ईशावास्योपनिषद : मनःशांतीचं संचित

परमेश्वराच्या जगतात परब्रह्मतत्त्व एकमेव मानलं गेलं आहे. ईशावास्योपनिषदाच्या सततच्या मनन-चिंतनातून प्राप्त होतो तो भव्यदिव्य स्वानुभव.
accumulation of peace
accumulation of peacesakal

- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com

परमेश्वराच्या जगतात परब्रह्मतत्त्व एकमेव मानलं गेलं आहे. ईशावास्योपनिषदाच्या सततच्या मनन-चिंतनातून प्राप्त होतो तो भव्यदिव्य स्वानुभव. याचा उपयोग व्हावा असं ज्याला वाटतं तो पूर्ण प्रयत्नानं प्रथमतः अंत:करणाची शुद्धी करवून घेतो.

वैदिक तत्त्वज्ञांसाठी वेद म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तर मनुष्याला जाणून घेण्याची कला होय. दैनिक जीवनव्यवस्था कशी आखीव-रेखीव व निश्चित आहे हे वेद शिकवतात. जगातलं जीवन आणि दिव्यानुभूतीनं भरलेलं जीवन हे वेगवेगळं नसतं. आत्मकृपा झाली की ध्यान साधतं व धारणा सिद्ध होते; अन्यथा ती सिद्ध होणं हे महाकठीण काम.

प्रथमतः साधनेचं मोल कळावं लागतं, म्हणजे साधकात साधकत्व आत्मभावानं प्रकट होतं. साधनेत, आपल्या कार्यात प्रत्येकाचं एक कौशल्य असतं आणि उपजत ज्ञान असतं. प्रत्येक यशस्वितेमागं एक गुपित असतं. जे ज्याचं त्यानं शोधायचं व जपायचं असतं. प्रापंचिकाला पैशाचं मोल माहीत असतं म्हणून तो ते धन कमावण्यातच सर्व आयुष्य घालवतो. मग कशाचं आलंय भगवंतदर्शन व मुक्ती? या मोहानं तो संसारसागरात गटांगळ्या खात बसतो...येरझारा घालत बसतो.

भारतीय संस्कृती म्हणून जी काही आपण म्हणतो ती म्हणजे या प्राचीन ग्रंथांचा आपल्या मनावर झालेला संस्कार आहे. धर्मग्रंथ म्हणून आपण आजही चार वेदांचीच नावं घेतो. ज्यांचा आपण आपल्या सांस्कृतिक जीवनात अंगीकार केला आहे, ज्यांचा अभिमान बाळगला आहे ते वेद जाणून घेणं आवश्यक ठरतं. हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृत भाषेतल्या या वेदांचा आजच्या अत्याधुनिक युगात काही संबंध उरला नाही असं वाटेल; पण वस्तुस्थिती तशी नाही.

समजा, जगतातून वैदिक साहित्य पूर्णतः नष्ट झालं आणि केवळ ईशावास्योपनिषदच जरी शिल्लक उरलं तरी त्यातल्या ज्ञानाच्या आधारे परत सर्व वैदिक साहित्य निर्माण करता येईल, अशी काही विद्वानांची धारणा आहे. एवढे हे अठरा मंत्र आशयघन व महत्त्वपूर्ण आहेत.

या अठरा मंत्रांचा विस्तार म्हणजेच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली श्रीमद्भगवद्गीता होय. प्रापंचिकांना जग-संसार मोठा गोड वाटतो; पण प्रपंच, संसार करून का मुक्ती मिळणार आहे? जगत् विनाशकारी आहे. मात्र, या जगात राहून, अविद्या शिथिल करून इथूनच ब्रह्म प्राप्त करायचं असतं. हे ज्ञान गुरुसान्निध्यात राहून, उपनिषदांचा अर्थ समजून घेण्यानं प्राप्त होत असतं. विद्या हेच उपनिषदांचं एक रहस्य आहे.

जगताचा सर्वोच्च सत्ताधारी म्हणजे ब्रह्म होय. त्याची दोन रूपं मानली जातात. एक सगुण व दुसरं निर्गुण. आत्मा हा ब्रह्मरूप समजून त्याला शाश्वत तथा अत्यंत पुरातन मानलं जातं.

उपनिषदांचं वैशिष्ट्य हे की, त्यांत जीवात्मा आणि परमात्मा यांना अभेद मानून अद्वैत सिद्धान्ताची स्थापना केल्याचं निदर्शनास येतं. आदर्श आचरण कसं असावं याचं मार्गदर्शन या उपनिषदांच्या उपदेशातूनच होत आलं आहे असं शंकराचार्य सांगतात.

‘भोग घ्या; पण अलिप्ततेनं व त्यागभावनेनं घ्या’ असं ईशावास्योपनिषद सांगतं. परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल ज्ञान जागृत करणारं हे उपनिषद आहे.

प्रत्येक उपनिषदाच्या प्रारंभी एक प्रार्थना केलेली असते, तशी इथंही ती आहे. प्रार्थनेत देवाला काही तरी मागितलं जात असतं; पण उपनिषदांमधल्या या प्रार्थनेत काहीही ‘मागणं’ नाही. ‘सगळीकडून येणारे जे ध्वनी आहेत, त्यातलं मांगल्य आम्ही ग्रहण करू’ अशी ही प्रार्थना आहे. तीमधल्या प्रत्येक शब्दाचा उच्चार अत्यंत शांतपणे, स्पष्टपणे करायला हवा.

मंत्र म्हणजे नि:स्वार्थपणे केलेले विचार. जे ज्ञान मिळालं ते उत्स्‍फूर्तपणे जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडलेलं असतं. त्यातून वातावरणनिर्मिती होते, मन:स्थिती शांत होते. जीवनावर श्रद्धा असली की प्रत्येक गोष्टीतलं सत्य गवसतं; मग कुठंही अपूर्ण असं काहीच दिसत नाही.

उपनिषदाचा प्रारंभ असा आहे :

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते।।

ॐ शांतिः शांतिः शांतिः।।

शब्दार्थ: पूर्णमद:= तो, म्हणजेच निरुपाधिक परब्रह्म, पूर्णम इदं= हा, म्हणजेच सोपाधिक परब्रह्म, पूर्णात= पूर्णातून, पूर्णम= पूर्ण जगत्, उदच्यते = न बाहेर पडणं, पूर्णस्य = पूर्ण, पूर्ण = पूर्णत:, मादाय = काढून घेतलं, पूर्णम्= पूर्णच, अवावशिष्यते = शिल्लक उरतं, ॐ = ब्रह्म, शांति: = आध्यात्मिक शांती, शांति: = आधिदैविक शांती, शांति: = आधिभौतिक शांती.

श्लोकार्थ :(पूर्णं अदः) ते परब्रह्म पूर्ण आहे. (पूर्णं इदं) हे सोपाधिक ब्रह्मही स्वरूपानं पूर्ण आहे. (पूर्णं पूर्णात् उदच्यते) ते हे कार्यात्मक ब्रह्म, पूर्ण म्हणजे कारणात्मक ब्रह्मापासून उद्भवतं; पण ते त्याच्यापासून जरी निराळं होत असलं तरी आपलं पूर्णत्व सोडत नाही, तर ते पूर्णच उद्भवतं. (पूर्णस्य पूर्णं आदाय) कार्यरूप ब्रह्माचं पूर्णत्व घेऊन (पूर्ण एव अवशिष्यते)‘पूर्णच-केवळ ब्रह्म’ अवशिष्ट राहतं.

म्हणजे, सृष्टीच्या पूर्वी जे अखंड, एकरस, सर्वव्यापी असं ब्रह्म होतं तेच हे सृष्टीनंतरचं नामरूपोपाधियुक्त कार्यब्रह्म आहे; पण तेही पूर्ण आहे. त्या कारणरूप पूर्णापासून हे कार्यरूप ब्रह्म पृथक् आहे, असं भासू लागतं. प्रलयसमयी त्या द्वैतरूप कार्यब्रह्मातलं पूर्णत्व तेवढं घेऊन, म्हणजे पूर्णत्व हा आपला धर्म त्यातून काढून घेऊन, ते पहिलं कारणरूप ब्रह्मच अवशिष्ट राहतं. त्रिविध तापांची शांती होवो.

ॐ शब्दानं जे व्यक्त केलं जातं ते परब्रह्म स्वत: सर्व प्रकारे पूर्ण आहे. आणि, ही सृष्टीसुद्धा स्वयंपूर्ण आहे...तेही पूर्ण, हेही पूर्ण, पूर्णातूनच पूर्णाची उत्पत्ती झाली आहे. पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी उरतं ते पूर्णच. आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक ताप-संताप शांत होवोत. ॐ हे निरुपाधिक परब्रह्म पूर्ण आहे आणि ते सोपाधिक कार्यब्रह्मसुद्धा पूर्ण आहे; कारण, पूर्णातूनच पूर्णाची उत्पत्ती आहे.

प्रलयकाळातसुद्धा सोपाधिक कार्यब्रह्म पूर्णत्वाला बरोबर घेऊनच जे शिल्लक उरतं, तेही निरुपाधिक परब्रह्म पूर्णच असतं. म्हणूनच, शांतिपाठात ‘त्रिविध तापांपासून शांतता मिळावी’ अशी प्रार्थना केली गेली आहे. कार्यब्रह्म आणि निरुपाधिक परब्रह्म ही दोन ब्रह्मं होत. जगाची उत्पत्ती ब्रह्माच्या पूर्णत्वाला क्षती पोहोचवत नाही, म्हणूनच शांतिपाठात म्हटलं आहे, ‘पूर्णातून पूर्ण जरी काढून घेतलं तरी तेही पूर्णच उरतं, त्यास न्यून येत नाही.’

तो परमात्मा आणि हे जगत् हे त्या दोन्ही परमात्म्याचे एकच अंश आहेत. एखाद्या व्यक्तीला जशी दोन नावं असतात; पण ती व्यक्ती असते एकच; तशाच प्रकारे. सर्वांना एकाच तत्त्वात विलीन करून घेणं म्हणजे पूर्ण व त्यातलं ब्रह्मतत्त्व हे तेवढं सत्य असतं. भगवंताशिवाय काहीच नाही हे इथं ध्यानी घ्यायला हवं.

ईशावास्योपनिषदात काही प्रतिपादन असेल तर ते हे की, नाम-रूप पूर्णत्वानं समजून घ्या, तरच आपल्यातली शांतता प्रकट होईल. मनाचं स्वास्थ्य सांभाळण्यासाठी साधना, योग करून साधकानं तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे.

शांतिपाठ हा आपल्या मनाची, समजदारीची शांतता टिकवणारा आहे. या ईशावास्योपनिषदाच्या मनन-चिंतनातून काय प्राप्त होणार असा संदेह कुणाच्या मनात असेल तर सांगतो : ‘इथं असं ज्ञान मिळेल की त्याच्या भरवशावर मनाचं तारतम्य व शांतता कायमस्वरूपी लाभेल.’ नाम-रूपाला महत्त्व न देता त्यातल्या ईशतत्त्वाचा विचार करायला शिकवणारं हे उपनिषद आहे.

एकेक मंत्र अभ्यासावा, स्वचिंतन-मनन करावं म्हणजे हेच मंत्र ज्ञानाचा कुंभ देतील; जेणेकरून तृष्णा शांत होईल. ईशावास्योपनिषदात अठरा मंत्र आहेत. इथं कुठंही कर्मकांड सांगितलेलं नाही. आहे ते ज्ञानच. असं हे ज्ञान अंगी बाणवावं लागेल. ज्ञान हे प्रत्येकाजवळ आहे; पण निद्रितावस्थेत. तेचं अभ्यासानं, सवयीनं जागृत करायचं असतं.

ज्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगला जातो ती का टिकली? कारण, वेदकाली ज्ञान ऐकल्यानंतर ते रोजच्या जीवनात उपयोगात आणत असत, ते ज्ञान आत्मसात केलं जात असे.

उपनिषदं तशी अनेक आहेत. त्यातही महत्त्वाची दहा आहेत व त्यातही पुन्हा ईशावास्योपनिषद हे अत्यंत महत्त्वाचं.

(लेखक हे अध्यात्मशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत.)

(हे पाक्षिक सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com