भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 

श्रीराम ग. पचिंद्रे
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

'इफ्फी' भारतीय असला तरी आंतरराष्ट्रीय आहे, म्हणून त्या दर्जाचे चित्रपट येथे प्रदर्शित होतात. बाहेर चित्रपटगृहांमध्ये कधीही दाखवले जात नाहीत असे असंख्य चित्रपट 'इफ्फी' मध्ये दाखवले जातात. सर्व भारतीय भाषांमधील चित्रपट येथे पहायला मिळतात. इतकेच नव्हे, तर जगातल्या सर्व भाषांमधले महत्त्वाचे चित्रपट पाहण्याची संधी 'इफ्फी'त मिळते.

'नेमेचि येतो मग पावसाळा' या काव्यपंक्तीप्रमाणं 47 वा 'भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया- इफ्फी) 20 नोव्हेंबर या दिवशी गोव्यात सुरू झाला. तो नेहमी दहा दिवसांचा असायचा; यंदा त्यातले दोन दिवस कमी होऊन तो आठ दिवसांचा झालाय. गेल्या 12 वर्षापासून हा महोत्सव गोव्यात आयोजित केला जातो. 2004 ह्या वर्षी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात हा चित्रपट महोत्सव आणला. त्यानंतर भाजपची सत्ता गेली, तरीही तो गोव्यातच सुरू राहिला. दरम्यान, गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार आले, पर्रीकर मुख्यमंत्री झाले. नंतर पर्रीकर केंद्रात गेले आणि त्यांनी खास प्रयत्न करून ह्या प्रतिष्ठेच्या, मानाच्या चित्रपट महोत्सवाचं गोवा हे कायमचं ठिकाण बनवलं. आता इफ्फी दरवर्षी गोव्यातच भरेल. 

'इफ्फी' भारतीय असला तरी आंतरराष्ट्रीय आहे, म्हणून त्या दर्जाचे चित्रपट येथे प्रदर्शित होतात. बाहेर चित्रपटगृहांमध्ये कधीही दाखवले जात नाहीत असे असंख्य चित्रपट 'इफ्फी' मध्ये दाखवले जातात. सर्व भारतीय भाषांमधील चित्रपट येथे पहायला मिळतात. इतकेच नव्हे, तर जगातल्या सर्व भाषांमधले महत्त्वाचे चित्रपट पाहण्याची संधी 'इफ्फी'त मिळते. ह्या महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळाही दिमाखदार असतो. हिंदी असोत की अन्य भारतीय भाषांमधील असोत, की, जागतिक स्तरावरचे असोत, अनेक नामवंत कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ उद्‌घाटन सोहळ्यात सहभागी होतात. सर्वसामान्य रसिकांना, जाणकार व तज्ज्ञांनाही हे सारं काही सोहळ्याच्या आरंभीच पहायला, अनुभवायला मिळतं. चित्रपटसृष्टीतल्या तारे- तारकांना 'याचि देही याचि डोळा' पाहण्याचा सोहळा काही अनुपम्यच असतो. 

हा चित्रपट महोत्सव प्रामुख्याने गोवा मनोरंजन संस्था आणि कला अकादमी अशा दोन ठिकाणी साजरा होतो. उद्‌घाटन आणि समोरोपाचं स्थळ वेगळं असतं. संपूर्ण पणजी शहर रोषणाईनं झागमगत असतं, तसेच अनेक प्रकारची सजावट ठिकठिकाणी केलेली असते. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या नावे असलेला मार्ग हा गोव्याचा मुख्य रस्ता होय. ह्या मार्गावर सर्वत्र रोषणाई असते. बाजूच्या महावीर उद्यानातही सजावट असते, तसेच अनेक कार्यक्रम उद्यानात दोन-तीन ठिकाणी होत असतात. गाणी-बजावणी, नकला, विदूषकी थाट असं बरंच काही तिथं सुरू असतं. नोंदणी न केलेली जनतासुद्धा ह्या मुक्त कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकते. मांडवी नदीच्या काठी असलेल्या भव्य पदपथावर खाद्यपेयांची दुकाने थाटलेली असतात. खास गोमंतकीय खाद्यपेयांबरोबरच देशातल्या अनेक भागातल्या खाद्यपेयांचेही ठेले तिथं असतात. गोमंतकीय जनतेला गोव्याबाहेरच्या पदार्थांचं आकर्षण असतं, तर देशा- परदेशातून आलेल्या चित्ररसिकांना गोमंतकीय पदार्थांचं आकर्षण असतं. मासे, हुमण, सोलकढी, किसमूर अशा गोव्याच्या पदार्थांवर मोठ्या आवडीनं ताव मारण्यात हे रसिक मश्‍गुल असतात. कांपाल मैदान, आझाद मैदान अशा सार्वजनिक ठिकाणी सर्व लोकांसाठी अनेक भाषेतले लोकप्रिय चित्रपट दाखवले जातात. ते पहायला कोणतीच नोंदणी अथवा बंधन नसल्यामुळं रसिक तिथं तोबा गर्दी करतात. 

2013 च्या 'इफ्फी'चं उद्‌घाटन पणजीत कांपाल मैदानावरील भव्य शामियान्यात झालं होतं, समारोपही त्याच शामियान्यात झाला होता. खचाखच गर्दी अर्थातच होती. आशा भोसले, राणी मुखर्जी आणि इतर अनेक तारका आणि तारे यांना पाहण्यास आतुर असलेल्या हजारो नेत्रांचा तो सोहळा होता. 2014 च्या 'इफ्फी'त हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन नायक आणि त्यांच्याहून काकणभर सरसच चमकणारे तारे रजनीकांत यांना पहायला रसिकांचे डोळे आसुसले होते. त्यांचं काहींना जवळून आणि असंख्यांना दुरूनही दर्शन झाल्यावर अवघ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. उद्‌घाटन आणि समारोपाच्या सोहळ्यांत नामवंत आणि स्थानिक कलाकारांचा नयनमनोहर कलाविष्कार सादर होत असतो. अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम असतो. 2014 पासून हा सोहळा श्‍यामाप्रसाद मुखर्जी मैदानाच्या भव्य जागेत साजरा होतो. 

दोन वर्षामागे 'इफ्फी'चा खर्च मेजवान्यांवर जास्त होत असे. राज्यपालांची मेजवानी, मुख्यमंत्र्यांची मेजवानी, केंद्रीय मंत्र्यांची मेजवानी अशा अनेक मेजवान्या साऱ्या वलयांकित व्यक्तींबरोबरच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही दिल्या जायच्या. ह्या मेजवानीच्या वेळी साऱ्या चमकत्या तारे- तारकांचं अधिक जवळून दर्शन घेता येत असे. पण हा वाढता खर्च टाळण्यासाठी गेल्या वर्षापासून ह्या मेजवान्या बंद झालेल्या आहेत; अर्थात ही चांगली गोष्ट आहे. उंची मद्य, असंख्य पदार्थ, इतर अनेक प्रकारची पेये, मनोरंजनाचे कार्यक्रम यावरचा लाखो रुपयांचा हा खर्च वाचला हे खरं तर चांगलं झालं. 

गोवा मनोरंजन संस्था ही 'इफ्फी'ची प्रमुख आयोजक संस्था होय. 2013 मध्ये आमदार विष्णू सूर्या वाघ यांच्याकडे गोवा मनोरंजन संस्थेचं उपाध्यक्षपद होतं, तसेच कला अकादमीचे अध्यक्षही तेच होते. पण सातत्यानं मनोहर पर्रीकर यांच्यावर (भाजपमध्ये असूनही) शरसंधान केल्यामुळं त्यांची सगळी पदं काढून घेण्यात आली. ते फक्त आमदारच राहिले. त्यांची गाडी गेली. त्यानंतर दामू नाईक यांच्याकडे गोवा मनोरंजन संस्थेचं उपाध्यक्षपद सोपवण्यात आलं. गेल्या दोन्ही महोत्सवांच्या वेळी तेच हे पद भूषवीत होते. यंदा चित्रपट महोत्स तोंडावर असताना दामू नाईक यांचा राजीनामा घेण्यात आला आणि चित्रपट निर्माते राजेंद्र तालक यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण त्यांच्या नेतृत्वाला एकमान्यता नाही. त्यामुळे यंदाच्या 'इफ्फी'त मतभेदांचे अनेक कंगोरे दिसताहेत. तालक यांचा काही ठसा जाणवत नाही. 

प्रतिनिधी नोंदणी असो की, माध्यम प्रतिनिधींची नोंदणी असो, त्यात सावळागोंधळ दिसून आला. 

यावर्षी लोकप्रिय चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी मिरामार, जॉगर्स पार्क या ठिकाणी खुल्या जागेत व्यवस्था करण्यात आलेली आहे, पण गेल्या तीन दिवसांपासून एकही चित्रपट येथे दाखवलेला नाही. विशेष म्हणजे याठिकाणी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी टीएलजी कंपनीला 62 लाख रुपयाचं कंत्राट दिलेलं आहे. अशा गोष्टींमुळे चित्ररसिक नाराज झालेले आहेत. 

यंदाच्या इफ्फीला चित्रपट रसिकांची गर्दी तुलनेनं कामी आहे, याची दोन कारणं आहेत. प्रतिनिधी शुल्क 300 रुपयावरून एक हजार एवढं वाढवण्यात आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे चित्रपट महोत्सवाच्या तोंडावरच देशात नोटाबंदी जाहीर झाली. लोकांच्या जवळ पैसा नाही आणि त्यांचा वेळ बॅंकेच्या रांगते उभा राहण्यात जात आहे. पैसा नाही हे कारण मुख्य म्हणावं लागेल. पण यंदा लोकांचा उत्साह एकंदरीत कमी दिसतो आहे, हे खरं!

Web Title: Shriram Pachindre writes about IFFI