ज्यांची बाग फुलून आली...

जगण्याच्या उलथापालथीचे सर्व संदर्भ कवी गोळा करत असतो.आयुष्याच्या चौकटीत येणाऱ्या अनेक अपरिहार्य प्रश्नांची उत्तरं तो शोधत असतो. शाश्वत मानवी जीवनमूल्यांची होणारी पडझड कवीला अस्वस्थ करत राहते.
solapur famous poet datta halasgikar
solapur famous poet datta halasgikar Sakal

- रमण रणदिवे

जगण्याच्या उलथापालथीचे सर्व संदर्भ कवी गोळा करत असतो.आयुष्याच्या चौकटीत येणाऱ्या अनेक अपरिहार्य प्रश्नांची उत्तरं तो शोधत असतो. शाश्वत मानवी जीवनमूल्यांची होणारी पडझड कवीला अस्वस्थ करत राहते.

सभोवतालातला कोलाहल त्याच्या काळजावर सारखा आदळत असतो. संकुचित प्रवृत्तीमुळे माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. तो पराकोटीचा आत्ममग्न झाला आहे. सृजनाची अस्वस्थता या बाबीकडं दुर्लक्ष करू शकत नाही.

सोलापूरचे सुप्रसिद्ध कवी दत्ता हलसगीकर (जन्म : सात आॕगस्ट १९३४, मृत्यू : नऊ जून २०१२) हे उदात्त मानवी जीवनमूल्यांवर नितांत प्रेम करणारे मनस्वी कवी होते. माणसांविषयी वाटणारा कळवळा त्यांच्या अनेक कवितांमधून अभिव्यक्त झाला आहे. संवेदनशील कवीची समंजस शहाणीव त्यातून दिसते. साध्या-सोप्या शब्दांतून, प्रतिमा-प्रतीकांद्वारे ते आशयाचा पट विस्तारत नेतात.

इथं ज्या कवितेबद्दल लिहिणार आहे ती ‘उंची’ ही कविता ‘कोशातून बाहेर’ या त्यांच्या काव्यसंग्रहातली आहे. फुलांनी भरलेली ओंजळ रिती करतानाही आसक्तीला विरक्तीची समंजस सोबत हवी हे भान हलसगीकर यांच्याकडं आहे. ‘उंची’ या कवितेत उत्कट समाजभान असून, कवीचं अंतर्याम करुणेनं काठोकाठ भरलेलं आहे. अशाश्वताच्या झुल्यावर झुलत राहणं, स्वतःभोवती कोश विणणं अगदी खोटं, असं ते एका कवितेत म्हणतात.

माणसाचं मन सदसद्विवेकावर पक्कं उभं असायला हवं, या एका भावनेनं हलसगीकर लोकांना आवाहन करतात की -

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळून आले

त्यांनी दोन गाणी गावीत

आज माणूस पराकोटीचा आत्मकेंद्री झाला आहे. आपल्याकडं जे आहे त्यातलं थोडंफार गरजूंना द्यावं ही भावना लोप पावत चालली आहे;

म्हणून हलसगीकर म्हणतात : ‘आपल्या जवळचं इतरांनाही प्रेमानं द्या. जगात अशी काही माणसं आहेत की ज्यांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यही काळानं आपल्या मजबूत पंजात जेरबंद केलं आहे. हा पंजा उघडला जावा म्हणून अशी माणसं सतत धडका देत असतात. जन्मोजन्मीच्या काळोखात ही माणसं आपल्या दुःखाची गाणी गात असतात.’

हलसगीकर पुढं म्हणतात : ‘ज्या लोकांचा सूर्यकुळाशी घरोबा आहे अशांनी या तमग्रस्त गरिबांना उजेड द्यावा. ज्यांच्या प्राक्तनात अंधारच अंधार आहे त्यांच्या गावात प्रकाश न्यावा.’

माणसाचं मन सध्या कठोर बनत चाललं आहे. खून-बलात्कार-दरोडे अशा बातम्या रोज कानांवर येतात. अशा निर्दयी लोकांना ते सांगतात : ‘आपलं मन पाषाणासारखं कठोर होऊ देऊ नका. ते दीनदुबळ्यांसाठी द्रवू द्या. अश्रूंच्या वर्षावात भिजू द्या. अश्रूंची ओल मिळाल्यावर तुमच्या अंतर्मनातून काही हिरवे, म्हणजे मंगलमय, सुविचार उगवून येतील. पिकलेल्या फळासारखं तुमचं काळीज रसाळ होऊ द्या. त्यामुळेच तुमचं आयुष्य रसमधुर होईल.’

अस्तित्वाच्या ज्या नैतिक आणि जबाबदार वळणावर कवी उभा आहे ते वळण म्हणजे उदात्त जीवनमूल्यांची वसाहत असणाऱ्या गावाला, माणुसकीच्या गावाला जाणारी वहिवाट आहे.

हलसगीकर म्हणतात : ज्यांच्या अंगणात ढग झुकले त्यांनी तृषार्ताला ओंजळभर पाणी द्यावं. ज्यांचं हृदय श्रीमंत, म्हणजेच औदार्यानं भरलेलं आहे त्यांनी ते रितं करून आपल्या आयुष्याच्या द्रोणात पुण्य भरून घ्यावं.

कवितेतल्या शेवटच्या कडव्यात हलसगीकर यांच्या विचारवैभवाचा, समग्र समाजभानाचा, तसंच उदात्त विचारांचा आविष्कार आढळतो. तो काव्यसामर्थ्याचा कळस मानावा लागेल.

लौकिकार्थानं यशाच्या शिखरावर असणाऱ्या अहंकारी लोकांना ते आवाहन करतात : ‘ज्यांची उंची आभाळाएवढी आहे त्यांनी थोडं खाली यावं. ज्यांचे जन्म मातीने मळले आहेत, म्हणजेच जे शापित आहेत; दीन आहेत, विमनस्क आहेत त्यांना उचलून वरती घ्यावं. त्यांना आधार द्यावा, त्यांचे निराधार अश्रू आपल्या ओंजळीत घ्यावेत.’

‘उंची’ या नितांतसुंदर कवितेचं संक्षिप्त स्वरूप असं आहे. ‘माणूसपणाची प्रतिष्ठापना ते माणसाचा गौरव’ या प्रवासासाठी कोणताही सच्चा कवी आपल्या आयुष्याचे सारे श्वास खर्ची टाकत असतो. जीवनजाणिवांचं ओझं शब्दांच्या पाठीवर प्रतिभावान कवी देत असतो. आसवांच्या ठिणग्यांचं चांदणं करण्याचं अफाट सामर्थ्य प्रतिभावंताकडं असतं. मानवी जीवनमूल्यांची जोपासना करणाऱ्या प्रत्येक संवेदनशील सहृदय माणसाला त्यामुळेच तर वैश्विक सूर्यसंस्कृतीचं सभासदत्व लाभत असतं.

उंची

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळून आले

त्यांनी दोन गाणी गावीत

सूर्यकुळाशी ज्यांचे नाते

त्यांनी थोडा उजेड द्यावा

प्राक्तनाचा अंधार तिथे

प्रकाशाचा गाव न्यावा

मन थोडे ओले करून

हिरवे हिरवे उगवून यावे

मन थोडे रसाळ करून

आतून मधुर मधुर व्हावे

ज्यांच्या अंगणात ढग झुकले

त्यांनी ओंजळ पाणी द्यावे

आपले श्रीमंत हृदय त्यांनी

रिते करून भरून घ्यावे

आभाळाएवढी ज्यांची उंची

त्यांनी थोडे खाली यावे

ज्यांचे जन्म मातीत मळले

त्यांना उचलून वरती घ्यावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com