टुरिंग टॉकीजचा जमाना... 

श्रीकांत कात्रे 
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

पूर्वी विरंगुळ्याची साधनं एवढी नव्हती. जमाना झपाट्यानं बदललायं. एखादा सिनेमा पाहयचा तर केवढं दिव्य करायला लागायचं, याची आठवण झाली. आता घरातल्या पडद्यावर अनेक चॅनेलवर 24 तास सिनेमा पाहता येतोय. 

बऱ्याच दिवसांनी मित्राची भेट होणार म्हणून उत्सुकता होती. त्याच्या घरी गेलो. हॉलमध्येच सारी मंडळी बसलेली. आता गप्पांचा फड रंगणार असे वाटले पण कुणाच्या तरी हाती टीव्हीचा रिमोट लागला आणि त्या 'इडियट बॉक्‍स' समोर सारेच तल्लिन झाले. साऱ्यांना याड लागलयं त्या टीव्हीचं आणि त्यावरच्या मालिकांचं, असं वाटलं खरं. पण साऱ्यांना एक विरंगुळा हवा होता आणि तो घरबसल्या मिळत होता. ऑफिसमधून, शाळेतून कंटाळून आल्यावर टीव्हीसमोर फतकल मारायची किंवा आडव झाल्याचं सुख सर्वानाच हवं असतं. पूर्वी विरंगुळ्याची साधनं एवढी नव्हती. जमाना झपाट्यानं बदललायं. एखादा सिनेमा पाहयचा तर केवढं दिव्य करायला लागायचं, याची आठवण झाली. आता घरातल्या पडद्यावर अनेक चॅनेलवर 24 तास सिनेमा पाहता येतोय. 

करमणुकीची साधनं कशी बदलतं गेली याचं चित्रचं डोळ्यासमोर उभं राहिलं. खेडेगावातील आयुष्यात टुरुंग टॉकीजला मोठे स्थान होतं. आताच्या पिढीला टुरिंग टॉकिज म्हणजे काय, इथपासून प्रश्‍न पडलेला असेल. टीव्हीच्या छोट्या पडद्यावरील चित्रापेक्षा मोठ्या पडद्यावरील चित्राचे आकर्षण अजूनही कायम आहे. त्यामुळेच अलिकडिल काळात प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यातच कोट्यवधींचा गल्ला निर्मात्याकडे जमा होतो. पूर्वी चित्रपटगृहात अनेक महिने चित्रपट टिकला तर तो यशस्वी असे गणित मांडले जायचे. आता एका आठवड्यांनंतर पैसे कमावून चित्रपट विस्मरणातही जातो. त्यामुळे टुरिंग टॉकिजच्या जमान्यातील चित्रपटाचा आनंद आता उरला नाही, हेच खरे आहे. पूर्वी मोठ्या शहरातच चित्रपटगृहे, नाट्यगृहे असायची. त्यामुळे ग्रामीण भागात टुरिंग टॉकिज हेच लोकांचे एकमेव आकर्षण असायचे. टुरिंग टॉकिज म्हणजे तंबूतला सिनेमा. टेम्पोसारख्या एका गाडीत सिनेमा दाखविण्याचा प्रोजेक्‍टर आणि वरून कापडी तंबू व बाजूला कापडी कनाती असा टुरिंग टॉकीजचा संसार. ग्रामीण भागातील तालुक्‍याचे किंवा मोठे गाव, किंवा मोठ्या जत्रा- यात्रांमध्ये फिरून सिनेमा दाखवून लोकांच्या करमणुकीची तहान भागविणारा हा व्यवसाय. मुंबई- पुण्यासारख्या शहरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक महिन्यांनी टुरिंग टॉकीजकडे येणारा सिनेमा म्हणजे गावकऱ्यांना पर्वणीच. रात्री नऊ ते बाराचा एकच शो. एखादा चित्रपट दोन ते पाच दिवस टिकणारा. दवंडी पिटावी तशी सिनेमाची रोज गावभर जाहिरात व्हायची. संध्याकाळी एक कर्णा घेऊन दोघे गावातील प्रमुख रस्त्यांवरून आरोळी देत जायचे. राजेश खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र, मनोजकुमार, राजकुमार, राजेंद्रकुमार असले हिरो या आरोळ्यातून लोकांना समजायचे. नंतरच्या काळात विनोद खन्ना, शत्रघ्न सिन्हा आणि काही काळ अमिताभ बच्चनही टुरिंग टॉकीजमधून दिसायला लागले. मराठीमध्ये निळू फुले आणि दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे टुरिंग टॉकिज फुल्ल करून जायचा. हिंदीतील 'पूरब और पश्‍चिम'पासून 'क्रांती'पर्यंत आणि 'नागिन' (जुना प्रदीपकुमारचा) पासून ते बच्चनच्या 'दीवार'पर्यंत, एक गाव बारा भानगडी, सतीच वाणं, आणि 'मुक्काम पोस्ट ढेबेवाडी' पासून रामराम गंगाराम ते 'गुदगुल्यां'पर्यंत अनेक मराठी चित्रपटांनी काळ गाजविला तो टुरिंग टॉकीजमधूनच. दवंडी ऐकायला आबालवृद्ध रस्त्यावर यायचे. ती दवंडीसुद्धा एक कलाच होती. लोकांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट लयीत होणारी शब्दफेक करणारे ते कलाकारही आता दुर्मिळच झालेत. गाडी लावायला आणि तंबू टाकायला मोकळे पटांगण मिळाले की टुरिंग टॉकीज तयार. टॉकीज येणार म्हटले साऱ्यांमध्ये एक चैतन्यच संचारायचे. चित्रपट कसा का असेना तो पाहिलाच पाहिजे, असे काही जण त्याची वाटच पाहत असायचे. तंबूच्या पुढील बाजूस तिकीटविक्रीचे खोके असायचे. पाच पैशांपासून रूपयांपर्यंत सर्वांना एकच तिकीट दर. तिथे ना अप्पर क्‍लास, ना बाल्कनी. खुर्ची बिर्ची भानगड नाही. जमिनीवर मातीत बसून डोळे पडद्याकडे लावून तहानभूक विसरून जाण्यातच आनंद होता. त्यातल्या त्यात प्रतिष्ठित घरून सतरंजी आणायचे बसण्यासाठी. टॉकीजकडे पुणे, सांगली, कोल्हापूर अशा शहराकडून सिनेमाची पेटी यायची. पेटीत फिल्मांची रिळे. एका चित्रपटाची अशी पाच- सहा रिळे असायची. रिळ संपले की मध्यंतर. असे पाचसहा मध्यंतर सिनेमात असायचे. पहिल्या दिवशीचा पहिला शो बघणारे दर्दी प्रत्येक गावात असायचे. रात्री पिक्‍चर बघून आले की पिक्‍चर कसा जोरदार आहे, याची पब्लिसिटी त्यांच्याकडूनच सकाळपासून सुरू व्हायची. न बघितलेल्यांच्या मनाला चुटपूट लागून राहयची. दुसऱ्या दिवशी रात्री त्यांचे पावले टॉकीजकडे वळायची. त्याकाळी टीव्ही नव्हता. शहरात जाऊन चित्रपट पाहणे सर्वांनाच जमणे आणि परवडणे शक्‍य नव्हते. त्यामुळे टुरिंग टॉकीज हाच रसिकांचा आधार होता. दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट निर्माण केला. तेव्हापासून या आधुनिक काळात प्रवेश करण्यापर्यंत टुरिंग टॉकीज हेच एक माध्यम रसिकांच्या मनाला रिझवण्याचे काम करीत होते. 

काळाच्या ओघात सर्वच क्षेत्रांप्रमाणे फिल्मी दुनियाही बदलत गेली. टॉकीजचा व्यवसाय करणे जिकिरीचे होऊ लागले. छोट्या गावातही चित्रपटगृहे आकाराला येऊ लागली. टॉकीजच्या प्रोप्रायटर लोकांपुढे अनेक अडचणी वाढू लागल्या. आर्थिकदृष्ट्या परवडण्याबरोबरच टीव्हीसारख्या छोट्या माध्यमांचे आक्रमणही त्यांना नामोहरम करीत होते. अगदी जत्रा- यात्रांतही आकर्षण असणारे तंबू दुरापास्त होऊ लागले. पण टुरिंग टॉकीज ही केवळ मनोरंजनाचे किंवा करमणुकीचे साधन नव्हते. ती एक संस्कृती होती. अशा टॉकीजमधून सिनेमे पाहणाऱ्यांनी अनेक स्वप्नेही पाहिली. जिद्दीने पूर्णही केली. अनेकांची मने समृद्ध केली. रसिकांचे रसिकत्व जपले. वाढविले. हल्ली जन्माला येताच मोबाईल हातात मिळणाऱ्या बाळांच्या पिढीला 'असेही एक विश्‍व होते', हे एखाद्या कहाणीसारखे सांगावे लागणार आहे. पण फिल्मी दुनियेच्या मोहमयी जगताचा आस्वाद देणारी टॉकीज अनेकांच्या हृदयात कायम राहिली आहे. टॉकीजच्या सिनेमाच्या आनंद देणाऱ्या आठवणी काही औरच होत्या हे सागणारे दर्दी आजही भेटतील. आजच्या या झगमगत्या जगातून काळाच्या एक संस्कृती बाजूला सारली गेली. पण करमणुकीच्या दुनियेला या संस्कृतीने दिलेल्या बळामुळेच आजची चित्रसृष्टी बहरली आहे, हे विसरणे कृतघ्नपणाच आहे.

Web Title: Shrikant Katre writes about entertainment and touring talkies