्रावण बाळ आपल्या अंध माता-पित्याला यात्रेला घेऊन जात असता वाटेत त्यांना तहान लागली. श्रावण बाळ पाणी शोधायला गेला. त्याच वनात राजा दशरथ मृगयेसाठी आलेला होता. श्रावण बाळ पाणी घड्यात भरत असताना जो आवाज झाला त्यामुळे तलावावर एखादे श्र्वापद पाणी पिते आहे असे वाटून आवाजाच्या रोखाने दशरथ राजाने बाण सोडला. श्रावण बाळाचा मृत्यू झाला. श्रावणाच्या पित्याने दशरथाला शाप दिला की तुलाही पुत्रवियोगाचे दुःख सहन करावे लागेल. यानंतर घडले रामायण. पाण्यामुळे श्रीरामांना १४ वर्षे वनवासात जावे लागले. असे म्हणतात, पाणी उभ्या-उभ्या पिऊ नये, घटा-घटा आवाज करून पिऊ नये. वरून पाणी प्यायले की पाण्याबरोबर हवाही पोटात जाते. पाणी व हवा एकत्र शरीररूपी घटात जायला लागली तर त्यातूनही रामायण घडते. त्यामुळे पाणी बसूनच प्यावे. शरीरातील बाहेर सोडायचे पाणी म्हणजे मूत्रविसर्जनही बसूनच करावे असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. कुठल्या काळापासून बसून मूत्रविसर्जन करण्याची सवय गेली हे कळत नाही.

पाणी काय करू शकते? साधा भात करताना पाणी कमी पडले तर तांदूळ कच्चट राहातात, पर्यायाने भात पचत नाही. जास्ती प्रमाणात पाणी घालून भात शिजवला तर तयार झालेला गुरगुट्या भात तोंडातून खाली उतरत नाही. मग अशा भाताला थोडे मेतकूट वगैरे लावून खाण्याजोगा करावा लागतो. कोणी म्हणतात, सकाळी सकाळी लोटाभर पाणी प्यावे, दुपारच्या जेवणानंतर पाणी प्यावे, कोणी म्हणतात जेवणाच्या आधी ग्लासभर पाणी प्यावे, कोणी म्हणतात उठता-बसता पाणी प्यावे. असे सगळे सांगणारी मंडळी विचार करत नाहीत की सर्व रोगांचे मूळ चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी पिण्यात आलेल्या पाण्यात आहे. पाणी व्यवस्थित वापरले नाही तर पाण्याचा अमृताचा गुण जाऊन ते विषासारखे होते. दोन भाग हायड्रोजन एक भाग ऑक्सिजन मिळून पाणी तयार होते, हे सर्वांनाच माहिती असते. पाण्याला सूर्यदर्शन झाले नाही, पाण्याला प्रकाश दिसला नाही तर हलके हलके त्याची गुणवत्ता कमी होते, ते पचायला जड होते. आज सगळीकडे पाण्याच्या टाक्या एक तर बंद असतात किंवा जमिनीच्या खाली असतात. अशा टाक्यांमध्ये साठविलेल्या पाण्यावर जडत्वाचा संस्कार होतो. गच्चीवर पाण्याची टाकी असली तर त्यातील पाणी दिवसा गरम होते, रात्री थंड होते असे विपरीत संस्कार होतात. अशा टाकीतील पाण्याला प्रकाशाची शक्ती मिळतच नाही.

नदीचे पाणी चांगले का, तर त्या पाण्याला सूर्यदर्शन तसेच चंद्रदर्शन झालेले असते. सूर्यातून येणाऱ्या विशिष्ट शक्तीच्या तरंगांचा पाण्याला स्पर्श होणे आवश्‍यक असते. सूर्यप्रकाश मिळालेले पाणी गढूळ असले, तर त्यात तुरटी फिरवावी. काही तासांनंतर कचरा खाली बसतो. वरचे नितळ पाणी सुती कापडातून गाळून घेऊन उकळावे. असे उकळवलेले पाणी अमृतासमान असते. असे पाणी योग्य प्रमाणात प्यायले तरच फायदा होतो. खोबरे, सुका मेवा, चण्याची भिजवलेली डाळ वगैरे पदार्थ पाट्यावर वा मिक्सरमध्ये वाटायचे असले तर त्यात चमचाभर पाणी घातल्याशिवाय वाटता येत नाही. पाणी घातल्याने हे पदार्थ उमलतात व नंतर वाटता येतात. अशाच प्रकारे सेवन केलेल्या अन्नाबरोबर एवढेच पाणी घ्यावे जेणेकरून ते अन्ननलिकेतून, आतड्यातून पुढे सरकायला मदत होईल. म्हणून जेवणाच्या सुरुवातीला आचमनासारखे पाणी, जेवताना मधे-मधे घोटभर पाणी पिणे योग्य ठरते. काहीही खाल्ल्यावर अन्नाला थोड्या पाण्याचा संस्कार दिला की अन्न पचणे सोपे होते.

जेवणाच्या आधी खूप पाणी पिण्याने भूक मेली तर नंतर जेवणार काय? जेवणाच्या शेवटी खूप पाणी प्यायले तर पाचक रसाचा विचका झाल्यामुळे अन्नपचन होत नाही, पर्यायाने आजारपण येते. भलतेच पाणी पिण्यात आले तर अन्न पचत नाही, त्यातून आम तयार होऊन तो रोगाचे कारण ठरतो.

आजूबाजूला काय चाललेले आहे हे सर्व पाण्याला ‘समजते’. असे प्रयोग झालेले आहेत. पाण्याचे तीर्थ कसे होते हे समजण्यासाठी आपल्याला असे प्रयोग करता येतील. डॉ. इमोटो नावाच्या एका जपानी शास्त्रज्ञाने अशा प्रयोगांची सुरुवात केली. युरोपातही असे प्रयोग केलेले आहेत. पाण्यावर चांगल्या मंत्रांचा, ध्वनीचा, विचारांचा, चांगल्या संकल्पनांचा, रत्नांचा, सुवर्णाचा संस्कार करावा. रोग कमी व्हावा, दुःख कमी व्हावे, यशप्राप्ती व्हावी अशी इच्छा असणारे असे संस्कार केलेले पाणी पितात. संस्कारित पाणी पिण्याने फायदा होत असावा म्हणून जगभर लोक असे पाणी पीत असणार. पाण्याचा सर्व महिमा लक्षात घेणे आवश्‍यक आहे. पाणी स्वच्छ असावे, नैसर्गिक असावे, त्यातील मिनरल्स काढलेली नसावीत तसेच वरून घातलेली नसावीत, पाणी संस्कारित असावे, उकळवलेले असावे. असे पाणी योग्य प्रमाणातच प्यावे. रात्री झोपायच्या वेळी खूप पाणी पिणे चांगले नाही, जेवतानाही अति पाणी पिऊ नये. दिवसभर थोडे थोडे पाणी प्यावे. मुख्य म्हणजे तहान लागल्यावरच पाणी प्यावे. जसे ज्ञानाची तहान असलेली व्यक्ती ज्ञान स्वीकारते तसे तहान लागलेली असताना प्यायलेले पाणी शरीराकडून स्वीकारले जाते, अमृतासमान ठरते, आरोग्यदायी ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com