पुतळा...

माणसाचा मृत्यू झाला की मग तो हवाच होता असे वाटत राहते. आयुष्यभर तंटणारी सूनही सासू गेल्यावर ‘सासूबाई हव्याच होत्या...’ असे म्हणत टिपं गाळत असते.
Human Death
Human DeathSakal
Summary

माणसाचा मृत्यू झाला की मग तो हवाच होता असे वाटत राहते. आयुष्यभर तंटणारी सूनही सासू गेल्यावर ‘सासूबाई हव्याच होत्या...’ असे म्हणत टिपं गाळत असते.

माणसाचा मृत्यू झाला की मग तो हवाच होता असे वाटत राहते. आयुष्यभर तंटणारी सूनही सासू गेल्यावर ‘सासूबाई हव्याच होत्या...’ असे म्हणत टिपं गाळत असते. नेणिवेच्या मनात आपण आपल्या ज्येष्ठांचे अन् स्वत:सकट साऱ्यांचेच मरणे गृहीतच धरलेले असते. आपल्या जगण्याच्या गृहीत सीमारेषेच्या पलीकडचे दीर्घ आयुष्य जगणाऱ्याचे मरण ही केवळ एक दुखवट्याची औपचारिकता असते.

त्याचे वडील काही वर्षे अंथरुणालाच खिळले होते. ते गेले. जन्मदाता गेल्याचे दु:ख तर होणारच. तरीही ‘एक दीर्घ, संपन्न, यशस्वी आयुष्य जगून ते गेले. नातवंडं पाहिली, नातसुनाही पाहिल्या,’ असे समाधान व्यक्त करण्यात येत होते रडता रडता... ते गेले. अगदी नव्वदी पार करून गेले. त्यांच्या उद्योगातील कर्मचाऱ्यांपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या स्वयंप्रेरित उद्योगपती असण्याचे, शून्यातून हे विश्व निर्माण केल्याचे, रंकाचा कोट्यधीश झाल्याचे प्रभावक्षेत्र मोठे होते. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत दुखवटा पाळला गेला. तुमच्या समाजाला असलेल्या गरजांचा परीघ जेवढा मोठा किंवा समाजाच्या गरजा तुमच्याकडून भागू शकतात त्याची व्याप्ती जितकी मोठी, तितकी तुमच्या जाण्याची पोकळी अधिक मोठी असते. त्यांच्या कुटुंबाकडून गरजपूर्तीची अपेक्षा आता त्याच्या पुढच्या पिढीकडे वारशाने आलेली. त्यांच्या मुलाने त्यांचा हा औद्योगिक व्याप चांगला सांभाळला. इतकेच नव्हे, तर त्याने तो त्याही पुढे नेलेला. भाईजींच्या एकसष्ठीचा कार्यक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला होता आणि त्याच कार्यक्रमात भाईजींनी आपल्या मुलाला त्या उद्योगसमूहाचा अध्यक्ष घोषित केले. निवृत्ती जाहीर केली. तरीही भाईजींचे मार्गदर्शन होतेच. गेल्या आठ-दहा वर्षांत भाईजींनी मुख्य कार्यालयात समारंभांनाही येणे बंद केले होते.

भाईजींच्या जाण्याचे दु:ख सर्वच कर्मचाऱ्यांनी केले. स्मरणिका काढली गेली. मोठमोठ्या लोकांनी दुखवटे जाहीर केले. मग भाईजींचा पुतळा त्या उद्योगसमूहाच्या मुख्य कार्यालयात बसवावा, असा प्रस्ताव कर्मचाऱ्यांनीच ठेवला होता. त्यासाठी आपले एक दिवसाचे वेतनही देऊ केले होते, आग्रही स्वेच्छेने...

पूर्णाकृती पुतळा बसवला गेला. संस्थेच्या भव्य आणि श्रीमंती कार्यालयांतील प्रवेशद्वाराजवळच्या स्वागतकक्षातच हा पुतळा बसवला गेला. मेणाच्या पुतळ्यासारखाच दिसणारा हा कुठल्या तरी खास सामग्रीने बनवलेला पुतळा अगदी जिवंत वाटत होता. डावा हात कमरेवर आणि उजवा हात पुढ्यात करून बोलण्याच्या भाईजींच्या शैलीतला हा पुतळा होता. धोतर, मनिला, त्यावर कोट आणि गांधी टोपी असा वेश... भाईजी आता आपल्याशी बोलतील की काय, असे वाटावा असाच. पुतळा प्रतिष्ठापनेनंतर त्या मूर्तिकाराच्या कौशल्याची तारीफ दरवळत राहिली. म्हणजे त्यात प्राण फुंकले कुणी तर भाईजींचा पुनर्जन्मच होईल असे साऱ्याच कर्मचाऱ्यांना वाटत राहिले...

माणूस मरण पावला की मग तो हवाच होता असे वाटत राहते. (कारण आता तो काहीही झाले तरीही परत येणार नाही हे माहिती असते.) आयुष्यभर तंटणारी सूनही सासू गेल्यावर ‘सासूबाई हव्याच होत्या...’, असे म्हणत टिपं गाळत असते. नेणिवेच्या मनात आपण आपल्या ज्येष्ठांचे अन् स्वत:सकट साऱ्यांचेच मरणे गृहितच धरलेले असते. आपल्या जगण्याच्या गृहित सीमारेषेच्या पलीकडचे दीर्घ आयुष्य जगणाऱ्याचे मरण ही केवळ एक दुखवट्याची औपचारिकता असते. ‘अरे! गेले का...’ इतकेच काय ते.

भाईजींचे तसे नव्हते... पुतळा स्थापनेला एक आठवडा झाला अन् मग भाईजींचा तो पुतळा अंगावर आल्यागत वाटू लागला सर्वच कर्मचाऱ्यांना. भाईजींनी इतके मोठे औद्योगिक साम्राज्य उभारले ते त्यांच्या जिद्द, निष्ठा यामुळेच; पण त्यात अनेकांचा घाम वांझोटाच जिरला होता. भाईजी चतुर, चलाख असायलाच हवेत तितके होते. त्यापुढची पायरी ही कपटाची असते. राजकारणात जसे कपटालाच कौशल्य म्हणतात, तसेच ते कार्पोरेटमध्येही कौशल्यच असते. भाईजींमध्ये हे कौशल्य होते. अतिरेकी शिस्तीमुळे कर्मचारी काची पडल्यागत होत. आपल्या सोबत न्याय नाही झाला किंवा सापत्न वागणूक मिळाली असे वाटणारे होते. त्यांच्या आर्थिक शिस्तीचे (कंजूषपणा) चटके बसलेलेही बरेच होते... साऱ्याच कर्मचाऱ्यांना भाईजींचा तो पुतळा पुन:पुन्हा काही जखमांचे व्रण ताजे करणारा होत गेला. एखादा कर्मचारी थोडा उशिराने आला, की भाईजींचा पुतळा त्यांना ‘काय, वेळ नाही पाळता येत का?’ असे विचारतोय असे वाटे. प्रत्येकाची आपली काम करण्याची एक पद्धत असते.

९९ टक्के कर्मचारी हे काम करण्यासाठीच आलेले असतात. एखाद् दुसराच हलगर्जी असतो. भाईजींना सगळ्यांनी त्याच्याच पद्धतीने एकसुरी काम करावे असे वाटे. त्या वेळी त्यांचे बोलणे धारदार सुई कानात खुपसावी असेच. काम करताना बाजूच्या सहकाऱ्यांशी बोललेलेही त्यांना आवडत नसे. सीसीटीव्ही नसतानाही त्यांचे बारीक लक्ष असे अन् मग आपल्या सहकाऱ्याशी अंमळ विरंगुळा म्हणून अल्पवेळ अनौपचारिक चर्चा केली तरीही तो गुन्हा होता त्या कार्यालयात. हसणे वगैरे तर फार दूरची गोष्ट होती... आता चुकून हसऱ्या चेहऱ्यानेही कार्यालयात प्रवेश घेणाऱ्या कर्मचाऱ्याला भाईजींचा तो जिवंत पुतळा म्हणजे सणसणीत चपराक वाटू लागला... कुजबुज वाढत गेली; मात्र मालकाला सांगणार कोण?सरव्यवस्थापकांपर्यंत ही कुजबुज पोहोचली. त्यांनाही नेमके तेच वाटत होते. त्यांनी मग भाईजींच्या मुलाला, बाबूजींना ते सांगितले. बाबूजींनी आश्चर्यकारकरीत्या ती बाब समजून घेतली अन् आदेश दिले, ‘‘ठीक है, मेरे कक्ष में स्थानांतरित करो बाबूजी को...’’

आता तो पुतळा त्यांच्या मुलाच्या अगदी डोळ्यासमोर होता, पूर्ण कार्यालयीन वेळेत. चार-आठ दिवस छान वाटले, की भाईजी आपल्या सोबत आहेत. काही अडले तर त्यांचा पुतळा प्रेरणा देईल... भाईजींच्या उद्योग संचालनाची नीती जुनाट होती, ती अमेरिकेत व्यवस्थापनाचे शिक्षण घेऊन आलेल्या त्यांच्या या ज्येष्ठ व एकमेव पुत्राला काहीअंशी पटत नव्हती; मात्र भाईजी आग्रही असायचे. उद्योगाच्या बदलत्या सूत्रानुसार काही गोष्टी करणे आवश्यक असायचे अन् भाईजींना ही लेन देन नको, म्हणून बाबूजींना कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला लावायचे... बाबूजींचे कधी कधी मालकपण सोडून कर्मचाऱ्यांशी मित्रासारखे वागणे आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही, असे भाईजींना वाटायचे. पूर्ण कारभार आता बाबूजीला सोपवला अशी घोषणा केल्यावरही भाईजी अदृष्यपणे मागे बसून संचालन करायचे. निर्णय घेण्याआधी त्यांची मंजुरी आवश्यक असायची. तसे नाही केले तर निर्णय घेतला, की त्यांना नेमके ते कळायचे. कसे? त्यांची खास माणसे पाळत ठेवतात आपल्यावर असे बाबूजीला वाटायचे.

आता भाईजी गेल्यावर तो पुतळा समोर असल्याने, आपल्या पद्धतीचे निर्णय घेताना, ‘ये क्या कर रहा... हम हमारे बाप के सामने सर उंचा करके बात नही कर सकते थे चेअरमन होने के बाद भी!’ असे भाईजी म्हणतील, असे बाबूजींना वाटू लागले. त्यांचाही जीव काची पडला. अवघडलेपण वाटू लागले. नेमके कर्मचाऱ्यांना काय वाटत असेल हे त्यांना कळले. त्यांनी जीएमला बोलावले. ‘‘बाबूजी के लिए कांच की पेटी बनाव और मेरे पिछे जो लकडे की अलमारी बनी है, उस में रख दो...’’ असे बाबूजी म्हणाले. जीएमने आश्चर्याने पाहिले. बाबूजी म्हणाले, ‘‘बाहर यह पुतला खराब हो जाएगा हवा के कारण...’’ जीएमनी ‘हवा का रुख’ ओळखला. भाईजी काचेच्या पेटीत बंद झाले. हळूच त्या पेटीवर एक छान तलम अपारदर्शक पडदा घातला गेला... काळाचाच पडदा होता तो!

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com