

Sonia Gandhi Autobiography
esakal
प्रियदर्शन - saptrang@esakal.com
सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक तुम्ही राजकीय गौप्यस्फोटांच्या अपेक्षेने वाचणार असाल, तर तुमची निराशा होऊ शकते. अर्थात, राजकीय चर्चेच्या दृष्टीने या पुस्तकात काही रंजक मुद्दे नक्कीच आहेत. सोनिया गांधी यांनी आणीबाणीच्या काळातील अत्याचारांसाठी संजय गांधी यांना, तर कुटुंबातील फाटाफुटीसाठी मेनका गांधी यांना जबाबदार धरले आहे किंवा बाबरी मशिदीचे पतन पाहून त्या ढसाढसा रडल्या होत्या, अशा चर्चा आता सर्वसामान्य झाल्या आहेत. याशिवाय त्यांनी पुस्तकात कोणत्या घटना आणि व्यक्तींचा उल्लेख केला आहे, तसेच कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक वगळल्या आहेत, याचाही शोध घेतला जात आहे.
मात्र, कोणतेही पुस्तक आणि विशेषतः आत्मचरित्र इतक्या वरवरच्या पद्धतीने वाचू नये. त्यातही हे सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र आहे. त्यांचे आयुष्य अत्यंत नाट्यमय, उदात्त आणि एका वेगळ्याच अर्थाने प्रतिष्ठेचे राहिले आहे. इटलीतील एका छोट्याशा गावात बालपण गेलेली, बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत लंडनपर्यंत पोहोचलेली एक तरुणी अखेर भारतातील सर्वांत शक्तिशाली राजकीय कुटुंबाची सून होण्याचे ‘भाग्य’ मिळवते. मात्र, या भाग्याच्या वाटेवर अनेक ‘दुर्भाग्ये’ही तिची वाट पाहत असतात. ती आणीबाणीचा काळ अनुभवते. त्यानंतर इंदिरा गांधी यांचा पराभव आणि सत्तेत झालेले पुनरागमन पाहते. अखेरीस गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेला त्यांचा मृतदेहही तिला पाहावा लागतो. यानंतर सात वर्षांनी पती राजीव गांधी यांचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेहही तिच्यासमोर आणला जातो.