महाराष्ट्र देशा : जात नाकारणाऱ्यांचं गाव

‘जात-पात, धर्माचा विचार मनात बिंबविणाऱ्या काही घटना समाजात अवतीभोवती घडत असतानाच कुणी व्यक्ती ‘अजातीय’ म्हणून जीवन जगू शकते का?’
Mangrul
Mangrulsakal
Summary

‘जात-पात, धर्माचा विचार मनात बिंबविणाऱ्या काही घटना समाजात अवतीभोवती घडत असतानाच कुणी व्यक्ती ‘अजातीय’ म्हणून जीवन जगू शकते का?’

‘जात-पात, धर्माचा विचार मनात बिंबविणाऱ्या काही घटना समाजात अवतीभोवती घडत असतानाच कुणी व्यक्ती ‘अजातीय’ म्हणून जीवन जगू शकते का?’ असा प्रश्न मनात घेऊन अमरावती जिल्ह्याच्या धामणगावरेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीरकडे जाणारा कच्चा रस्ता पार करीत आम्ही पुढील प्रवास करीत होतो. या गावात मागील दोन पिढ्यांपासून काही कुटुंबं अजातीय म्हणून आपली हयात घालवीत असल्याची माहिती मिळाली. मात्र, या कुटुंबांतील सदस्यांना भेटायचं स्थान ठरलं ते गावातील गणपती मंदिर. मनात विचार आला, अजातीय म्हणजेच कुठलीही जात न मानणारे, कर्मकांडापासून कोसो दूर, देवधर्माचा पत्ताच नाही, मग गणपती मंदिर हे कार्यक्षेत्र कसं? अनेक प्रश्न मनात घर करून होते.

गावात शिरताच वेशीवर शाळेत मुलांना घेऊन जात असलेल्या एका महिलेला गणपती मंदिराबाबत विचारणा केली. तिने थोडावेळ आमच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि खुणेनेच पुढे जाण्यास सांगितलं. पुढे मंदिराचा शोध घेत अगदी ‘अजातीय बालेकिल्ला’ असलेल्या गणपती महाराजांच्या ‘कचेरी’समोर, म्हणजेच समाधिस्थळासमोर येऊन आम्ही उभे ठाकलो. त्याचवेळी पांढरीशुभ्र दाढी असलेली, अंगात सफेद शर्ट आणि धोतर, तसंच डोक्यावर त्याच रंगाचा दुपट्टा बांधलेली, अनुभवी वाटत असलेली एक ज्येष्ठ व्यक्ती समोर आली. त्यांची वेशभूषा व हालचाली पाहून वाटलं की, ही व्यक्ती त्याठिकाणी कर्ताधर्ता असावी. श्यामबाबा भभूतकर असा परिचय त्यांनी करून दिला. सोबत हरिचंद्र निमकर होते.

मंदिरसदृश वाटणाऱ्या छोटेखानी सभागृहात प्रवेश करताच आमच्या नजरा कल्पनेतील गणपतीच्या मूर्तीकडे खिळल्या, कारण गणपती मंदिराचा पत्ता विचारत आम्ही याठिकाणी पोहोचलो होतो. मात्र, गणपतीची मूर्ती कुठेच दिसली नाही. दिसलं ते संत गणपती ऊर्फ हरी महाराजांचं छायाचित्र. जरा वेळ छायाचित्राकडे नजर खिळली. थोडा अंदाज आला की, हा देवधर्माचा मामला नाही. ‘आम्ही फार कष्टाने हा लढा दिला आहे; मात्र आता नाइलाज आहे,’ काही कळायच्या आतच श्यामबाबा भभूतकर बोलते झाले. त्यांच्या डोळ्यांत काहीसा संताप दिसत होता. चर्चा सुरू असतानाच ‘जय हरी’चा आवाज आला. अशोक अवघड आले होते. मी नमस्कार म्हटलं, त्यांनी त्याला ‘जय हरी’ने प्रतिसाद दिला. ‘जय हरी?’ असा प्रश्नार्थक चेहरा करीत मी त्यांच्याकडे पाहिलं. ‘होय ना, आम्ही सर्व हरीचीच लेकरं आहोत ना?’ पलीकडून उत्तर मिळालं. ‘‘अजातीय म्हणजे दुसरं-तिसरं काहीच नसून, पांढऱ्या कपड्यांप्रमाणेच मनसुद्धा पांढरं, म्हणजे स्वच्छ ठेवून जीवन जगणं एवढं मर्यादित आहे,’’ असं अवघड म्हणाले.

‘आजोबा, बापाने ‘अजातीय’ म्हणून हयात घालविली; मात्र सरकारी कागदांवर जात लिहिणं आवश्यकच झालं,’’ काहीशा निराशाजनक सुरात हरिचंद्र निमकर म्हणाले. गणपती महाराजांच्या सान्निध्यात कुठल्याही जातीचा झेंडा न घेता स्वतंत्र अजातीय झेंडा अंगाखांद्यावर घेत या मंडळींनी तत्कालीन जातीवर आधारित वर्णव्यवस्थेविरोधात लढा दिला होता. ‘‘दोन पिढ्या खपल्या. आम्हाला लग्नातही कुणी बोलवत नव्हतं. समारंभातून ते हाकलून द्यायचे, पांढरे झेंडेवाले नकोच असं म्हणायचे,’’ डोळे पुसत अशोक अवघड म्हणाले.

‘आजवरच्या जाती-धर्मांच्या अभेद्य भिंतींनी माणसाचं माणूसपण हिरावलं, कर्मकांडांत अनेक पिढ्या गेल्या; मात्र माणूसपण काही आलं नाही. म्हणून आम्ही अजातीय असा उल्लेख आमच्या कागदपत्रांवर केला,’’ श्यामबाबा भभूतकर म्हणाले. ‘अजातीय म्हणूनच आमचीही कारकीर्द संपत आली आहे. गावात अजातीय म्हणवून घेणारी १०-१२ कुटुंबंच शिल्लक राहिली. कोणत्याच जातीत नसल्याने आम्हाला कुणी मुली देत नव्हतं, म्हणून आम्ही आमच्या आमच्यातच सोयरिका करीत गेलो,’’ अशोक अवघड सांगत होते. प्रवाहाच्या विरोधात लढा दिला, कागदपत्रांवरील जातीच्या रकान्यात ‘अजातीय’ हा शब्द लिहून आजही आपल्या निर्णयावर ठाम असणारे शाममहाराज भभूतकर, जितेंद्रनाथ निमकर, संतोष बिरस्कर, अशोक अवघड, हरिचंद्र निमकर, चैतन्यप्रभू भभूतकर यांची कुटुंबं आजही गावात आपल्या घरासमोर श्वेत म्हणजे पांढरा ध्वज लावत मोठ्या अभिमानाने आम्ही ‘अजातीय’ असल्याचं ठामपणे सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. नवीन पिढीच्या शिक्षणाची मोठी समस्या अजातीयमुळे निर्माण झाली आहे. शैक्षणिक कागदांवर इच्छा नसतानाही जातीचा उल्लेख करावा लागत असल्याची खंत हरिचंद्र नीमकर यांनी व्यक्त केली. पर्यायाने ज्यांनी अनेक पिढ्या अजातीय म्हणून समाजात अढळ स्थान निर्माण केलं, त्याच मंडळींवर आज कागदपत्रांवर जात लिहिण्याची वेळ नाइलाजाने का होईना आली आहे.

Mangrul
कधीही दूध न विकणारं गाव

आता नाईलाज झाला

गावाबाहेर असलेल्या ‘श्वेतनिशाणधाऱ्यां’च्या स्मशान-भूमीवर नेत हरिचंद्र पाटलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ‘‘आयुष्यभर प्रस्थापितांच्या शिव्याशाप खात जीवन काढलं, गावाबाहेरील स्मशानभूमीतही भेदाभेद होताच. आम्हाला वेगळी व्यवस्था करून देण्यात आली. आता जमाना बदलला. पुतण्याच्या प्रमाणपत्रावर जात लिहायचा नाइलाज झाला, कारण तो पुढील शैक्षणिक सुविधा मिळवू शकत नव्हता,’’ डोळे पुसत हरिचंद्र पाटील यांनी सांगितलं. गणपती महाराजांचं साहित्य पुनर्लिखित व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पूर्वी आमचे वाडवडील व आम्हालाही खूप त्रास सोसावा लागला, अजातीय म्हणून जगताना काही वेगळे असल्याचा भास होत गेला. समाजाच्या तीक्ष्ण नजरांमुळे मनाचं खच्चीकरण होत होतं; मात्र नाइलाज होता, ‘मिशन’ तर पुढे चालवायचंच होतं. त्या वेळी आम्हाला सांभाळून घेणारं कुणीच नव्हतं, आज थोडंफार समजून घेतात.

- अशोक अवघड

आजही समाजात धर्म-जातीची दरी आहे; मात्र ती पूर्वीइतकी नाही. आज गरीब आणि श्रीमंत यांमधील दरी प्रकर्षाने दिसून येते. आज सोन्याचा काळ सुरू आहे, मात्र कर्मकांडांत तास न् तास घालविले जातात, याचंच दुःख आहे.

- श्यामबाबा भभूतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com