...तर पळता भुई थोडी होईल

Situation of corona in rural area
Situation of corona in rural area

ड्या आपला गावच बरा...म्हणत अनेकांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावाकडे धाव घेतली. कारण पहिल्या लाटेत सर्वात जास्त बाधित हे शहरी भागात होते. पण, दुसऱ्या लाटेचे चित्र वेगळं आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनानं रौद्र रुप धारण केलं आहे. हाच तो ग्रामीण भाग जिथे आरोग्य यंत्रणेचे 3/13 वाजले आहेत. तीन-चार गावं मिळून एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याचीही अवस्था रुग्णांपेक्षा गंभीर असते. कधी डॉक्टर असतो, तर प्रशिक्षित परिचारिकाच उपचार करतात. रुग्णाला साध्या उलट्या होत असेल आणि इंजेक्शनमुळे अंगाला थरकाप सुटला असेल तर सलाईन काढून घरी पाठविणारी हीच ग्रामीण आरोग्य यंत्रणा आहे. (हा प्रसंग माझ्यासोबत घडला आहे.)

एखादा रुग्ण गंभीर झाला असेल तर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात  नेल्यानंतर त्याच्यासाठी कुठलीही सुविधा नसते. त्याला दुसऱ्या दवाखान्यात न्या, असं सांगितलं जातं. गावात वेळेवर गाडी मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल, प्राथमिक आरोग्य केंद्राची अॅम्बुलन्स असते की. पण ते अॅम्बुलन्स कधीच कामात येत नाही. कधी त्याचा ड्रायव्हर नसतो, तर कधी गाडी खराब झालेली असते. गाडी मिळालीच तर रस्ते हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत. ज्या ठिकाणी पोहोचायला १५ मिनिटं लागतात, त्या ठिकाणी अर्ध्या तासात माणूस पोहोचतो. त्यातही रुग्ण नागपूरला न्यायचा झाला, तर वाटेत कधी तो दगावेल याचा नेम नसतो.

ग्रामीण भागात अशी दुरवस्था असताना कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहे. आज नागपूर जिल्ह्यात साडेपाच हजार कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यापैकी अर्धेच ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंग नावाचा प्रकार नसतोच. कारण शहरासारखे बेडरुम, किचन, हॉल अशी घराची व्यवस्था ग्रामीण भागात नसतेच. बिचारे एकाच खोलीत सर्व झोपतात.

त्यातच घरातील एका व्यक्तीला कोरोना झाला, तर अख्खं कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडते. आज नागपूर शहरात खाटांची संख्या अपुरी पडत आहे, तर ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाला कुठून खाटा मिळतील? कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना आम्ही मात्र कोरोनाच्या राजकारणात गुंतले आहोत.

केंद्रानं राज्याला इतकं दिलं, तर मग स्थिती अशी का? आम्ही इतकंच विचारू शकतो. पण, राजकारण बाजूला ठेवून आपल्या जिल्ह्याला कोरोनापासून कसं वाचविता येईल, याचा विचार आम्ही करू शकत नाही. कदाचित आम्हाला ते करायचं नसेल. सागांयचं इतकंच, की ग्रामीण भागात घरोघरी कोरोनाचे रुग्ण जर सापडायला लागले ना, तर सगळंच अवघड होऊन बसेल. अख्ख्या जगाची आरोग्य यंत्रणा कामाला लावली, तरी पळता भुई थोडी होईल. त्यामुळे राजकारण सोडा अन् आताच कोरोनाला आवर घाला...नाहीतर... काळ वाट पाहतोच आहे...
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com