सोशल मीडियावरचं गाजलेलं... (प्रज्ञा माने)

प्रज्ञा माने healinghopes2016@gmail.com
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

सध्या माझ्याकडे वीस पॉक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस  ॲक्ट) केसेस आहेत. त्यातल्या काही केसेसचे निकाल न्यायपूर्वक लागले. काहींचे लागायचे बाकी आहेत. आज सतराव्या केसमधील ‘व्हिक्‍टिम’ची न्यायालयात हजेरी होती. मुलीला स्टेटमेंट द्यायचं होतं आणि नंतर ओळख परेड.
मुलीला मानसिक आणि शारीरिक दोन्हीदृष्ट्या सांभाळणं... ‘ट्रॉमा’वर काम करणं .... नंतर तिला तिच्या जबानीसाठी तयार करणं ... आणि मग कोर्टाच्या ‘तारीख पे तारीख’ला सामोरं जाताना त्या मुलीच्या अनेक भावनिक- मानसिक वादळांना सकारात्मकपणे शमवावं लागतं.

सध्या माझ्याकडे वीस पॉक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस  ॲक्ट) केसेस आहेत. त्यातल्या काही केसेसचे निकाल न्यायपूर्वक लागले. काहींचे लागायचे बाकी आहेत. आज सतराव्या केसमधील ‘व्हिक्‍टिम’ची न्यायालयात हजेरी होती. मुलीला स्टेटमेंट द्यायचं होतं आणि नंतर ओळख परेड.
मुलीला मानसिक आणि शारीरिक दोन्हीदृष्ट्या सांभाळणं... ‘ट्रॉमा’वर काम करणं .... नंतर तिला तिच्या जबानीसाठी तयार करणं ... आणि मग कोर्टाच्या ‘तारीख पे तारीख’ला सामोरं जाताना त्या मुलीच्या अनेक भावनिक- मानसिक वादळांना सकारात्मकपणे शमवावं लागतं.

आणि हे सगळं करताना तिचं कोवळं वय, नको त्या लहान वयात आलेली मॅच्युरिटी, स्वतःच्या शरीराबद्दलची वाटणारी घृणा आणि तिने स्वतःवर लादलेलं ‘गिल्ट’, ‘सेल्फ ब्लेमिंग’..... हे सगळं आळीपाळीनं पाहायला लागतं. ही पूर्ण प्रोसेस खूप दमवणारी असते... कधीकधी आपल्यालाच नैराश्‍यात टाकणारी असते. सिग्मंड फ्रॉइडच्या ‘सेक्‍स’ आणि ‘ॲग्रेशन’चा सिद्धांत पुनःपुन्हा सिद्ध करणाऱ्या या आठ-दहा वर्षांच्या मुलींच्या केसेस सुन्न करून जातात.
केस चालू असताना आणखी दडपण असतं. मुलगी घाबरून बोलली नाही तर...? ‘डिफेन्स लॉयर’ने उलटसुलट प्रश्न विचारल्यावर ती गोंधळली तर..? कसं करेल? काय होईल?......

या सगळ्यामध्ये मला अतिशय दिलासा वाटतो तो केस सांभाळणाऱ्या पोलिसांचा. आतापर्यंत माझा या केसेसबाबत ज्या-ज्या पोलिस काकांशी परिचय झाला... ते सगळेच खूपच सपोर्टिव्ह होते. त्या मुलीशी कसं आणि काय बोलायचं, यापेक्षा काय बोलायचं नाही... हे यथायोग्य जाणून होते. काळजी करणारे, काळजी घेणारे...प्रेमळ! वर्दीतली माणसं पाहिली की सहसा आपल्या काळजाचा ठोका चुकल्यासारखा होतो; पण, या केसेसना कोर्टात गेले, की मला पोलिसांना पाहून जे हायसं वाटतं, त्याला तोड नाही.

आजची गोष्ट... ‘पोग्गी’ला तिचं स्टेटमेंट घेणार म्हणून बोलवलं गेल्याची आज अकरावी वेळ. (पोग्गी हे मी ठेवलेलं नाव. पोग्गी- पोरगी-मुलगी!!!) कधी आरोपी आलाच नाही, कधी सरकारी वकील आले नाहीत, कधी न्यायाधीश नाहीत...अशा अनेक कारणांनी आम्ही परत गेलेलो. पोग्गीला बोलण्यासाठी तयार करायचं, काय प्रसंग घडला हे आठवायला लावायचं, तो विशिष्ट भाषेत बोलून घ्यायचा... आणि मग आज जबानी होणार नाही... पुन्हा आठवडाभराने तेच! यात त्या पोग्गीचं काय होत असेल... मानसिक नरकयातनाच त्या! पोग्गीने मला ‘‘दीदी, आज नाही झालं तर आपण परत यायचं नाही,’’ असं सांगून टाकलेलं. मला पोलिसांनी आज नक्की होणार, असं सांगितलं. आम्ही दोघी वाट पाहत पोलिसांसाठीच्या जागेत बसून होतो. दीड वाजल्यावर शांतपणे आमच्या डब्यातला एग राईस खाल्ला. पोग्गी तिच्या ओळखी-अनोळखी सगळ्या पोलिस काकांना एक-एक घास त्यांच्या त्यांच्या ताटात देऊन आली. कोणाची पोळी, चपाती-भाजी, पोहेही खाल्ले. तिचे आवडते काका मात्र उपवासावर होते. ते एकटे शांत दरवाजासमोर उभे होते. माणूस ५२-६४ वर्षांचा होता. उंच- धिप्पाड- डोंगरासारखा. पोग्गी त्यांनी एक तरी घास खावा, म्हणून सारखी त्यांना विनवत होती. ‘‘एक घास खा’’, ‘‘देव थोडी ओरडणार आहे!’’ अशी कॉमेंट्री! मग तरीही त्यांनी नाही खाल्लं... म्हणून ती फुगली त्यांच्यावर! (मागच्या भेटीत इतका हक्क तिने कमावला होता!)

लंचनंतर पहिलीच केस आमची होती. त्या पोलिस काकांनी वर बघून देवाला नमस्कार केला आणि ‘नीट बोल हं बाळा! सगळं खरं सांग, घाबरू नको,’ असं हसून सांगितलं. पोग्गी खूप धीराने बोलली. सुमारे पाऊण तासांनी आम्ही बाहेर आलो. तेव्हा पोग्गी रडत होती... पण शांतपणे... मोठ्या माणसासारखी. सगळ्यांनी पोग्गीचं कौतुक केलं. कोणी चॉकलेट दिलं. आम्ही दोघी निघालो. कोर्टाच्या खाली आल्यावर तिची पाण्याची बाटली राहिल्याचं लक्षात आलं. आम्ही परत वर गेलो. त्याच सगळ्या पोलिस काकांच्या खोलीत, तर हे लाडके काका डबा खात बसलेले. बाटली राहिली बाजूला... ही पोग्गी आजी असल्यासारखी डाफरली त्यांच्यावर. ‘मी मगाशी केवढं सांगितलं ... खाल्लं का नाही?’ जाब विचारायला लागली. बाजूला बसलेल्या काकांनी सांगितलं, ‘‘मंगेशीला बोललेलो सकाळी... ती पोर नीट बोलू दे... मग घेईन घास घशाखाली.’’ मला डोळ्यांला धार लागली. तेवढ्यात पोग्गीने डब्बा उघडला आणि म्हणाली ... ‘‘हे घ्या... चांगला झालाय आमचा एग राइस’’..... पोग्गीने खरंच त्यांच्यासाठी घास राखून ठेवला होता.
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत.)

Web Title: social media article write on pradnya mane