चूक मोठीच; पण गुन्हा नाही... | Twenty-20 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Team
चूक मोठीच; पण गुन्हा नाही...

चूक मोठीच; पण गुन्हा नाही...

नुकत्याच झालेल्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्‍वकरंडक स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीनंतर निराशा पसरली आहे. भारतीय संघाकडून अर्थातच खूप अपेक्षा असताना पहिल्या दोन महत्त्वाच्या सामन्यातील दारूण पराभवानंतर टीकेचे सूर उमटत आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कागदावर आखलेल्या योजना मैदानावर अजिबात राबवता न आल्याने लढत देण्याइतपतही खेळ करता आला नाही, ज्याने क्रिकेट चाहत्यांना राग आला आहे. खराब खेळ करताना भारतीय संघानं घोर निराशा आणि मोठी चूक केली आहे यात काडीमात्र शंका नाही. फक्त खेळाडूंनी गुन्हा केलेला नाही हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे.

भारतीय संघाच्या एक वर्षातील कामगिरीची तपासणी केली तर खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी करून दाखवली आहे हे नमूद करावे लागेल. २०२०च्या अखेरीपासून जानेवारी २०२१ च्या अखेरीपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. सक्षम ऑसी संघासमोर पहिला सामना भयानक पद्धतीने गमावून दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करताना भारतीय संघाने सामना जिंकला.

पुढील दोन कसोटी सामने असंख्य अडचणींवर मात करून एक अनिर्णित राखला तर शेवटचा जिंकला. संपूर्ण ताकदीने खेळणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या अंगणात कसोटी मालिकेत २-१ फरकाने पराभूत करायची कमाल भारतीय संघाने करून दाखवली होती.

पाठोपाठ इंग्लंड विरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका भारतात झाली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावल्यावर पुढील तीन कसोटी सामने प्रचंड मोठ्या फरकाने भारतीय संघाने जिंकले होते. मोठ्या दिमाखात जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यावर निर्णायक लढतीत खराब खेळ झाला आणि न्यूझीलंड संघाने पहिले विजेतेपद पटकावले. चुकीचा खेळ करायची घटना २०१९ जागतिक करंडक स्पर्धेत बघायला मिळाली त्याचीच पुनरावृत्ती नंतर झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत इंग्लंडसमोर इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील २ कसोटी सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-१ आघाडी घेतली होती. मालिका रंगात आली असताना शेवटच्या कसोटी सामन्याच्या आदल्या दिवशी कोरोनाची माशी शिंकली आणि सामना पुढे ढकलला गेला. भारतीय संघाची नुसती कसोटी क्रिकेटमधलीच कामगिरी सरस नव्हती तर एक दिवसीय आणि टी२० मालिकांमधली कामगिरीही चांगली होती. त्याच पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा झाली, ज्यात अपेक्षा अर्थातच वाढल्या होत्या. नेमके परत एकदा महत्वाच्या स्पर्धेत खराब खेळ झाला आणि भ्रमाचा भोपळा फुटला.

सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेत निर्णायक सामन्यात भारतीय संघाचा खेळ खराब व्हायला खेळाडू आणि बीसीसीआय एकत्र जबाबदार आहेत. रहाटगाडग्यासारखे सतत क्रिकेट खेळायला लावणाऱ्या बीसीसीआयची जेव्हढी चूक आहे तितकीच चूक मोह टाळून एखाद्या मालिकेतून विश्रांती घेऊन महत्त्वाच्या स्पर्धेकरता ताजेतवाने न राहणार्‍या खेळाडूंची आहे. ही दोन्ही हातांनी वाजलेली टाळी आहे. बीसीसीआय म्हणते की नुसता भारतीय संघच नव्हे तर बाकी संघही तितकेच आंतरराष्ट्रीय सामने खेळतात. फरक दोन गोष्टींचा आहे. एक म्हणजे भारतीय संघातील आणि आसपासचे सर्वच्या सर्व खेळाडू पावणे दोन महिन्यांची आयपीएल खेळतात. तसेच दुसरे म्हणजे सध्याचे पूर्ण क्रिकेट जैव सुरक्षा वातावरणात खेळावे लागत असल्याने त्याचाही असह्य ताण खेळाडूंवर येतो. अत्यंत भिन्नं आणि आव्हानात्मक वातावरणात क्रिकेट खेळायला लागल्याचा दुष्परिणाम शरीराबरोबर मनावरही होतो.

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होत आहे आणि लगेच १७ नोव्हेंबरपासून बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेचा घाट घालून ठेवला आहे. हे टाळले जात नाहीये कारण बीसीसीआय इतकेच खेळाडूही दणदणीत उत्पन्नाला हपापलेले आहेत.

अमाप पैशाचा राग

टीका करणाऱ्या सामान्य जनतेतील चाहत्यांना भारतीय खेळाडूंना मिळणाऱ्या वारेमाप पैशाचा राग येतो आहे असे सोशल मिडीयातील टिप्पणीवरून स्पष्ट दिसत आहे. आयपीएलचे जे आकडे कानावर येतात ते भयचकित करून सोडणारे आहेत यात शंका नाही. आपण इतकेच लक्षात घेतले पाहिजे की जगातील कोणत्याही व्यावसायिक क्रीडा स्पर्धांचे आकडे असेच भयानक मोठे आहेत. सर्वोत्तम आणि लोकप्रिय खेळाडूंना मिळणारे पैसे असेच मोठे आहेत.

विश्वास नाही बसत तर हे वाचा...

  • लायोनेल मेस्सीला त्याचा फुटबॉल क्लब आठवड्याला ६ कोटी ६२ लाख रुपये देतो.

  • तसेच अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्सला आठवड्याला ५ कोटी ९२ लाख मिळतात.

  • नोवाक जोकोविचचे आठवड्याची मिळकत ४ कोटी ९३ लाखाची आहे.

मी हे आकडे अशा करता सांगत आहे, जेणेकरून तुम्हांला जगातील इतर खेळाडूंना मिळणाऱ्या आमदनीचा अंदाज यावा. भारतात जाहिरातदारांना आपले प्रॉडक्ट बाजारात उभे करायला लोकप्रिय व्यक्तीची साथ लागते. आपल्या देशात बॉलिवूड आणि क्रिकेटपटूंची लोकप्रियता खास करून तरुण पिढीत अमाप असल्याने जाहिरातदार त्यांना करारबद्ध करतात. हा सगळा बाजाराचा खेळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे इतकेच. खराब खेळाने खेळाडूंच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली तर त्यांना मिळणाऱ्या जाहिरांतीचा ओघ क्षणार्धात घटतो हे सत्य आहे.

चेहरा नसलेली टिका

विश्‍व करंडक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर भारतीय संघावर खेळाडूंवर भरपूर टिका झाली. यातील धोरणात्मक टिका किंवा निराशेच्या पोटी झालेली टीका वाजवी आहे असे मला वाटते. पण ज्या व्यक्ती सोशल मिडीयावर स्वत:चे नांव सांगायची हिंमत करत नाहीत ते अत्यंत घाणेरड्या शब्दात टिप्पणी करतात तेव्हा नुसता राग येत नाही तर बिघडत चाललेल्या मानसिकतेची भिती वाटते. ज्याला सोशल मिडीयाच्या भाषेत ट्रोलिंग म्हणले जाते ते अजिबात पटत नाही. असे लोक स्वत:च्या जीवनातील निराशा किंवा अपयश घाणेरड्या भाषेत टिप्पणी करून व्यक्त करतात असे वाटते. ज्यांनी आयुष्यात स्वत: काहीही करून दाखवलेले नाही ते काहीतरी कमाल करून दाखवलेल्या व्यक्तींवर टिप्पणी करतात ते सहन होत नाही. महंमद शमीवर झालेली धार्मिक टिप्पणी तर लज्जास्पद वाटते. भारतीय संघ कोणता सामना जिंकला तरी हे सटकलेले लोक छातीठोकपणे सामना फिक्स्ड होता असे म्हणतात आणि गमावला तरीही फिक्स्ड होता म्हणतात. काय म्हणावे या मानसिकतेला ? मला खरच हे सगळं उमगत नाही. अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेत खराब कामगिरी करून संघाने घोडचूक केली आहे यात तिळमात्र शंका नाही. फक्त खराब कामगिरी हा गुन्हा नाही हे सुद्धा नम्रपणे सांगावेसे वाटते.

न्यूझीलंड मालिकेपासून राहुल द्रविड भारतीय मुख्य संघाच्या प्रशिक्षक पदाची सूत्र हाती घेत आहे त्याचा काळ २०२३ च्या विश्‍व करंडक स्पर्धेपर्यत चालणार आहे. दरम्यान लगेच सुरू होणाऱ्या न्यूझीलंड समोरच्या मालिकेकरता ट्वेन्टी-२० संघाचा कप्तान म्हणून अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माला जबाबदारी दिली गेली आहे. संघात बदल करताना हार्दिक पंड्याला बाहेर बसवले गेले आणि आणि ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली आहे भारतीय क्रिकेटचे रूप पुढील दोन वर्षात बदलण्याचे हे सर्व संकेत आहेत.

loading image
go to top