लोकबिरादरीच्या विद्यार्थिनींच्या कर्तृत्वाने दुमदुमते क्रीडा क्षेत्रही

अनिकेत आमटे संचालक, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा
Saturday, 25 July 2020

गेल्या 6-7 वर्षात ज्या पंचकन्यांनी लोक बिरादरी प्रकल्पाचे व भामरागड तालुक्‍याचे नाव भारतभर गाजविले आहे त्यांच्याबद्दल आपण थोडे जाणून घेऊया.

हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाने जसे शाळेच्या माध्यमातून उच्च शिक्षित विद्यार्थी घडवलेत तसेच क्रीडा क्षेत्रात सुद्धा राष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू घडविले आहेत. अनेक वर्षांपासून लोक बिरादरी आश्रमशाळेचे विद्यार्थी राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे तसचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात.
गेल्या 6-7 वर्षात ज्या पंचकन्यांनी लोक बिरादरी प्रकल्पाचे व भामरागड तालुक्‍याचे नाव भारतभर गाजविले आहे त्यांच्याबद्दल आपण थोडे जाणून घेऊया.

कु. काजलसोमा मज्जीहि 16 वर्षांची मुलगी. मिडदापल्ली हे भामरागड तालुक्‍यातील अति दुर्गम गाव. साधारण 30 किलोमीटर तालुक्‍याच्या ठिकाणापासून दूर. रस्ते अगदी नसल्यासारखे. पावसाळ्यात जाणे केवळ अशक्‍य. बाबा आई शेतकरी. घरी 2 मोठ्या बहिणी आणि एक छोटा भाऊ. काजलचे 5 वी पर्यंतचे शिक्षण हे लोक बिरादरी आश्रमशाळेत झाले.

तिच्यातील जिद्द, चिकाटी व काटकपणा तसेच काटक शरीरयष्टी आमच्या शाळेतील उत्तम क्रीडा शिक्षक विवेक दुबे यांनी ओळखली. 2014 मध्ये आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत तिने सहभाग नोंदवला. शाळेची जबाबदारी सांभाळणाऱ्या समीक्षाच्या(माझी पत्नी) कायम मिळणाऱ्या प्रोत्साहनाने आणि मनाने प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्या सारिका गायकवाड यांच्या मदतीने दुबे सर प्रकल्पातील काही निवडक खेळाडू घेऊन औरंगाबाद येथे असलेल्या भारतीय खेळ प्राधिकरणमध्ये दाखल झाले.

तिथे त्यांची निवड चाचणी झाली. त्यात लोक बिरादरी आश्रमशाळेचे विद्यार्थी विविध खेळासाठी पात्र ठरले. त्यात काजल होती. लांब उडी हा तिचा क्रीडा प्रकार होता. आमच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बाब होती. निवड तर झाली. राहण्याची - जेवणाची उत्तम सोय क्रीडा संकुलात होतीच. शाळेचा प्रश्न होता. पण तो सारिकाने सोडवला. क्रीडा संकुलापासून जवळच एक ज्ञानेश्वर विद्यालय होते तेथे त्यांची शिक्षणाची सोय झाली. सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास व्यायाम आणि तेथील कोच सुब्बाराव सर यांच्या मार्गदर्शनात सराव सुरू झाला. मधल्या वेळेत शाळा. संपूर्ण दिवस व्यस्त. 2015 पासून विविध स्पर्धेत सहभाग घेणे सुरू झाले.

2016 मध्ये नागपुरात खेळविण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत काजलने 3 रा नंबर पटकावला. 2017 मध्ये 2 रा नंबर. त्यानंतर 2017 मध्ये नागपुरात भरविण्यात आलेल्या वेस्टझोन नॅशनल स्पर्धेत तिने लांब उडी मध्ये 1 ला नंबर पटकावला. ज्युनिअर नॅशनल ओपन क्रीडा स्पर्धेत आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे तिने 2 रा नंबर पटकावला. तिची उत्तम कामगिरी बघून 2018 मध्ये तिला अंजु बॉबी जॉर्ज यांच्या बंगलोर येथील क्रीडा ऍकेडेमीत 2 महिन्यांचे ट्रेनिंगकरिता पाठविले गेले. 2018 मध्येच तिची निवड खेलो इंडियामध्ये झाली. आणि तिला केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याने ओरिसा मधील भुवनेश्वर येथे असलेल्या खेलो इंडिया ऍकॅडेमीत प्रवेश दिला. येथे ती 5 वर्ष राहणार. तेथील सर्व खर्च केंद्र सरकार मार्फत केला जातो. 2019 मध्ये ओरिसा स्टेट फेडरेशन क्रीडा स्पर्धेत 1 ला नंबर पटकावला. पुढे ओरिसातर्फे खेळात इस्ट झोनराष्ट्रीय स्पर्धेत 2 रा नंबर पटकावला. जानेवारी 2020 मध्ये खेलोइंडियामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी तिला यश आले नाही. पण खचून न जाता तिची प्रॅक्‍टिस जोरात सुरु आहे. तिचा लांब उडीचा सध्याचा रेकॉर्ड 5.48 मीटर इतका आहे. पुढे सर्व सुरळीत सुरु राहिले तर ऑलिम्पिक स्पर्धेत येथील विद्यार्थी नक्कीच भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील. यावर्षी तिने औरंगाबाद येथून 10 वी ची परीक्षा दिली आहे.

अशीच गोष्ट कल्पना शंकर मडकामीची आहे. तिचे गाव गोंगवाडा. तेही तितकेच दुर्गम. तिला 2 भाऊ अन एक बहीण आहे. आई वडील शेतकरी. वय 15 वर्ष. 2016 मध्ये आदिवासी विकास विभागाच्या राज्य स्तरीयस्पर्धेत तिने लांब उडी मध्ये 1 ला नंबर पटकावला. 7 वि मध्ये शिकत असताना 2017 मध्ये तिची निवड भारतीय खेळ प्राधिकरण, औरंगाबाद येथे झाली. महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यास निवड झाली नाही म्हणून तिच्या सरांनी तिला आंध्र प्रदेश राज्याकडून खेळविण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये आंध्रप्रदेशातील स्टेट फेडरेशन च्या स्पर्धेत तिने 1 ला नंबर पटकावला.

जुनिअर नॅशनल क्रीडा स्पर्धेत 2015 सहभाग नोंदवला. 2017 मध्ये तिला महाराष्ट्र स्टेट फेडरेशन च्या स्पर्धेत 1 ला नंबर पटकावला. रायपूर येथे झालेल्या वेस्टझोन क्रीडा स्पर्धेत 2 रा नंबर पटकावला. भोपाळ येथे 2 महिन्यांच्या नॅशनल ट्रेनिंगकॅम्प मध्ये तिची निवड झाली. 2019 मध्ये पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला. इंटरडिस्ट्रिक्‍ट नॅशनल मध्ये 2017 आणि 2019 साली विशाखापट्टणम येथे सहभाग नोंदवला. राजस्थान येथे वेस्टझोन स्पर्धा खेळताना 2019 मध्ये 2 रा नंबर पटकावला. या वर्षी तिने 9 वी ची परीक्षा दिली.

कल्पनाची मोठी बहीण सगुणाशंकर मडकामी हिसुद्धा खेळाडू आहे. लोक बिरादरी आश्रमशाळेत शिकत असताना 9 वी मध्ये तिला भारतीय खेलप्राधिकरण, औरंगाबादला प्रवेश मिळाला. भालाफेक मध्ये तिने उत्तम कामगीरी निभावली होती. शाळेत असताना तिने उंच उडी आणि भालाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. राष्ट्रीय स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेत 2015 मध्ये तिने भालाफेक मध्ये रानंबर पटकावला. आता तीऔरंगाबाद येथे BA करीत आहे. आणि युनिव्हर्सिटीतर्फे क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असते. कु. प्रियंकालालसूओकसा, मल्लमपोडूर गावची. वय 14 वी पास. 8 वी पर्यंत प्रकल्पाच्या शाळेत होती. पुढे भारतीय खेल प्राधिकरण, औरंगाबाद येथे राहून तिने 800 मीटर रनिंग स्पर्धेत राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर खेळविण्यात आलेल्या विविध स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे.

कु. रोशनी साधू मज्जीहिगोंगवाडा गावची. वय 15 वर्ष. 9 वी पास. आदिवासी विकास विभागाच्या स्टेट लेव्हल स्पर्धेत तिने गोळा फेक क्रीडा प्रकारात 2016 मध्ये 1 ला नंबर पटकावला आहे. पण पुढे भारतीय खेल प्राधिकरण येथे प्रवेश मिळाल्यावर तिला 400 मीटर रनिंगसाठी निवडण्यात आले. तिने सुद्धा अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

औरंगाबादला ट्रेनिंग घेत असलेल्या वरील पाचही खेळाडू मुली अतिमागास अशा माडिया समाजातील आहेत. आज लोक बिरादरी आश्रमशाळेत शिकणाऱ्या बोटानंफुंडी येथील मीनाउसेंडी या मुलीने गेली दोन वर्ष भाला फेकमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आणि 2 वर्ष सलग राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लोक बिरादरी प्रकल्पाच ेहितचिंतक सुद्धा अधून मधून यांना मदत करीत असतात. यात सर्वात महत्वाचा वाटा हा क्रीडा प्रशिक्षक, प्रोत्साहन देणारे मुख्याध्यापक व शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचा असतो.अशा दुर्गम भागातील खेळाडूंना आपण योग्य संधी दिली तर पुढे ते आपल्या देशाचे नाव जगात नक्कीच मोठ करतील यात मला तरी शंका वाटत नाही. गरज आहे ती प्रोत्साहन आणि संधी देण्याची.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The success of Lokbiradari students in the field of sports