आहारतज्ज्ञाच्या मदतीशिवाय घटविले वजन!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फिट - भूमी पेडणेकर, अभिनेत्री
माझे वजन खूप होते, ते कमी करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. परंतु, यासाठी मी कोणत्याही प्रकारे आहारतज्ज्ञाची मदत घेतली नाही. प्रथम मी साखर सोडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वर्कआउट आणि डाएटच्या मदतीने मी वजन कमी केले. यामध्ये मला माझ्या आईने खूप मदत केली. मी घरी केलेले पदार्थच खाते आणि इंटरनेटवर सर्च करून आपल्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ चांगले हे ठरवते. 

मी सकाळी उठल्यावर कोमट पाणी किंवा डिटॉक्स वॉटर घेते. त्यानंतर अर्धातासाने मी दूध आणि सूर्यफुलांच्या बिया खाते. जिमला जाण्याआधी मी २ अंड्याच्या पांढऱ्या भागाच्या ऑम्लेटसह गव्हाचा ब्रेड व सफरचंद किंवा पपई खाते. जिम झाल्यानंतर पाच अंड्यांचा पांढरा भाग खाते. दुपारच्या जेवणात दही किंवा ताक, २ चपात्या, भाजी आणि डाळ खाते. कधी तरी सॅण्डविच, ग्रील्ड चिकन, न्यूट्री नगेट्स खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यात मी सफरचंद, पपई, पेरू, पेर यांपैकी कोणतेही फळ खाते. तासाभरानंतर ग्रीन टी आणि बदाम किंवा अक्रोड घेते. त्यानंतर फळांचे किंवा भाज्यांचे सलाड खाते. रात्रीच्या जेवणात ब्राऊन राईस किंवा एका पोळीसोबत नॉनव्हेज खायचे असल्यास ग्रील्ड मासे किंवा चिकन खाते. कधी पनीर आणि उकडलेल्या भाज्या खाते. एवढे सगळे करत असताना प्रत्येक ५ दिवसानंतर मी चीट डे ठेवते, यामध्ये माझ्या आवडते पदार्थ मी खाते. 

व्यायामही महत्त्वाचा आहेच. यासाठी मी जिममध्ये जाऊन कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग करते. कार्डिओ आठवड्यातून तीन वेळा करते. या व्यतिरिक्त मी लिफ्टने जाण्याऐवजी पायऱ्यांनी चालत वर जाणे पसंत करते. जवळचेच अंतर असल्यास गाडीने न जाता पायी जाते. या सगळ्याची माझ्या व्यायामात मदतच होते. तुम्ही तुमच्या प्रत्येक कामासाठी हालचाल करीत असल्यास तुम्हाला कोणत्याही अन्य व्यायामाची फारशी मदत लागणार नाही. तहान लागल्यास जवळच पाण्याची बाटली घेऊन न ठेवता, स्वतःचे पाणी स्वतः उठून घेणे, अशा अनेक ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slim Fit bhumi pednekar maitrin supplement sakal pune today