मला प्रेरणा मिळते, ती हुतात्मा वणी यांच्याकडून...

मला प्रेरणा मिळते, ती हुतात्मा वणी यांच्याकडून...

'त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले, ही बातमी समजल्यानंतरही मला रडू आलं नव्हतं.. माझ्या आतच कुठलीतरी शक्ती होती, ज्यामुळे मला रडता आलं नाही..' देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या लान्सनाईक नझीर अहमद वणी यांची पत्नी महजबीन सांगत होत्या.. वणी यांना शांततेच्या काळातील सर्वोच्च 'अशोक चक्र' पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त वणी यांची ही वीरगाथा आपल्याला माहीत असायलाच हवी.. 

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही घटना घडली. मूळचे काश्‍मीरमधीलच असलेले वणी दहशतवादाचा मार्ग सोडून 2004 मध्ये लष्करात दाखल झाले. लष्कराच्या 162 व्या इन्फंट्री बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू होती. त्यामध्येच 25 नोव्हेंबरला एक चकमक झाली. हिरापूर गावात वणी यांची टीम आणि सहा दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्या दहशतवाद्यांमध्ये 'लष्करे तोयबा'चा एक कमांडर होता. 

लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली. त्यात वणी यांनी त्या कमांडरला यमसदनी धाडले. त्याच्याबरोबर एक इतर देशातील दहशतवादीही होता. त्यालाही वणी यांनी ठार केले. या चकमकीमध्ये वणी यांना अनेक गोळ्या लागल्या. एक गोळी तर त्यांच्या डोक्‍यात लागली. घायाळ झालेल्या अवस्थेतही त्यांनी आणखी एका दहशतवाद्यावर हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केले. वणी यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. 

अतुलनीय कामगिरीबद्दल वणी यांना 2007 आणि 2018 मध्ये सेना पदकाने गौरविण्यात आले होते. गेल्या वर्षी त्यांनी एका दहशतवाद्याला अत्यंत जवळून नि:शस्त्र केले होते आणि ठार मारले होते. या कामगिरीबद्दल त्यांना गेल्या वर्षी हे पदक मिळाले होते. 

त्यांच्या हौतात्म्यानंतर जवळपास दीड महिन्यांनंतर त्यांची पत्नी महजबीन यांची 'पीटीआय'ने मुलाखत घेतली होती. त्यात महजबीन वणी यांच्याविषयीच्या भावना आणि त्यांचं विश्‍व याविषयी हळवेपणाने बोलल्या होत्या. 

'आम्ही शाळेत भेटलो होतो. पहिल्या भेटीतच एकमेकांवर प्रेम जडले होते. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझ्यासाठी ते मार्गदर्शकच होते. आपल्या आजूबाजूच्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. मी शिक्षिका आहे. माझ्या देशासाठी चांगले आणि सुजाण नागरिक घडविण्याचे काम मी यापुढेही सुरू ठेवणार आहे आणि यासाठी मला प्रेरणा मिळते ती वणी यांच्याकडून..' महजबीन सांगत होत्या.. आपल्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या वणी यांचे कुटुंबीयही आता देशासाठी काम करत आहेत.. सलाम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com