विक्रांतची अधुरी विजया...

अंगावर पांढरे कपडे, भिंगासारखा जाड चष्मा, तो कलाकार माझ्यासमोर एका दगडाला कोरत बसला होता. तिथं वेगवेगळ्या आकाराच्या छोट्या-मोठ्या मूर्ती बघायला मिळत होत्या.
story of stone statue artist vikrant and his lover vijaya
story of stone statue artist vikrant and his lover vijayaSakal

कर्नाटकातला कार्यक्रम संपवून मी कोल्हापूरला निघालो. वाटेत जेवायला थांबलो. त्या दरम्यान मला एक फोन आला आणि मी फोन घेत हॉटेलच्या मागच्या दारातून बाहेर डोकावत होतो. बाहेर दगडांत कोरलेल्या मूर्ती मला बघायला मिळाल्या. मी त्या आचाऱ्याला विचारलं, ‘‘एवढ्या जबरदस्त मूर्ती कोणी तयार केल्या.’’

तो म्हणाला, ‘‘आमच्या मालकाचा मित्र आहे, तो बघा तिथं बसला आहे.’’ त्या आचाऱ्यानं दूर एका झाडाकडं माझं लक्ष वेधलं. मी तिकडं पाहिलं, जिथं तो माणूस मूर्ती घडवत बसलेला होता. आचारीमामांचा स्वयंपाक होईपर्यंत आपण त्या मूर्तीवाल्याला जाऊन भेटावं, त्याचं अभिनंदन करावं, या उद्देशानं मी त्या मूर्तीवाल्याकडं निघालो.

अंगावर पांढरे कपडे, भिंगासारखा जाड चष्मा, तो कलाकार माझ्यासमोर एका दगडाला कोरत बसला होता. तिथं वेगवेगळ्या आकाराच्या छोट्या-मोठ्या मूर्ती बघायला मिळत होत्या. तो मूर्तिकार कामामध्ये इतका दंग झाला होता, की मी त्याच्याजवळ जाऊन थांबलो तरी त्याचं माझ्याकडं लक्ष नव्हतं. मीही शांतपणानं ते ज्या दगडाला आकार देत होते ते पाहत होतो.

ते मूर्तिकार, आईचं शिल्प साकारत असावेत असं मला वाटलं. माझी चाहूल लागल्यानं माझ्याकडं मान वळवत मला ते म्हणाले, ‘‘आपण इथं कसं काय ? कोण आहात आपण ?’’ मी म्हणालो, ‘‘क्षमा करा, तुम्हाला न विचारता मी इकडं आलो.

मी तुम्हाला पाहत होतो. हॉटेलमधल्या आचारीमामानं तुमच्या कलेविषयी मला सांगितलं. त्यामुळं उत्सुकता निर्माण झाली, म्हणून मी आपल्याकडं आलो.’’ ते एकदम शांत झाले. ते जी मूर्ती कोरत होते, ती मी पाहत होतो.

आजूबाजूच्या प्रत्येक शिल्पामध्ये प्रचंड वेदना आणि दुःख मला दिसत होतं. मी त्यांना म्हणालो, ‘‘ फार वेदनादायी शिल्प आहे हे, नेमकं तुम्हाला यातून काय सांगायचंय.’’ ते काहीच न बोलता एकाग्रतेनं काम करत होते. मी त्या मूर्तीविषयी पुन्हा विचारल्यावर ते मूर्तिकार मला म्हणाले, ‘‘आता या आईच्या मांडीवरचं बाळ शांत झालंय. आता ते कधीच उठणार नाही.

अनेक दिवसांपासून उपाशी असलेली आई बाळाला दूध देईल तरी कशी?’’ खंबीर असलेली आई आता अश्रू देखील ढाळत नाही. कारण तिला अनेकांची काळजी होतीच. शिवाय आईच्या डोळ्यात अश्रू देखील शिल्लक नाहीत.

ते मूर्तिकार ज्या मूर्तीविषयी सांगत होते, त्या मूर्तीतल्या आईच्या डोळ्यांतून पाणी येत असल्याचं शिल्प होतं ते. मला हे सांगणाऱ्या मूर्तिकारांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. आता त्यांनी त्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली.

अतिशय नम्रपणे ते माझ्याशी बोलत होते. माझी मात्र बडबड सुरू होती. ते मूर्तिकार कोण ? ते कुठून आले ? त्यांनी केलेल्या मूर्ती एकाच जाग्यावर का आहेत ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांच्याकडून जाणून घेत होतो.

मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांचं नाव विक्रांत कारन्त. विक्रांत मूळचे कर्नाटकमधले. विक्रांत यांचे वडील, आजोबा आणि त्यापूर्वीची पिढी सुद्धा दगडाचं कोरीव काम करायची. विक्रांत मात्र पारंपरिक कोरीव मूर्तीच्या कामाकडं वळले नाहीत. त्यांनी केवळ वेदना मांडणाऱ्या कलाकृती साकारणं पसंत केलं.

एका अपघातामध्ये विक्रांत यांचं अवघं कुटुंब गेलं. दु:खातून थोडे सावरल्यावर विक्रांत भ्रमंतीला निघाले. त्या भ्रमंतीमध्ये विक्रांत यांना विजया नावाची सहचारिणी मिळाली. विजया साहित्यिक होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ते दोघे जण उज्जैनजवळ नर्मदाकाठी एकत्रित राहू लागले. विजयाला एक छंद जडला होता. नर्मदेच्या आतमध्ये बोटीनं जायचं आणि तिथं शांत जागा बघून काहीतरी लिहीत बसायचं.

विक्रांत हा झोपडीच्या समोर दगडावर कोरीव काम करत बसायचा. एका रात्री अशीच विजया बोटीमध्ये बसून नर्मदेमध्ये गेली. आख्खी रात्र संपली तरी तिचा पत्ता नाही. दुसऱ्या दिवशी विक्रांत विजयाचा शोध घ्यायला गेला, तेव्हा ती कुठेही सापडली नाही.

विजया कुठं निघून गेली ? पाण्यामध्ये पडून गेली ? नेमकं काय झालं ? हे आज पंधरा वर्षे झाली तरी कोडं सुटत नव्हतं. विक्रांत उज्जैनवरून पुन्हा कर्नाटकमध्ये परत आला. तो सतत आजारी असायचा. त्याच्या मित्रांनी, ज्यांचं हे हॉटेल होतं त्यांनी विक्रांतला इथं आणलं. त्याच्या पालन-पोषणाची सगळी जबाबदारी स्वीकारली. त्याचं शरीर थकलेलं आहे, पण त्यांच्याकडून ज्या काही कलाकृती निर्माण होत आहेत, त्या जबरदस्त आहेत.

आपल्या हॉटेलवाल्या मित्राला त्यांनी एकच अट घातली, ती म्हणजे जी काही कलाकृती ते करतील, ती कलाकृती त्याच्या पश्चात कोणाला तरी त्यांनी भेट म्हणून द्यायची. विक्रांतचा निरोप घेऊन मी निघणार, तितक्यात विक्रांत म्हणाला, ‘‘इकडं या, तुम्हाला मी काहीतरी दाखवतो.’’

एका भल्यामोठ्या मूर्तीच्या समोर जाऊन थांबून त्या मूर्तीवर झाकलेलं कापड त्यानं काढलं. एका सुंदर स्त्रीचं रूप त्या मूर्तीच्या माध्यमातून त्यानं साकारलं होतं. त्या मूर्तीवरचं कापड काढताच विक्रांतनं त्या मूर्तीला घट्ट मिठी मारत आसवांना वाट मोकळी करून दिली. विक्रांत म्हणाले, ‘‘हीच माझी विजया, ती अजून माझी वाट पाहते.’’

विक्रांत यांची समजून तो आचारी काढत होता. विक्रांत यांचं आयुष्य म्हणजे कमालीचं आहे. तो कलाकार म्हणून जगला, कलाकार म्हणूनच आता सन्मानानं आयुष्याचा प्रत्येक दिवसही काढतोय. त्याची कलाच त्याची सोबती बनली आहे.

माझा पाय तिथून हालत नव्हता. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. नियती एखाद्याबरोबर किती वाईट वागते, विक्रांतच्या बाबतीत नियतीचा खेळ अजब होता. हा हळव्या मनाचा कलाकार आपल्या भावना दगडावर कोरतो खरा, पण त्याच्या मनातलं दुःख काही केल्या कमी होत नाही. विक्रांत यांचं एकटेपण माझ्या मनाला एकदम बोचत होते. विक्रांतच्या वेदना या माझ्या वेदना आहेत, असंच मला वाटत होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com