ऋतूंचे डोळे नसलेली शहरे...

शहरांना आपले असे काही ऋतू असतात का? गावांना ते असतात, कारण अजूनही गावांना गावच्या पांढरीसोबतच गावाची काळीही असते... पांढरीत माणसांची वहिवाट असते आणि व्यवहाराची भाषा असते.
ऋतूंचे डोळे नसलेली शहरे...

गावातील नद्याही गालावर सुकलेल्या अश्रूंच्या व्रणासारख्या झाल्याने गावांना पुलाची गरज राहिलेली नाही. गावच्या नद्याही शहरातल्या तरण्या पोरींसारख्या झीरो फिगर सौंदर्यासाठी डायट करू लागल्याने ऐन पावसाळ्यातही दुथडी भरून वाहत नाहीत. आता गावांना नद्याच नसल्याने पुलांची गरज राहिलेली नाही अन् शहरात दुथडी भरून बारोमास वाहणाऱ्या रस्त्यांना ओलांडण्यासाठी पुलांची गरज पडू लागली आहे.

शहरांना आपले असे काही ऋतू असतात का? गावांना ते असतात, कारण अजूनही गावांना गावच्या पांढरीसोबतच गावाची काळीही असते... पांढरीत माणसांची वहिवाट असते आणि व्यवहाराची भाषा असते. त्यांचा पेरण्या आणि उगवण्याशी काहीच संबंध नसतो. उलट पेरण्या आणि उगवण्याच्या निर्मितीचाच इकडे व्यवहार केला जातो. खरेदी-विक्री आली की पाण्याची वाफ होऊन ढगात साचणे अन् ढगांनी निर्लेपपणे ती वाफ थंडावून पाणी टपटपवून टाकणे, यातला नरहरी सोनाराच्या व्यवहाराचा भाव किंवा भावपूर्ण व्यवहार करणाऱ्‍यांना कळत नाही. अशा ठिकाणी मग पांढरं खपतं, गोऱ्याला मागणी असते. जे पांढरं असतं ते सत्य नसतं, उलट फसव्या वस्तूंना आकर्षक वेष्टन करायलाच पांढऱ्याचा वापर होतो. असली सगळी तंत्रं पांढरीत वापरली जातात. तरीही गावाची पांढरी ही गावाच्या काळीवरच अवलंबून असल्याने पांढरे व्यवहारही शुद्ध होते. त्यामुळे काळीच्या कळकळीने आलेला पाऊस गावातही यायचा.

हिवाळ्यात म्हातारीच्या पाठीला हमखास कशी खाज सुटते अन् मग ती सकाळी कोवळ्या उन्हात तिळाचं तेल हाता-पायांना चोळत उगाच का बसलेली असते. आजूबाजूंच्या घरात नाक खुपसत याचा शोध घेण्यासाठी थंडीसोबत हिवाळ्यातली हळवी उन्हंही गावात यायची. गावातली माणसंही ऋतूंचा आब राखून सन्मान करणारी होती. कुठल्या ऋतूला कसल्या पायघड्या घालाव्या लागतात ते शेतशिवारांच्या भरोशावर पिढ्यान् पिढ्यांचे रहाटगाडगे चालवणाऱ्यांना चांगलं कळत होतं. धर्म म्हणजे निसर्ग अन् देव म्हणजे ऋतूंना जोजवणारे निसर्गातले घटक, हे त्यांना चांगलं माहिती होतं, तोवर गावात ऋतू अगदी बिनबोभाट यायचे.

गावातली माणसं काळीशी बेईमान झाली. पांढरी त्यांच्या पाशवी सधनतेची अन् वासनांची भूक भागवण्यात असमर्थ ठरते आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते शहराकडे धावले. जाताना त्यांनी ग्रामदेवतेच्या मूर्तीवरचा शेंदूरही खरवडून नेला. श्रद्धेचा शेंदूर गळून पडल्यावर दगड उघडा पडतो. गावही तसेच ओकेबोके वाटू लागले. शहरांना स्वत:चे असे ऋतू नसतात, कारण शहरांना हिरवळीचा तिटकारा असतो. पावसाळ्यातही भिंतीवर शेवाळ साचू नये यासाठी मग उच्चप्रतीचे अनैसर्गिक रंग ते भिंतींना लावतात. शहरांना रस्ते रुंद आणि गुळगुळीत हवे असतात. त्यासाठी मने आक्रसलेली अन् व्यवहार निसरडे हवेत, हे शहरांना कुणी सांगितले माहिती नाही; मात्र शहरांना कुठलेच प्रश्न पडू नयेत, अशी व्यवस्था केलेली असते. प्रश्न नसतात असे नाही; मात्र व्यवस्थेला प्रश्न न विचारणाऱ्या पिढ्या शहरात घडवल्या जातात. शहरांना आभाळाकडे मोकळेपणाने बघता येत नाही. गर्दीतल्या कोपऱ्यात आभाळाचे तुकडे अस्तित्वाचा शोध घेत विसावलेले असतात. वेल फर्निश्ड फ्लॅटच्या खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा, गावातून शहरात आलेल्या एखाद्या हळव्या जीवाला गावातल्या स्वच्छंद ऋतूंची आठवण करून देतो. उत्तुंग इमारतींच्या टेरेसवरून दिलेले निरोप गावाकडे पोहोचवणे आताशा ढगांनी बंद केले आहे. तरीही शहरवासी आपण कसे निसर्गस्नेही आहोत, याचा मस्त देखावा निर्माण करतात. शहरांचे सत्ताधारी ऋतूंच्या देखभालीची कंत्राटे देतात. त्यांच्या भव्य दिवाणखान्यात सजावटीसाठी बैलबंडीचं चाक वापरण्याची कल्पकता दाखवली जाते अन् त्यासाठी खूप पैसे मोजले जातात. एका मोठ्या इमारतीत तर मी प्लास्टिकची झाडे अगदी खऱ्या झाडांनाही लाजवतील अशी पाहिली तेव्हा मला खूप भीती वाटली. आजूबाजूला वावरणारी माणसं खरीच आहेत की प्लास्टिकची, असा विचार मनात आल्यावर मी दचकलो. शहारातल्या रासायनिक क्रूर उन्हांनी आपली त्वचा काळी का पडते, असा प्रश्न झाल्यावर हे स्वीकारावं लागलं होतं की आपलंही काही प्रमाणात प्लास्टिकीकरण झालं आहे.

शहरात इमारती झाडांपेक्षा उंच असतात आणि पाखरं खरोखरची असली तरीही ती झाडांपेक्षा या उंच इमारतींच्या कुप्यांमध्ये घरटी बांधतात. माणसं कबुतरांसारखी उंच इमारतींच्या अशाच खोप्यांमध्ये राहतात. कधी काळी झाडांवर चढून फळे तोडणारी मूलं गावातून पोटासाठी शहरात आल्यावर पायऱ्याही चढू शकत नाहीत. मोठ्या व्यापारी इमारतीत काचांवर सतत पाणी ओघळत ठेवून पाऊस येत असल्याची संवेदना निर्माण केली जाते. आता गावातील नद्याही गालावर सुकलेल्या अश्रूंच्या व्रणासारख्या झाल्याने गावांना पुलांची गरज राहिलेली नाही. गावच्या नद्याही शहरातल्या तरण्या पोरींसारख्या झीरो फिगर सौंदर्यासाठी डायट करू लागल्याने ऐन पावसाळ्यातही दुथडी भरून वाहत नाहीत. आता गावांना नद्याच नसल्याने पुलांची गरज राहिलेली नाही अन् शहरात दुथडी भरून बारोमास वाहणाऱ्या रस्त्यांना ओलांडण्यासाठी पुलांची गरज पडू लागली आहे. कधी काळी जिथे वृक्ष होते, आता तिथे अशा उड्डाणपुलांचे पिलर्स आहेत अन् त्यावर मग ऋतूंना भुलवण्यासाठी लोखंडी जाळ्यांमध्ये खास ब्रीडची झाडे लावली गेली आहेत. माणसांना हवी तितकी, तशीच वाढणारी, फुलं-फळं न येणारी झाडं शहरात लावली जातात. फळं-फुलं आली की मग पाखरंही येतात अन् त्यांच्या किलबिलाटाचा शहरातील वाहनांच्या आवाजांना त्रास होतो म्हणून मग शहरात मोठ्या इमारतींवर खास संशोधित केलेले वेल लावले जातात. त्यांना म्हणे पाणी कमी लागतं, मातीची गरज नसते अन् छानपैकी हिरवीदेखील असतात...

शहरातील जमिनी चौरस फुटांनी मोजल्या जातात आणि तशाच त्या विकल्याही जातात. जमिनींची किंमत माणसांच्या अन्नाच्या भुकांपेक्षा कित्येक पटींनी वाढल्यामुळे आजकाल त्या जमिनीवर घाम नाही, तर रक्त सांडतं. मुख्य म्हणजे जमिनीचा जामीन नाकारून आभाळाकडे बघता येत नाही. शहर सतत भूक शांत करण्यासाठी धडपडत असते आणि अशा अवस्थेत कुणाशी नाते जोडता येत नाही. नाते जोडण्यासाठी गरज संपवावी लागते आणि भूक तर सतत स्वत:शी बांधून ठेवते. म्हणून आजकाल ‘भूक भागवण्याचा कलेशी संबंध जोडणारे’ बंजाऱ्यांचे काफिले शहर टाळून गावाकडे वळतात.

शहरांचे मात्र वेगळे असते. शहरात जेवढी जमीन असेल तेवढे आभाळ नसते. सिमेंटच्या जंगलाने आभाळ गिळून टाकलेले असते. खरं तर ऋतूंचे येणे हे माणसाच्या जगण्याच्या शैलीवर अवलंबून असते. शहरांतील माणसांची जगण्याची शैली साहसी असू शकते; पण संयमी आणि शालीन असणे शक्य नसते. शहरात येताना गावाच्या शिवेवर घोड्याची नाल उलटी ठोकून येतात. तशी पद्धत आहे.

इथे अस्तावर सूर्य उगवत नाही, कारण या शहरात ऋतू नसतात. ऋतू नसतात; कारण पहाट नसते, आकाश नसते. पानांचे डोळे आणि फुलांच्या पापण्या नसतात आणि क्षितिजही नसते. शहरी खुराड्यांच्या खिडकीतून जेवढे आकाश दिसते, त्याला आभाळाचे कुठलेच संदर्भ नसतात. बुढीचे खाटले, शुक्राची चांदणी, पावसापूर्वी गारवा आलेला ढग, अस्ताच्या सूर्याच्या डोळ्यांमधील मस्तीची नशा, संध्याकाळच्या सावल्या, अंगावरील शेवंतीचा सुगंध असे काहीच नसते. खुराड्यातल्या या आभाळाला उगवती आणि मावळतीचे रंगही नसतात. असे रंग असायला आभाळाची पाटी कोरी असावी लागते. शहरात आलेली ही पाखरे, मग काही दिवसांनी आभाळाकडे बघू शकणारे ऋतुपूर्ण डोळेही गमावून बसतात...

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com