स्वतःला व्यक्त करणं हाच परमोच्च आनंद (श्रीराम हसबनीस)

shriram hasabnis
shriram hasabnis

प्रत्येक मैफल काही ना काही नक्की देत असते, शिकवत असते. त्यातूनच आपले गुण-दोष कळत जातात आणि सुधारणेला वाव मिळतो. संगतकार म्हणून वेगवेगळ्या शैलींच्या गायकांबरोबर वाजवताना वेगवेगळ्या विचारांची ओळख होत असते. काही अनुभव खोलवर रुजतात आणि मग ते वादनातही डोकावतात.

"दैवायत्तम्‌ कुले जन्म मदायत्तम्‌ तु पौरुषम्‌!'
कर्णाच्या या उक्तीनुसार संगीताचे संस्कार घडावेत, अशा घरी माझा जन्म झाला. पूर्वाश्रमी असणारी संगीताची आवड आईनं थोडीफार जपली होती. सांगलीतले जुन्या पिढीतले हार्मोनिअमवादक वसंतराव गुरव यांच्या वडिलांकडं आईनं पेटीचे धडे गिरवले होते. वडिलांनाही लहानपणापासून संगीताची आवड. त्यामुळे पुढं सांगलीतले गोविंदबुवा काळे यांच्याकडं वडिलांनी शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं होतं. शिवाय पेणमधल्या वास्तव्यात त्यांनी विनायकराव घांग्रेकर यांच्याकडूनही तबल्याचं रीतसर शिक्षण घेतलं होतं. वडील संस्कृतशिक्षक. रोज संध्याकाळी त्यांची गायनाची उजळणी चालत असे. त्यामुळे साहजिकच कानावर पडणाऱ्या बंदिशीही - पाढे पाठ करता करता- पाठ झाल्या. धाकटा भाऊ विनायक याचा ओढा तबल्याकडं आणि माझा पेटीकडं. मग एकत्रच आमचं प्राथमिक शिक्षण वडिलांकडं सुरू झालं. घरी रेडिओ सुरूच असायचा. त्यावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांतून वेगवेगळे गायक-वादक, वेगवेगळे राग-चिजा, वेगवेगळी वाद्यं असा सांगीतिक खुराक मिळत होता. हळूहळू आम्ही बंधुद्वय गावात येणाऱ्या कीर्तनकारांची साथ करू लागलो. गणेशवाडीच्या प्रख्यात काणे-कीर्तनकुलाशी निकटचा घरोबा असल्यानं नारदीय कीर्तनाच्या अनेक पारंपरिक चालींची ओळख सहजच झाली होती. त्यामुळे कीर्तनपरंपरेतल्या अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कीर्तनकारांबरोबर साथ करण्याचा अनुभव अगदी बाराव्या वर्षांपासून मिळाला. माधवनगर इथं गावातली भजनी मंडळीदेखील रागसंगीताची जाणकार होती. त्यामुळं सरावही नित्याचाच होता.

पुढं मिरजेचे हृषीकेश बोडस, मंगला जोशी आणि आजच्या आघाडीच्या गायिका मंजूषा कुलकर्णी-पाटील यांचा परिचय झाला. इचलकरंजी इथले संगीताचार्य द. वि. काणेबुवा यांची ही शिष्यत्रयी. त्यांच्याबरोबर रोजचा सराव आणि कार्यक्रम असं सत्र सुरू झालं. त्यांच्यामुळे काणेबुवा माझ्या आयुष्यात आले आणि माझं सांगीतिक आयुष्य बदलून गेलं.

मी, मंजूषाताई आणि त्यांची बहीण संजीवनी - जी पुढं मला सहधर्मचारिणी म्हणून लाभली - असे आम्ही तिघं रोजच्या रोज सांगलीहून इचलकरंजीला जात असू. सुमारे दोन-अडीच तास शिकवणी होत असे. गाण्याची शिकवणी ऐकता ऐकता काणेबुवा साथसंगतीबाबत मार्गदर्शन करत. उत्तम गानगुरू असण्याबरोबरच काणेबुवा एक उत्तम हार्मोनिअमवादकही होते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. संगीतकाराला रागांच्या बंदिशी, अस्थाई-अंतरे माहीत असावेत. एवढंच नव्हे तर, प्रत्येक बंदिश आपल्याला स्वतंत्रपणे किमान दहा मिनिटं तरी वाजवता आली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. सुमारे वीस वर्षांनंतर आजही प्रत्येक शिकवणीचे स्वर, आवर्तन भरण्याची त्यांची शिकवण कानात जशीच्या तशी आहे. माझ्या आयुष्यातला हा योग म्हणजेही परमेश्‍वरी कृपाच. तेच सोनेरी क्षण आज माझ्या सांगीतिक प्रवासात "शिदोरी' बनलेले आहेत. घरंदाज गायकी, पठडी, शिस्त, कल्पकता, स्वरभाव या सगळ्या गोष्टींचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे काणेबुवांची शिकवणी असं म्हणता येईल. आग्रा घराण्याची रागरूप उकलणारी नोम्‌-तोम्‌, जयपूर घराण्याची आवर्तनाची शिस्त, बोजदारपणा, ग्वाल्हेर घराण्याचा चपळ सट्टा, भावनिक परिणामाचं उत्तुंग शिखर साधणारे किराणा घराण्याचे स्वर अशा सर्वच सुंदर गोष्टींचा मिलाफ काणेबुवांच्या गाण्यात होता.
हार्मोनिअमवादक म्हणून घडताना आपण आधी नीट ऐकलं पाहिजे, काय चाललंय हे आपल्याला नीट कळलं पाहिजे आणि मग आपण जे वाजवू ते गाणाऱ्याचा विषयविचार टिकवून त्यात आपल्या कल्पनेची भर घालणारं वाजवणं असावं अशी त्रिसूत्री काणेबुवांनी दिली. काणेबुवा इहलोकी असेपर्यंत त्यांचा घडलेला सहवास या परमेश्‍वरानं दिलेल्या दानासाठी मी त्याचा आजन्म कृतज्ञ आहे. स्वतःच्या व्याधीकडं दुर्लक्ष करून शिष्यांना तळमळीनं शिकवणारा असा गुरू विरळाच.

काणेबुवांच्या निधनानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी गुरूंच्या शोधार्थ होतो. माझ्यासमोर एकच नाव होतं. पं. तुळशीदासजी बोरकर. नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आल्यानंतर माझी मनोकामना पूर्ण झाली. गुरुजींनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं. हार्मोनिअम या वाद्याची खरी ओळख मला गुरुजींनी करून दिली. प्रत्येक वाद्याचा एक स्वभावधर्म असतो आणि तो ओळखूनच आपण आपली कला वाढवावी...हार्मोनिअमवादनात काय करावं? काय टाळावं? मैफलीस रंगत येण्यासाठी संगत कशी असावी? स्वतंत्र वादनाचा विचार करता त्या वाद्याचा वकूब ओळखून त्यानुसार तो कसा उतरवावा यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची उकल गुरुजींकडं शिकण्यातून झाली. वाद्यावर निस्सीम प्रेम आणि गुरूंवर अपार निष्ठा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार शिकवण्याची तळमळ यामुळे बोरकर गुरुजी आज भारतभर सर्वांसाठी एक महान वादक-गुरू म्हणून दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. मधुकर पेडणेकर यांच्या वादनातली तयारी, स्पष्टता त्याचबरोबर ज्येष्ठ ऑर्गनवादक विष्णुपंत वष्ट यांच्या वादनातलं शब्दमाधुर्य यांचा अजोड मिलाफ बोरकर गुरुजींच्या वादनात आढळतो. "नाट्यसंगीत कसं वाजलं पाहिजे याचा वस्तुपाठ म्हणजे वष्ट' असं गुरुजींच्या तोंडी नेहमी येतं. उच्चारणातले ऱ्हस्व-दीर्घ, स्वरांमधली आस या गोष्टी सूक्ष्म निरीक्षण आणि चिंतन, त्यासाठीचा डोळस सराव यातूनच हे साध्य होऊ शकतं, याची गुरुजींच्या वादनातून नेहमीच प्रचीती येते. मला अजूनही आठवतं, "यदुमनी सदना' या पदाची आउटलाईन गुरुजी मला जवळपास दोन अडीच तास शिकवत होते. जुजबी चाल वाजवणं त्यांना कधीच पटणारं नव्हतं. एखादं पद त्यांना हवं तसं वाजवणं यासाठी त्यांच्यासमोर बसून त्याची "संथा' घेण्याशिवाय पर्यायच नाही. तेव्हाच ते पद वाजताना श्रोते भान हरपून जातात.

हार्मोनिअमवर रागसंगीत वाजवण्याबाबत गुरुजींचे स्वतःचे असे काही निकष आहेत. इथं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही, की इतर वाद्यांच्या तुलनेत हार्मोनिअम हे वाद्य चपळ, जलद, "तैयार' वाजवण्यासाठी सुकर आहे; परंतु या वाद्याच्या मूलतः जलद स्वभावाच्या विरुद्ध जाऊन त्यामध्ये स्थिरता आणणं ही गोष्ट मात्र कठीण आहे. म्हणूनच आलापीसाठी, गतीसाठी काय लय असावी याचा गुरुजींचा विचार दीर्घ चिंतनातून आला आहे. वादनामध्ये रंजकता वाढून एकसुरीपणा किंवा पुनरावृत्तीचा दोष टाळून वादन कसं असावं याचा वस्तुपाठ म्हणजेच गुरुजींचं वादन, तसंच स्वतंत्र वादनाचा विचार करता कोणते राग हार्मोनिअमवर वाजवावेत, कोणते वाजवणं इष्ट नव्हे याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट आहे. उदाहरण द्यायचं झालं तर "दरबारी', "अडाणा', "ललत', "मल्हार' असे विशिष्ट व मिंडयुक्त स्वरलगावांनी सिद्ध होणारे राग हार्मोनिअमवर वाजवणं संयुक्तिक नव्हे, असं गुरुजी म्हणतात. हार्मोनिअमवादनाच्या कक्षा रुंदावताना नवीन प्रयोग करण्याबाबत गुरुजींचं मत सकारात्मक आहे. कारण, जे चांगलं आहे ते श्रोते स्वीकारतात व ते टिकतं यावर गुरुजींचा विश्‍वास आहे.

एक हार्मोनिअमवादक म्हणून व्यासंग जपताना मला ज्या गुरुजनांचा सहवास लाभला, त्यातून ज्या गोष्टी मला भावल्या त्या उतरवण्याचा प्रयत्न एक विद्यार्थी म्हणून मी करत आहे. प्रत्येक मैफल काही ना काही नक्की देत असते, शिकवत असते. त्यातूनच आपले गुण-दोष कळत जातात आणि सुधारणेला वाव मिळतो. संगतकार म्हणून वेगवेगळ्या शैलींच्या गायकांबरोबर वाजवताना वेगवेगळ्या विचारांची ओळख होत असते. काही अनुभव खोलवर रुजतात आणि मग ते वादनातही डोकावतात. हार्मोनिअमवादकाचा श्रवणानुभव अधिक समृद्ध असतो. कारण, साथसंगतीमुळे गायकाला गुरू मानून त्याच्या सांगीतिक विचारांचं जवळून निरीक्षण करण्याची संधी हार्मोनिअमवादकाला मिळत असते.

आज अनेक चांगले हार्मोनिअमवादक आपापल्या अनुभवांतून समृद्ध होत आहेत; परंतु खऱ्या अर्थानं हार्मोनिअमवादकाची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी त्यास स्वतंत्रवादनासाठीचं व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा हार्मोनिअमवादकाची कारकीर्द ही साथसंगत करण्यापुरतीच गणली जाते. संगीतसंस्थांबरोबरच आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांनीदेखील यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. कला ही रसिकांसमोर येण्यानं समृद्ध होते. कारण, तो एक संवाद असतो. म्हणूनच या संवादाचं कौशल्य आत्मसात करण्यासाठी तशा संधी उपलब्ध होण्याची गरज असते. पुढील काळात या वाद्याची ओळख अधिक आश्‍वासक व समृद्ध व्हावी यासाठी कलाकार, रसिक व आयोजक या सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे, असंही मला वाटतं. स्वतःला व्यक्त करणं हाच प्रत्येक कलाकारासाठी परमोच्च आनंदाचा क्षण असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com