न बोले तुम, न मैंने कुछ कहा... (सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर suhass.kirloskar@gmail.com
रविवार, 26 मार्च 2017

 

पार्श्वसंगीत हा कोणत्याही सिनेमाचा प्राण असतो. सिनेमाची दृश्‍यात्मकता पार्श्वसंगीतामुळं परिणामकारक ठरते. संगीतकाराला जेवढा वेळ गाणी करायला लागतो, तेवढाच वेळ आणि सर्जनशीलता पार्श्वसंगीतासाठीही लागत असते. सिनेमाच्या तंत्रामध्ये जसे बदल झाले, तसेच संगीताच्या या प्रकारामध्येसुद्धा काळाप्रमाणे बरेच बदल होत गेले. उदाहरणार्थ ः प्रत्येक पात्रासाठी वेगळं संगीत!

 

 

पार्श्वसंगीत हा कोणत्याही सिनेमाचा प्राण असतो. सिनेमाची दृश्‍यात्मकता पार्श्वसंगीतामुळं परिणामकारक ठरते. संगीतकाराला जेवढा वेळ गाणी करायला लागतो, तेवढाच वेळ आणि सर्जनशीलता पार्श्वसंगीतासाठीही लागत असते. सिनेमाच्या तंत्रामध्ये जसे बदल झाले, तसेच संगीताच्या या प्रकारामध्येसुद्धा काळाप्रमाणे बरेच बदल होत गेले. उदाहरणार्थ ः प्रत्येक पात्रासाठी वेगळं संगीत!

 

‘अ  ब तक छप्पन’ या सिनेमामध्ये जेव्हा जेव्हा नायक (नाना पाटेकर) त्याच्या पत्नीचा (रेवती) विचार करत असतो, तेव्हा तेव्हा सतार वाजत राहते. प्रख्यात सतारवादक नीलाद्रीकुमार यांनी वाजवलेली ही धून ऐकली, की सतार आणि नायकाची पत्नी यांची सांगड प्रेक्षक घालतो. तिचा खून झाल्यावर सारंगी वाजते आणि नंतर सतार वाजत राहते. मोजकंच बोलणारा नायक हळूहळू विचार करताना दिसतो. तेव्हा सतार वाजते आणि प्रेक्षकाला समजतं, की नायक पत्नीच्या खुनाचा सूड घेण्याचा विचार करत आहे. सलीम सुलेमान यांनी पार्श्वसंगीताच्या माध्यमातून नायकाचे विचार आपल्यापर्यंत हे असे पोचवलेले असतात!
***

सिनेमामध्ये बरेच प्रसंग असे असतात, की जिथं नायक नायिकेबद्दल विचार करतो आहे...पण तो कुणाबद्दल किंवा कशाबद्दल विचार करत आहे, हे प्रेक्षकांना कसं कळणार? कदाचित तो नायिकेचा विचार करत असेल किंवा नायिकेबद्दल विचार करताना एकदम खलनायकाबद्दल असूयाही बाळगून असू शकेल. अशा प्रसंगात संवाद नसल्यामुळं पार्श्वसंगीत संवादकाची भूमिका करत असतं. त्यासाठी संपूर्ण सिनेमाभर एक धून वाजवली जाते आणि प्रेक्षकांना तिची सवय करून दिली जाते. नायक पडद्यावर आला की बासरीवर ती धून वाजवतात. दोन प्रसंगांमध्येच प्रेक्षकांना तिची सवय होते. नायिका आली की तीच धून बासरीवर न वाजवता सतार/संतूरवर वाजते. अजाणतेपणी आपण नायकाची बासरीच्या धूनबरोबर सांगड घालतो. काही वेळानंतर, नायक नायिकेची वाट पाहत आहे, तिचा विचार करत आहे, असा प्रसंग असेल, तेव्हा नायक पडद्यावर असतो व ती धून बासरीवर न वाजवता संतूरवर वाजवली जाते. प्रेक्षक लगेच ओळखतो की नायक ‘ती’चा विचार करत आहे. ही किमया साधली जाते पार्श्वसंगीतामुळं.

पार्श्वसंगीत हा कोणत्याही सिनेमाचा प्राण असतो. सिनेमाची दृश्‍यात्मकता पार्श्वसंगीतामुळं परिणामकारक ठरते. संगीतकाराला जेवढा वेळ गाणी करायला लागतो, तेवढाच वेळ आणि सर्जनशीलता पार्श्वसंगीतासाठीही लागत असते. सिनेमाच्या तंत्रामध्ये जसे बदल झाले, तसेच संगीताच्या या प्रकारामध्येसुद्धा काळाप्रमाणे बरेच बदल होत गेले. उदाहरणार्थ ः प्रत्येक पात्रासाठी वेगळं संगीत!
***

‘लगान’ या सिनेमाचे संगीतदिग्दर्शक आहेत ए. आर. रहमान. या सिनेमामधल्या प्रत्येक पात्राला, प्रसंगाला वेगळं पार्श्वसंगीत आहे. ब्रिटिशांचा राजवाडा, ब्रिटिशांचं आगमन याला जो ड्रम, तालवाद्यं आणि ब्रास सेक्‍शन वाजला आहे, त्याचा परिणाम सिनेमाची भव्यता वाढवणारा आहे. कथा पुढं सरकत असताना एकेका पात्राचा प्रवेश होतो, तेव्हा त्या त्या पात्राच्या स्वभाव/गुणवैशिष्ट्यांप्रमाणे पार्श्वसंगीत वाजतं. सिनेमातल्या प्रत्येक पात्राला आपण त्या त्या सांगीतिक धूनमुळे ओळखतो - भुवन, गौरी, भुवनची आई, बाघा, टिपू, लाखा, कप्तान रसेल, एलिझाबेथ, वगैरे. ब्रास सेक्‍शन, सतार, ड्रम अशा वाद्यांचा मेळ जमतो आणि यानंतर कोरसमध्ये गातात ‘छूटे लगान, छूटे लगान,’ व्हायोलिननंतर तालवाद्याबरोबर कोरस ऐकू येतो ‘के भैया छूटे लगान’. संगीतकार सिनेमाच्या पार्श्वसंगीतामधून अशा प्रकारे प्रेक्षकावर संगीताचे संस्कार करतो, ऐकून ओळखण्याची सवय लावतो आणि आपण हळूहळू सिनेमाच्या वातावरणात सहभागी होतो. सिनेमाच्या नायकाचं म्हणजे भुवनचं गौरीवर प्रेम आहे; पण ब्रिटिशांच्या क्रिकेट संघाच्या कप्तानाची बहीणही भुवनवर अव्यक्त प्रेम करत असते. गौरीला ज्या ज्या वेळी ‘गोरी मेम’ दिसते, तेव्हा सवतीमत्सर दर्शवण्यासाठी एक विशिष्ट धून वाजते आणि प्रेक्षकाला सिनेमा बघताना कळतं, की गौरी काय विचार करते आहे...
***

सिनेमात असे काही भावपूर्ण प्रसंग असतात, की ते बघत असताना डोळे पाणावतात. ही किमया दिग्दर्शकाची आणि अभिनेते यांची तर असतेच; पण या संदर्भात पार्श्वसंगीतसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. ‘तारे जमींपर’ या सिनेमातला शेवटचा प्रसंग ः चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर केला जातो. ईशानला उत्कृष्ट चित्राचं बक्षीस जाहीर होतं. घाबरलेल्या ईशानला हे खरंच वाटत नाही. त्याला निकुंभ सर घेऊन येतात, तेव्हा बासरी वाजते. प्रमुख पाहुणे त्याला बक्षीस देतात आणि ईशान धावत जाऊन निकुंभ सरांना बिलगतो. सिंथेसायझरवर ‘खो न जाए ये तारे जमींपर’ ही धून वाजते (संगीत ः शंकर-एहसान-लॉय). हा प्रसंग डोळ्यांत पाणी आणणारा आहे. आवाज बंद करून
हा प्रसंग बघितल्यावर लक्षात येतं, की पार्श्वसंगीताचं महत्त्व काय असतं ते आणि सिनेमाला ‘दृक्‌-श्राव्य’ माध्यम का म्हणतात ते!
***

हाणामारीच्या दृश्‍यासाठी पार्श्वसंगीत म्हणून शास्त्रीय आलापगायन असा विचार कुणी करेल का? नाना पाटेकर यांनी ‘प्रहार’चं दिग्दर्शन केलं, तेव्हा त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या आवडीचं प्रतिबिंब सिनेमात दिसते. सिनेमाच्या शेवटी नायिकेच्या (डिम्पल) घराबाहेर गुंड येतात. त्यांना नायक (नाना) धडा शिकवतो. त्या हाणामारीच्या दृश्‍यासाठी वापरण्यात आलेला किशोरी आमोणकर यांचा आलाप ऐकून अंगावर काटा येतो. किशोरीताईंना आणि नानाच्या कल्पकतेला सलाम.
***

‘परिंदा’ या सिनेमात नायक, खलनायक, नायकाचं खलनायकात रूपांतर यासाठी वेगवेगळी तालवाद्यं वाजवण्यात आलेली आहेत. प्रेमप्रसंगाच्या वेळी वाजणारी बासरी, खलनायक सुरेश ओबेरॉय वाजवतो ती बासरी, गोळ्या झाडताना कारच्या काचा खाली होत असताना वाजलेला ब्रास सेक्‍शन, नंतर अचानक भीषण शांतता...आग दिसल्यावर अण्णाशेठ (नाना पाटेकर) वेडापिसा होतो, त्या वेळचं कर्नाटकशैलीचं पार्श्वसंगीत हे सगळंच संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी असं काही करून ठेवलं आहे, की त्यामुळं सिनेमामधले प्रसंग फार प्रभावीपणे समोर येतात. हॉटेलमध्ये सगळीकडं शांतता असताना होणारा बाटली ‘ओपन’ करतानाचा आवाज, फेसाचा आवाज हे त्या प्रसंगात पुढं काय होणार, याची चुणूक दाखवतात.
हे असं पार्श्वसंगीत ऐकत सिनेमा बघण्याची सवय मला लागली ती ‘तीसरी मंझिल’ आणि ‘शोले’ हे सिनेमे पाहण्याच्या वेळी. या दोन्ही सिनेमांच्या पार्श्वसंगीताबद्दल पुढच्या लेखात...

Web Title: suhas kirloskar's article in saptarang