वाचनविकास चळवळीच्या शास्त्राचा आरंभबिंदू

इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान व पर्यावरण हे विषय एकमेकांत हात गुंफून येतात.
आरंभबिंदू
आरंभबिंदूsakal

राजन गवस

वाचन महत्त्वाचं आहे, असं म्हणत राहायचं; पण त्यासाठी ठोस काहीही करायचं नाही, यातून आपलं भविष्य कसं घडणार? आपण एखादा विचार सर्वदूर कसा पोहोचवता येईल, याची पद्धत वा शास्त्र तयार करण्याचा विचार कधीही केला नाही. एक पुस्तक किंवा पुस्तकातील विचार कोणापर्यंत व कसा पोहोचेल, त्याचा त्या विचारांच्या बाजूने व विरोधात असणाऱ्यांवर काय परिणाम होईल, हे कसं जाणता येईल? त्या विचारांत तसूभर का असेना वाढ व्हावी, अशी पुस्तकाकडे नेणारी पद्धत आपण तयार केली नाही. थोडक्यात, वाचनवाढ व्हावी यासाठी आपण पद्धतशीरपणे काहीच केलं नाही.

आपण शिकतो आणि वाचायला लागतो. याच्या उलट कलांचं आहे. संगीताचा कान तयार व्हावा लागतो. तुमची दृष्टी विकसित झाली असेल, तर तुम्ही चित्र बघू शकता. म्हणजे कला उमजून घेण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचं शिक्षण आवश्यक असतं. पुस्तकाच्या आत्म्याला स्पर्श करता येईल असं वाचन विकसित करण्यासाठी अशी पद्धत का नसावी? मराठी संस्कृतीचं दारिद्र्य हे आहे की, आपण याबाबतीत काहीही काम केलं नाही. आपल्या सार्वजनिक जीवनाच्या ऐरणीवर वाचनविकास हा मुद्दा कधीही येऊ शकला नाही.

शाळा-कॉलेजमधून, तसंच सर्वसामान्य वाचकांपर्यंत जाऊन वाचनविकासाचा आरंभ करणे, हे आपल्याला शक्य नव्हतं? आपल्याकडे असंख्य वाचनालयं असून त्यांत भरपूर पुस्तकं आहेत, तरीही वाचनविकास करायचा असतो, या दृष्टीचा अभाव आहे. वाचकाची वाचन-अभिरुची वाढावी आणि ती आपली जबाबदारी आहे, त्यासाठी प्रशिक्षण विकसित केलं पाहिजे, असा विचार होताना दिसत नाही. ‘ग्रंथाचिया द्वारी - जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा’ या पुस्तकाद्वारे अतुल देऊळगावकर वाचकाला सजग व उन्नत करतात. इतकंच नाही तर त्याला खडबडून जागंही करतात. त्याच्या मनात प्रश्नही निर्माण करतात आणि त्यातून वाचनविकासाची पद्धती सादर करतात.

आपल्या वाचनात काही क्रम असू नये का? समजा, आपण पहिल्यांदा नारायण धारप वाचले, नंतरच्या काळात हातात पडेल ते वाचत गेलो तर... तो वाचक मोकाट पद्धतीने जात मोकाट वाचक होणार. ‘ग्रंथाचिया द्वारी’ हे पुस्तक वाचनविकास चळवळीच्या शास्त्राचा आरंभबिंदू आहे, असं मला वाटतं. अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचा एकत्र परिचय देत देऊळगावकर आपल्याला ‘ग्रंथाच्या द्वारी’ नेऊन सोडतात. वाचनाचा उद्देश काय असावा? विरंगुळा, वेळ घालवणं की ज्ञानाच्या कक्षांचा विस्तार? ही प्राथमिकता प्रत्येकाने कधीतरी ठरवणं आवश्यक आहे. वाचनाने व्यक्तीला उन्नत केलं पाहिजे, बदललं पाहिजे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, ‘जग बदलण्याची जबाबदारी ही वाचकावर असते,’ याचं भान त्याला आणून दिलं पाहिजे. यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक मोलाचं आहे.

इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान व पर्यावरण हे विषय एकमेकांत हात गुंफून येतात. संगीत, चित्र, वास्तुकला व चित्रपट ह्या कला परस्परावलंबी आहेत, याची जाणीव देऊळगावकर करून देतात, त्यासाठी ते उत्तमोत्तम ग्रंथांची निवड करून त्यांचं मर्म आपल्या हातात ठेवतात. त्यामुळे प्रत्येक विषयाचा केवळ परिचय न होता त्या त्या विषयातील कळीचे प्रश्न व सिद्धांत ध्यानात येतात. आपण नकळत विचार करू लागतो. एकंदरीत ह्या पुस्तकामुळे मराठी वाचन चळवळीस पुढे नेण्यासाठी अतिशय आवश्यक अशी सैद्धांतिक सिद्धांत मांडणी करणारं हे ऐतिहासिक महत्त्वाचं पुस्तक आहे. अशा पुस्तकांचा प्रसार करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com