केंद्रीय पीकलागवड संशोधन संस्था

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सन १९१६ मध्ये त्या वेळच्या मद्रास प्रांतीय सरकारनं सध्याच्या केरळमधल्या राष्ट्रीय रस्ता क्रमांक ६६ वरच्या कासारगोड या जिल्ह्याच्या ठिकाणी नारळांवर संशोधन करणारी एक संस्था सुरू केली. १९४८ मध्ये ‘भारतीय नारळ समिती’कडं ही संस्था हस्तांतरित झाली. पुढं १९७० मध्ये केंद्रीय पीकलागवड संशोधन संस्था (सीपीसीआरआय) असा बदल होऊन ही संस्था भारतीय कृषी परिषदेच्या अखत्यारीत आली. त्यानंतर या संस्थेने नारळाबरोबरच काजू, सुपारी, कोको, तेलमाड आणि अन्य पिकांच्याही संशोधनाची व्याप्ती वाढवली.

वरील पिकांच्या उत्पादन आणि प्रक्रियाविषयक तंत्रज्ञानात देशाला जगात उच्च स्थानी घेऊन जाणं हे या संस्थेचं ध्येय आहे. या पिकांसाठी सुधारणा, उत्पादन, संरक्षण, शरीरशास्त्र, जैवतंत्रज्ञान, तसेच पिकांसंदर्भातलं प्रक्रिया तंत्रज्ञान आणि समाजविज्ञान या विषयक्षेत्रांमध्ये संशोधन उपक्रम राबवले जातात. संशोधनासाठी कृषिविज्ञान, रेण्वीय जीवशास्त्र, ऊती-संवर्धन, रोपविषयक रोगनिदानशास्त्र, तसंच कृषिविषयक कीटकशास्त्र आणि सांख्यिकी या प्रयोगशाळांची सुविधा आहे. याखेरीज नारळासह अन्य पिकांच्या जनुकीय पेढीची सुविधा इथं उभारण्यात आली आहे. अलीकडंच इथं कृषिविषयक माहिती व व्यवस्थापन आणि पीकप्रक्रिया केंद्राचीही सुविधा उभारण्यात आली आहे. ७८ हेक्‍टर क्षेत्रातल्या बागेत सीपीसीआरआयकडून देशातल्या आणि जगभरातल्या नारळांच्या ८००, सुपारीच्या ३२५, तर कोकोच्या ५५० जाती जोपासल्या जातात. शेतकऱ्यांसाठी रोपव्यवस्थापनापासून प्रक्रिया-तंत्रज्ञानापर्यंत १५ ते २० विषयांमधलं सल्ला-मार्गदर्शन आणि शेती व पिकांसंदर्भात माती, पाणी आदी घटकांच्या विविध तपासण्या करण्याची सुविधा असून, अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही राबवले जातात. पारंपरिक आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमातलं ग्रंथालय इथं आहे.

सीपीसीआरआयनं ‘माझा गाव, माझा गौरव’ या संकल्पनेतून शास्त्रज्ञांना थेट काही गावांची जबाबदारी देऊन संबंधित पिकांच्या बाबतीत समृद्धी आणण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे. पिकांशी संबंधित विज्ञानवृद्धीसाठी सीपीसीआरआयनं फ्रान्स, इटली आणि जकार्ता या देशांबरोबर आणि देशातल्या विद्यापीठांशी सामंजस्य करार केले असून, पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून या संस्थेनं २०५० पर्यंतचा विकास-संशोधन आराखडा तयार केला आहे. सीपीसीआरआयमध्ये शेतीशास्त्र आणि संबंधित विद्यार्थ्यांसाठी थेट क्षेत्रावर काम करण्यापासून संशोधनक्षेत्रात कुशल कामगार, तंत्रज्ञ ते संशोधकपदांच्या असंख्य संधी असतात.

संस्थेचा पत्ता -
केंद्रीय पीकलागवड संशोधन संस्था,
कुडलू पोस्ट, कासारगोड, केरळ - ६७१ १२४.
दूरध्वनी - (०४९९४) २३२८९४
संकेतस्थळ - www.cpcri.gov.in

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang