सदाची सायकल (श्रीकांत बोकील)

श्रीकांत बोकील
रविवार, 2 डिसेंबर 2018

सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले.

सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले.

सकाळचे दहा वाजले होते. सैदापूरमधल्या ग्रामपंचायतीच्या पटांगणावर गावकरी मोठ्या प्रमाणावर जमले होते. त्यात काही महिलाही होत्या. खरं तर सकाळची वेळ म्हणजे वेगवेगळ्या कामधंद्यांना जाण्याची वेळ; परंतु त्या दिवशी रविवार होता आणि रविवारी सैदापूर या गावाचा आठवडेबाजार भरायचा. नेहमीच्या कामांना रविवारी सुटी असल्यानं इकडं तिकडं फिरून वेळ घालवण्यापेक्षा गावकरी ग्रामपंचायतीपुढं जमले होते. आज असं जमण्याला एक कारणही होतं.
तालुकापातळीवरची नेतेमंडळी सभा घेण्यासाठी तिथं येणार होती. आमदारसाहेबही सभेला येणार होते.
यंदा अपुरा पाऊस झाल्यानं गावात दुष्काळी परिस्थिती होती. पिण्याच्या पाण्याचा, तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या व इतर अडीअडचणींबाबत या ठिकाणी विचारविनिमय होणार होता.
नेतेमंडळी कोणत्याही कार्यक्रमासाठी वेळेवर न येणं यात तसं नवीन काहीच नाही; परंतु या वेळी वेळेवर येण्याचं आश्‍वासन आमदारसाहेबांनी दिलं होतं. लाउडस्पीकर सुरू होता. गावकरी गप्पा मारण्यात दंग होते. हास्याचेही फवारे उडत होते. इतक्‍यात धूळ उडवत गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी आला. एकेक जण गाडीतून उतरत होता आणि गावकरी ते पाहत होते. आता आपापसातल्या त्यांच्या गप्पा बंद झाल्या होत्या. पुढारीमंडळी व सरपंच हे आलेल्यांच्या स्वागतासाठी गाड्यांजवळ गेले. आलेली नेतेमंडळी व आमदारसाहेब व्यासपीठावरच्या खुर्च्यांत विराजमान होताच सरपंच माईकसमोर आले. मात्र, त्या ठिकाणी हार-तुरे, नारळ, फेटे, शाली असं काहीच दिसत नसल्यानं गावकऱ्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केलं जात होतं.

सरपंच बोलू लागले ः ""कोणतीही नेतेमंडळी गावात आली की हार-तुरे देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. त्यामुळे मोठी रक्कमही खर्च होते आणि वेळही अनावश्‍यक वाया जातो. या वेळी आपण दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करून कामाचं नियोजन करणार आहोत, त्यामुळे या सर्व बाबींना फाटा दिला जावा असं आमदारसाहेबांनी आम्हाला बजावलं होतं. त्याची आम्ही काटेकोर अंमलबजावणी इथं केली आहे. आम्ही ज्यांचं नाव घेऊ ते उभे राहतील व आपल्याला नमस्कार करतील, अशा अभिनव पद्धतीनं या ठिकाणी स्वागत समारंभ होईल.'' सरपंचांच्या या बोलण्याचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. त्याचबरोबर अगदी थोड्या वेळात स्वागतसमारंभ पार पडला.
"ज्याला ज्याला वैयक्तिक वा सार्वजनिक अडचण सांगायची असेल त्यानं त्यानं जागेवरच उभं राहून आपलं नाव सांगायचं व अडचण थोडक्‍यात सांगायची,' अशी सरपंचांनी सूचना करताच एकेक जण उठून अडचण सांगू लागला. काही महिलांनीही समस्या सांगितल्या.

ज्या सार्वजनिक विहिरीतून गावासाठी पाणीपुरवठा केला जात होता त्या विहिरीची पाणीपातळी कमी झाल्यानं एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे ती विहीर खोदणं, तसंच तिच्या जवळपास एक कूपनलिका घेण्याचं ठरलं. जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याविषयीही चर्चा झाली.
ही चर्चा सुरू असतानाच दहा-बारा वर्षांचा एक मुलगा उभा राहिला. तो काहीतरी बोलणार इतक्‍यात त्याच्या शेजारी बसलेल्या दोघांनी त्याचा शर्ट ओढून त्याला खाली बसायला सांगितलं. व्यासपीठावरच्या खुर्चीत बसलेल्या एका कार्यकर्त्यानं ते पाहताच तो उभा राहून त्या दोघांना म्हणाला ः ""त्या मुलाला बोलू द्या, त्याला खाली का बसवता?''
""बाळ, तुझं नाव काय? काय अडचण आहे?'' आमदारसाहेबांनी विचारलं.
""माझं नाव सदा डोईफोडे. या गावाशेजारच्या एका वाडीत मी राहतो. इथल्या शाळेत मी पाचवीत आहे; परंतु माझ्या घरापासून शाळा लांब आहे. मला शाळेत पायी पायीच याव-जावं लागतं. त्यात बराच वेळ जातो, तेव्हा मला सायकल हवी आहे. मी गरीब घरातला आहे. मला वडील नाहीत. इतर काही मुलांचीही माझ्यासारखीच अडचण आहे,'' सदानं असं म्हटल्याबरोबर पाच-सहा मुलं उभी राहिली. त्यात काही मुलीही होत्या. उभी राहिलेली सगळी मुलं-मुली शाळेत पायीच येत-जात असत.
उभा राहिलेला एक मुलगा म्हणाला ः ""मी रोज तीन किलोमीटरवरून शाळेत पायी येतो. पायी येण्यात माझा बराच वेळ जातो. मी जिथं राहतो तिथं रात्रीच्या वेळी नेहमीच वीज नसते. सरांनी घरी करण्यासाठी सांगितलेला अभ्यास त्यामुळे पुष्कळ वेळा होत नाही आणि मग सरांची बोलणी खावी लागतात. तेव्हा आम्हाला सायकलची खूप गरज आहे. सायकल असली की दिवसाउजेडीच घरी जाता येईल व सरांनी सांगितलेला अभ्यास करता येईल...''

""माझी लहानगी नातही शाळेत रोज पायीच येते. आमच्या घरी वीजच नसल्यानं तिला रात्रीचा अभ्यास करता येत नाही. घरात कंदील-चिमणी लावण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकानात रॉकेलच मिळत नाही. दुकानात गेलं की धान्य-रॉकेल-साखर संपल्याचं सांगितलं जातं व हेलपाटे मारायला लावले जातात...'' एका आजीबाईंनी त्यांच्या घरची व्यथा सांगितली.
आणखी एका महिलेनं तिची अडचण सांगितली.
***

त्यानंतर अण्णासाहेब पाटील उभे राहिले. गावातली ती एक बडी असामी होती. ते काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं. सरपंचांकडं पाहून अण्णासाहेब म्हणाले ः ""ज्या मुलांनी सायकलीबाबत अडचणी सांगितल्या आहेत, त्यांची नावं मला द्या. सर्वांची अडचण पाच-सहा दिवसांत मी नक्की सोडवतो.'' अण्णासाहेबांनी असं सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या व दाद दिली.
""या परिसरात माळरान, टेकड्या खूप आहेत. वेगवेगळ्या जाती-जमातींचे लोक छोट्या छोट्या वस्त्यांवर राहतात. त्यांना सतत वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. रस्ते-पाणीपुरवठा-वीजपुरवठा यांची कुठंच सोय नाही. तालुकापातळीवर रेशनिंग दुकान आहे; पण ते बहुतेकदा बंद असतं. त्या ठिकाणी धान्य-साखर-रॉकेल काहीच मिळत नाही. या अडचणी कायमच्या सुटायला हव्यात...'' एकानं तक्रार सांगितली.
""आम्ही अनेकदा आमची गाऱ्हाणी मांडत आलो आहोत...पण समस्या काही सोडवल्या जात नाहीत. "सरकारी काम अन्‌ सहा महिने थांब' याचा अनुभव आम्हाला सतत येत असतो. यातून सोईस्कर मार्ग निघणं आवश्‍यक आहे...'' दुसरा नागरिक म्हणाला.
"तुम्ही सांगितलेल्या सर्व अडचणी मी जातीनं लक्ष घालून लवकरात लवकर सोडवीन,' असं आश्‍वासन आमदारसाहेबांनी दिलं व सभा संपल्याचं जाहीर करून आलेल्या सर्व गाड्या धुरळा उडवत निघून गेल्या.
***

या गोष्टीला पाच-सहा दिवस झाले. अण्णासाहेब पाटील दुपारच्या वेळी गावातल्या हायस्कूलमध्ये गेले. मुख्याध्यापकांनी त्यांचं स्वागत केलं.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर रविवारी झालेल्या सभेत ज्या मुला-मुलींनी सायकलबाबत अडचणी सांगितल्या होत्या, त्या मुला-मुलींना घेऊन ते सायकलींच्या दुकानात गेले व त्या सर्वांना त्यांनी सायकली घेऊन दिल्या. मुलांना खूप आनंद झाला. त्यांनी अण्णासाहेबांचे आभार मानले. ती मुलं त्यांच्या पाया पडली.
त्या दिवशी नव्या सायकलवरून घरी जाताना सदाच्या आनंदाला पारावार नव्हता.
घरी आल्यावर सदानं आईला सर्व हकीकत सांगितली व तिला सायकल दाखवली. तिलाही खूप आनंद झाला. सदाचे वडील वारले होते. घरात तो, त्याची धाकटी बहीण व आई असे तिघं राहत होते. त्याची आई दुसऱ्याच्या शेतात खुरपणीचं काम करून मिळणाऱ्या मजुरीवर प्रपंचाचा गाडा चालवत होती. तिची खूप ओढाताण होत असतानाही लेकरांना काही कमी पडू नये, याची काळजी ती घेत होती.
***

सदा आता सायकलवर बसून नियमितपणे शाळेत जाऊ लागला. धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी ते तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. ""अहो मावशी, त्या दिवशी सदानं सभेत धीटपणे त्याची अडचणी सांगितली. मला त्याचं कौतुक वाटलं. आमदारसाहेबांनीही त्याचं धीटपणाबद्दल कौतुक केलं व मुलांची सायकलची अडचण मी सोडवली,'' अण्णासाहेब म्हणाले.
""अण्णासाहेब, तुमच्यासारखी जाणती माणसं आहेत म्हणून तर आम्हा गोरगरिबांच्या अडचणी सुटतात. माझं लेकरू रोज पायी शाळेत जात होतं. घरी आल्यावर दमून जायचं. आता त्याची एक मोठी अडचण सुटली,'' सदाची आई मोठ्या कृतज्ञतेनं म्हणाली. मग घरची सर्व परिस्थिती तिनं अण्णासाहेबांना आणि त्यांच्या पत्नीला सांगितली. थोडा वेळ शांतता पसरली.
अण्णासाहेब बोलू लागले ः "" आम्ही दोघांनी तुमचं बोलणं ऐकलं. आता मी काय सांगतो, ते तुम्ही नीट ऐका...''
""अण्णासाहेब, सांगा की...'' सदाची आई म्हणाली.
""माझा शेतीचा मोठा पसारा आहे. लोकांची सतत ये-जा सुरू असते, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसह इथं राहायला या. बाहेर दोन खोल्या आहेत. तिथं तुम्ही राहा आणि आमच्या घराची झाडलोट, धुणं-भांडी स्वयंपाक ही कामं करा. त्या कामांचा पगार तुम्हाला दरमहा दिला जाईल. त्यातून तुमचा सर्व खर्च भागेल. सदा तर शाळेत जात आहेच. मुलीलाही शाळेत पाठवा,'' अण्णासाहेब म्हणाले.
""अण्णासाहेबांनी आत्ता जे काही सांगितलं, त्याचा नीट विचार करा व या इथं राहायला. उद्या आमची ट्रॅक्‍टर तुमच्या घरी येईल. त्यात घरचं सगळं सामान भरा आणि या,'' अण्णासाहेबांची पत्नी म्हणाली.
यावर सदाच्या आईला काय बोलावं तेच सुचेना. तिनं मानेनं होकार दिला व दोघांचा निरोप घेतला. आपलं लेकरू सभेत बोललं काय आणि सायकलचा विषय त्यानं काढला काय...आणि आज तर त्याच्या पुढची मोठी घटना घडली...आता प्रपंचाला मोठाच हातभार लागला म्हणायचा. गरिबाचा वाली परमेश्‍वर असतो, त्याला सगळ्यांची काळजी असते हेच खरं. उद्या आपण लेकरांसह नवीन दुनियेत राहायला जाणार...हे सगळं बघायला लेकरांचा बाप हवा होता...घराकडं परतत असताना सदाच्या आईच्या मनात विचार येत होते... मधूनच तिला लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. आनंदी मनःस्थितीत पायाखालची वाट लवकर सरली. तिघंही घरी आले...उद्या एका नव्या दुनियेत जाण्यासाठी...

Web Title: shrikant bokil write article in saptarang