झाडं अन्‌ शहाणी माणसं

शहाणे जे जे काय म्हणून आहे ते चालत नाही, लोकांना सोसत नाही. जगाला शहाणपण शिकविणारे नको असते. तितकेच निमूटपणे स्वत:च शहाणपणाने वागणारेही नको असतात.
Tree
TreeSakal
Summary

शहाणे जे जे काय म्हणून आहे ते चालत नाही, लोकांना सोसत नाही. जगाला शहाणपण शिकविणारे नको असते. तितकेच निमूटपणे स्वत:च शहाणपणाने वागणारेही नको असतात.

झाडं शहाणी असतातच; पण आता झाडांच्या सावलीत वाढलेली काही माणसंही शहाणी झाली आहेत. वंशवृक्ष वाढावा म्हणून मुलगाच हवा, यासाठी अट्टहास करण्यापेक्षा वृक्षच लावून पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्राणवायूची सोय करून ठेवता येते. झाडं लावण्याच्या आणि ते जगवण्याच्या वेगवेगळ्या संकल्पना काही मित्र समाजात रुजवत आहेत. त्या शहाण्या मित्रांबद्दल...

शहाणे जे जे काय म्हणून आहे ते चालत नाही, लोकांना सोसत नाही. जगाला शहाणपण शिकविणारे नको असते. तितकेच निमूटपणे स्वत:च शहाणपणाने वागणारेही नको असतात. माणसांचे कसे असते की, त्यांना प्रत्यक्ष दृश्‍यमान अशा फांद्या, पाने, मूळे असत नाहीत अन् म्हणूनच दिसण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही; तरीही माणसांच्या श्रेय अहंकाराची मुळे खूप खोलवर रुतलेली असतात. त्याच्या वंश, रक्त, वर्ण, वर्चस्वाच्या फांद्यांचा खूप विस्तार झालेला असतो अन् तोच एकुणातच मानवी अस्तित्वाच्या मूळावर उठलेला असतो. गरज, मोह अन् लोभाची पाने तर मोजता येणार नाहीत, इतकी असतात. त्यामुळे माणसांच्या जगात घटनांना चांगले-वाईट असे ठरविले जाते. माणसांना गुन्हेगार ठरविले जाते अन् त्याची शिक्षा दिली जाते. घटना कुठलीही असो, त्यासाठी कुणाला तरी सारखे जबाबदार ठरवत राहणे, हे माणसांचे रहाटगाडगे आहे...

माणसाने सहज सोपे असे काहीच ठेवले नाही. उरू दिले नाही. पुढच्या पिढ्यांना ते नैसर्गिक असे सहज सोपे पुरू दिलेले नाही... झाडे बेटी भलतीच शहाणी असतात अन् प्रामाणिकही. ती सहज उगवतात आणि वाढतात, गावात आणि गावाबाहेरही... त्यासाठी मानवी असे काही प्रयत्न आजवर करावे लागलेले नाहीत. ज्यासाठी मानवी प्रयत्न नाही किंवा ज्याचे श्रेय / जबाबदारी कुणावर टाकता येत नाही, ज्यासाठी शिक्षा / बक्षीस देता येत नाही, ते माणसांच्या गावीही नसते. त्याच्या जाणिवांच्या कक्षांमध्ये ते येतच नाही. माणसाच्या निसर्गाबद्दलच्या जाणिवा भरदुपारी त्याच्या पायाशी साकळलेल्या त्याच्या सावली इतक्याच संकुचित असतात. म्हणूनच झाडांचे असे त्याच्या श्रेयाविना वाढणे त्याने दुर्लक्षित केले. इतकेच नव्हे, तर त्याने परवानगी न घेता, त्याला श्रेय न देता वाढणाऱ्या झाडांची अत्यंत क्रूरपणे कत्तल केली. झाडे कापून सरपण केले, घरे बांधली, कोळसा केला, लगदा करून कागद केला, त्यांच्या विकासमार्गात (?) येणारी झाडे बिनदिक्कत आडवी केली.

अस्तित्व (एक्झिस्टन्स) आणि अभिव्यक्ती (एक्स्प्रेशन) यात खूप अंतर असते, हे माणसाला कधी कळलेच नाही. तो आपल्या अभिव्यक्तीलाच अंतिम सत्य समजत राहिला. तेच वास्तव आहे आणि म्हणून अस्तित्व आहे, असे मानत राहिला. एकमेकांचे मुडदे पाडत राहिला. एखाद्या बीजात वृक्ष दडलेला असतो, हे त्याला कळलेच नाही. ते ‘सत्’ आहे. अस्तित्व आहे. तुम्हाला दिसत नाही; पण बीजात वृक्ष आहे आणि तो वंश पुढे राखणार आहे खऱ्या अर्थाने... म्हणून अरविंद जगताप नावाच्या मित्राने त्याच्या वडिलांच्या एकाहत्तरीचा कृतज्ञता सोहळा त्यांची बीजतुला करून केला. झाडांचे शहाणपण कळलेली अन् ते मानवी अहंकार बाजूला सारून स्वीकारलेली ही माणसे आहेत. सयाजी शिंदे आणि अरविंदा... राज्यभरातून ७१ प्रकारच्या बिया मागवल्या. जैवविविधता टिकून राहावी यासाठी हा प्रयत्न... आता अरविंदाच्या वडिलांचे वजन किती भरले कळले नाही; मात्र ज्यांना बीजातील झाडे पाहता येतात त्यांचे वजन अफाटच असले पाहिजे. वंशवृक्ष वाढावा म्हणून मुलगाच हवा, यासाठी अट्टहास करण्यापेक्षा वृक्षच लावून पुढच्या अनेक वंशांना प्राणवायू देणे, वंशसातत्य टिकविण्यासाठी अगत्याचे. अरंविद जगतापने त्याच्या वडिलांची बीजतुला करून वडिलांना चिरंतन केले आहे. हे झाडांइतकेच शहाणपण आणि प्रामाणिकपण त्याच्यात झाडांच्या सहवासातूनच आलेले. आता त्याचे वडील झाडांसारखेच सहज वाढतील गावात आणि गावाबाहेरही...

आमच्या युवा चळवळीतील नंदू लुचे याने त्याला शिक्षक म्हणून मिळालेल्या आडगावीच्या नोकरीचे चीज केले. जंगल-झाडीतील गावात त्याला बोलायलाही कुणी भेटत नव्हते. मग तो झाडांशीच गप्पा मारायचा अन् त्याला कळले की झाडे बेटी बोलतातही. त्याने मग आपले हे मित्र वाढवायचे ठरविले अन् रोपांचे रोपण सुरू केले. नंदू मास्तरच्या या नव्याच येडपटपणाची टिंगलही झाली. ‘‘आपल्याले कायले झाडं लावा लागते, इतके वाढतेत का निस्ता तरास...’’, ‘‘कितीही कापा, बेटे पुन्हा पुन्हा वाढतेत झाडं, पाखराच्या विष्ठेतूनबी झाडं तयार होतेत ना...’’ असे सुनावले गेले. आपोआप वाढतात अन् अडचण करतात, अशीच झाडांबद्दलची भावना. पाखरांच्या विष्ठेतूनही झाडे जन्मतात, म्हणत झाडे कापली गेली अन् पाखरेही परागंदा झाली... नंदूने झाडे लावणे सुरू ठेवले. ज्याच्या हातात त्याने रोप दिले, त्याला शहाणपण आले. नंदू मास्तरची ही चळवळ इतकी फोफावली की मग नंदू मास्तर बदामाच्या झाडाचा लिलाव करायचा अन् ते झाड आपल्याला मिळावे म्हणून परिसरातील आठ-दहा गावांतील किमान दहा हजार लोक नंदू मास्तरच्या गावात जमायचे.

बरे, लिलाव कसला? तर बदामाचे झाड माझे, मी हजार झाडे लावीन... नाही, माझे. मी बाराशे झाडे लावीन... नंदूची त्या गावातून बदली होण्याच्या आधी लिलावात बदामाची २२०० झाडे लावण्याच्या बोलीवर दिले गेले होते...

झाडे बेटी भलतीच शहाणी असतात, हे खरे आहेच; पण आता झाडांच्या सावलीत वाढलेली काही माणसेही शहाणी झालली आहेत. सयाजी शिंदे, अरविंद जगताप, नंदू लुचेसारख्या वृक्षशहाण्या माणसांकडे पाहून वाटू लागलं आहे, की काही काही माणसेही बेटी भलतीच शहाणी असतात.

pethkar.shyamrao@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com