रकमेचं सुलभ हस्तांतर (सुधाकर कुलकर्णी)

sudhakar kulkarni write bank article in saptarang
sudhakar kulkarni write bank article in saptarang

बॅंकामधल्या तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिणामी बॅंकिंग सेवा जास्तीत जास्त तत्पर, पारदर्शी आणि ग्राहकाभिमुख होत आहेत, याचं एकूण प्रमुख उदाहरण म्हणजे फंड ट्रान्स्फर करणे ही बाब एनईएफटी, आरटीजीएस व आयएमपीएस या सुविधांमुळं अगदी जलद आणि सुलभ झाली आहे. या सगळ्या सुविधांद्वारे रक्कम एका खात्यावरून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करता येत असली, तरी त्यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. या सुविधांबाबत आपण थोडक्‍यात माहिती घेऊ.

एनईएफटी : नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) ही सुविधा आता नेट बॅंकिंग;  तसंच मोबाईल बॅंकिंगद्वारा बॅंक ग्राहकास घरबसल्या वापरता येते. ही सुविधा वापरून आपण देशभरात कुठंही फंड ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा कशी वापरता येते हे आता पाहू. यासाठी नेट बॅंकिंगला लॉगिन करून फंड ट्रान्स्फर हा पर्याय निवडून त्यातला एनईएफटी हा पर्याय निवडावा. आपण सबंधित व्यक्तीस अथवा संस्थेस प्रथमच फंड ट्रान्सफर करत असाल, तर प्रथम एनईएफटीसाठी सबंधिताची नोंदणी करावी लागते. त्यासाठी संबंधिताचं पूर्ण नाव, बॅंकेचं नाव/शाखा, खाते नंबर, खात्याचा प्रकार, आयएफएससी कोड ही माहिती भरून सबमिट केलं, की आपल्या मोबाईलवर यूआरएन (युनिक रजिस्ट्रेशन नबर) असलेला एसएमएस येतो. हा नंबर ज्या ठिकाणी टाकणं आवश्‍यक असतं, तिथं तो भरून आपल्या बॅंक खात्याचा लॉगिन आयडी आणि ट्रान्झॅक्‍शन आयडी देऊन संबंधिताचं खातं एनईएफटीसाठी नोंदिवलं जातं. ही नोंदणी एखाद्याला प्रथमच फंड ट्रान्स्फर करताना करावी लागते. पुढच्या फंड ट्रान्स्फरसाठी करावी लागत नाही. मात्र नोंदणी केल्यापासून पुढचा एक तास फंड ट्रान्सफर करता येत नाही. आपल्याला ज्यांना वेळोवेळी फंड ट्रान्स्फर करावे लागत असतील, अशा सर्वांचं सुरवातीला रजिस्ट्रेशन केल्यास हवं तेव्हा आपल्याला त्यांना रकमेचं हस्तांतर करता येतं. मात्र, ही सुविधा वापरून एका दिवसात एका व्यक्तीस पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्स्फर करता येते. या पद्धतीनं ट्रान्स्फर केलेले फंड सर्वसामान्यपणे पुढच्या तासाभरात संबंधिताच्या खात्यात जमा होतात. ही वेळ तांत्रिक गोष्टी, संबंधित व्यवस्था यांच्यानुसार पुढंमागं होऊ शकते. मात्र, जर आपण फंड ट्रान्स्फर शेवटच्या तासात केले असतील, तर रक्कम पुढच्या दिवशी संबंधिताच्या खात्यात जमा होते. ही सुविधा सोमवार ते शनिवार सकाळी आठ ते सायंकाळी सात या कालावधीत वापरता येते. (दुसरा आणि चौथा शनिवार सोडून.) १० जुलैपासून सेटलमेंट दर अर्ध्या तासानं होत असून, दिवसातून एकूण २३ वेळा सेटलमेंट होत असल्यानं तासाभरात फंड ट्रान्स्फर होऊ शकते. एनईएफटीसाठी बहुतांश बॅंका ठराविक शुल्क आकारतात. त्या त्या बॅंकेच्या नियमांनुसार हे शुल्क वेगवेगळं असतं.
आरटीजीएस : आरटीजीएस म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. यात आपण ट्रान्स्फर केलेली रक्कम तत्क्षणी संबधिताच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित असतं. यात होणारी सेटलमेंट ही एनईएफटीप्रमाणं नेट सेटलमेंट पद्धतीनं न होता प्रत्येक व्यवहाराची स्वतंत्रपणे होत असते. ही सुविधा मोठी रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी वापरली जाते. आरटीजीएस ही सुविधा सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत उपलब्ध असते. ही सुविधा वापरून एका दिवसात दोन ते दहा लाख रुपयांपर्यंत रक्कम ट्रान्स्फर करता येते. दोन ते पाच लाख रुपयांपर्यंत २५ रुपये, तर त्यापुढे ५० रुपये अधिक जीएसटी इतकं शुल्क भरावं लागतं.

आयएमपीएस : एनईएफटी आणि आरटीजीएस या दोन्हीची पुढची पायरी म्हणजे आयएमपीएस म्हणजेच इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. या सुविधेस वेळेचं बंधन नसून ही सुविधा २४x७ उपलब्ध असते. अगदी सुटीच्या दिवशीसुद्धा ही सुविधा मोबाईल; तसंच नेट बॅंकिंगद्वारा वापरता येते. मात्र, यासाठी बेनिफिशियरीचा एमएमआयडी नंबर आवश्‍यक असतो. एमएमआयडी हा सात-आकडी मोबाईल मनी आयडेंटिफिफिकेशन नंबर असून या पद्धतीनं रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी बेनिफिशीयरीचा एमएमआयडी, मोबाईल नंबर आणि नावही माहिती आवश्‍यक असते. इथं बॅंकेचं नाव; तसंच खाते नंबर माहीत असणं गरजेचं नाही. आयएमपीएससाठी दहा हजार रुपयांपर्यंत २.५ रुपये, दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पाच रुपये, तर एक ते दोन लाख रुपयांपर्यंत १५ रुपये अधिक जीएसटी इतकं शुल्क द्यावं लागतं.

थोडक्‍यात वरीलपैकी कोणतीही एक पद्धती वापरून आपण घरबसल्या आपल्या सोयीनुसार रकमेचं सहजगत्या हस्तांतर करू शकतो आणि यातून वेळेची, पैशाचीही बचत करू शकतो. सध्याच्या डिजिटल पेमेंटच्या जमान्यात आपण या सुविधांचा वापर करणं आवश्‍यक आणि हितावह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com