बघ्यांची गर्दी

१६ एप्रिल हा ‘जागतिक आवाज दिन’ म्हणून साजरा केला जातो. व्यावसायिक कारणांसाठी आवाजाचा वापर करणाऱ्या गायक, अभिनेते, शिक्षक, वकील, राजकारणी अशा सगळ्यांसाठीच या दिवसाचं खूप महत्त्व आहे.
Crowd of spectators
Crowd of spectatorssakal
Summary

१६ एप्रिल हा ‘जागतिक आवाज दिन’ म्हणून साजरा केला जातो. व्यावसायिक कारणांसाठी आवाजाचा वापर करणाऱ्या गायक, अभिनेते, शिक्षक, वकील, राजकारणी अशा सगळ्यांसाठीच या दिवसाचं खूप महत्त्व आहे.

- सोनाली लोहार, sonali.lohar@gmail.com

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, त्यावर कसे व्यक्त होतो, त्याला कसा प्रतिसाद देतो, यावर आपण नागरिक म्हणून समाजाबाबत किती जबाबदार आहोत, हे प्रतीत होते; परंतु माझ्यामुळे काय फरक पडणार आहे, असा विचार केल्यास समाज आणि व्यक्ती म्हणून आपल्यात बधिरता आली असल्याचे समजावे. परंतु माणूस म्हणून अजूनही सर्व संवेदना शाबूत आहेत असं वाटत असेल तर एक नागरिक म्हणून आवाज उठवत राहू या...!

१६ एप्रिल हा ‘जागतिक आवाज दिन’ म्हणून साजरा केला जातो. व्यावसायिक कारणांसाठी आवाजाचा वापर करणाऱ्या गायक, अभिनेते, शिक्षक, वकील, राजकारणी अशा सगळ्यांसाठीच या दिवसाचं खूप महत्त्व आहे. या दिवसासाठी या वर्षी जागतिक संघटनेने जाहीर केलेले बोधवाक्य आहे ‘युवर व्हॉइस मॅटर्स’, अर्थात, ‘तुमचा आवाज महत्त्वाचा आहे’. याच वाक्याचा दुसराही एक गर्भित अर्थ आहे जो विशेषतः सध्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर खूप प्रकर्षाने जाणवतोय.

शारीरिक विकारांमुळे कंठातून न निघणाऱ्या आवाजावर एकवेळ उपचार करता येतील, पण एखाद्या व्यक्तीने अथवा समाजाने गृहितच धरलं, की ‘आपल्याला आवाजच नाही’ तर मग त्या समाजाचं काय करायचं? पदोपदी एक नागरिक म्हणून अनेक गोष्टी जाणवत राहतात, खटकतात; पण आपण त्याविषयी तोंडातून साधा ‘ब्र’ही काढणं टाळतो. यात ‘मी एकट्याने बोलून काय फरक पडणार आहे’ असा विचार असतो किंवा ‘मी बोललो तर मला त्याचे परिणाम भोगावे लागतील का’ हे भयही असू शकतं; पण बोलायला तर हवंच, राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरील एक सिंह हे ‘धैर्याचं प्रतीक’ आहे हे विसरून कसं चालेल?

उदाहरण म्हणून या साध्या गोष्टी घ्या. भररहदारीच्या रस्त्यांवर दर दोन दिवसांनी उभे राहणारे राजकीय नेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक ‘हे राज्याच्या अथवा देशाच्या हितोपयोगी कसे बरे’ याची कोणी कारणमीमांसा करेल काय? अशा फलकांवरील वाढदिवस असलेल्या नेत्याचा चेहरा, त्याच्या डोक्याला चिकटून अजून दोनतीन राजकीय चेहरे, त्याखालची १५-२० स्थानिक (?) राजकीय मंडळींच्या फोटोंची पंगत, सोबतच कोण्या शुभेच्छुक ताई-मॅडम यांचे सालंकृत फोटो हे सर्व ‘शहर सुशोभीकरण मोहिमे’चा एक भाग आहे, असे नागरिकांनी समजणं अपेक्षित आहे काय?

या फलकावर केला जाणारा खर्च प्रभागाच्या इतर विकासकामांवर किंवा एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजांवर किंवा गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी करणं योग्य ठरणार नाही का? फलकच लावायचे असतील, तर आपल्या शहराच्या प्रेक्षणीय जागांचे लावा, शहरात शिरणाऱ्या देश-विदेशीच्या पाहुण्यांना त्या जागेचा संपन्न वारसा सांगणाऱ्या गोष्टींचे लावा, शहराला प्रगतिपथावर नेणाऱ्या प्रकल्पांचे लावा, जेणेकरून नागरिकांनाही त्याचा अभिमान वाटावा आणि आपलं शहर प्रगतीच्या वाटेवर आहे याचा दिलासाही मिळावा.

अशीच साधी; पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे धार्मिक/ अधार्मिक/ राजकीय आणि अशाच कारणांमुळे सतत घडत असलेलं ध्वनिप्रदूषण. न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी ध्वनीच्या वापरावर काही मर्यादा घालून दिल्या आहेत, ज्या सर्वांसाठीच बंधनकारक आहेत. त्या न पाळता वेळोवेळी वाजणारे कर्णकर्कश्श भोंगे हे जितके त्रासदायक आहेत, तितकेच त्रासदायक कान फुटेस्तोवर वाजणारे ढोल-ताशे; रात्री-अपरात्री वाजत राहणारे फटाकेही! घरून काम करणारी मंडळी, आजारी आणि वयोवृद्ध मंडळी, परीक्षेदरम्यान अभ्यास करणारे विद्यार्थी यांनाच नव्हे, तर कुठल्याही शांतताप्रिय माणसाला हे सगळंच क्लेशकारक असतं.

अशा वेळी त्यांनी काय करावं? शहर सोडून जाणं हाच उपाय उरतो का? ‘काही विशिष्ट फायद्यांसाठी नियमांवर बोट ठेवणं आणि वेळ पडलीच तर सोयीस्कररीत्या त्याच नियमांना बगल देणं’ हीच राजकीय आणि सामाजिक व्यवस्था नागरिक म्हणून मुकाट स्वीकारायची का? नुकताच एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर बघितला. त्यात चाळीच्या पॅसेजमध्ये एक व्यक्ती चाकूने दुसऱ्या व्यक्तीवर वार करत होती आणि खाली रस्त्यावर बघ्यांची जमलेली तुफान गर्दी ‘अरे मारलं! मेला, मेला!’ हे ओरडत तेच दृश्य आपापल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात गर्क होती.

अचानक जाणवलं, की त्याच गर्दीचा भाग होऊन आपणही अत्यंत चवीने तेच दृश्य बघतोय! समाज आणि व्यक्ती म्हणून किती बधिरता आलीय, त्याची शरम वाटली. जिवंत असण्याचं भान असेल आणि माणूस म्हणून अजूनही सर्व संवेदना शाबूत आहेत असं वाटत असेल तर एक नागरिक म्हणून एवढं तरी करू या... कृती करू या, आवाज उठवत राहू या...!

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com