‘ऐसा हुवा होगा...’

गेल्या काही दिवसांत मात्र मिळकत आणि खर्च यांची तफावत वाढत गेली होती. कुठल्या गरजा वाढल्या का? तर त्याचेही उत्तर ‘नाही’ असेच होते.
Shyam Pethkar writes Petrol gas cylinder prices hike due non-observance of Dharma
Shyam Pethkar writes Petrol gas cylinder prices hike due non-observance of Dharmasakal
Summary

तो रिक्षाचालक. त्याला वाटले अग्नीदिनाला ऊर्जा देवतेची पूजा नीट केली नाही, त्यामुळे पेट्रोलचे भाव वाढले. गॅस सिलिंडरही परवडेनासे झाले... कर्जावर घेतलेल्या रिक्षाचे मासिक हप्तेही अचानक वाढले. हे सारे तो देवभक्तीशी जोडत होता. नोकरीच्या शोधात बाहेर पडला. तेव्हा त्याला कळले, की अनेकांनी धर्मपालन केले नाही म्हणून अनेकांवर ही आपत्ती ओढवली आहे... यात आपली काहीही चूक नाही...

आजवर त्याचे चांगले चालले होते. श्रीमंत नसला तरी कुणापुढे हात पसरावा लागत नव्हता. थोडा कधी पोटाला चिमटा अन् पोराबाळांना थोडे मन मारावे लागत होते, इतकेच... अलीकडच्या काळात मात्र मिळकत तीच होती. तरीही काही तरी बिनसत चालले होते. तो ऑटोरिक्षा चालवायचा. महिन्याला दहा-पंधरा हजार रुपये मिळायचे. त्यात त्याच्या कुटुंबाचे भागायचे. गेल्या काही दिवसांत मात्र मिळकत आणि खर्च यांची तफावत वाढत गेली होती. कुठल्या गरजा वाढल्या का? तर त्याचेही उत्तर ‘नाही’ असेच होते.

तसा तो बऱ्यापैकी मेंदूचे ऐकणारा, तरीही त्याने आपल्या पुरोहितांना विचारूनच घेतले. कुलदेवतेचे करण्यात काही चूक झाली का? त्यांनी सांगितले तेही उपाय करून झाले. आधीच परवडत नसताना त्या कर्मकांडाचा खर्चही अंगावर बसला. गावी गेला तर वडील म्हणाले, मारुतीला मध्यरात्री एकवीस प्रदक्षिणा घाल, कुणीही न टोकता हे काम कर म्हणजे तुझ्या सगळ्या समस्या तात्काळ सुटतील... त्याने तसेही करून पाहिले होते. गावाकडून परतत असताना बसमध्ये बसायला जागा मिळावी,पण ही साधी इच्छाही शहर येईपर्यंत पूर्ण झाली नाही...

मिळकत तीच होती. पेट्रोलसाठी दर महिन्याला काढून ठेवलेले पैसे पुरत नव्हते. का? मग त्याच्या लक्षात आले, अग्नीदिनाला आपण ऊर्जा देवतेची पूजा नीट केली नाही. त्यामुळे पेट्रोलचे भाव वाढले. धर्मबुडवेच आपण. त्याचेच हे फळ, की गॅस सिलिंडरही परवडेनासे झाले... रिक्षा बँकेच्या कर्जावर घेतलेली. त्याचे मासिक हप्तेही अचानक वाढले... महालक्ष्मीचे पूजन यथासांग केले नाही, त्याचे हे फळ. कर्ज वाढलेच अन् त्याच्यावरचे व्याजही वाढले. दोन महिने बँकेचे हप्ते भरणेच झाले नाही. कसे करणार? खाद्य तेल महिन्याला दोन लिटर लागायचे, आता एक लिटरचाच भाव इतका वाढला, की आधी तितक्याच भावात दोन लिटर खाद्य तेल यायचे. मग त्यांनी एक लिटरच तेल महिनाभर पुरवणे सुरू केले. हा सारा शनीदेवाचा प्रकोप आहे हे त्याला वाटले. शनीशिंगणापुरात घरांची दारे उघडी असतात कारण तिथे कुणी चोरी करूच शकत नाही, यावर तो हसला होता.

ही सगळी काटकसर करून अन् केलेल्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून त्याने पूजा करून केली, पण त्याचे आर्थिक गणित काही केल्या जुळत नव्हते. त्याच्या भावाची नोकरी गेली. आता काहीच भागेना म्हणून मग त्याने त्याचे कुटुंब त्याच्या बेरोजगार झालेल्या भावासह गावी पाठवले. (आता ते तिकडे गेल्यावर त्यांचे काय होईल हा प्रश्न होताच; पण जे काय व्हायचे ते आपल्या परोक्ष होईल.) किरायाचे ते घर आता परवडत नव्हते म्हणून त्याने तिकडे वस्तीत एक पडकी खोली घेतली किरायाने.....

त्याने नोकरी शोधून पाहिली. तेव्हा त्याला कळले, की देशात बेरोजगारी वाढली आहे. म्हणजे आपणच काही केवळ धर्मबुडवे नाही, तर अनेकांनी धर्मपालन केले नाही म्हणून अनेकांवर ही आपत्ती ओढवली आहे... नोकरी किंवा काम शोधताना भूक लागली, तहान लागली... पैसे नव्हतेच. पाणीही विकत मिळू लागले आपल्या देशात, हे त्याला तेव्हा कळले. फिरता फिरता तो अनेकांशी बोलत होता. त्यात त्याला कळू लागले, की हे जे काय आपल्या सोबत होते आहे ते तसेच अनेकांच्या बाबत घडते आहे आणि यात आपली काहीही चूक नाही. ‘त्यांची’ चूक आहे. त्यांना आपण त्यासाठीच नेमले होते. आता त्यांच्या अस्तनींना हात घातला पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे... अनेकांच्या मनाची ही तयारी झालेली...

तो त्याच्या खोपटात आला. येताना टीव्हीच्या दुकानापाशी थांबला. आयपीएलच्या मॅचेस सुरू होत्या. दुकानाच्या काचेतून त्याने मॅच पाहिली. भूक-तहान विसरला. आता ‘त्यांच्या’ लक्षात आले होते, की चूक आपलीच आहे हे लोकांना कळू लागले आहे. काही केले पाहिजे... त्यांनी मग क्रिकेटला धर्म अन् धर्माचा खेळ सुरू केला.

तो त्याच्या खोपटात आला. भुकेने तळमळत होता. ‘त्यांची’ कॉलर पकडायची आहे, जाब विचारायचा आहे... अजानचा आवाज ऐकू येऊ लागला, मग टाळ, मृदंग अन् घंट्यांचा घणघणाट सुरू झाला. ते दिवसातले पाच प्रहर अल्लाच्या नावाने कल्ला करतात, आपणही आपल्या परमेश्वराचा आवाज केला पाहिजे, असे ‘ते’ सांगू लागले. ‘आव्वाज कुणाचा?’ असे जोरात विचारले जाऊ लागले. सगळ्याच प्रार्थनास्थळांमधून गोंगाट सुरू झाला. बाकीच्यांनी आक्रमण आणि अतिक्रमण केले आहे, आताच त्यांना रोखले नाही तर आपणच आपल्या देशात परके होऊ. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी इतरांचेच लाड केले. आपण उपेक्षित, उपोषित आणि कुपोषित... आपले हक्क ते हिरावून नेतात. प्रार्थनास्थळांमधून आवाज वाढत गेला. अजाण, आरती, धम्मपद, येशूची प्रार्थना... असे सगळेच ऐकू यायला लागले. उपाशीपोटी त्याचे बाहू फुरफुरले. आपला धर्म बुडवायला निघालेल्यांना धडा शिकवलाच पाहिजे... तो भूक विसरला, बेकारी विसरला, तहान विसरला... आपण कुणाची कॉलर पकडणार होतो, हेही विसरला अन् इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळातून येणारा आवाज कायमचा बंद करण्यासाठी धडपडून उठला. दोनचार दिवसांचा तो उपाशी असल्याने त्याला ही ऊर्मी पेलवली नाही. तो कोसळला. कायमचा, कधीही न उठण्यासाठी!

त्याच्या प्रेताचा वास सुटल्यावर ‘ते’ आले. ते त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, किमान मतदान होईपर्यंत तरी वाचवायचे होते ना त्याला...

कई दिनों के फाकें बीता कर मर मया वो

अब सब कहतें है, ऐसा हूवा नही, ऐसा हूवा होगा...

उपवासाने तो मेला अशी वार्ता पसरू लागली. ते धोक्याचे होते. मग तो कसा अखेरच्या क्षणी आपल्या देवतेचा जयघोष करत होता अन् इतरांच्या प्रार्थनास्थळांमधून जे ध्वनिप्रदूषण होते, ते बंद करण्यासाठी तो उठला होता अन् म्हणून परधर्मीयांनीच त्याला मारला, असा ठाम निष्कर्ष काढून तो त्यांच्या कुजबुज यंत्रणेमार्फत पसरवण्यात आला. मग दंगल उसळली. त्याच्या अन् त्याच्यासारख्या भुकेल्यांच्या भुकेचा आवाज त्यात दबून गेला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com