पाणी प्या आणि जंक फूड टाळा

पूजा हेगडे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फिट - पूजा हेगडे, अभिनेत्री
एक अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळविण्याआधी मी मॉडेल होते. त्यामुळे शरीर फिट ठेवणे माझ्यासाठी आधीपासूनच गरजेचे होते. मी व्यायाम आणि डाएट या दोन्ही गोष्टींवर विश्‍वास ठेवते. जीमचे मला खूप व्यसन आहे, असे म्हणायला हरकत नाही. माझे ट्रेनर माझ्याकडून विविध प्रकारचे व्यायाम करून घेतात, त्यामुळे वर्कआऊट करतानाही मजा येते. मी आठवड्यातून ४ वेळा १ तास व्यायाम करते. यामध्ये मी ट्रेडमिलवर चालणे, कार्डिओ, वेट लिफ्टिंग 
यासारखे व्यायाम करते. कधीकधी मी ४५ मिनिटे किक बॉक्सिंगसारखे प्रकार करते. 

डाएटच्या बाबतीत प्रत्येक दोन तासांनी जेवण्याचा नियम मी पाळते. जेवणामध्ये तूप आणि खोबरेल तेलाचा अधिकाधिक वापर करते. मी स्वतःला ट्रीट देण्यासाठी चॉकलेटही खाते. योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि जंक फूड टाळणे, हाच तंदुरुस्त शरीराचा मंत्र आहे. त्यामुळे मी अनहेल्दी पदार्थ खाणे टाळते, तसेच किती प्रमाणात कॅलरीज माझ्या पोटात गेल्या, याचादेखील हिशेब ठेवते. 

वर्कआऊट झाल्यानंतर मी थोडी कॉफी घेते. सकाळच्या नाश्त्यामध्ये मी ज्यूस आणि टोस्टच्या स्लाइस खाते. तसेच बदाम आणि मोड आलेले धान्यही खाते. कामात व्यग्र नसल्यास दुपारच्या जेवणात मी भाजी आणि डाळीसोबत भात किंवा रोटी खाते. सोबत फळांचा ज्यूस पिते. कामात व्यग्र असल्यास मात्र ताजी फळे आणि घरगुती पद्धतीने बनविलेले शेक घेते. रात्रीच्या जेवणात मी हलके पदार्थ खाते, जे पचायलाही हलके असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: slim fit pooja hegde maitrin supplement sakal pune today