हरवलेला मॅटिनी शो...

श्रीकांत कात्रे 
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

मॅटिनीचे वेड काही औरच होते. सिनेमा पाहणे विशेषतः विद्यार्थीदशेत म्हणजे अनेक अडचणीचा सामना करायचा, असेच समीकरण होते. त्यात मॅटिनी म्हणजे प्रेमाचा सिनेमा, प्रेमाची गाणी. कॉलेज चुकवून तोंड लपवतच थिएटरच्या अंधारात मॅटिनी पाहणाऱ्यांच्या मनात अजूनही धाकधूक टिकून असेल. 

सिनेमाचे आकर्षण नाही, असा माणूस सापडणे विरळच. किंबहुना सिनेमाचे वेड असणारेच अनेक जण आढळतील.

सिनेमातील प्रसंगांची कॉपी करण्यातही काहींना आनंद मिळतो. नवीन येणारा सिनेमा पाहिल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. काही वर्षांपूर्वी "पहिला शो, पहिला दणका' म्हणत रिलिज होणारा सिनेमा पहिल्याच दिवशी पाहण्याचे मनसुबे अनेक जण रचत असतं. त्या काळी टीव्ही किंवा इतर माध्यमे नसल्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी केवळ चित्रपटगृहावर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. एखादा गाजलेला पिक्‍चर पाहयचा म्हणजे तिकिट मिळविण्याची मारामार. "ब्लॅक'ने तिकिट मिळविण्याची परंपरा त्यावेळपासून सुरू झाली. 

काही सिनेमे महिनो न महिने चित्रपटगृहात मुककाम ठोकून असायचे. काही कसेबसे आठवडाभर तग धरायचे. त्यात रेग्युलर (तीन, सहा, नऊचा शो) आणि मॅटिनी (दुपारी बारा) असे शो असायचे. रेग्युलरला नवे सिनेमे असायचे तर मॅटिनीला जुने. मॅटिनी पाहण्याचे अनेक किस्से सांगितले जातात. मॅटिनी पाहण्याचीही एक क्रेझ होती. आता पहिल्याच आठवड्यात गल्ला जमा झाला की चित्रपटगृहातून सिनेमा गायब होतो. त्यामुळे रेग्यलर शोचेही काही वाटत नाही आणि "मॅटिनी' ची तर नव्या पिढीला कल्पनाही नाही. हरवलेल्या "मॅटिनी' संकल्पनेला जीवदान मिळाले आणि थिएटरमध्ये दुपारी बाराला पुन्हा मॅटिनीचे शो दिसू लागले तर काय बहार असते, हे नव्या पिढीलाही समजून जाईल, असे वाटते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आता ते शक्‍य होईल असे दिसत नाही. पण मॅटिनीची मजा काही औरच होती, हेही नाकारता येणार नाही. 

भारतीय चित्रपटसृष्टीला मोठी परंपरा आहे. त्यामुळे अनेक हिरो- हिरॉईननी इथल्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. सिनेमा रंगीत नव्हता त्यावेळीही. नंतर इस्टमनकलरचा जमाना आला. रंगीत सिनेमांची गर्दी झाली. तरीही काही ब्लॅकव्हाइट सिनेमांनी अनेकांना वेड लावले होते. नवीन सिनेमा रिलीज झाल्यावर चित्रपटगृहात जुन्या सिनेमांना स्थान मिळणे अवघड व्हायचे. जुन्या चित्रपटांच्या दर्दींची अडचण मॅटिनीने दूर केली. कोणत्याही शहरात मॅटिनीला कोणता सिनेमा आहे, याची उत्सुकता सर्वांनाच असायची. दुपारी बारा वाजताही रेग्युलर शोसारखी गर्दी व्हायची. पृथ्वीराजकपूरपासून ते अमिताभ बच्चनपर्यंतच्या हिरोंना आणि मीनाकुमारी, नर्गिसपासून हेमामालिनीपर्यंतच्या हिरॉईन मॅटिन शोमधून लोकांच्या मनात रूजत होत्या. नागिन (जुना प्रदीपकुमारचा), राजकपूरचे आवारा, श्री 420, आग, मनोजकुमारचे हरियाली और रास्ता, उपकार, अनिता, पूरब और पश्‍चिम, यादगार, यासारखे आणखी कितीतरी चित्रपट. प्यासा, पाकिजा, गीत, दिल एक मंदिर, राम और श्‍याम, गाईड, हरे राम हरे कृष्ण, हकीगत, हमराज अशी अनेक नावे मॅटिनीच्या पोस्टरवर झळकत असायची. राजकपूरप्रमाणेच दिलीपकुमार, राजकुमार, राजेंद्रकुमार, मनोजकुमार, गुरूदत्त, विश्‍वजीत, शम्मीकपूर, शशीकपूर, सुनील दत्त, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, धर्मेंद्र या हिरोंनी मॅटिनीला हजेरी लावली की त्यांच्या चाहत्यांची झुंबड उडायची. मीनाकुमारी, नर्गिस, सायरा बानू, आशा पारेख, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, पद्मिनी, संध्या, अशा कितीतरी अभिनेत्री मॅटिनीचे आकर्षण असायच्या. चित्रपटातील गाणी म्हणजे "मॅटिनी शो'चा आत्मा होता. खास गाण्यांसाठी एकदोन वेळा नाही तर अनेक वेळा चित्रपटगृहाला हजेरी लावणारे दर्दी असायचे. एखादा हिरो आवडला की त्याचा येणारा कोणताही पिक्‍चर चुकणार नाही, याची काळजी घेतली जायची. 

मॅटिनीचे वेड काही औरच होते. त्याकाळात सिनेमा पाहणे विशेषतः विद्यार्थीदशेत म्हणजे अनेक अडचणीचा सामना करायचा, असेच समीकरण होते. एक तर सध्या मिळतात तसे पॉकेटमनी सर्वांना मिळत नसतं. त्यातही सिनेमा बघूच नये, असा दंडक असायचा. त्यामुळेच सिनेमा अधिक बघितला जायचा. त्यात मॅटिनी म्हणजे प्रेमाचा सिनेमा, प्रेमाची गाणी. कॉलेज बूडवून तोंड लपवतच थिएटरच्या अंधारात मॅटिनी पाहणाऱ्यांच्या मनात अजूनही धाकधूक टिकून असेल. उत्कट प्रेमाची ओळख थिएटरमधूनच व्हायाचा तो काळ होता. म्हणूनच मॅटिनीला रसिकांची दाद मिळत होती. रसिकांच्या मनावर मॅटिनीची मोहिनी होती.

आता होम थिएटर आले. रेग्युलरही नाही तर मॅटिनी कोठून येणार? मॉर्निंग शोही असायचा. पण त्याची गोष्ट आणखीन वेगळीच. थिएटरला जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा हव्या त्यावेळी घरातच 24 तास सिनेमा पाहण्याची सोय झाली आहे. तरीही मोठ्या पडद्याची क्रेझ अजूनही आहे. मात्र, मोठ्या पडद्यावरून मॅटिनीचा शो गायब झालाय. मॅटिनी शोची गाणी मनात रूंजी घालायची. म्हणूनच जुनी गाणी अजूनही अनेकांना साद घालतात. आताच्या गाण्यांत संगीताचा कल्लोळ आणि हरवलेले शब्द. जुन्या गाण्यांतील शब्द मनाला भिडायचे. संगीताचे सूर मनात झंकारायचे. मॅटिनीत एक भावनिक गुंतवणूक असायची. पडद्यावरच्या कथेप्रमाणे बघणारे नायक- नायिका थिएटरच्या खुर्चीत विराजमान झालेले असायचे. अनेकांची स्वप्नमयी दुनिया मॅटिनीतून बहरायची. मॅटिनीशी प्रत्येकाचे वेगळे नाते असायचे. त्यामुळेच चित्रपटजगतातून केवळ मॅटिनी शो हरवलेला नाही. माणसाच्या मनातील नात्यांतील स्वप्नांची एक वेगळी नाळही त्याबरोबर हरवली आहे.

Web Title: Shrikant Katre write about Cinema