बंगालची ‘वाघीण’

mamta-banerjee
mamta-banerjee

वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर पंतप्रधान कार्यालयात काम करत असे. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसशी समन्वय राखण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. कामानिमित्त माझं कोलकत्याला नेहमी येणं-जाणं असायचं. या शहराच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि  तिथल्या लोकांचा मी चाहता आहे.   
‘कोलकत्यातील कालीमंदिर तुम्ही पाहिलं आहे का?’’ त्या व्यक्तीनं मला एकदा विचारलं. 
‘नाही,’’ मी उत्तरलो.
‘कालिमातेचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही परत कसे जाऊ शकता? उद्या मी तुम्हाला तिथं घेऊन जाईन,’’ असं उत्तर मिळालं. 
दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता अटलजींच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री असलेली ती व्यक्ती माझ्याबरोबर मंदिरात आली. 
‘कालिमातेची पूजा करण्यासाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे,’’ असं ती व्यक्ती म्हणाली. 
ही ‘ती’ व्यक्ती म्हणजे ममता बॅनर्जी! 
कम्युनिस्टांचा काळ सरल्यानंतरच्या बंगालमधील सर्वांत प्रभावी नेत्या! 

पश्र्चिम बंगालमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या प्रचारात याच ममतांची अटलजींच्याच पक्षाकडून हिंदूविरोधी म्हणून हेटाळणी केली जात आहे. भारतीय जनता पक्षामधून २०१२ मध्ये बाहेर पडण्यापूर्वी त्या पक्षामधील माझ्या दीर्घ कारकीर्दीत इतर कोणत्याही नेत्यापेक्षा ममतांबरोबर सर्वांत चांगला संपर्क माझाच होता. या आधारावर मी अगदी ठामपणे सांगू शकतो, ‘ममता या श्रद्धाळू हिंदू असून आधुनिक काळात बंगालमध्ये जन्मलेल्या महान व्यक्तींपैकी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या दोन आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांचा त्यांच्यावर मोठाच प्रभाव आहे. त्याबरोबरच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि विद्रोही कवी काझी नझरुल इस्लाम या अविभाजित बंगालच्या दोन महान कवींच्या धर्मनिरपेक्ष आणि संमिश्र परंपरांचाही वारसा त्या चालवतात.’ 

नझरुल यांना बांगलादेशानं नंतर राष्ट्रीय कवी म्हणून सन्मानित केलं. पश्र्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या स्वभावाचं इंगित जाणून घ्यायचं असल्यास पुढील दोन घटनांचा संदर्भ पुरेसा आहे : पहिली म्हणजे, बांगलादेशानं टागोरांचं ‘आमार शोनार बांगला’ हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं आहे आणि दुसरी म्हणजे, नझरुल यांचे बंगालभर चाहते आहेत. नझरुल यांनी जशा प्रेषित महंमद यांचं गुणगान करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत, तसेच त्यांच्या लेखणीतून काली, दुर्गा, सरस्वती आणि गंगा यांचीही स्तुती करणारे शब्द उतरले आहेत. ममता या रवींद्रसंगीताबरोबरच नझरुल यांच्या जहाल कविताही सहजपणे गुणगुणतात.    

ममता यांच्यावर हा लेख लिहिण्याचं कारण म्हणजे, मी बंगालमधील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी तिथं नुकताच जाऊन आलो. माझं अनुमान सांगतो : ‘पुढील दोन महिन्यांत काही अकल्पित घडलं नाही तर, तिथली जनता सलग तिसऱ्यांदा ममतांच्या हाती सत्ता देईल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आक्रमक प्रचारमोहिमेच्या जोरावर भाजपच्या जागा निश्र्चितच वाढतील; परंतु २०१६ मधील तिसऱ्या क्रमांकावरून विधानसभेतील २९४ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा मिळवण्याइतपत ही मजल असणार नाही. मात्र, जातीय ध्रुवीकरणाचा हरेक प्रयत्न केलेली प्रचारमोहीम राबवूनही, विश्र्वास बसणार नाही इतका पैसा ओतूनही, तृणमूल काँग्रेसच्या काही नाराज नेत्यांना आणि आमदारांना आपल्या तंबूत ओढूनही, आणि सीबीआयसह ईडीचा राजकीय विरोधकांच्या विरोधात बिनदिक्कत वापर करूनही, समजा भाजपचा पराभव झालाच तरीही, २०२४ च्या संसदीय निवडणुकीत बंगालमध्ये विरोधकांसाठी दारे थोडी किलकिली होणार आहेत.’

बंगालमधील राजकीय किल्ला काबीज करण्याची भाजपची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. अखेर, ती भारतीय जनसंघाचे (भाजपचं पूर्वीचं रूप) संस्थापक डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमी आहे. २०१४ मधील दोन जागांवरून २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत १८ जागांवर झेप घेतल्यानंतर भाजपचा सरकार स्थापण्याविषयीचा आत्मविश्र्वास एकदमच वाढला आहे. या निवडणुकीत त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी (४० टक्के) ही तृणमूलपेक्षा (४३ टक्के) थोडीशीच कमी होती. त्यामुळेच, मोदी आणि शहा या दोघांनी ममता यांना सत्तेवरून घालवणं ही वैयक्तिक प्रतिष्ठेची बाब केली आहे. त्यांना यामध्ये यश मिळणार नाही. मी असं का म्हणतोय त्याची चार कारणं सांगता येतील.   

पहिलं कारण : बंगाली जनतेला राज्याचा मुख्यमंत्री निवडायचा आहे, देशाचा पंतप्रधान नव्हे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील फरक समजण्याइतपत भारतीय मतदार सुजाण आहे. उदाहरणार्थ, मे २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं दिल्लीतील सर्व सात जागा जिंकल्या. तरीही, तिथं काही महिन्यांनंतर लगेचच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षानं त्यांचा धुव्वा उडवत ७० पैकी ६२ जागा मिळवल्या. शिवाय, ममता यांची लोकप्रियता आणि करिष्मा यांच्या जवळपास जाणाराही नेता बंगालमध्ये भाजपकडे नाही. ममतांचे टीकाकारही त्यांचा साधेपणा, स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसामान्य जनतेसाठी अथक् काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीची स्तुती करतात. 

दुसरं कारण : भाजपची मोहीम मुख्यत्वे हिंदुत्व या अजेंड्यावर केंद्रित झाली असून २७ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या राज्यातील हिंदुमतांचं ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्याच हेतूनं त्यांनी ‘जय श्रीराम’ ही निवडणूकघोषणाच करून टाकली असून, अयोध्येत लवकरच बांधल्या जाणाऱ्या भव्य राममंदिराचा शक्य तितका फायदा उठवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. विरोधाभास म्हणजे, केवळ तृणमूलला विरोध करायचा म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील काही गटही भाजपला साथ देत आहेत. ‘पहले राम, बाद मे बाम (डावी विचारसरणी)’ हा त्यांचा त्यासाठीचा तर्क आहे.  

हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध इतिहासकार आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बंधू शरच्चंद्र यांचे नातू असलेले प्रा. सुगत बोस यांनी मला सांगितलं,‘ममता बॅनर्जी यांना हिंदुविरोधी ठरवण्यासाठी आणि मुस्लिमांच्या पाठिराख्या ठरवण्यासाठी अमित शहा हे वारंवार त्यांच्या सरकारवर ‘दुर्गापूजेला आणि सरस्वतीपूजेला परवानगी नाकारली,’ असा आरोप करतात. हे पूर्णतः खोटं आहे.’ त्याचप्रमाणे, मोदींनीही नुकत्याच झालेल्या एका सभेत ‘ज्या घरात बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘वंदे मातरम्’‌ लिहिलं ते घर पडझड झालेल्या अवस्थेत आहे,’ असा दावा करत, ‘हे ममता या मुस्लिमांचं लांगुलचालन करत असल्याचं उदाहरण आहे,’ असं सांगितलं होतं. तेही पूर्णतः खोटं आहे. बंगालमधील वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी बंकिमचंद्र यांच्या योग्य रीतीनं जतन केलेल्या आणि आता संग्रहालयाच्या रूपात असलेल्या घराची छायाचित्रं प्रसिद्ध केली.   

तिसरं महत्त्वाचं कारण : भाजपच्या प्रचारमोहिमेचे मोदी आणि शहा हेच केवळ दोन चेहरे आहेत. त्यामुळे, समजा भाजपचा विजय झालाच तर आपलं राज्य ‘बाहेर’च्या लोकांकडून चालवलं जाईल आणि त्याचा रिमोट कंट्रोल पंतप्रधानकार्यालयात आणि गृहमंत्रालयात असेल, अशी शंका आणि भीती अनेक बंगाली नागरिकांमध्ये वाढत आहे. मी ज्या वेळी ममतांना त्यांच्या कार्यालयात भेटलो, तेव्हा त्या मला म्हणाल्या : ‘‘हा बंगालच्या अस्मितेचा मुद्दा आहे. मी बंगाली जनतेला दिल्लीची वेठबिगार होऊ देणार नाही.’’  

ममता पुढं असंही म्हणाल्या : ‘‘स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याच केंद्र सरकारनं - राज्य सरकारांना राज्यघटनेने दिलेले अधिकार हिरावून घेत - आपल्या हाती इतकी सत्ता एकवटलेली नाही. मी अटलजींबरोबर काम करत होते त्या काळात असं झालं नव्हतं. आम्हा बंगाली लोकांना अटलजींविषयी आदर आहे. कारण, तेही तृणमूलसारख्या छोट्या पक्षाचा आदर करत असत. मोदी आणि शहा हे उद्धट आहेत. त्यांनी भाजप पार बदलून टाकला आहे.’’ 
‘शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला खूप आदर आहे,’’ असं सांगत ममता म्हणाल्या : ‘‘या दोघांनी मोदी-शहांच्या वर्चस्ववादाचा मोठ्या धीरानं सामना केला आहे. त्यांच्यासह इतर प्रादेशिक पक्षांच्या समवेत जाऊन राज्य सरकारांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी, तसंच राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सीबीआय, ईडी, निवडणूक आयोगाचा वापर करणाऱ्या भाजपला रोखण्याची माझी इच्छा आहे. असा गैरवापर रोखला नाही तर भारताची लोकशाही धोक्यात येईल.’’ 

चौथं कारण : राज्यात मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यात तृणमूल सरकारला अपयश आलं असलं तरी या सरकारच्या अनेक ‘गरीब कल्याण योजनां’चं सर्वत्र, विशेषतः ग्रामीण बंगालमध्ये, स्वागत झालं आहे. या कारणामुळेही भाजपला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. 

अर्थात, एक बाब ममता यांच्या विरोधात जाणारी आहे. सरकारी योजना राबवताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचारावर जनता नाराज आहे. मोदी आणि शहा या दोघांनी तृणमूलच्या पंखांखाली चालणाऱ्या या ‘कट मनी’ संस्कृतीवर जोरदार टीका केली आहे. मात्र, कोलकत्यातील एका तटस्थ राजकीय निरीक्षकानं मला सांगितलं की, ‘भ्रष्टाचारात गुंतलेल्या आपल्या सहकाऱ्यांना आणि पक्षकार्यकर्त्यांना न रोखून ममता यांनी निश्चितच घोडचूक केली आहे; पण भाजपमध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असंही अजिबात नाही. निवडणुकीत फारसा पैसा न खर्च करण्याची परंपरा असलेल्या बंगालमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रचारमोहिमेत ओतण्यासाठी भाजपनं कोट्यवधी रुपये कुठून आणले?’ 

बंगालमधील निवडणुकीचं चित्र थोडक्यात सांगतो. कधीही हार न मानता आक्रमकपणे लढणाऱ्या मोदी आणि शहा यांचे ममता यांच्यासमोर आव्हान आहे. ममता यांनी एकटीच्या बळावर राज्यातील ३४ वर्षांची डाव्यांची सत्ता संपुष्टात आणली होती. डाव्यांना असलेल्या त्यांच्या कट्टर विरोधामुळे खरं तर त्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नैसर्गिक सहकारी असायला हव्यात. मात्र, त्यांचा जितका कम्युनिस्टवादाला विरोध आहे तितकाच जातीयवादालाही आहे. त्यामुळेच संघपरिवार त्यांच्यापासून फटकून आहे. म्हणूनच, किमान २०२१ मध्ये तरी बंगालच्या या वाघिणीला पराभूत करणं भाजप-संघपरिवाराला शक्य होणार नाही. 

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, ‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)
(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com