लोकसहकार्याचं दशक

‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू; या माध्यमातून आत्तापर्यंत झालेल्या कामाचा वेध...
social work done by Sakal Social Foundation Social for Action work done list
social work done by Sakal Social Foundation Social for Action work done list
Summary

‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू; या माध्यमातून आत्तापर्यंत झालेल्या कामाचा वेध...

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला. या माध्यमातून आत्तापर्यंत झालेल्या कामाचा वेध...

‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानांतर्गत आतापर्यंत दहा स्वयंसेवी संस्थांचं अभियान यशस्वीपणे राबवून पूर्ण करण्यात आलं असून, स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांसाठी क्राउड फंडिंगद्वारे जमा झालेला निधी त्या-त्या संस्थांना वर्ग केला आहे. त्यातील काही संस्थांच्या कामाचा थोडक्यात आढावा.

देवता लाइफ फाउंडेशन

बारा वर्षांखालील कर्करोगग्रस्त बालकांना औषधं व उपचारांकरिता दत्तक घेऊन, अशा मुलांना कर्करोगमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नागपूर येथील ‘देवता लाइफ फाउंडेशन’ या संस्थेची माहिती देण्यात आली, संस्थेने दत्तक घेतलेल्या कर्करोगग्रस्त बारा मुलांच्या उपचारांकरिता मदतीसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसंच, मिळालेला निधी संस्थेला वर्ग करण्यात आला आहे.

हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड

दिव्यांगांना समाजात सन्मानपूर्वक जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी त्यांना सक्षम केलं पाहिजे, तसंच त्यांचं शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, वैवाहिक सर्वांगीण पुनर्वसन करण्यासाठी त्यांना जीवनावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. या उद्देशाने प्रेरित होऊन, अपंगांच्या व दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी गेली ३७ वर्षं अखंडितपणे कार्य करणाऱ्या कोल्हापूरमधील ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ या संस्थेची माहिती प्रसिद्ध करून, अनेक गुणवंत दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व संस्थेला भौतिक साधनांसाठी, संगणक कक्षासाठी, इतर उपकरणांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसंच, मिळालेला निधी संस्थेला संगणक साहित्यासाठी वर्ग करण्यात आला आहे.

यशोधन ट्रस्ट

सातारा रोडवरील वाई येथील अनाथ व मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या ‘यशोधन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेबद्दल समाजभान सदरात माहिती प्रसिद्ध केली होती. निराधार-बेघर व मनोरुग्णांची आरोग्यतपासणी व औषध-उपचारांच्या वार्षिक खर्चासाठी व नवीन आश्रम इमारत बांधकामाकरिता ‘यशोधन ट्रस्ट’ संस्थेच्या मदतीसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसंच, मिळालेला निधी संस्थेला वर्ग करण्यात आला आहे. आश्रमाच्या नवीन इमारतीचं बांधकामदेखील पूर्ण झालं आहे. संस्थेत सातत्याने नवीन निराधार-बेघर व मनोरुग्णांची भरती होत असते, त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी, औषध-उपचारांसाठी व जेवण आणि इतर सुविधांच्या वार्षिक खर्चासाठी संस्थेला मदतीची कायम गरज आहे.

प्रार्थना फाउंडेशन

सोलापूर जिल्ह्यातील मोरवंची येथे गरीब, कमी उत्पन्न गटातील, तसंच निराधार, बेघर व भिक्षेकरी मुलांसाठी ‘प्रार्थना फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘वंचितांची शाळा - एक पाऊल प्रगतीकडे’ हा प्रकल्प चालविणाऱ्या अनंतअम्मा कृष्णय्यान व प्रसाद मोहिते या तरुण दाम्पत्याविषयी माहिती दिली होती. ‘वंचितांची शाळा - एक पाऊल प्रगतीकडे’ या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावरची बेघर आणि निराधार ३०० मुलं-मुली आणि वृद्धांसाठी ‘प्रार्थना बालग्राम’ या निवासी प्रकल्पाच्या इमारत बांधकामासाठी ‘प्रार्थना फाउंडेशन’ संस्थेच्या मदतीसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये पुण्यातील प्रवीण मसालेवाले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून सीएसआरअंतर्गत बहुमूल्य मदत करण्यात आली होती. तसंच, मिळालेला निधी संस्थेला वर्ग करण्यात आला आहे. ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या व अनेक देणगीदारांच्या माध्यमातून ‘प्रार्थना बालग्राम’ प्रकल्पाच्या वसतिगृहाच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असून, वृद्धाश्रमाचं बांधकाम सुरू आहे. याकरिता संस्थेला मदतीची गरज आहे.

माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका या आदिवासीबहुल परिसरात महिला सशक्तीकरण, रोजगाराभिमुख कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण आणि महिला व कुटुंबाचं राहणीमान उंचाविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेच्या ‘उषा शिलाई स्कूल’ उपक्रमाची माहिती प्रसिद्ध करून, साक्री परिसर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरजू महिलांना टेलरिंग व शिलाईचं प्रशिक्षण देण्याकरिता व महिलांना स्वतःचा टेलरिंग व शिलाईचा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी ‘माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान’ या संस्थेला शिलाई मशिन व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. आवाहनास रोटरी क्लब, धुळे क्रॉसरोड यांनी प्रतिसाद देऊन, संस्थेला उषा कंपनीच्या दहा शिलाई मशिन व एक पिको फॉल मशिन अशी अकरा मशिन भेट दिल्या आहेत.

माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका या दुष्काळग्रस्त परिसरात परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. संजीवनी केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी एकत्र येऊन महिलांची, महिला व तिच्या कुटुंबाच्या विकासासाठी ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही संस्था व एक चळवळ सुरू केली. संस्थेअंतर्गत ग्रामीण भागातील कमी उत्पन्न गटातील मुलांसाठी उत्कर्ष विद्यालय चालविण्यात येतं. ही शाळा दहावीपर्यंत असून, शाळेतील विद्यार्थिसंख्या एक हजारहून अधिक आहे. शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृहाची पुरेशी सोय नव्हती, त्यामुळे ‘सोशल फॉर अॅक्शन’च्या माध्यमातून संस्थेचं अभियान राबविण्यात आलं. या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पुण्यातील देसाई ब्रदर्स लिमिटेड यांच्या सीएसआर निधीतून स्वच्छतागृहाचं बांधकाम प्रगतिपथावर आहे.

माहेर

निराधार मुलांसाठी व मानसिक विकलांग महिलांसाठी आधार ठरलेल्या ‘माहेर’ या संस्थेत संस्थेकडून लिंग, जात, पंथ किंवा धर्म कोणताही असो; महाराष्ट्राबरोबर भारतातील ग्रामीण, शहरी व झोपडपट्टी भागातील हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला, मुलं त्याचबरोबर निराधार मुलं - मुली व मानसिक विकलांग महिला यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून, मानसिक आधार देण्याबरोबरच शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व त्यांना समाजात अभिमानाने जीवन जगता यावं यासाठी प्रयत्न केले जातात. माहेर संस्थेत ४० मुलांचं एक घर असतं आणि या चाळीस मुलांचं शैक्षिणक शुल्क, शैक्षणिक साहित्य, कपडे व इतर साहित्य, आरोग्य आणि अन्नधान्य यावरील वार्षिक खर्चासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’च्या माध्यमातून मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यामध्ये पुण्यातील चाकण परिसरातील न्यूमन अँड ईस्सार इंजिनिअरिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर)अंतर्गत बहुमूल्य मदत केली होती. तसंच, मिळालेला निधी संस्थेला वर्ग करण्यात आला आहे. संस्थेत सातत्याने नवीन निराधार-बेघर मुलांची व मानसिक विकलांग महिलांची भरती होत असते, त्यांच्या वार्षिक खर्चासाठी संस्थेला मदतीची कायम गरज आहे.

शाळांसाठी ‘अॅक्ट फॉर एज्युकेशन’

शाळांमध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे किंवा चांगल्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे प्रामुख्याने मुलींची मोठी गैरसोय होते. शाळांमध्ये चांगली स्वच्छतागृहे असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, विद्यार्थ्यांनी डिजिटल साक्षर होणे आवश्यक आहे. हे ओळखून ‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानांतर्गत स्वच्छतागृह उभारणी, डिजिटल ई-लर्निंग सुविधा अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागाच्या व सामूहिक मदतीच्या (क्राउड फंडिंगच्या) माध्यमातून ‘अॅक्ट फॉर एज्युकेशन’ उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत भोर तालुक्यातील तांभाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत व वेल्हे तालुक्यातील सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे स्वच्छतागृहाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. तसंच, पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना ई-लर्निंग सेट-अप उपलब्ध करून दिला आहे. दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहं व ई-लर्निंग सेट-अप उपलब्ध करून देण्याचं नियोजन असून, या उपक्रमासाठी मदतीची गरज आहे.

शैक्षणिक व जीवनावश्यक साहित्याचं वाटप

समाजातील भटक्या विमुक्त व स्थलांतरित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना व निराश्रित व सामाजिक स्नेहापासून दुर्लक्षित राहिलेल्या मुलांना सामाजिक विकासाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत कार्यशील असणाऱ्या व भटक्या जाती-जमातीतील मुलांच्या संस्कारक्षम सर्वांगीण विकासाचं व पुनर्वसनाचं कार्य करणाऱ्या ‘केअरिंग हॅन्डस्’ या संस्थेतील ४३ मुलांना ‘सोशल फॉर अॅक्शन’च्या अभियानाच्या माध्यमातून शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात आलं. तसंच निराधार, बेघर, एकल पालक असलेल्या, बालकल्याण समितीमार्फत व पोलिसांमार्फत दाखल केलेल्या वंचित व दुर्लक्षित मुलींसाठी निवासी प्रकल्प चालविणाऱ्या पुण्यातील ‘सेंट क्रिस्पीन्स होम’ या संस्थेतील ४९ मुलांना शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात आलं. याचबरोबर ग्रामीण भागातील मुलांना अशा एकूण ३२० विद्यार्थ्यांना उपक्रमांतर्गत साहित्याचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमासाठी पुण्यातील श्री मुकुंद भवन ट्रस्ट व लोहिया प्रतिष्ठान या संस्थांनी बहुमूल्य मदत केली होती.

कशी कराल मदत...

‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर विविध स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांची माहिती प्रसिद्ध केली जाते. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक कंपन्या, विविध सेवा संस्था, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, विविध सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८०-जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल.

स्वयंसेवी संस्थांनी असं व्हावं सहभागी

महाराष्ट्रात विविध सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आपल्या सामाजिक उपक्रमांची माहिती https://socialforaction.com/ या वेबसाइटवर एनजीओ फंडरेझिंग या सेक्शनमध्ये जाऊन, स्वयंसेवी संस्थांसाठी असणारा फॉर्म भरून आपल्या संस्थेसाठी ऑनलाइन क्राउड फंडिंगसाठी फंडरेझिंग अभियान सुरू करू शकतात. स्वयंसेवी संस्थेसाठी नोंदणी प्रमाणपत्र, ८०-जी प्रमाणपत्र व १२ ए प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com