'इसिस' चा चक्रव्युह (श्रीराम पवार)

- श्रीराम पवार
रविवार, 12 मार्च 2017

मध्य प्रदेशात उज्जैनमधल्या स्फोटानंतर लखनौमध्ये जो दहशतवादी मारला गेला, तो इसिसचा किंवा त्यापासून प्रेरणा घेतलेला असला तरी या दुखण्याकडं पाहताना व्यापक भारतीय सुरक्षेसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या राजकारणाच्या चौकटीतूनही पाहायला हवं. इसिसचा धोका आहेच; मात्र, आजघडीला पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवाद्यांचा धोकाही तेवढाच मोठा आहे.

मध्य प्रदेशात उज्जैनमधल्या स्फोटानंतर लखनौमध्ये जो दहशतवादी मारला गेला, तो इसिसचा किंवा त्यापासून प्रेरणा घेतलेला असला तरी या दुखण्याकडं पाहताना व्यापक भारतीय सुरक्षेसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या राजकारणाच्या चौकटीतूनही पाहायला हवं. इसिसचा धोका आहेच; मात्र, आजघडीला पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवाद्यांचा धोकाही तेवढाच मोठा आहे. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी आणि त्यानंतरची संभाव्य राजकीय समीकरणं यांच्याकडं सगळ्या देशाचं लक्ष असताना या स्फोटाच्या घटनेकडं काहीसं दुर्लक्षच झालेलं आहे. मात्र, तसं करून चालणार नाही. हा स्फोट म्हणजे धोक्‍याची घंटा आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

लखनौमध्ये पोलिसांनी दहशतवाद्याला चकमकीत टिपला, त्याचे बरेचसे साथीदार पकडले ही एक दहशतवादी घटना असली, तरी तिला व्यापक पार्श्‍वभूमी आहे. इसिसची बदलती रणनीती, अफगाणिस्तानच्या भवितव्यासाठी चाललेल्या वाटाघाटीत रंगलेले शह-काटशह असे अनेक कंगोरे इसिसच्या भारतातल्या कारवायांशी आणि इसिसच्या प्रभावाविषयी जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या प्रचारासोबत जोडले आहेत. एका भूभागावर राज्य स्थापन करून ते विस्तारायचं ही मूळ कल्पना असलेल्या इसिसच्या कथित खिलाफतीनं अलीकडं कुठंही दहशतवादी हल्ला होताच त्याची जबाबदारी स्वीकारायला सुरवात केली आहे. हे इसिस रंग बदलू लागल्याचं द्योतक आहे. सीरियातल्या इसिसच्या कथित खिलाफतीभोवती फास आवळत चालला आहे. सीरिया-इराकची बगदादीच्या खिलाफतीतून मुक्तता होणं आता जवळपास निश्‍चित बनलं आहे. गेल्या वर्षाच्या सुरवातीपासूनच इसिसच्या सीरियातल्या पाडावाची पार्श्‍वभूमी तयार होत होती. वर्ष सरताना इसिसची ताकद त्या भागातून खच्ची झाल्याचं दिसत होतं. इसिसचं राज्य पराभूत होणार, यात शंका नव्हतीच, ते कधी होणार, इतकाच मुद्दा होता.

मात्र, तिथं पराभव होत असताना जगभरचे स्लीपर सेल कार्यान्वित करून इसिसचा विचार जिवंत ठेवायची धडपड सुरू होईल, याचे संकेत मिळू लागले आहेत. इसिसचं प्रचंड चर्चेत आलेलं राज्य संपवणं जेवढं आवश्‍यक आहे, तेवढंच इसिसच्या बदलत्या रणनीतीकडं आणि त्यासाठी निवडल्या जात असलेल्या ठिकाणांकडं लक्ष देणं गरजेचं आहे. इसिस आपला अड्डा बदलण्याची शक्‍यता दिसू लागली आहे. यात एक अत्यंत स्पष्ट कारण आहे व ते म्हणजे इसिसला सीरियात पराभव झाला तरी ‘संघटन जिवंत आहे’ असं दाखवायचं आहे. दुसरीकडं लढाईच्या नव्या आघाड्या उघडून दहशतवाद्यांची नवी भरती करणं, त्याद्वारे सीरियातल्या पराभवावरून लक्ष वळवणं हाही हेतू आहे. गेल्या काही महिन्यांत इसिसकडून सातत्यानं चीनच्या विरोधात गरळ ओकणारे व्हिडिओ किंवा ऑडिओ जारी केले जात आहेत. प्रचारी व्यूहनीतीत इसिस अन्य जिहादी गटांहून कितीतरी आघाडीवर आहे. अगदी पाश्‍चात्य देशांनाही या प्रचाराला तोंड देणं आव्हान बनलं आहे. अलीकडंच इसिस किंवा इसिसप्रणित खोरासनच्या प्रवक्‍त्यांनी ‘चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील,’ असा इशारा दिला आहे. चीनमधल्या उघूर बंडखोरांचा वापर इसिस करू पाहत आहे. चीनच्या विरोधातलं हे प्रचारयुद्ध, पाकिस्तानमध्ये क्वेट्टाचा हल्ला किंवा सेहवानमधला हल्ला किंवा अगदी ताजा भारतामध्ये मध्य प्रदेशातल्या रेल्वेत घडवून आणला गेलेला स्फोट या सगळ्या घडामोडी इसिसचा धोका भारतीय उपखंडाच्या दरवाजावर आल्याची जाणीव करून देणाऱ्या आहेत. 

उत्तर प्रदेशात मारला गेलेला दहशतवादी सैफुल्ला याचा थेट इसिसशी संबंध असल्याचे पुरावे नाहीत, असं उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनी सांगायला सुरवात केली आहे. ते खरंही असू शकतं. मात्र, पाकिस्तानचा प्रभाव आणि मदतीविना उभं राहू पाहत असलेलं दहशतवाद्याचं हे नवं प्रकरण दखलपात्र आहे. त्याची प्रेरणा इसिस हीच असू शकते. यात इसिसशी थेट संबंध आणि आर्थिक किंवा अन्य साधनांची मदत दिली की नाही, यापेक्षा इसिस ज्या विखारी विचारसरणीचं प्रतिनिधित्व करते, ती प्रमाण मानणारे स्वतंत्र गट तयार होत असतील, तर ते तेवढंच खतरनाक आहे. साहजिकच सैफुल्ला आणि त्याचे साथीदार इसिसचे आहेत की नाहीत, यावर वाद घालण्यापेक्षा वहाबी विचारांनी भारावलेलं मॉड्यूल तयार झालं, याकडं लक्ष द्यायला हवं. भारतात इसिसनं अद्याप उघड कारवाया केल्या नाहीत हे खरं आहे, तसंच जलालाबादमधल्या भारतीय वकिलातीवर हल्ला करू पाहणाऱ्या इसिसच्या हल्लेखोराला अफगाणिस्तानच्या गुप्तहेरांनी पकडलं होतं, हेही खरं आहे. या स्थितीत इसिसचं आव्हान समजून घ्यायला हवं, त्याचबरोबर इसिसचा मोठा धोका दाखवून भारतीय उपखंडातला पाकपुरस्कृत दहशतवादाचा धोका त्याहून कमी आहे, असं सांगायचं आणि अफगाणिस्तानात तालिबान्यांना मोकाट सुटायची संधी देण्यासाठी जगाला राजी करायचं, हा व्यापक व्यूह समजून घ्यायला हवा. इसिस हे आजतरी आकार आणि सामर्थ्य या दोन्ही बाजूंनी भारतीय उपखंडातलं फार मोठं संघटन नाही. मात्र, त्याची भारावून टाकण्याची क्षमता प्रचंड आहे. त्याला भुलणाऱ्यांची जगभर कमतरता नाही. इसिसमध्ये अरब देशांबाहेरून सामील झालेल्यांमध्ये निम्म्याहून अधिक चांगली शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातले आहेत. अफगाण-पाक सीमेलगत तर असल्या कामासाठी वाटेल तेवढा ‘कच्चा माल’ उपलब्ध आहे. आतापर्यंत पाकिस्ताननं धूर्तपणे त्याचा आंतरराष्ट्रीय व्यूहनीतीत वापर केला, तोच आता इसिसविरोधातल्या लढाईत कच्चा दुवा बनतो आहे. 

इसिसचा भारतात थेट धोका नसल्याचं मानलं जात असतानाच इसिसप्रणित ‘विलायत खोरासन’ या नावानं सक्रिय झालेले दहशतवादी पाक-अफगाण सीमेवर एकवटत असल्याची चिन्हं आहेत. तूर्त हा मध्य आशिया आणि भारतीय उपखंडातला सगळ्यात मोठा दहशतवादी धोका नसला तरी सीरियातून पळून जावं लागेल, तसं 

जगभरातून खिलाफतीच्या आकर्षणापायी तिथं जमलेले कडवे दहशतवादी नवी आश्रयस्थानं शोधू लागतील आणि अशी ठिकाणं पाकिस्तानच्या नादानपणामुळं तिथं भरपूर तयार झाली आहेत. हे जिहादी दहशतवाद्यांचं अधिक कडवं स्वरूप पाकच्या नियंत्रणात राहण्याची शक्‍यता नाही.

काश्‍मिरातही पाकिस्तानच्या तालावर नाचणाऱ्या दहशतवाद्यांना इसिसचा विरोध आहे. वहाबी-सलाफी विचारसरणी न मानणाऱ्यांना संपवणं हाच अजेंडा असलेल्या इसिससाठी काश्‍मीरमधले पाकिस्तानचे हितसंबंधही धर्मविरोधी ठरतात. पाकिस्तान ज्या वाटेवरून चालत आला, त्यात वहाबी विचारसरणीचं फारसं वावडं नाही. मात्र, पाकला लष्कर-ए-तोयबापासून ते अफगाण तालिबान्यांपर्यंत सगळे चालतात; पण टीपीपी किंवा इसिसचा शिरकाव नको असतो. याचं कारण वरवर विचारसरणी एकसारखीच असली, तरी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान(टीटीपी), इसिस यांना पाकमधलं राज्य पुरेसं इस्लामी वाटत नाही. ते संपवणं आणि खिलाफत स्थापन करणं हेच त्याचं ध्येय आहे. हे पाकच्या आतापर्यंत सोईनं दहशतवाद पोसणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी आणि लष्करासाठीही अडचणीचं आहे. भारतासाठी या दोन्हींत काही फरक नाही. त्यांचा मुकाबला अनिवार्य आहे. कुणाचा आज, कुणाचा उद्या इतका प्राधान्यक्रमातला बदल फारतर असू शकतो. 

‘विलायत खोरासन’च्या नावानं जमलेले दहशतवाद्यांचे गट भारताला शत्रू मानतातच; पण चीन, रशिया, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानलाही शत्रूच मानतात. आता अशा स्थितीत इसिस सगळ्यांचा समान शत्रू ठरतो आणि निदान इसिसला या भागात पाय ठेवता येऊ नये, यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं हा समान कार्यक्रम असायला हवा. ही मांडणी तर्कशुद्ध असली तरी त्यामागं पाक-रशियाचं, अफगाणिस्तानातल्या हितसंबंधांचं राजकारणही आहे. दहशतवाद नेहमीच आंतरराष्ट्रीय राजकारणात सोंगटीसारखा वापरला जातो. सीरियातही इतका वेळ खिलाफत तग धरू शकली, ती त्याविरोधातल्या कारवाईत अमेरिका-रशिया, इराण-अरब देश यांच्यातल्या मतभेदांमुळंच. इसिसनंतर त्या भागात वर्चस्व कुणाचं हा तिथं मुद्दा आहे, तर आता अफगाणिस्तानात वर्चस्व कुणाचं हा इकडं मुद्दा आहे. इसिसविरोधात एकत्र यायचं आवाहन करणारे त्याआडून आपलं अफगाणिस्तानातलं महत्त्व कायम ठेवायचं राजकारण रेटत आहेत. साहजिकच इसिसचा आज फार मोठा नसलेला धोका वाढवून सांगत पाकिस्तानला-रशियाला अफगाणिस्तानातले आपले हितसंबंध राखायचे आहेत. या मुद्द्याकडं पाहण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आहे. तोच रास्त मानून चाललेला व्यवहार मूळ दुखण्याकडं दुर्लक्ष करणारा आहे. 

इसिसचा या भागातला शिरकाव सगळ्या भागाच्याच शांततेला वेठीला धरणारा ठरू शकतो हे खरंच आहे. अलीकडंच नजिबुल्लाह कुरेशी नावाच्या पत्रकारानं अफगाण सीमेलगत जमलेल्या विलायत खोरासनच्या तळांवर आधारित चित्रफीत बनवली आहे. असं करणारा तो पहिलाच. ‘अल्‌ जझीरा’नं प्रसिद्ध केलेली ही चित्रफीत खोरासनचे समर्थक पिढ्यान्‌पिढ्या दहशतवाद पोसणारं विष कसं पेरत आहेत, याचं दर्शन घडवते. पाच-सहा वर्षांच्या मुलांना पिस्तूल, बंदुका आणि बॉम्बचं प्रशिक्षण दिलं जातं. आत्मघाती हल्लेखोर बनण्याची त्यांची मानसिकता घडवली जाते. हे सगळं धर्मासाठी आवश्‍यकच हे बिंबवलं जातं. असं अत्यंत घातक, धर्मांध विचारांचं बाळकडू देण्याचा प्रयत्न होत असल्याचं या चित्रफितीतून पुढं आलं आहे. हे सगळं घडतं तो परिसर अफगाण-पाक सीमेवरचा आहे. ही पद्धतशीर सुरू असलेली पेरणी जगानं दखल घ्यावी अशीच आहे. 

यातून पाकच्या आसपास तयार होत असलेलं संघटन पाकची डोकेदुखी ठरणारं आहे. पाकिस्ताननं जिहादी गटांना हाताशी धरलं, ते राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. पश्‍चिम आशियातून या विचारांना आणि त्यासाठीच्या हिंसक कृत्यांना समर्थन मिळत राहिलं ते प्रामुख्यानं विचारसरणीच्या अंगानं. हा वहाबी विचार इस्लाममधलीच अन्य कोणतीही परंपरा मानायला तयार नाही. दहशतवादी पोसण्याचा पाकचा प्रयत्न, पश्‍चिम आशियातला वैचारिक वेडाचार याचा परिणाम अधिकाधिक खतरनाक, एकारलेली आणि अनियंत्रित दहशतवादी संघटनं तयार होण्यात झाला आहे. अमेरिकेनं बरबाद करून सोडून दिलेल्या इराक आणि सीरियात इसिसनं बस्तान बसवल्यानंतर जिहादी दहशतवादाचं केंद्र बनण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. इसिसच्या जागतिक नकाशात खोरासन नावाची विलायत आहे.

मध्ययुगात जगणाऱ्यांची परिभाषाही त्याच काळातली आहे. हे खोरासन नावाचं प्रकरण त्यातूनच तयार झालं आहे. यात पूर्वाश्रमीच्या पर्शियाच्या पूर्वेकडचा सारा भाग खोरासन नावाच्या विलायतीत समाविष्ट होतो. अफगाणिस्तान-पाकिस्तान-इराण, तसंच रशिया-भारत-चीनच्या काही भागासाठी ही कथित विलायत असल्याचं इसिसनं जानेवारी २०१५ मध्ये जाहीर केलं होतं. पाक-अफगाण सीमेवरची दहशतवादाची अभयारण्यंच या नव्या गटासाठीही आश्रय बनली. यात सामील झालेले अनेकजण आधीच कुठल्या ना कुठल्या दहशतवादी गटांशी संबंधित होतेच. खासकरून टीटीपीचे दहशतवादी मोठ्या प्रमाणात इसिसच्या या शाखेत सामील झाले.

या विलायतेचा कथित आमीर किंवा गव्हर्नर सय्यद हाफिज खान हा टीटीपीचा म्होरक्‍याच आहे. कधीतरी या भागावर काळ्या झेंड्यांचं म्हणजे इसिसचं राज्य येईल, या स्वप्नासाठी हा गट कार्यरत आहे. हे राज्य अंतिमतः इस्रायल, इराक, सीरिया, लेबनॉन या भागात विजय मिळवेल, असा आशावाद पेरत दहशतवाद्यांची भरती इसिसकडून केली जाते. इसिसनं एकदा खोरासन भागात तळ उभारायला सुरवात केल्यानंतर अनेक मूळच्या तालिबान्यांनी निष्ठा इसिसकडं वळवल्या. यातून तालिबान विरुद्ध इसिस असाही संघर्ष छेडला जातो आहे. 

इसिसचा किंवा इसिसप्रणित खोरासनचा धोका केवळ भारतापुरता नाही, याची जाणीवही सगळ्यांना आहे. मात्र, आजघडीला या भागातला सगळ्यात कळीचा प्रश्‍न आहे तो अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य पुरतं माघारी गेल्यानंतरच्या सत्तवाटपाचं काय? यात ज्या तालिबानविरोधात अफगाणयुद्ध झालं, त्याच तालिबानला वाटाघाटीच्या टेबलवर बोलवावं, यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. रशियालाही यात रस आहे.

यातून इसिसचा वापर अधिक खतरनाक आव्हान म्हणून केला जातो आहे. मांडणी सोपी आहे. या भागात कमी खतरनाक असलेल्या तालिबानशी जुळवून घ्यावं आणि अधिक मोठा धोका असलेल्या इसिसला पिटाळून लावावं. पाकिस्तान खेळात मुरलेला खेळाडू आहे. अफगाण तालिबानला अफगाणी राष्ट्रवादाचं प्रतीक ठरवायचा पाकचा प्रयत्न आहे. मुळात या तालिबानला पोसणारा पाकच होता. अमेरिकी कारवाईतही हे प्रकरण पुरतं मोडू नये, याची काळजी पाकच्या लष्करानं घेतली. आता अफगणिस्तानचं भवितव्य ठरवताना तालिबानला विचारात घेतलं पाहिजे, असा सूर लावण्यात पुन्हा पाकच पुढं आहे. इसिसला भारत आणि अफगाणिस्तान बळ देत असल्याचंही निदान पाकमध्ये जोरात आहे. हे तिथल्या प्रत्येक समस्येत भारत पाहण्याच्या जुनाट रोगाचं लक्षण आहे. इसिसशी लढण्यावरून रशियाचे अमेरिकेशी मतभेद आहेत, त्याचं दर्शन खोरासनचा धोका किती याविषयीच्या रशियन भूमिकेत घडतं. आपल्याकडं आणि अफगाणिस्तानात इसिसप्रणित दहशतवाद्यांना बळ देण्यातही पाकचाच हात असल्याचं निदान मध्यवर्ती आहे. म्हणजेच ‘धोका आहे’ यावर एकमत आहे; पण त्याचं स्वरूप काय, यावर प्रत्येकाची सोईची भूमिका आहे. 

उज्जैनमधल्या स्फोटानंतर लखनौत मारला गेलेला दहशतवादी इसिसचा किंवा त्यापासून प्रेरणा घेतलेला असला तरी या दुखण्याकडं पाहताना व्यापक भारतीय सुरक्षेसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या राजकारणाच्या चौकटीतही पाहायला हवं. इसिसचा धोका आहेच. मात्र, आजघडीला पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवाद्यांचा धोकाही कायमच आहे. ‘तालिबानी म्हणजे अफगाणिस्तानातले राष्ट्रवादी, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद या काश्‍मिरात धर्मयुद्ध लढणाऱ्या संघटना आणि टीटीपी-इसिस दहशतवादी. कारण, या संघटना पाकिस्तानचं राज्यच मानत नाहीत,’ हा पाकचा सोईचा शब्दच्छल आहे. यातले सगळेच भारताच्या विरोधात आहेत. या दहशतवाद्यांशी लढणं, त्यांना संपवणं हा या लढाईतला एक भाग आहे. खरा मुद्दा सुस्थितीत, सुशिक्षित तरुणांनाही विखारी, धर्मांध विचारांचं आकर्षण वाटतं त्याचा मुकाबला करण्याचा आहे. कडवेपणावर विरुद्ध टोकाचा कडवेपणा हे उत्तर नसतं. त्या विचारातला पोकळपणा दाखवून देणं हे असतं. प्रत्येक चकमकीचं राजकारण करण्याच्या, त्यात ध्रुवीकरण शोधण्याच्या सहजसाध्य मार्गापेक्षा हा विचारांचा लढा अधिक खडतर आणि गुंतागुतीचा आहे.

Web Title: shriram pawar isis article saptarang