पडदा बोलू  लागला...

‘आलमआरा’ ची त्यावेळची जाहिरात आणि त्या चित्रपटातील एक प्रसंग.
‘आलमआरा’ ची त्यावेळची जाहिरात आणि त्या चित्रपटातील एक प्रसंग.

मुंबईत "मॅजेस्टिक'' चित्रपटगृहात १४ मार्च १९३१ या दिवशी पहिला भारतीय बोलपट ‘आलमआरा'' प्रदर्शित झाला आणि भारतीयांच्या भावविश्‍वात अद्‌भूत असे साहित्य, संगीत, भाषा, अभिनय, सौंदर्य याचे कथापर्व सुरू झाले. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात सुरू झालेली नवनवीन शोधांची मालिका विज्ञान-तंत्रज्ञान यांच्या बोलणाऱ्या चित्रपटाच्या रूपाने जणू कळसाला गेली. मुंबईत दादासाहेब फाळके यांनी ३ मे १९१३ या दिवशी ‘राजा हरिश्चंद्रा’च्या रूपानं सुरू केलेली चलच्चित्राची सुरस कथा ‘आलमआरा''च्या रूपानं आर्देशीर इराणींनी उत्कंठावर्धक केली... तो दिवस होता १४ मार्च १९३१... त्याचा भावनिक आठव... 

गिरगावातल्या ‘मॅजेस्टिक’ चित्रपटगृहासमोर लोकांनी रांगा लावल्या होत्या. गाणारी, बोलणारी फिल्म हे एक नवल होतं. १९३१ मधला १४ मार्च हा दिवस ‘आलमआरा''च्या प्रदर्शनानं, पहिल्या भारतीय बोलपटाच्या पदार्पणाने गाजला आणि तो उत्सव आजच्या घडीलाही सुरू आहेच कारण शब्द, ध्वनी लाभलेला रजतपट आणि त्याभोवती घडणारे नाट्य हा आपल्या जीवनाचा सोहळा होऊन गेला. 

‘मॅजेस्टिक''वर अलोट गर्दी उसळली होती, वाहतूक अगदी विस्कळीत झाली होता. बोलपटाच्या या घटनेला अनेक हात लागले असले, तरी याचे प्रमुख शिल्पकार होते आर्देशीर इराणी ! ‘आलमआरा'' या अरबी सुरस कथेचे जनक. पुण्यात जन्मलेल्या (५ डिसेंबर १८८५) आर्देशीर इराणींचा प्रवास शाळामास्तर, पोलिस इन्स्पेक्‍टर, तंबू सिनेमा, वाद्याचे दुकान याला वळसा घालून हॉलिवूडपर्यंतचा आहे. ‘युनिव्हर्सल पिक्‍चर्स''चे ते प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना औद्योगिकरणाच्या जाणिवेनं ते मूकपट निर्मिती आणि अखेर १९२८ मध्ये स्वतःच्या सुसज्ज इम्पीरिअल मूव्हीटोनच्या निर्मितीत उतरले. ‘शो बोट'' या १९२९ मध्ये आलेल्या ४० टक्के बोलपटानं प्रभावित होऊन ते भारतीय बोलपटाची स्वप्नं पाहू लागले. कलकत्त्याचे ‘मादन थिएटर्स''देखील बोलपटनिर्मितीत प्रयत्नशील होते; पण आर्देशीर इराणींनी बाजी मारली. लॉस एंजलिसहून १९३० मध्ये मुंबईला निघालेल्या विल्फोर्ड डेमिंग या ध्वनिमुद्रण तंत्रज्ञाला शाही पाहुणचार तर त्यांनी दिलाच, पण स्वतः ध्वनिलेखन शिकून घेतलं. 

कोल्हापूरजवळच्या चिंचली मायक्का इथं जन्मलेला पण शरीरसौष्ठव, चापल्य, मर्दानी सौंदर्याचा जणू पुतळा असलेला विठ्ठल रघुनाथ देसाई म्हणजे मा. विठ्ठल याला शारदा फिल्मच्या करारातून सोडवून आपल्या बोलपटाचा नायक मुक्रर केला. गुजरातच्या नवाबाची पत्नी फातिमा बेगमची सुकुमार कन्या झुबैदा नायिका ठरवली. पेशावरहून आलेल्या धोबी तलावाजवळच्या काश्‍मिरी गेस्टहाऊसमध्ये पथारी टाकून राहिलेल्या देखण्या पृथ्वीराजना एक भूमिका दिली. हार्मोनियम, तबला घेऊन वझीर मुहम्मद खानला गाणं गायला लावलं. "दे दे खुदा के नाम दे दे...'' अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साऊंड प्रूफ यंत्रणेअभावी त्यावर मात करून बोलपटाची पहिली आद्याक्षरं रेखली.

पाठोपाठ कलकत्त्याचे ‘मादन थिएटर्स'', कोल्हापूरचे व नंतर पुण्यात आलेले ‘प्रभात'' यांनी ‘जमाई षष्ठी'', ‘अयोध्येचा राजा'' हे बोलपट आणले. पहिली भारतीय रंगीत फिल्म "किसान कन्या'' (१९३६) देखील इराणींनी नोंदली. स्पर्धेत मागे पडू लागले तरी मेहबूब खान, पृथ्वीराज कपूर, दादा साळवी, सुलोचना, रुबी मायर्स, जाल मर्चंट, झुबैदा, मुकुल बोस अशी गुणी माणसं देऊन ‘आलमआरा''चा बेशकिमती  नजराणा देऊन आर्देशीर इराणी १९६० मध्ये १४ ऑक्‍टोबरला  गेले. बहुधा आणखी देण्यासारखं उरलं नव्हतं. मूकपटाचा जमाना ज्यांच्या नावे लिहावा ते मा. विठ्ठल मात्र बोलपटाच्या जमान्यात निष्प्रभ ठरले. परतीचा प्रवास मराठी चित्रपटात जणू हरवून गेला. ‘इंडियन डग्लस'' म्हणून मिरवलेले मा. विठ्ठल कोल्हापुरात परतले. ‘छत्रपती संभाजी'', ‘मर्द मराठा'', ‘अमृत'', ‘बहिर्जी नाईक'', ‘ठकसेन राजपुत्र'', ‘मीठभाकर'' आणि अखेर ‘साधी माणसं'' इथं त्यांचा प्रवास संपला. 

१९२४ पासून मूकपटात काम करणाऱ्या झुबैदा पहिल्या बोलपटाच्या मानकरी नायिका ठरल्या; पण १९३५ मध्ये चित्रसृष्टीतून बाहेर पडल्या. टॉकीची निर्मिती आणि आपला आवाज ऐकण्याचे अनुभव रोमहर्षक होते, त्यासाठी थोडी नंतर जन्मले असते तर बरं झालं असतं, असं म्हणत राहिल्या... हैद्राबादच्या राजा धनराज गिरजींशी विवाह करून निवृत्त जीवन जगणाऱ्या झुबैदा १९८८ मध्ये गेल्या. इराणीसेठच्या बेबीला शाळेत सोडण्यापासून पडेल ती कामं करण्यासाठी तत्पर असलेले मेहबूब खान पुढे मोठे झाले. पृथ्वीराज कपूरने तर घराण्याची मुहूर्तमेढ रोवली. ‘आलमआरा''ची कहाणी अनेक शाखा-प्रशाखांनी फुलत राहिली. त्यात दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, मामा वरेरकर, नानासाहेब सरपोतदार, भालजी पेंढारकर इत्यादी मराठी माणसांनी व अन्य भारतीयांनी उभं केलेलं मूकपटाचे विश्‍व मात्र उपेक्षेच्या अंधारात लुप्तप्राय झालं. दृश्‍यात्मकतेतून प्रेक्षकांना खेचून घेणाऱ्या मूकपटाच्या चाहत्यांचा जल्लोष असे. थिएटरमध्ये पियानो, व्हायोलिन किंवा हार्मोनियम, तबला यांची साथ करून वातावरण निर्मिती केली जात असे. 

कमलाबाई गोखले, झेबुन्निसा, रुबी मायर्स, जाल मर्चंट, मा. निसार, खलील, राजा सॅण्डो ही मूकपटातील नावं अस्तंगत झाली; पण चित्रनिर्मितीचा अनुभव, माणसं यांनी टॉकीची पालखी उचलली. कथा पुरवल्या. विषय दिले. नवे गायक, संगीतकार, लेखक, गीतकार यांच्यासाठी ‘आलमआरा''ने राजरस्ता उघडून दिला. भारताचा नकाशा भारताच्या विविध प्रांतांतून आलेल्या कलावंतांनी आपापल्या शैलीनं रंगवून टाकलेला आहे. इराणींनी सर्व भारतीयांना एका सूत्रात गुंफणाऱ्या हिंदीचा प्रयोग केला आणि मुख्य धारेचा हिंदी सिनेमा आपली ओळख ठरला. 

चलच्चित्रापासून ते "टॉकी'' म्हणजे बोलपटापर्यंत अठरा वर्षे ही आमच्या संगीत रंगभूमीची ऐश्‍वर्याची आणि पुढे पतनाची वर्षे ठरली. मराठीच्या संगीत नाटक मंडळींचे संसार उद्‌ध्वस्त झाले. १९३१ नंतर तर मराठी संगीत नाटक मंडळींचे अस्तित्व संपुष्टात आले. पण सर्व संगीत साहित्याची जननी असलेल्या रंगभूमीने बोलपटाला आपलं ऐश्‍वर्य दिलं. तडाखेबाज संवाद, सुमधुर स्वर आणि कथा सांगणारे, ऐकणारे लोक आधीच्या परंपरेनं बोलपटाच्या विशाल रजतपटाला दिले आहेत हे विसरता कामा नये. ऐतिहासिक, पोषाखी, सामाजिक, काल्पनिक, पौराणिक कथा हृदयात असलेल्या भारताचा कथासरित्सागर हेलकावे घेत आहे. ‘आलमआरा''ची कहाणी म्हणूनच कधी संपणार नाही... 

(लेखिका चित्रपट आणि संगीतक्षेत्राच्या जाणकार आणि लेखिका आहेत.)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com