खेलंदाजी ; खेळात धर्म नकोच...

महाभारतातसुद्धा युद्ध संपल्यानंतर संध्याकाळी सैनिक शत्रूंच्या शिबिरात जात आणि त्या मंडळींना भेटत
saptrang
saptrangsakal

पाकिस्तानकडून ‘टी-२०’ जागतिक करंडकाच्या स्पर्धेत झालेला मानहानीकारक पराभव आपल्याला झोंबला. आपण मधाच्या पोळ्याची अपेक्षा ठेवली होती, पण आपल्याला मधमाश्याच निर्दयपणे डसल्या. लक्षात घ्या की एका चांगल्या संघाची ती रात्र होती आणि त्यांनी उत्कृष्ट खेळ करून आपल्याला पूर्ण चीत केलं. कदाचित पुढे त्यांच्या बरोबरच खेळताना पुढची रात्र आपली असेल. ‘टी-२०’ यश हे अळवावरच पाणी असतं. मॅच संपल्यानंतर काही चांगल्या गोष्टी घडल्या.

मला बरं वाटलं, ज्या पद्धतीने मॅचनंतर विराट कोहलीला रिझवानने मिठी मारली. आणि विराटने त्याच्या केसातून हात फिरवला. त्याचं कौतुक केलं. नंतर प्रेझेंटेशनच्यावेळी सुद्धा धोनी पाकिस्तानी खेळाडूंशी गप्पा मारताना दिसत होता. खरं तर मॅच संपल्यानंतर तिथल्या तिथे शत्रुत्व संपायला पाहिजे. महाभारतातसुद्धा युद्ध संपल्यानंतर संध्याकाळी सैनिक शत्रूंच्या शिबिरात जात आणि त्या मंडळींना भेटत. हा आपला संस्कार आहे. काही माजी पाकिस्तानी खेळाडू हे संस्कार विसरलेले दिसताय की त्यांच्यावर ते झालेच नव्हते. ज्या पद्धतीने त्यांच्या काही जुन्या खेळाडूंनी प्रतिक्रिया दिल्या ते पहिलं की वाटलं ही मंडळी विजयानंतर अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाले आहेत. एक जमाना होता जेव्हा दोन देशात शत्रुत्व असूनही आम्ही भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटपटुंच्या मैत्रीची, एकमेकांबद्दल असलेल्या आदराची उदाहरणं देत होतो.

उदाहरणार्थ इम्रान खान या खेळाडूला सुनील गावसकरच्या फलंदाजीबद्दल किती आदर आहे !. सुनील गावसकर त्याची गाजलेली शेवटची ९६ धावांची कसोटी खेळी खेळत होता. विकेट भिंगरी होती, चेंडू भोवऱ्यासारखा फिरत होता. इम्रान खानने आपल्या दोन फलंदाज क्षेत्ररक्षकांना पुढे सिली मिड ऑन, सिली मिड ऑफला उभं केलं आणि त्यांना सांगितलं की, '' हे पहा तुमच्याकडे काही झेल येईल म्हणून मी तुम्हाला तिथे उभं करत नाहीये. पण तुम्ही जवळ उभं राहून त्याचं फूटवर्क पहा. मग तुम्हाला कळेल की टर्निंग ट्रॅकवर कशी फलंदाजी करायला पाहिजे.''

आज एका विजयाबरोबर, वकार युनुसला हिंदूंमध्ये रिझवान याने नमाज पढल्याचा आनंद झाला. का त्या तरूण मुलांचं मन कलूषित करत आहेत? या सामन्याला इस्लाम विरूध्द हिंदू असा रंग देणे आणि दुफळी निर्माण करणे हा नादानपणा आहे.

भारतात सुध्दा शमीला तो केवळ मुस्लिम आहे म्हणून पराभवासाठी ट्रॉल केलं गेलं. ते सुध्धा विखारी होत. पण बोर्ड, खेळाडू, आणि ज्यांच्याकडे विवेक होता त्या सर्वांनी त्याची निर्भसना केली. पाकिस्तानात असं झालेलं हा लेख लिहिपर्यंत मला ज्ञात नाही. वकार आणि त्याच्या विचाराचे त्याचे जातभाई विसरतात की क्रिकेट एका रात्रीत फासे पालटू शकत. रमीज राजा काय बोलला ते वकार विसरला काय ? ठरवलं तर भारतीय बोर्ड कधीही पाकिस्तान क्रिकेटला दाती तृण धरून शरण आणू शकतो. पाकिस्तान क्रिकेटची भाकरी बंद करू शकतो. पाकिस्तानी क्रिकेटपटू फार समृद्ध वगैरे नाहीत.

एक किस्सा सांगतो. मला विजय लोकपालीने सांगितलेला. एका भारत पाकिस्तान मालिकेनंतर विजय, राहुल द्रविडला भेटायला त्याच्या रूमवर गेला होता आणि तिथे पाकिस्तानचा युनुस खान आला. युनुस खान राहुल द्रविडशी बोलायला लागला. त्याने द्रविडला सांगितलं की, ‘मालिकेमध्ये खूप मजा आली. तुझी बॅटिंग बघायला आम्हाला खूप आवडलं. आम्ही काही गोष्टी तुझ्याकडून शिकलो. खरंच ही मालका संपूच नये असं वाटत होतं.'' तिथे राहुल द्रविडचे पॅड्स आणि ग्लोव्हज् पडले होते.

युनुसने विचारलं, ''तुझे पॅड्स आणि ग्लोव्हज् मी घेऊ शकतो का?'' तर द्रविड म्हणाला, ''घे ना. काहीच हरकत नाही.'' त्याने ते घेतले. मग युनुसने राहुलची बॅट पाहिली. तो म्हणाला की, ''ज्या बॅटने तू एवढ्या रन्स केल्यास, ती बॅट मला हवीय. देतोस का?'' राहुल द्रविडने नवी कोरी, त्याला आवडणारी बॅट उचलून युनुसच्या हातात दिली. अर्जुनाने गांडिव धनुष्य कर्णाला देण्यासारखं होत. पण ते दिलं गेलं. कधी कधी मला पाकिस्तानी क्रिकेटकडे पाहिलं की आश्चर्य वाटतं. आश्चर्य का वाटतं ते सांगतो. भारतीय क्रिकेट हे पाकिस्तानी क्रिकेटपेक्षा कितीतरी पटीने समृद्ध आणि सुसज्ज आहे. भारतीय क्रिकेटपटूंना जेवढा पैसा मिळतो तसा पाकिस्तानी क्रिकेटपटूंना स्वप्नातही पहायला मिळणार नाही. भारतीय क्रिकेटमध्ये देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा जवळपास गेली शंभर वर्ष आयोजित केल्या जात आहेत. .आता तर भारता एव्हढी समृध्द सिस्टीम इंग्लंडमध्ये नसेल.

आयपीएलच्या पैशाने क्रिकेट छोट्या गावात गेलंय. पाकिस्तानात काय आहे? म्हणजे पाकिस्तानमध्ये कायदे आझम ट्रॉफी आहे. लाहोरमध्ये स्टेट ऑफ आर्ट अॅकॅडमी आहेत. पण तरी सुद्धा भारताची जी स्थिती आहे, त्या तुलनेत पाकिस्तानमध्ये क्रिकेटच्या सुविधा किंवा सिस्टीम यामध्ये मुंबई आणि बरेली इतका फरक आहे. त्यात पाकिस्तानमध्ये जायला कुठलाही आंतरराष्ट्रीय संघ तयार नसतो. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू आपल्या देशात खेळूच शकत नाहीत. त्यांनी अरबी आखात ही आपली खऱ्या अर्थाने क्रिकेट भूमी केली आहे. आपल्याकडे आयपीएल आहे आणि आपले सगळे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. जगातून खेळाडू आयपीएलमध्ये येतात. केव्हढा समृध्द अनुभव भारतीय खेळाडूंना मिळतो.! आपण पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलचा दरवाजा उघडून आत सुध्दा घेत नाहीये. त्यात त्यांच्या देशाची इकॉनॉमी रसातळाला गेलीय. रमिझ राजा उगाच नाही म्हणाला, भारताने ठरवलं तर पाकिस्तानी क्रिकेटची भाकरी बंद होऊ शकते !

भारताचा आणखीन विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे खेळाडू निवडायची मुबलकता किती मोठी आहे ! देशात ३८ रणजी संघ आहेत. त्यातले प्रत्येकी ३० खेळाडू घेतले तरी ११४० रणजीस्तराचे खेळाडूं असतात. त्याच्यामध्ये तुम्ही ए टीम, अंडर १९, अंडर १५ असे खेळाडू प्रत्येक असोसिएशनचे मिळवले तर तुमच्या असं लक्षात येईल की भारतीय संघाला निवड करण्यासाठी जवळजवळ १५०० ते १८०० खेळाडू मिळतात. त्यातून भारतीय संघ १५ निवडतो. पाकिस्तानमध्ये त्याच्या निम्मे काय, त्याच्या एक चतुर्थ्यांश सुद्धा नसतील.कारण त्यांच्या कायदे आझम ट्रॉफी मध्ये ६ संघ खेळतात. पण त्याच बरोबर खेळाडू शोधण्यात इम्रान, झहीर अब्बाससारख्या खेळाडूंचा वाटाही मोठा आहे.

मी एक, दोन उदाहरणं तुम्हाला देतो. दिल्ली विरुद्ध पाकिस्तानमधली युनायटेड बँक अशी फायनल मॅच लाहोर मध्ये सुरु होती. आणि इम्रान खान ती मॅच लाहोरमध्ये घरी टीव्हीवर पाहत होता. आणि अचानक इम्रानला दिसलं की, खेळणारा एक मुलगा अतिशय वेगात गोलंदाजी टाकतोय. त्याची ऍक्शन चांगली आहे. तो उत्कृष्ट गोलंदाज होऊ शकतो. इम्रानने गाडी काढली. आणि तो मैदानावर गेला. त्याने त्या खेळाडूला पाहिलं. आणि लगेच त्याला पाकिस्तानी संघात घेतलं. तोपर्यंत तो फक्त ६ पहिल्या दर्जाच्या मॅचेस खेळला होता. पुढे त्याने जगाला पळवल. त्या खेळाडूचं नाव होतं वकार युनुस. अक्षरश: आकाशातून पडल्याप्रमाणे वकार युनुस त्यांना मिळाला. देवाने टाकला इम्रानने झेलला. नाहीतर वकार मोहल्ल्यात अडकला असता.

वासिम अक्रमच्या बाबतीत काय घडलं? वसीम पठाणी ड्रेस मध्ये एका मैदानावर गोलंदाजी टाकत होता. एका माणसाने त्याला सांगितलं, त्या गाडीत एक माणूस बसलाय तो बोलवतो. तो गेला. गाडीत इम्रान होता. त्याने त्याला नेटवर नेल.आणि नंतर काही महिन्याने न्यूझीलंडला, चक्क पाकिस्तानसाठी खेळायला. तिथे एका टेस्ट मॅचमध्ये त्याला इम्रानने सांगितलं की, ''या बॅट्समनला यॉर्कर टाक.''

तेव्हा अक्रमने इम्रानला विचारलं की, ‘यॉर्कर काय असतो?’ मग इम्रानने त्याला सांगितलं की, ''जो बुंध्यांत चेंडू टाकतो त्याला आपण यॉर्कर म्हणतो.'' आणि त्यानंतर जगाने पाहिलं की, अक्रम हा आईच्या पोटातूनच शिकून आल्यासारखा यॉर्कर टाकत होता.

इम्रानने तौसिफ अहमद या ऑफ स्पिनरला रस्त्यावरून उचलून आणला. झहीर अब्बासला रस्त्यावर ऑफस्पिन टाकणाऱ्या मुलात उद्याचा ऑफस्पिनर दिसला. तो होता सकलेन मुश्ताक आणि इंझमामची कथा तरी वेगळी कुठाय? इम्रान पाकिस्तानी क्रिकेटचा तेंव्हा सर्वेसर्वा होता. त्याला इम्रानने अक्षरशः मैदानातून उचलला. त्याला १९९२ च्या विश्‍व करंडक स्पर्धेत घेऊन गेला. सुरवातीला तो अपयशी ठरला. पण इम्रानला स्वतःच्या गुणग्राहक कुवतीबद्दल आत्मविश्वास असावा. त्याने सतत संधी दिली.उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाच्या २६२ धावांचा पाठलाग करताना त्याने ३७ चेंडूत ६० धावा केल्या आणि अंतिम सामन्यात ४२ धावा. पाकिस्तानच्या विश्‍व करंडक स्पर्धेचा तो विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने मग कधीही मागे वळून पहिले नाही.

ब्राझीलच्या फुटबॉलपटू प्रमाणे पाकिस्तानचे बहुतेक खेळाडू तळागाळातील आहेत. मजीद खान, जावेद बर्की, इम्रान, वकार, रमीझ राजा वगैरे अपवाद. आपण आज पाहतो की, त्यांचे खेळाडू इंग्लिश बोलू शकत नाहीत. त्यांची मुलाखत ही हिंदीमध्ये घेतली जाते. शाहीन आफ्रिदीने मॅच जिंकल्यानंतर आपली मुलाखत पूर्णपणे हिंदीत दिली. पाकिस्तान हा दीर्घकाळ ताकदवान संघ कधी झाला नाही. पण अचानक जगातल्या सर्वोत्कृष्ट संघाला चिरडायची ताकद त्यांच्याकडे नेहमी होती. या ताकदीचा आम्ही आदर करतो. शत्रूचं कौतुक करणं ही आमची संस्कृती आहे आणि म्हणून जिंकल्यावर काही पाकिस्तानी धर्मांधांनी धार्मिक फुत्कार टाकूनही मला विराटच्या कृतीचं कौतुक वाटलं.

- द्वारकानाथ संझगिरी

dsanzgiri@hotmail.com

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व साहित्यिक आहेत.)

----------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com