काळ्या सूर्याचे विलोभनीय दर्शन

आपणास सूर्याचे नेहमी प्रकाशित तेजस्वी रूप दिसते; मात्र खग्रास सूर्यग्रहणात चंद्राने सूर्यबिंबाला झाकल्यानंतर आपणास काळ्या सूर्याचे विलोभनीय दर्शन घडते.
Khagras solar eclipse
Khagras solar eclipsesakal

आपणास सूर्याचे नेहमी प्रकाशित तेजस्वी रूप दिसते; मात्र खग्रास सूर्यग्रहणात चंद्राने सूर्यबिंबाला झाकल्यानंतर आपणास काळ्या सूर्याचे विलोभनीय दर्शन घडते. असे दर्शन मला यंदाच्या वर्षी ८ एप्रिल रोजी घडले. तेही थेट अमेरिकेतून. यंदाच्या वर्षी भारतातून एकही ग्रहण दिसणार नसल्याने मी थेट अमेरिका गाठली. ‘नासा’ची भेट आणि खग्रास सूर्यग्रहणाचा विलोभनीय आविष्कार पाहण्याचा योग त्यानिमित्त जुळून आला...

गेली ६० वर्षे खगोलशास्त्राचा छंद माझी आनंदी सोबत करीत आहे. मागील ५२ वर्षे मी पंचांग-दिनदर्शिका तयार करण्याचे काम करतो आहे. २०२४ मध्ये एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही, हे पाहून मी खिन्न झालो होतो; परंतु या वर्षी ८ एप्रिलचे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेतून दिसणार हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हाच मी मनाशी ठरवले, की ते अमेरिकेत जाऊन पाहायचे!

सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो. ४४ वर्षांपूर्वी १६ फेब्रुवारी १९८० रोजी झालेले खग्रास सूर्यग्रहण मी कारवारजवळच्या अंकोला गावातून पाहिले होते. त्यानंतर २४ आॅक्टोबर १९९५ रोजी झालेले खग्रास सूर्यग्रहण मी उत्तर भारतातील फत्तेपूरसिक्रीतून पाहिले होते. ११ आॅगस्ट १९९९ रोजीचे खग्रास सूर्यग्रहण पाहायला मी गुजरातमधील भूजला गेलो होतो.

२२ जुलै २००९ रोजी झालेले खग्रास सूर्यग्रहण मी इंदूरहून पाहिले; परंतु दोन्ही खग्रास सूर्यग्रहणे आकाश अभ्राच्छादित राहिल्याने नीट दिसली नव्हती. १५ जानेवारी २०१० रोजी झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण मी कन्याकुमारीतून पाहिले होते; परंतु कंकणाकृती सूर्यग्रहण पाहणे आणि खग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घेण्यात विलक्षण फरक होता. खग्रास सूर्यग्रहणात छायाप्रकाश लहरी (शॅडोबॅण्डस्), हिऱ्याची अंगठी (डायमंड रिंग), चंद्रबिंबाने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकल्यानंतर दिवसा होणाऱ्या अंधारात बुध-शुक्र ग्रह आणि तारका यांचे होणारे दर्शन, प्रभाकिरीट (करोना) आणि बेलीज बीडस् यांचे विलोभनीय दर्शन मनास आनंदी करत असते.

सूर्यग्रहण सुटताना पुन्हा अशा सर्व आविष्कारांचे सुंदर दर्शन घडते. १६ फेब्रुवारी १९८० च्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी आम्ही काही प्रयोग केले होते. खग्रास स्थितीच्या वेळी तापमान उतरले होते. लाजाळूच्या झाडाने पाने मिटली होती. पशुपक्षी स्तब्ध झाले होते. तो अनुभव पुन्हा घेता येणार होता... माझी पत्नीही सोबत होती. खग्रास सूर्यग्रहण पाहण्यापूर्वी ह्युस्टनला जाऊन ‘नासा’लाही भेट देण्याचे ठरले.

‘नासा’मध्ये दर शनिवारी सकाळी ‘अवकाशवीराबरोबर नाश्ता’ असा अनोखा कार्यक्रम असतो. त्यासाठी अगोदर फी भरून नावनोंदणी करावी लागते. आपणास एका अवकाशवीराबरोबर नाश्ता करण्याची संधी मिळते. त्याच्याशी संवाद साधता येतो. सुमारे दीड तास कार्यक्रम चालतो. ठरल्याप्रमाणे शनिवारी, ६ एप्रिल रोजी अवकाशवीर केनेथ डी. कॅमेरॉन यांना आम्ही भेटणार होतो.

केनेथ यांनी एकूण २३ दिवस १० तास ११ मिनिटे अंतराळात राहून संशोधन कार्यात सहभाग घेतला होता. त्यांना भेटायची, त्यांच्याबरोबर नाश्ता घेण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची संधी आम्हास मिळणार होती. आम्ही सकाळी आठ वाजताच नासा स्पेस सेंटरच्या सभागृहात दाखल झालो. प्रवेशद्वारापाशीच केनेथ यांच्या हस्ताक्षरात त्यांच्या फोटोवर आमचे नाव लिहिलेले आणि त्यांची सही असलेले कार्ड आम्हाला देण्यात आले.

नाश्त्याचे पदार्थ डिशमध्ये घेऊन कार्डावर लिहिलेल्या नंबरच्या टेबलापाशी आम्हाला बसायचे होते. आम्ही अगोदर नावनोंदणी केल्यामुळे आमचे टेबल केनेथ यांच्याजवळच होते. जवळजवळ शंभर खगोलप्रेमी जमले होते. नाश्ता करता करता प्रश्न विचारायचे होते. ७४ वर्षांचे केनेथ सर्वांच्याच प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत होते.

मी प्रश्न विचारला, ‘मी भारतातून आलो आहे. भारत देश आता चार अंतराळवीर आणि एक रोबो महिला - व्योममित्रा यांना अंतराळात पाठवून पृथ्वीवर सुखरूप आणणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरविण्यात भारताला यश आले आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटते?’ केनेथ डी. कॅमेरॅान म्हणाले, ‘भारताची अंतराळ संशोधन क्षेत्रातील प्रगती पाहून मला आनंद होतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘इस्रो’ संस्था सर्व मोहिमा कमीत कमी खर्चात करीत असते; परंतु अंतराळ संशोधन क्षेत्रात सर्व देशांनी एकमेकांचे सहकार्य घ्यायला पाहिजे. अंतराळ संशोधनात स्पर्धा असता कामा नये. पृथ्वीवरचे महासागर आणि अवकाश सर्वांचे आहे.’

इतरही खगोलप्रेमीही प्रश्न विचारत होते. लहान मुलांच्या प्रश्नांनाही केनेथ सविस्तर उत्तर देत होते. अंतराळवीर अंतराळयानात कसे राहतात, चंद्रावर वातावरण नाही; मग ध्वज फडकताना कसा दिसला, शून्य गुरुत्वाकर्षणाचा आरोग्यावर काय परिणाम होतो, अंतराळ प्रवासात कोणती काळजी घ्यावी लागते, अंतराळात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या काय आहे, अंतराळयानात निर्माण होणाऱ्या कार्बन डॅायआॅक्साइडचे काय करतात, अंतराळात जेवण काय घेतात, व्यायाम कसा करतात, अंतराळ प्रवासात धोक्याचे प्रसंग कोणते असतात, अंतराळात नेमके कोणते संशोधन करतात, स्पेस टुरिझम कसे असेल, पुढील शंभर वर्षांत अंतराळ संशोधन क्षेत्रात कोणत्या गोष्टी घडतील वगैरे वगैरे अनेक प्रश्नांची केनेथ डी. कॅमेरॅान यांनी सविस्तर उत्तरे दिली आणि सर्वांना खूश करून सोडले... प्रश्नोत्तराचा कार्यक्रम उत्तमच झाला होता. त्यानंतर आम्ही म्युझियम पाहिले. वेगवेगळ्या प्रकल्पांना भेट देण्यासाठी ट्रॅाम्स होत्या. एकंदरीत नियोजन अतिशय उत्तम होते.

विलोभनीय दर्शन!

दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी आम्ही कारने ह्युस्टनहून डलासला जायला निघालो. डलासहून खग्रास सूर्यग्रहण पाहायचे ठरविले होते. खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी निरभ्र आकाश मिळणे जरुरीचे होते. चार तासांत डलासला आलो. माझी दृष्टी आकाशाकडे होती. तुरळक मेघ पाहून मनात बेचैनी निर्माण होत होती.

सोमवारी आकाश निरभ्र राहील ना? सूर्यग्रहण दिसेल ना? असे प्रश्न मनात येत होतेच. एवढ्या दूरवर खग्रास सूर्यग्रहण पाहायला आलो आहे तो उद्देश साध्य होईल ना? विचार करतच रविवारी रात्री डलासच्या ठरलेल्या त्या हॅाटेलमध्ये पोहोचलो.

पहाटेच जाग आली. खोलीतील खिडकी पूर्वेलाच होती. सूर्य उगवताना आकाशात किरकोळ ढग होते... मला तर आनंदच झाला. खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेतील १५ राज्यांतून दिसणार होते. खग्रास सूर्यग्रहण दिसण्याच्या पट्ट्यात मोठी नागरी वस्ती येत होती. ग्रहण चष्मे पुरविण्यात आले होते. विशेष म्हणजे कुत्रे, घोडे इत्यादी प्राण्यांसाठीही ग्रहण चष्मे तयार करण्यात आले होते.

काही शाळांनी तर सुट्टी जाहीर केली होती. काही शाळा विद्यार्थ्यांना बोलावून, परवानगी पत्रकावर पालकांची सही घेऊन गटागटाने त्यांना आपल्या मैदानात नेऊन ग्रहण दाखविणार होते. अनेक खगोल संस्थांनी मैदानात व बागेतील मोकळ्या जागेत दुर्बिणी लावून ग्रहण दर्शन आणि जेवणाची सोय केली होती. संपूर्ण उत्तर अमेरिका ग्रहण दर्शनार्थ सज्ज झाली होती. सकाळपासूनच टीव्हीवर सूर्यग्रहणाच्या बातम्या सुरू होत्या. माहिती देण्यात येत होती.

पूर्वी खग्रास सूर्यग्रहणात अनेक शोध लागले होते. प्रकाशकिरणांचा गुरुत्वाकर्षणावर परिणाम होत असल्याचेही एका खग्रास सूर्यग्रहणात सिद्ध झाले होते. १८६८ मध्ये झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी केलेल्या संशोधनामुळे सूर्यावर हिलियम आहे, हे सिद्ध झाले होते. आताच्या खग्रास सूर्यग्रहणातही नासा आणि काही विद्यापीठांनी प्रयोग करण्याचे ठरविले होते.

खग्रास सूर्यग्रहणात पशू-पक्षी-वन्यप्राण्यांवर काय परिणाम होतात, त्याची निरीक्षणे केली जाणार होती. साऊंडिंग रॅाकेटस् आणि फुगे सोडून पृथ्वीसभोवतालच्या वातावरणात काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला जाणार होता. कृत्रिम उपग्रहांवरचा परिणामही नोंदविला जाणार होता. खग्रास सूर्यग्रहणाच्या पट्ट्यामधून अनेक खगोलप्रेमी करोनाचे फोटो एकत्रित करून संशोधन करण्यात येणार होते.

डलासमध्ये सूर्यग्रहणास दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी प्रारंभ होणार होता. दुपारी १ वाजून ४० मिनिटांपासून १ वाजून ४४ मिनिटांपर्यंत चार मिनिटे सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार होती. सूर्यग्रहण दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी सुटणार होते. मी ग्रहण चष्मे, पांढरी चादर आणि चाळण तयार ठेवली होती. हॅाटेलच्या स्वीमिंग पूलच्या जवळच्या मोकळ्या जागेतून ग्रहण पाहायचे ठरविले होते. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. दुपार झाली.

आम्ही अगोदर ठरविलेल्या जागी आलो. नंतर बरेच खगोलप्रेमी तिथे जमा झाले. आकाशात किरकोळ ढगही येत होते. दुपारी १२.२३ वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ झाला. आम्ही पांढऱ्या चादरीवर चाळणीतून ग्रासित सूर्याच्या प्रतिमा घेऊन सूर्यग्रहण पाहत होतो. काही अमेरिकी नागरिक जवळ येऊन आमच्या प्रयोगाचे फोटो घेत होते. ग्रहण चष्म्यातून ग्रासित सूर्य पाहत होतो. चंद्रबिंबाने अर्धा सूर्य झाकला. सूर्यकोर दिसू लागली.

पांढऱ्या चादरीवर शॅडोबॅण्डस् दिसू लागले. चंद्रबिंबाने सूर्यबिंबाला झाकण्यापूर्वी सुंदर डायमंड रिंग दिसली. क्षणार्धात चंद्रबिंबाने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकले. डोळ्यावरील ग्रहण चष्मे दूर केले गेले. सर्वत्र अंधार पसरला होता. आकाशात गुरू-शुक्र-बुध ग्रह दिसले.

चंद्रबिंबाने झाकलेल्या काळ्या सूर्याभोवती सुंदर करोना दिसला. बेलीज बीडस् दिसल्या. चार मिनिटे पटकन संपली. पुन्हा सुंदर डायमंड रिंग दिसली. शॅडोबॅण्डस् दिसल्या. सूर्यग्रहण सुटू लागले. ग्रहणकालात मधे मधे ढग येत होते; परंतु खग्रास सूर्यग्रहणाचे विलोभनीय आविष्कार पाहण्यात जराही अडथळा आला नव्हता. आम्हाला आनंदाचे क्षण अनुभवता आले, जे कायम सोबत राहतील...

यापूर्वी २१ ॲागस्ट २०१७ रोजी अमेरिकेतून खग्रास सूर्यग्रहण दिसले होते. आता २३ ॲागस्ट २०४४ रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेतून दिसणार आहे. तुम्हाला भारतातून खग्रास सूर्यग्रहण पाहायचे आहे का? तर २० मार्च २०३४ रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातील काश्मीरमधून दिसणार आहे. हो, तुम्हाला महाराष्ट्रातून खग्रास सूर्यग्रहण पाहायचे असेल तर मात्र बराच काळ थांबावे लागेल. कारण थेट १८ सप्टेंबर २२४८ रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण महाराष्ट्रातून दिसणार आहे!

‘नासा’ची अविस्मरणीय भेट

‘नासा’ म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन! पूर्वी अंतराळ संशोधन क्षेत्रात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात तीव्र स्पर्धा असायची. ह्युस्टनमधील म्युझियममध्ये साधारण ४०० प्रकल्प आहेत.

मर्क्युरी-९, जेमिनी-५, अपोलो-१७ आणि ल्यूनर मॅाड्युल पाहताना वेळ कसा जातो तेच कळत नाही.

स्पेस सेंटर थिएटरमध्ये वेगवेगळे शो सुरू होते. मून रॅाकला स्पर्श करून आनंद मिळवता येतो. स्पेस शटल आतून पाहता येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय आहे. रॅाकेट पार्क पाहून आम्ही चकित झालो. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि स्कायलॅब पाहताना खूप आनंद झाला.

नील ॲार्मस्ट्राँग चंद्रावर उतरले त्या वेळचा नियंत्रण कक्ष जसाच्या तसा एका वेगळ्या इमारतीत ‘आठवण’ म्हणून जतन करून ठेवण्यात आला आहे. अशा सर्व अद्‍भुत गोष्टी पाहण्यासाठी संपूर्ण जगातून रोज हजारो नागरिक इथे येत असतात; पण कुठेही गडबड-गोंधळ नाही. सर्व मजेत पाहत असतात... आनंद घेत असतात.

खगोलविज्ञान समजून घेत असतात. त्या दिवशी आम्ही सकाळी आठ वाजता गेलो आणि सायंकाळी पाच वाजता न थकता आनंदित होऊन बाहेर पडलो.

dakrusoman@gmail.com

(लेखक प्रसिद्ध खगोल अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com